Tuesday, 27 October 2020

DIO BULDANA NEWS 27.10.2020

 तूर पिकावरील किडींचे व्यवस्थापन करावे

  • कृषि विभागाचे आवाहन
  • शेंगा पोखरणारी हिरवी अळी, पिसारी पतंग, शेंगमाशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता

बुलडाणा, (जिमाका) दि. 27 : तूर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या किडीमध्ये हिरवी अळी अर्थात घाटे अळी, पिसारी पतंग, शेंग माशी या अळ्यांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेंगा पोखरणाऱ्या किडीस हिरवी अळी, घाटेअळी आदी नावांनी संबोधण्यात येते. ही किड बहुभक्षी कीड असून हरभरा, वाटाणा, सोयाबीन, चवळी आदी कडधान्य पिकांवर फार मोठ्या प्रमाणावर आढळून येते. याशिवायी कपाशी, ज्वारी, टमाटे, सुर्यफूल, करडई या पिकांवरसुद्धा आढळून येते.

     शेंगा पोखरणाऱ्या किडीची पतंग शरीराने दणकट व पिवळसर रंगाचा असतो. पंखाची लांबी सुमारे 37 मी. मी असते. पुढील तपकीरी पंख जोडीवर काळे ठिपके असतात. तर मागील पंखाच्या कडा धुरकट रंगाच्या असतात. पुर्ण वाढ झालेली अळी 37-50 मी.मी लांब असून पोपटी रंगाची असली तरी विविध रंग छटा असलेल्या अळ्याही दृष्टीस पडतात. अळीच्या शरीराच्या बाजुवर तुटक तुटक करड्या रंगाच्या उभ्या रेषा आढळतात. अंडी पिवळसर पांढऱ्या रंगाची व गोलाकार असतात. या अंडीचा खालील भाग सपाट असून पृष्ठभाग घुमटकार असतो. मादी नरापेक्षा मोठी असून तिच्या शरीराच्या मागील भागांवर केसांचा झुपका असतो.

     या किडीची मादी सरासरी 600 ते 800 अंडी तूरीची कोवळी पाने, देठ अथवा कळ्या, फुले तसेच शेंगांवर वेगवेगळी घालत असते. अंडी अवस्था 3 ते 4 दिवसांची असते. अंडीतून बाहेर पडलेल्या अळ्या सुरूवातीस सुस्त असून प्रथम कोवळी पाने व देठ कुरतडून खातात. डिसेंबर ते जानेवारी दरम्यान आभाळ आभ्राच्छादीत असल्यास या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळतो. ही अळी सहा अवस्थांमधून जावून 18-25 दिवसांनी जमिनीत मातीच्या वेष्ठनात अथवा झाडाच्या पालापाचोळ्यात कोषावस्थेत जातात. कोषअवस्था 7 ते 14 दिवसांची असते. या किडीचा जिवनक्रम 4-5 आठवड्यात पूर्ण होतो.

   तूर पिकावर येणारी दुसरी महत्वाची किड पिसारी पतंग आहे. हा पिसारी पतंग नाजूक निमुळता 12.5 मि.मी लांब करड्या/भुऱ्या रंगाचा असतो. पुढील पंख दुभंगलेले व मागील पंख तीन भागात विभागलेले असतात. त्यांच्या कडांवर नाजूक केसांची दाट लव असते. पुढील पंख खूप लांब असून त्यांचे पाय लांब व बारीक असतात. त्यामुळे त्यांना पिसारी पतंग म्हणतात. अळी हिरव्या रंगाची, मध्ये फुगीर व दोन्ही टोकांकडे निमुळती होत गेलेली असते. तिचे शरीर केस व लहान लहान काट्यांनी आच्छादलेले असते. कोष लालसर, तपकीरी रंगाचे असून अळीसारखे दिसतात.  अंड्यातून बाहेर पडलेली अळी कळ्या, फुले व शेंगांना छिद्रे पाडून खाते. पुर्ण वाढ झालेली अळी प्रथम शेंगेचा पृष्ठभाग खरडून खाते व नंतर शेंगेला शेंगेच्या बाहेर राहून खाते. समागमानंतर मादी कोवळी देठे, कळ्या, फुले व लहान शेंगावर रात्रीच्या वेळी अलग अलग अंडी घालते. अंडी 3 ते 5 दिवसात उबून त्यातून बाहेर पडलेली अळी शेंगेवर अथवा शेंगेवरील छिद्रात कोषावस्थेत जाते. कोषावस्था 4 ते 7 दिवसांची असून ह्या किडीची एक पिढी 18 ते 28 दिवसात पुर्ण होते. ही कीड पावसाळा संपल्यानंतर तुरीवर मोठ्या प्रमाणात क्रियाशील असते.

   शेंगमाशी ही आकाराने फारच लहान 1.5 मि.मी लांब असते. माशीचा रंग हिरवट असतो. मादी नरापेक्षा किंचीत मोठी असते. पुढील पंखाची लांबी 4 मि.मी असते. अळी बारीक, गुळगुळीत व पांढऱ्या रंगाची असून तिला पाय नसतात. तिचा तोंडाकडील भाग निमुळता असतो.  शेंगमाशीच्या प्रादुर्भावाने शेंगेवर कोणतेही लक्षण दिसत नाही. मात्र जेव्हा पूर्ण वाढलेली अळी कोषावस्थेत जाण्यापूर्वी शेंगेला छिद्र पाडते. त्यामुळे दाण्याची मुकणी होते. त्यावर वाढणाऱ्या बुरशीमुळे दाणे कुजतात. मादी शेंगाच्या सालीच्या आत अंडी घालते. ही अंडी 3 ते 8 दिवसात उबून त्यातून निघणारी अपाद  अळी सुरूवातीस दाण्याचा पृष्ठभाग कुरतडून खाते, त्यामुळे दाण्यावर नागमोडी खाचा तयार झालेल्या दिसतात. एक अळी एका दाण्यावरच दरभरण करून जिवनक्रम पुर्ण करते. जिवनक्रम पुर्ण होईपर्यंत अळी शेंगेतच राहते. अळी अवस्था 10 ते 18 दिवसांची असून पुर्ण वाढ झालेली अळी शेंगेतच राहते. कोष दाण्याच्या बाहेरपण शेगंगेतच असतो. कोषावस्था 4 ते 9 दिवसांची असते. माशीची अळीने शेंगेत जाण्यापूर्वी तयार केलेल्या छिद्रावरील पातळ आवरण फोडून कोषामधून निघालेली माशी शेंगेच्या बाहेर पडते. शेंग माशीचा जीवनक्रम 3 ते 4 आठवड्यात पूर्ण होतो.

   या किडींच्या नियंत्रणासाठी तृणधान्य व तेलबिया पिकांबरोबर पिकांची फेरपालट करावी, पेरणीपूर्वी मशागत खोल नांगरणी व वखरणी करावी, वेळेवर कोळपणी व खुरपणी करावी, अळ्या वेचून त्यांचा नाश करावा, हेक्टरी 20 पक्षीथांबे पिकात उभारावीत, घाटे अळीच्या नियंत्रणाकरीता त्या अळीचा विषाणू (एचएनपीव्ही) प्रति हेक्टर 500 रोगग्रस्त अळ्यांचा अर्क फवारावा, शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणाकरीता 5 टक्के निंबोळी अर्क फवारावा.

  तसेच या किडीच्या नियंत्रणाकरीता 50 टक्के फुलोऱ्यावर असताना पहिली फवारणी करावी.  आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यास अझाडिरेक्टीन 300 पीपीएम 50 मि.ली किंवा अझाडिरेक्टीन 1500 पीपीएम 25 मि.ली किंवा एचएनपीव्हीएच (1 x 100 पीओबी / मिली) 500 एल ई / हेक्टर किंवा  बॅसिलस थुरीजीएंसिस 15 मिली किंवा क्विनॉलफॉस 25 ईसी 20 मिली  प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पहिल्या फवारणीनंतर 15 दिवसांनी दुसरी फवारणी करावी. इमामेक्टीन बॅन्झोएट 5 टक्के 3 एसजी 4.4 ग्रॅम किंवा लॅमडा सायहेलेथ्रीन 5 टक्के प्रवाही 10 मिली किंवा क्लोरॅनट्रॅनीलीप्रोल 15.5 एससी प्रवाही 2.5 मिली प्रती 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी,   असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी संतोष डाबरे यांनी केले आहे.

                                                                        **********

जवळा बु. येथील परिचराविरूद्ध प्रशासकीय कार्यवाही

बुलडाणा, (जिमाका) दि. 27 : शेगांव तालुक्यातील जवळा बु. येथील जिल्हा परीषद हायस्कूलमधील कार्यरत परिचर श्रीमती अंबिका ज्ञानदेव बावणे 3 जुलै 2018 पासून सदर कार्यालयास कोणताही अर्ज सादर न करता अनधिकृत गैरहजर आहेत. त्यांच्याविरूद्ध सदर गैरहजेरीच्या अनुषंगाने महाराष्ट्र जिल्हा परिषदा, जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम, 1964 (6) नुसार खाते चौकशी प्रस्तावित करण्यात आलेली आहे. सदर कार्यवाही अंतर्गत श्रीमती अंबिका ज्ञानदेव बावणे यांना ज्ञापन व जोडपत्र 1 ते 4 त्यांच्या पत्त्यावर पाठविण्यात आले आहे. मात्र त्यांनी दिलेल्या पत्त्यावर राहत नसल्याने सदर ज्ञापन व जोडपत्र पोच करता आलेले नाही. सबब त्यांना एतद्वारा सुचीत करण्यात येते की, त्यांनी सदर प्रकटनाचे प्रसिद्धीचे दिनांकापासून 10 दिवसाचे आत त्यांचे कार्यालयास उपस्थित होवून सदरचे ज्ञापन व जोडपत्र 1 ते 4 स्वीकारावे अन्यथा सेवेतून बडतर्फ करण्यासाठी त्यांच्याविरूद्ध एकतर्फी कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे, याची नोंद घ्यावी, असे मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प बुलडाणा यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

                                                                        **********

माजी सैनिक / विधवांच्या पाल्यांना पंतप्रधान शिष्यवृत्ती योजना लागू

  • लाभ घेण्याचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांचे आवाहन
  • 15 नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करावे

बुलडाणा, (जिमाका) दि. 27 : जिल्ह्यातील माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा पत्नी व अवलंबित यांच्या पाल्यांसाठी पंतप्रधान शिष्यवृत्ती योजना लागू करण्यात आली आहे. योजनेनुसार उच्च माध्यमिक परीक्षा अर्थात इयत्ता 12 वी, पदवी या परीक्षेमध्ये 60 टक्के गुण किंवा त्यापेक्षा अधिक गुणांनी उत्तीर्ण होऊन सन 2020-21 या वर्षात बीई, बीटेक, बी आर्च, बीडीएस, एमबीबीएस, बी एड, बीबीए, बीसीए, बी फार्मा, एमबीए, एमसीए आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षात शिकणाऱ्या पाल्यांना लाभ देण्यात येतो. तसेच इतर अभ्यासक्रमांची यादी www.ksb.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ज्या माजी सैनिकांची पाल्ये वर्ष 2020-21 या सत्रात शिक्षण घेत आहेत, अशा पाल्यांसाठी पंतप्रधान शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज व इतर माहिती सदर संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

    या संकेतस्थळामध्ये नमूद केलेल्या अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत असलेल्या वरील अटी पुर्ण करीत असलेल्या माजी सैनिक / विधवा यांचे पाल्यांनी सर्व कागदपत्रांची  पुर्तता करून त्यांचे अर्ज www.ksb.gov.in या संकेतस्थळावर  ऑनलाईन अर्ज करावे. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर संकेतस्थळामध्ये दिल्याप्रमाणे सर्व कागदपत्रे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, बुलडाणा येथे तपासणी करीता सादर करावेत. अर्ज सादर करण्याची अंतिम 15 नोव्हेंबर 2020 पर्यंत आहे. तरी पंतप्रधान शिष्यवृत्ती योजनेचा जास्तीत जास्त माजी सैनिक व त्यांच्या विधवा पत्नी यांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा. अधिक माहितीकरीता सहा. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सुर्यकांत सोनटक्के यांचेशी संपर्क साधावा. किंवा 07262-242208 क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

                                                *********

                शिष्यवृत्तीचे प्रलंबित अर्ज तातडीने निकाली काढावे

·        समाज कल्याण विभागाचे आवाहन

·        विद्यार्थ्यांनी आधार क्रमांक दिला नसल्यास आधार अपडेट करावा

बुलडाणा, (जिमाका) दि. 27 : महाडीबीटी पोर्टलवरील अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे सन 2018-19, 2019-20 मधील प्रलंबित शिष्यवृत्ती, फ्रीशीपचे अर्ज तातडीने निकाली काढण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त यांनी केले आहे.

  मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी नवीन अर्ज भरत असताना आधार नोंदणीकृत अर्ज भरणे आवश्यक आहे. सन 2018-19, 2019-20 मध्ये ज्या मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी आधार क्रमांक नसलेले अर्ज भरले आहेत. अशा विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रोफाईलमध्ये जावून आधार क्रमांक तसेच आधार संलग्नीकृत बँक खात्याची माहिती अद्ययावत करणे आवश्यक आहे. मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न आहे की नाही याची पडताळणी आधार पोर्टलवरील https://resident.uidai.gov.in/bankmapper या लिंकवरती जावून करावी. विद्यार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलवरील प्रणालीद्वारे निर्गमीत झालेले पेमेंट व्हाऊचर विद्यार्थी लॉग इनमध्ये जावून त्वरित रीडीम करावेत. यासाठी विद्यार्थ्यांनी आपला युजर आयडी व पासवर्ड जतन करून ठेवणे आवश्यक आहे. महाडीबीटी प्रणालीमध्ये नोंदणीकृत होत असताना जे लॉगीन आयडी विद्यार्थ्याने तयार केलेला आहे. तोच लॉगीन आयडी विद्यार्थ्यांनी कायमस्वरूपी लक्षात ठेवून वापरावा. जेणेकरून भविष्यात याबाबत कोणताही लॉगीन आयडी दुबार तयार होणार नाही. तसेच आपला लॉगीन आयडी व सापवर्डची माहिती गोपनीय ठेवल्यास दुरूपयोग होणार नाही.

                                                                        महाविद्यालयांनी करावयाची कार्यवाही

    महाविद्यालय स्तरावरील स्क्रुटीनी पर्यायाचा वापर करून प्रलंबित अर्ज फॉरवर्ड करत असताना प्रणालीमध्ये दर्शविण्यात आलेल्या सर्व बाबींची खात्री करून तपासूनच पात्र अर्ज मंजूरीकरीता विहीत मुदतीत जिल्हा कार्यालयास प्रणालीद्वारे ऑनलाईन पाठविण्यात यावेत. ज्या विद्यार्थी व महाविद्यालय यांना शिष्यवृत्तीचा पहिला हप्ता मिळालेला आहे, त्यांनी दुसऱ्या हप्त्याकरीता महाविद्यालय लॉगीनमधून द्वितीय सत्राची उपस्थिती अद्ययावत करूनच अर्ज मंजूरीकरीता विहीत मुदतीत पाठवावेत. महाविद्यालयाच्या लॉगीनमध्ये अलॉटमेंट डेट वाईज रिपोर्ट या पर्यायाचा वापर करून अर्ज अलॉट झाला की नाही, याची महाविद्यालयाने वेळोवेळी पडताळणी करणे आवश्यक आहे व नॉट अलोटेड अर्जाबाबत त्रुटी पुर्तता करण्यासाठी संबंधीत विद्यार्थ्याला त्वरित याबाबत अवगत करावे. महाविद्यालयांनी संबंधीत लॉगीनमधील डिबीटी डॅशबोर्ड या पर्यायाचा वापर करून शिष्यवृत्ती बाबतचा महाविद्यालय निहाय तपशील अहवाल दिसून येतो. तसेच लॉगीनमध्ये इन्स्टीट्युट डिस्बरमेंट रिपोर्ट, स्टुडन्ट डिस्बरमेंट रिपोर्ट व स्टेटस वाईज अप्लीकेशन डिटेल रिपोर्ट या तीनही पर्यायामध्ये विद्यार्थी व महाविद्यालय यांना शिष्यवृत्ती वितरण झालेल्या स्थितीचा अहवाल दिसून येतो. महाविद्यालयाच्या प्राचार्य लॉगीन सपोर्ट डेस्कमध्ये अर्ज क्रमांक निहाय शोध घेतल्या अर्ज क्रमांकाला क्लिक केल्यानंतर सदर अर्जासंबधीत पीएफएमएस पोर्टल बाबतच्या त्रुटींची माहिती महाविद्यालय लॉगीनमध्ये विद्यार्थीनिहाय प्रणालीमध्ये दर्शविण्यात येत आहे. त्यानुसार ज्या विद्यार्थ्यांचे आधार अथवा बँक खात्या संबंधीत त्रुटी असल्यास संबधीत विद्यार्थ्याला याबाबत अवगत करावे.

   तरी सन 2018-19, 2019-20 या वर्षातील मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण व परीक्षा शुल्क, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठ्यक्रम निर्वाह भत्ता योजनेतंर्गत सदर कार्यवाही न केल्यास कोणताही मागासवर्गीय पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहल्यास त्यास महाविद्यालयाचे प्राचार्य व्यक्तीश: जबाबदार राहणार आहेत, याची गांभीर्याने नोंद घ्यावी, असे सहाय्यक आयुक्त डॉ अनिता राठोड यांनी कळविले आहे.

                                                            ********

 

No comments:

Post a Comment