नवीन तंत्रज्ञानाच्या जिज्ञासेने कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांची गर्दी
*खासदार प्रतापराव जाधव, आमदार श्वेता महाले यांच्या भेटी
*200 स्टॉलमधून शेती तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन
*सांस्कृतिक कार्यक्रमाने वेधले लक्ष
*पाककला स्पर्धेत महिलांचा उत्साही सहभाग
बुलडाणा, दि १२ : जिल्हास्तरीय कृषी प्रदर्शनाला शुक्रवारपासून उत्साहात सुरुवात झाली. या महोत्सवात विविध शासकीय योजना तसेच शेतीविषयक तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन करणारे स्टॉल लावण्यात आलेले आहे. या नवीन तंत्रज्ञानाच्या जिज्ञासेने शेतकऱ्यांनी कृषी प्रदर्शनात गर्दी केली आहे
दरम्यान कृषी प्रदर्शनाला खासदार प्रतापराव जाधव आणि आमदार श्वेता महाले यांनी भेट दिली. खासदार प्रतापराव जाधव यांनी शनिवार, दि. 11 फेब्रुवारी रोजी कृषी प्रदर्शनाला भेट दिली. त्यांनी प्रदर्शनातील कृषी विभाग, तसेच इतर शासकीय विभागांचे दालन, बचत गट आणि शेतकरी उत्पादक कंपनी व इतर कृषी निविष्ठा पुरवठा कंपन्यांच्या दालनास भेट देऊन समाधान व्यक्त केले. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला शेतमाल थेट ग्राहकांना विक्रीसाठी उपलब्ध झाल्याबद्दल श्री. जाधव यांनी समाधान व्यक्त केले. कृषी प्रदर्शनाचा शेतकऱ्यांना लाभ होणार असून या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून शेतीचे उत्पादन वाढविण्यासाठी हे प्रदर्शन उपयोगी पडत असल्याने शेतकऱ्यांनी कृषी प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन केले.
कृषी प्रदर्शनीला आमदार श्वेता महाले यांनी आज भेट दिली. कृषी प्रदर्शनात तज्ज्ञ व्यक्तीमार्फत मार्गदर्शन करण्यात येत असल्याने हे ज्ञान शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणार आहे. त्यासोबतच कृषी यांत्रिकीकरणाबाबत मुबलक माहिती देण्यात येत आहे. याचाही शेतकऱ्यांनी लाभ घेऊन उत्पादन पश्चात करण्यात येणाऱ्या प्रक्रियांची माहिती घ्यावी, असे आवाहन केले.
सदर प्रदर्शनी दिनांक 14 फेब्रुवारी पर्यंत सुरू राहणार असून यात कृषी विषयक माहिती सोबतच विविध सांस्कृतिक कार्यक्रम, महिलांसाठी पाककला स्पर्धा आणि तज्ज्ञ व्यक्तींमार्फत विविध सत्रांमध्ये माहिती देण्यात येत आहे. कृषी विषयक माहिती देण्यासाठी शासकीय आणि इतर तंत्रज्ञान विषयक 200 स्टॉल जिजामाता प्रेक्षागार येथे लावण्यात आले आहे. यासोबतच विविध बचतगटांच्या खाद्यपदार्थांचे स्टॉलवर खवैय्यांची गर्दी होत आहे. या सर्व वैविध्यमुळे शेतकऱ्यांसह शहरातील नागरिकही मोठ्या संख्येने कृषी प्रदर्शनाला भेट देत आहेत.
कृषि प्रदर्शनान सोमवार, दि. 13 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे सहायक प्राध्यापक डॉ. योगेश इंगळे हे संत्रा पिक व्यवस्थापन, तर दुपारी दोन वाजता विषयतज्ज्ञ श्रीमती के. सी. गांगडे ह्या पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्व याबाबत मार्गदर्शन करतील.
मंगळवार, दि. 14 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सी. पी. जायभाये हे पौष्टिक तृणधान्य लागवड तंत्रज्ञान व बाजारपेठ याबाबत मार्गदर्शन करतील. दुपारी दोन वाजता कृषि महोत्सवाचा समारोप करण्यात येणार आहे.
कृषी प्रदर्शनी ही शेतकऱ्यांसह नागरिकांनाही पर्वणी ठरवणार आहे. कोरोना कालावधीनंतर तब्बल तीन वर्षानंतर भव्य दिव्य अशी कृषी प्रदर्शनी आयोजित करण्यात आली आहे.या महोत्सवाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कृषि विभागातर्फे करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment