खडकपूर्णा प्रकल्पाच्या कालवा दुरूस्तीचे प्रस्ताव तातडीने सादर करावे
- पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे
- खडकपूर्णा प्रकल्प निगडीत विविध विषयांबाबत आढावा बैठक
बुलडाणा,(जिमाका) दि.18: नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे खडकपूर्णा प्रकल्पाच्या कालव्याचे पाणी देऊळगाव धनगर, वसंत नगर परीसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात गेले. त्यामुळे पिकांचे नुकसान झाले. पीके पाण्यात गेली. तरी या कालव्याच्या दुरूस्तीचा प्रस्ताव संबंधीत विभागाने तातडीने सादर करावा व कालवा दुरूस्त करावा, अशा सूचना पालकमंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिल्या आहेत.
चिखली येथील विश्राम गृह येथे खडकपूर्णा प्रकल्पाबाबत निगडीत असलेल्या विविध विषयांच्या आढावा बैठकीचे आयोजन 17 ऑक्टोंबर रोजी करण्यात आले होते. त्यावेळी पालकमंत्री आढावा घेताना बोलत होते. यावेळी माजी मंत्री भारतभाऊ बोंद्रे, पांडुरंग, पुनर्वसन अधिकारी श्री. माचेवाड, खडकपूर्णा प्रकल्पाचे अभियंता वैभव आव्हाड, संदीप कंकाळ, सहायक अभियंता राजेश मुरमुरे, एकनाथ थुट्टे, शेनफड घुबे, विकास मिसाळ, गजानन पवार, प्रकाश गिते, गणेश भुतेकर, सुरेश भुतेकर, विष्णू बनकर आदी उपस्थित होते.
कालव्याच्या अर्धवट कामामुळे पाणी शेतात गेल्याने नुकसान झालेल्या शेतकऱ्ययांना पुढील 15 दिवसांत नुकसान भरपाई देण्याचे निर्देश देत पालकमंत्री डॉ शिंगणे म्हणले, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची कार्यवाही तातडीने करावी. शेतकरी आपला केंद्रबिंदू असून रात्रंदिवस त्याच्या कल्याणासाठी काम करून त्यांना दिलासा द्यावा. जास्तीत जास्त पाणी वापर संस्था सथापन करून त्यांची कार्यशाळा घ्यावी. कालव्याच्या चाऱ्या मोऱ्यांचे काम पूर्ण करावे. प्रकल्पाच्या पाण्याचा लाभ शेवटच्या शेतकऱ्याला मिळाला पाहिजे. शासनाने करोडे रूपये खर्च करून प्रकल्प उभारला आहे. त्यामुळे सिंचन क्षमता वाढवून शेतकऱ्यांना लाभ द्यावा. अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना पाणी मिळवून देण्यासाठी आपल्या कर्तव्यात हलगर्जीपणा करता कामा नये. सिनगांव जहागीर येथील पुनर्वसनाचा प्रश्नही लवकरात लवकर मार्गी लावावा. प्रकल्पग्रस्त नागरीकांना दिलासा द्यावा. अशा सूचनाही पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी यावेळी दिल्या.
ते पुढे म्हणाले, चाऱ्या मोऱ्यांचे काम अपूर्ण असल्याने पाणी असून शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत नाही. तर अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. या चाऱ्या मोऱ्यांची कामे तातडीने पूर्ण करावी. प्रकल्प 100 टक्के भरला आहे. या पाण्याचा लाभ घेवून शेतकऱ्यांना आर्थिक उन्नती साधण्याची संधी द्यावी. यावेळी संबंधीत विभागाचे कर्मचारी, शेतकरी बांधव उपस्थित होते.
कोविड संसर्ग नियमावलीचा अवलंब करून आठवडी बाजार सुरू
- दुकाने सकाळी 9 ते रात्री 9 पर्यत सुरू राहतील
- सार्वजनिक ग्रंथालये नियमावलीचा अवलंब करून उघडण्यास परवानगी
- कौशल्य किंवा उद्योजकता प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यास परवानगी
बुलडाणा,(जिमाका) दि.18: कोविड साथरोग रोखण्यासाठी शासनाने विविध उपाययोजना केल्या आहेत. तसेच शासनाने 14 ऑक्टोंबर च्या आदेशानुसार 31 ऑक्टोंबर 2020 पर्यंत असलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीत निर्बंध शिथील केले आहेत. त्यानुसार जिल्हादंडाधिकारी एस राममूर्ती यांनी जिल्ह्यात शासनाच्या आदेशानुसार अनेक बाबी सुरू करण्यास परवानगी दिली आहे.
जिल्ह्यात प्रतिबंधीत क्षेत्र वगळून सर्व शाळांतील 50 टक्के शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना ऑनलाईन शिक्षण, टेली कॉन्सीलींग व शाळेतील इतर कामकाज करण्यासाठी शाळेत उपस्थित राहण्यासाठी मुभा राहणार आहे. तसेच जिल्ह्यात गुरांचे बाजारासह आठवडी बाजार प्रतिबंधीत क्षेत्र वगळून सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. याबाबत कोरोना संसर्ग सुरक्षा नियमावली अर्थात एसओपी स्थानिक स्वराज्य संस्थेने शासनाच्या कोविड संदर्भातील मार्गदर्शक सुचनांचे पालन करून तयार करावी. प्रतिबंधीत क्षेत्र वगळून इतर क्षेत्रातील मार्केट्स, दुकाने सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत सुरू राहण्यास मुभा देण्यात आली आहे. बगीचे, पार्क व सार्वजनिक मोकळ्या जागेतील ठिकाणे मनोरंजनासाठी सुरू ठेवता येतील.
सर्व खाजगी व शासकीय ग्रंथालये सोशल डिस्टसिंग, सॅनीटायझींग करून सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तथापी याठिकाणी कोविड संदभातील शासनाच्या सुचनांचे पालन करणे आवश्यक आहे. उच्च शैक्षणिक संस्था ऑनलाईन व दुरस्थ शिक्षण प्रक्रिया सामाजिक अंतर राखून शिकविण्यास प्रोत्साहित करण्यात येत आहे. पीएचडी व विज्ञान शाखेच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांकरीता प्रयोगशाळेचा उपयोग करण्यास परवानगी देण्यात येत आहे. कौशल्य किंवा उद्योजकता प्रशिक्षण केंद्र सुरू ठेवण्याची मुभाही देण्यात आली आहे. मात्र जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, कोचिंग संस्था 31 ऑक्टोंबर 2020 पर्यंत बंद राहतील. कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यातबाबत शासनाकडून वेळोवेळी निर्गमीत करण्यात आलेले आदेश, निर्देश, नियमावली, जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून वेळोवेळी निर्गमीत करण्यात आलेले आदेश लागू राहणार आहेत. या आदेशांचे उल्लंघन केल्यास सदर बाब ही साथरोग प्रतिबंधक कायदा, भारतीय दंड संहीता, आपत्ती व्यवस्थापन कायदा मधील कलम 51 ते 60 तरतूदीनुसार शिक्षेस पात्र राहणार आहे.
या नियमांचे पालन आवश्यक
जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी व प्रवास करताना चेहऱ्यावर मास्कचा वापर करणे बंधनकारक आहे. तसेच सर्व नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी कमीत कमी 6 फुट शारिरीक अंतर ठेवणे आवश्यक आहे. दुकानांचे चालक, मालक यांनी दुकानात प्रवेश देतेवेळी दोन ग्राहकांमध्ये शारिरीक अंतराच्या नियमाचे पालन करावे. दुकानात एकावेळी 5 पेक्षा जास्त ग्राहकांना प्रवेश देण्यात येवू नये. मोठ्या प्रमाणावर गर्दी होणारे कार्यक्रम, सभा बंदच राहतील. लग्न समारंभाकरीता जास्तीत जास्त 50 लोकांना परवानगी असेल. याकरीता कुठल्याही वेगळ्या परवानगीची आवश्यकता असणार नाही. अंत्यविधीकरीता जास्तीत जास्त 20 लोकांना उपस्थित राहता येणार आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास, पान, गुटखा, तंबाखू, दारू सेवनास बंदी असेल.
No comments:
Post a Comment