मार्चमध्ये डाक पेंशन अदालतीचे आयोजन
बुलडाणा, दि. 22 : टपाल विभागातील निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्त वेतनधारकांसाठी 52वी पेंशन अदालत दि. 16 मार्च 2023 रोजी सकाळी 11 वाजता मुंबई येथील मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल येथे आयोजित केली आहे.
निवृत्ती वेतनधारकांच्या लाभाशी संबंधित तक्रारी, टपाल विभागातून निवृत्त झालेले, सेवेत असताना मुत्यू झाले आहे, टपाल विभागात महाराष्ट्र आणि गोवा राज्यांचे निवृतीवेतनधारकांची 3 महिन्यांच्या आत पूर्तता झालेली नाही, अशा प्रकरणाचा डाक पेंशन अदालतीमध्ये विचार केला जाणार आहे.
पेंशन अदालतीमध्ये पूर्णपणे कायदेशीर मुद्दांसह प्रकरणे, वारसा प्रमाणपत्र, कल्पित पेंशन टीबीओपी, एमएसीपी पदोन्नती, वेतनश्रेणी वाढविणे आणि धोरणात्मक बाबींसह शिस्तभंगाच्या आणि डीपीसीच्या पुनरावलोकनासाठी प्रलंबित प्रकरणाचा विचार केला जाणार नाही. निवृत्तीवेतनधारकांनी दिलेल्या पत्रामध्ये आपल्या अर्जाचे तीन प्रती लेखा अधिकारी, सचिव, पेंशन अदालत, मुख्य पोस्टमास्तर जनरल कार्यालय, महाराष्ट्र सर्कल, मुंबई जीपीओ भवन, दुसरा मजला, मुबई 400 001 येथे पाठवावेत, असे आवाहन डाक अधिक्षक यांनी केले आहे.
000000
सोनोग्राफी, एमटीपी केंद्रचालकांना कार्यशाळेत मार्गदर्शन
बुलडाणा, दि. 22 : पीसीपीएनडीटी कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व सोनोग्राफी आणि एमटीपी केंद्र चालकांसाठी मंगळवार, दि. 21 फेब्रुवारी रोजी जिल्हा स्त्री व बाल रुग्णालयात एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. यात कायदेशीर बाबींचे मार्गदर्शन करण्यात आले.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुशील चव्हाण अध्यक्षस्थानी होते. यावेळी वैद्यकीय अधिक्षक डॉ. सचिन वासेकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. यास्मीन चौधरी, मुख्य प्रशासकीय अधिकारी अनिल बांगर, रेडिओलॉजिस्ट डॉ. संजय बोथरा, डॉ. डी. डी कुळकर्णी, डॉ. अर्चना वानेरे, अॅड. सुभाष विणकर उपस्थित होते.
ॲड. सुभाष विणकर यांनी पीसीपीएनडीटी कायद्याची माहिती दिली. डॉ. संजय बोथरा यांनी सोनोग्राफी, एमटीपी सेंटरधारकांनी अवैध कार्य करू नये असे सांगितले. डॉ. डी. डी. कुळकर्णी आणि डॉ. अर्चना वानेरे यांनी एमटीपीबाबत मार्गदर्शन केले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुशील चव्हाण यांनी पीसीपीएनडीटी कार्यक्रमाची माहिती दिली. सोनोग्राफी, एमटीपी सेंटरधारकांना कायदेशीर अडचणी आल्यास प्रशासनाकडून योग्य सहकार्य देण्यात येईल, असे सांगितले. तसेच शासनाच्या खबऱ्या बक्षीस योजना, टोल फ्री क्रमांकाबाबत माहिती देऊन जिल्ह्यातील मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन केले.
जिल्हा रुग्णालयाच्या विधी समुपदेशक ॲड. वंदना तायडे यांनी प्रास्ताविक केले. सुनिल जोशी यांनी सूत्रसंचालन केले. कार्यशाळेसाठी रुग्णालयातील पीसीपीएनडीटी विभागातील के. पी. भोंडे, विवेक जोशी यांनी पुढाकार घेतला.
0000000
नवउद्योजकांनी स्टँड अप इंडिया योजनेचा लाभ घ्यावा
*समाज कल्याण विभागाचे आवाहन
बुलडाणा, दि. 22 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील नवउद्योजकांसाठी केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजना राबविण्यात येते. या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागातर्फे करण्यात आले आहे.
या योजनेंतर्गत धनगर समाजाच्या महिलांसाठी स्टँड अप इंडिया योजना सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील नवउद्योजक, तसेच धनगर समाजाच्या महिलांसाठी उद्योग आधार नोंदणी पत्र, जात प्रमाणपत्र, बॅंकेचे कर्ज मंजूरीची कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहेत. सदर योजनेतील सवलतीस पात्र नवउद्योजकांनी 10 टक्के स्वहिस्सा भरण केल्यानंतर व बँकेने अर्जदारास स्टॅण्ड अप इंडिया योजनेंतर्गत 75 टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित 15 टक्के राज्य शासनामार्फत देण्यात येणार आहे.
पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयास दि. 28 फेब्रुवारी 2023 पर्यंत सादर करावे, असे आवाहन समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment