Saturday, 17 October 2020

DIO BULDANA NEWS 17.10.2020

कोविड साथरोगाच्या कालावधीत रोजगार उपलब्ध करून द्यावे - खासदार प्रतापराव जाधव जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती सभा बुलडाणा,(जिमाका) दि.17: सध्या सगळीकडे कोविड या साथरोगामुळे संकटाची परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्वच क्षेत्रामध्ये कोविडमुळे समस्या उभ्या राहल्या आहेत. दरम्यानच्या कोविड काळात रोजगार देणारे उद्योग बंद असल्याने अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. तरी जिल्ह्यात कोरोनामुळे रोगजार गेलेल्या बेरोजगारांना रोजगाराच्या संधी निर्माण करून द्याव्यात, अशा सूचना खासदार तथा केंद्रीय ग्रामविकास समितीचे अध्यक्ष प्रतापराव जाधव यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात दि. 16 ऑक्टोंबर रोजी दिशा अर्थात जिल्हा विकास व सनियंत्रण समितीच्या सभेचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी खासदार आढावा घेताना बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जि. प अध्यक्षा मनिषाताई पवार, आमदार सर्वश्री डॉ. संजय रायमूलकर, संजय गायकवाड, आमदार श्वेताताई महाले, बुलडाणा कृऊबासचे सभापती जालींधर बुधवत, जिल्हाधिकारी एस राममूर्ती, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी षणमुखराजन एस आदी उपस्थित होते. विहीरी व रस्त्यांच्या कामांव्यतिरिक्त अन्य माध्यमातून रोजगार निर्माण करून देण्याचे सूचीत करीत खासदार श्री. जाधव म्हणाले, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त रोजगार निर्माण करून द्यावा. त्यामुळे कोरोना काळात बेरोजगार झालेल्या तरूणांच्या हाताला काम मिळेल. मजुरांच्य कामाचा मोबदला वेळेत देण्यात यावा. वेळेत मजूरी दिल्यास या कामांकडे मजुरांचा कल वाढेल. ते पुढे म्हणाले, जिल्ह्यात परतीच्या पावसाने अनेक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. सोयाबीन उत्पादक शेतकरी यामुळे संकटात सापडला आहे. अनेक ठिकाणी सोयाबीनची मळणी करण्याचीही गरज उरली नाही. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे तातडीने पंचानामे पूर्ण करावेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी कार्यवाही करण्यात यावी. पीक विमा योजनेत विमा काढलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे नुकसानीची माहिती ताबडतोब पिक विमा कंपनी, संबंधीत कृषि विभागाचे कर्मचारी, कृषि कार्यालय यांना देण्यात यावी. पिक विमा कंपनीने पात्र एकही शेतकरी मदतीशिवाय ठेवू नये. विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या सर्वेत सहभा घ्यावा. सभेला संबंधीत विभागांचे विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सभेचे संचलन उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. तायडे यांनी केले. ************ नागपूर ते पुणे या मार्गावर शिवशाही वातानुकूलीत आसनी बससेवा सुरू प्रवाशांनी लाभ घेण्याचे महामंडळाचे आवाहन बुलडाणा,(जिमाका) दि.17: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्यामार्फत नागपूर ते पुणे, पुणे ते नागपूर या मार्गावर शिवशाही वातानुकूलीत आसनी बससेवा सुरू केली आहे. कोविड मध्ये सुरक्षीततेच्या दृष्टीकोनातून शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करून ही सेवा प्रवाशांच्या सुविधेसाठी आहे. ही बससेवा जिल्ह्यातील खामगांव, चिखली येथून पुणे व नागपूरसाठी असणार आहे. तरी या सुविधेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक, राज्य परिवहन, बुलडाणा यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. नागपूर ते पुणे बससेवेचे जिल्ह्यातील खामगांव व चिखली बसस्थानकांवरील वेळापत्रक : खामगांव येथून पुण्यासाठी सायं 7.15 वा, रात्री 9.15, 10.15, 10.45, 11.15, 11.45, मध्यरात्री 12.15 वा, 12.45, 1.15 व 2.45 वाजता. तसेच चिखली येथून पुण्यासाठी ही बससेवा रात्री 8.30 वाजता, 10.30, 11.30, मध्यरात्री 12 वाजता, 12.30, 1 वा , 1.30, 2 वा, 2.30 वाजता व पहाटे 4 वाजता. पुणे ते नागपूर बससेवेचे जिल्ह्यातील खामगांव व चिखली बसस्थानकांवरील वेळापत्रक : खामगांव येथून नागपूरसाठी रात्री 10 वाजता, मध्यरात्री 12 वाजता, 1 वाजता, 1.30, 2 वाजता, 2.30, 3 वाजता, 3.30, पहाटे 4 वाजता व 5. 30 वाजता. तसेच चिखली येथून नागपूरसाठी ही बससेवा रात्री 8. 55 वाजता, 10.55, 11.55, मध्यरात्री 12.25, 12.55, 1.25, 1.55, 2.25, 2.55 व पहाटे 4.25 वाजता. *********** कोविडच्या पार्श्वभूमीवर नवरात्र उत्सवादरम्यान यात्रांवर प्रतिबंध पुढील काळात होणारे अन्य सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमही असणार साधे बुलडाणा,(जिमाका) दि.17: जिल्ह्यात 26 ऑक्टोंबर 2020 पर्यंत दुर्गादेवी, शारदा देवी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. कोविड 19 या साथरोगामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता शासन परिपत्रकानुसार यावर्षीचा नवरात्रौत्सव, दुर्गादेवी व शारदा देवी पुजा,दसरा आदी साध्या पद्धतीने साजरे करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. कोविड या साथरोगाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात साजऱ्या होणाऱ्या नवरात्र उत्सवादरम्यान गरबा, दांडीया, रावण दहन, यात्रा, महोत्सव, परंपरानुसार करण्यात येणारे कार्यक्रम व इतर सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनांवर प्रतिबंध करण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यात गरबा, दांडीयाचे आयोजन नवरात्र उत्सवादरम्यान करण्यात येवू नये. त्याएैवजी सार्वजनिक मंडळांनी आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन करावे. त्यामाध्यमातून कोरोना, अन्य साथरोग व स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात यावी. नवरात्र उत्सवादरम्यान मोठ्या प्रणाणात गर्दी होत असल्यामुळे जिल्ह्यात कोठेही यात्रा भरणार नाहीत. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त निघणाऱ्या मिरवणूका, कँडल मार्च आदी सार्वजनिक कार्यक्रम साजरे करू नये. त्याऐवजी बुध्द विहारामध्ये पुजा अर्चा, धार्मिक कार्यक्रम 5 ते 10 लोकांच्या उपस्थितीत साजरे करावे. तसेच आरएसएस यांचे पथसंचलनाचा कार्यक्रम 5 ते 10 लोकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात यावा. त्याचप्रमाणे दसऱ्याला असणारा रावण दहन कार्यक्रम शासन निर्देशानुसार 5 ते 10 लोकांच्या उपस्थितीत प्रतिकात्मक स्वरूपात 4 फुटापर्यंत उंचीच्या पुतळ्याचा वापर करावा व सदर पुतळ्याचे दहन करावे. सदर निर्देशांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. तसेच या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहुन कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हादंडाधिकारी एस राममूर्ती यांनी केले आहे. *************** --

No comments:

Post a Comment