Tuesday, 14 February 2023

DIO BULDANA NEWS 14.02.2023

 





जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबविणार

-जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड

बुलडाणा, दि. 14 : येत्या महिन्यात दहावी आणि बारावीची परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षा भयमुक्त वातावरणात होण्यासाठी कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांनी दिली.

          जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान राबविण्यासंदर्भात बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक सारंग आवाड, निवासी उपजिल्हाधिकारी गौरी सावंत, माध्यमिक शिक्षणाधिकारी मुकुंद प्रकाश आदी उपस्थित होते.

          जिल्ह्यात 113 केंद्रावरून 32 हजार 183 विद्यार्थी बारावी, तर 153 केंद्रांवरून 39 हजार 684 विद्यार्थी दहावीची परीक्षा देतील. 21 फेब्रुवारी ते 25 मार्चपर्यंत या परीक्षा  चालणार आहेत. ही परीक्षा  कॉपीमुक्त होण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहे. यात करण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांमध्ये भरारी आणि बैठे पथकांची निर्मिती करण्यात येणार आहे. प्रत्येक तालुक्यासाठी एक भरारी पथक, तर प्रत्येक केंद्रासाठी एक बैठे पथक राहणार आहे. बैठे पथकात विविध कार्यालयाच्या अधिकारी, कर्मचारी यांचा समावेश राहणार आहे. हे पथक प्रामुख्याने केंद्रावरील गैरप्रकार रोखण्यास मदत करणार आहे.

          परीक्षा केंद्रावर केवळ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. केंद्राच्या 100 मीटरच्या परिसरात बंदी आदेश लागू करण्यात येणार आहे. परीक्षा  केंद्रामध्ये जाण्यापूर्वी विद्यार्थ्यांची संपूर्ण तपासणी करण्यात येणार आहे. परीक्षा सुरू होण्यापूर्वी अर्धा तास अगोदर विद्यार्थ्यांनी त्यांच्या जागी उपस्थित राहावे, लागणार आहे. परीक्षा  सुरू झाल्यानंतर कोणत्याही विद्यार्थ्याला प्रवेश दिला जाणार नाही. तसेच परीक्षा  सुरू होण्याच्या वेळीच प्रश्नपत्रिका दिल्या जाणार आहे. परीक्षा केंद्राच्या परिसरात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचविण्यासाठी सार्वजनिक वाहतूक आणि विजेचा पुरवठा सुरळीत सुरू राहावा, यासाठी दक्षता घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी आणि प्रसाधनगृहाची व्यवस्था ठेवण्यात येणार आहे.

          कॉपीमुक्त परीक्षा  होण्यासाठी पालक, शिक्षक, संस्थाचालक तसेच शासकीय, अधिकारी कर्मचारी यांच्यात जाणीव जागृती करण्यात येत आहे. हे अभियान यशस्वी होण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. तुम्मोड यांनी केले आहे.

00000

सेसमधील लाभार्थ्यांची आज निवड

बुलडाणा, दि. 14 : जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या सेस अंतर्गत साहित्यासाठी लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. लाभार्थ्यांच्या निवडीसाठी बुधवार, 15 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा परिषदेतील श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात ईश्वर चिठ्ठी काढण्यात येणार आहे.

महिला बालकल्याण विभाग आणि समाज कल्याण विभागातर्फे वैयक्तिक लाभाच्या विविध योजना 2022-23 या वर्षात राबविण्यासाठी अटी व शर्तींच्या अधिन राहून पात्र लाभार्थ्यांमधून लाभार्थीची ईश्वर चिठ्ठीने निवड करावयाची आहे. यात पिठाची गिरणी, शिलाई मशिन, पिको फॉल मशिन, मसाला उद्योग यंत्र, पल्वरायजर यंत्र आणि अदिवासी घटक उपयोजनेंतर्गत पिठाची गिरणी, शिलाई मशिन, मिनी दालमिल, तसेच समाज कल्याण विभागांतर्गत झेराक्स मशिन, 5 एचपी विद्युत मोटार पंप, शिलाई मशिन या लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. यावेळी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे.

000000



भूजल पंधरवडाचे उद्घाटन

बुलडाणा, दि. 14 : भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या वरिष्ठ भूवैज्ञानिक कार्यालयातील जिल्हा प्रकल्प व्यवस्थापन कक्षात अटल भूजल पंधरवडाचे उद्घाटन  करण्यात आले. प्रादेशिक उपसंचालक डॉ. प्रविण कथने यांच्या हस्ते सोमवार, दि. 13 फेब्रुवारी 2023 रोजी उद्घाटन करण्यात आले.

जिल्हा आणि योजनेमध्ये समाविष्ठ असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये जाणीव जागृती  करणे आणि लोकसहभागातून योजना पूर्ण करण्यासाठी दि. १३ ते २७ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत जिल्हा आणि ग्रामपंचायतस्तरावर अटल भूजल पंधरवडा साजरा करण्याबाबत माहिती देण्यात आली. यात जिल्हास्तरावर संलग्न अधिकाऱ्यांसोबत कार्यक्रम, ग्रामपंचायतस्तरावर शेतकरी मेळावे, शालेय विद्यार्थ्यांच्या पाण्यासंदर्भात स्पर्धा, शाळांमधून प्रभातफेरी, रन फॉर वॉटर, जलदिंडी आदी कार्यक्रम घेण्यात येणार आहे. वृक्षारोपण आणि ग्रामस्तरावर महिलांची गटचर्चा घेऊन त्यांना परसबागेसाठी देशी वाणांच्या भाजीपाला बियाण्यांचे वाटप करणे, तसेच अटल भूजल योजनेंतर्गत उत्कृष्ठ काम करणाऱ्या सरपंच, प्रभावी महिला, उत्कृष्ठ मुलांची निवड करून त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

डॉ. कथने यांनी अटल भूजल योजनेचा आढावा घेऊन योजना चांगल्याप्रकारे राबवित असल्याबाबत समाधान व्यक्त केले. यावेळी कनिष्ठ भूवैज्ञानिक सोहम डव्हळे, स्वाती बैनाडे, उपलेखापाल आकाश महाजन, कनिष्ठ लिपिक समाधान गवई, नाईक अर्जुन मस्के, जलसंधारण तज्‍ज्ञ अक्षय ढवळी, लेखा सहायक किशोर गव्हाणे, रसायनी सुरेखा शेळके, डाटा एन्ट्री ऑपरेटर सोनाली भुतेकर आदी उपस्थित होते. माहिती शिक्षण संवाद तज्‍ज्ञ एस. जी. डावर यांनी जल प्रतिज्ञा दिली.

000000

सोमवारी महिला लोकशाही दिनाचे आयोजन

बुलडाणा, दि. 14 : जिल्हास्तरीय लोकशाही दिन दर महिन्याच्या सोमवारी आयोजित करण्यात येतो. त्यानुषंगाने फेब्रुवारी महिन्याचा महिला लोकशाही दिन सोमवार, दि. 20 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे.

महिलांनी त्यांच्या तक्रारीसाठी निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अशोक मारवाडी यांनी केले आहे.

000000

3 comments: