Wednesday, 28 June 2023

DIO BULDANA NEWS 28.06.2023

 परिवहन विभागाचे तालुका शिबीर जाहिर

बुलडाणा, दि. 28 : उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे जुलै ते डिसेंबर 2023 दरम्यान तालुका स्तरावर घेण्यात येणारे शिबीर जाहिर केले आहे. त्यानुसार आता प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी महिन्यातून एक किंवा दोन वेळा शिबीर आयोजित करण्यात येणार आहे.

जुलै महिन्यात जळगाव जामोद 5 जुलै, शेगाव 7 आणि 28 जुलै, मेहकर 10 आणि 31 जुलै, खामगाव 12 आणि 26 जुलै, चिखली 17 जुलै, देऊळगाव राजा 19 जुलै, लोणार 20 जुलै, नांदुरा 21 जुलै, मलकापूर 13 आणि 27 जुलै, सिंदखेड राजा 24 जुलै रोजी घेण्यात येतील.

ऑगस्ट महिन्यात जळगाव जामोद 4 ऑगस्ट, शेगाव 7 आणि 28 ऑगस्ट, मेहकर 9 आणि 31 ऑगस्ट, खामगाव 11 आणि 25 ऑगस्ट, चिखली 17 ऑगस्ट, देऊळगाव राजा 18 ऑगस्ट, लोणार 21 ऑगस्ट, नांदुरा 23 ऑगस्ट, मलकापूर 14 आणि 29 ऑगस्ट, सिंदखेड राजा 24 ऑगस्ट रोजी घेण्यात येतील.

 

सप्टेंबर महिन्यात जळगाव जामोद 4 सप्टेंबर, शेगाव 5 आणि 21 सप्टेंबर, मेहकर 7 आणि 27 सप्टेंबर, खामगाव 8 आणि 25 सप्टेंबर, चिखली 12 सप्टेंबर, देऊळगाव राजा 14 सप्टेंबर, लोणार 15 सप्टेंबर, नांदुरा 18 सप्टेंबर, मलकापूर 11 आणि 29 सप्टेंबर, सिंदखेड राजा 20 सप्टेंबर रोजी घेण्यात येतील.

ऑक्टोबर महिन्यात जळगाव जामोद 6 ऑक्टोबर, शेगाव 9 आणि 27 ऑक्टोबर, मेहकर 10 आणि 31 ऑक्टोबर, खामगाव 12 आणि 26 ऑक्टोबर, चिखली 16 ऑक्टोबर, देऊळगाव राजा 17 ऑक्टोबर, लोणार 19 ऑक्टोबर, नांदुरा 20 ऑक्टोबर, मलकापूर 13 आणि 30 ऑक्टोबर, सिंदखेड राजा 25 ऑक्टोबर रोजी घेण्यात येतील.

नोव्हेंबर महिन्यात जळगाव जामोद 6 नोव्हेंबर, शेगाव 7 आणि 28 नोव्हेंबर, मेहकर 8 आणि 30 नोव्हेंबर, खामगाव 10 आणि 24 नोव्हेंबर, चिखली 16 नोव्हेंबर, देऊळगाव राजा 17 नोव्हेंबर, लोणार 20 नोव्हेंबर, नांदुरा 22 नोव्हेंबर, मलकापूर 9 आणि 29 नोव्हेंबर, सिंदखेड राजा 23 नोव्हेंबर रोजी घेण्यात येतील.

डिसेंबर महिन्यात जळगाव जामोद 4 डिसेंबर, शेगाव 6 आणि 27 डिसेंबर, मेहकर 8 आणि 29 डिसेंबर, खामगाव 11 आणि 26 डिसेंबर, चिखली 13 डिसेंबर, देऊळगाव राजा 15 डिसेंबर, लोणार 18 डिसेंबर, नांदुरा 19 डिसेंबर, मलकापूर 12 आणि 28 डिसेंबर, सिंदखेड राजा 21 डिसेंबर रोजी घेण्यात येतील, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी कळविले आहे.

00000

ग्रामीण रुग्णांना आभाचा आधार

*जिल्ह्यात १ लाख ८३ हजार नोंदणी

बुलडाणा, दि. 28 : सरकारी रुग्णालयात केस पेपर, उपचारासाठी लागणाऱ्या रांगेतून आता जिल्ह्यातील रुग्णांची सुटका झाली आहे. आयुष्यमान भारत डिजिटल मिशन अंतर्गत जिल्हा रुग्णालयात आभा हेल्थ अॅपवर नोंदणी करण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांचा वेळ आणि त्रास कमी झाला असून आतापर्यंत १ लाख ८३ हजार रुग्णांनी नोंदणी केली आहे.

सरकारी रुग्णालयात केसपेपर काढणे ही वेळखाऊ प्रक्रिया आहे. त्यासाठी लांब रांगा लागलेल्या असतात. अनेकवेळा ठराविक वेळेनंतर केसपेपर मिळत नाही. यात रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचे श्रम वाया जातात. काही रुग्णांना रांगेतच त्रास जाणवू लागतो. या सर्वांतून सुटका होण्यासाठी आभा ॲपच्या नोंदणीनंतर आभा हेल्थ कार्डचे वाटप आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र याठिकाणी आभा कार्ड मोफत काढून देण्याची सुविधा उपलब्ध आहे. नागरीकांनी आपले आधार कार्ड मोबाईल क्रमांकासोबत लिंक असल्याची खात्री करून आधार कार्ड घेऊन कोणत्याही आरोग्य संस्थेत जाऊन आभा कार्ड काढावे लागणार आहे.

'आभा हेल्थ कार्ड' नागरिकांच्या आरोग्याची कुंडलीच असून नागरिकांनी त्यांचे, त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींचे आभा कार्ड काढून घेऊन लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. कार्डसोबत रुग्णाच्या आरोग्याशी संबंधित संपूर्ण माहिती नोंदवली जाणार आहे. कार्डच्या मदतीने डॉक्टर तुमच्या संपूर्ण आरोग्याच्या नोंदी पाहू शकतील. कार्डद्वारे कोणत्याही रुग्णाचा वैद्यकीय इतिहास अगदी सहज शोधता येणार आहे.

आभा हेल्थ कार्डचा उपयोग

आभा म्हणजेच आयुष्मान भारत हेल्थ अकाऊंट नंबर आहे. हे एक डिजिटल हेल्थ कार्ड आहे. ज्यामध्ये नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित माहिती साठवली जाणार आहे. हे कार्ड आधार कार्डसारखेच आहे. यावर १४ अंकी क्रमांकाचा वापर करून रुग्णाची सर्व मेडिकल नोंदी डॉक्टरांना मिळणार आहे. रुग्णाच्या आजारावर झालेला उपचार, कधी व कोणत्या दवाखान्यात झाला, कोणत्या तपासण्या केल्या, कोणती औषधे दिली, आरोग्याच्या समस्या, रुग्ण आरोग्यविषयक कोणत्या योजनेशी जोडला गेलाय, ही माहिती कार्डच्या माध्यमातून मिळणार आहे.

आरोग्याचा तपशील

आभा डिजिटल कार्डचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे रूग्णालयात जाताना तुम्हाला आधीच्या डॉक्टरांची चिठ्ठी गोळ्यांचे प्रिस्क्रिप्शन सोबत नेण्याची गरज नाही. तुमच्याकडे जुन्या चाचणीचे रिपोर्ट नसले तरी पुन्हा सगळ्या टेस्ट करायची गरज पडणार नाही. यामुळे वेळ आणि पैशाची बचत होईल.

ग्रामीण भागातील नागरिकांना आभा प कसे वापरावे याची माहिती नाही, त्यासाठी 'स्कॅन अॅण्ड शेअर' मोहिम राबवली आहे. यास जिल्हा रुग्णालयात चांगला प्रतिसाद मिळत आहे. यानंतर उपजिल्हा आरोग्य केंद्र प्राथमिक केंद्रातही आभा ॲपच्या वापर होणार आहे.

आरोग्य कर्मचाऱ्यांकडून नागरिकांना माहिती

रुग्णालयात येणाऱ्या व्यक्तींना आभा ॲपद्वारे कशी नोंदणी करायची याची माहिती देण्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. कोड स्कॅन केल्यानंतर आभा हेल्थचे अॅप मोबाईलवर डाऊनलोड होते. त्यात मोबाईल क्रमांकावर येणारा ओटीपी टाकल्यावर नोंदणीची प्रक्रिया सुरू होते. त्यानंतर १४ आकडी आभा क्रमांक येतो. हा क्रमांक केसपेपर खिडकीवर दाखवल्यानंतर आजाराविषयी माहिती भरून घेतली जाते. अवघ्या काही मिनिटात टोकन क्रमांक मोबाईलवर येतो. टोकन क्रमांक टाकल्यावर क्षणात केसपेपर प्रिंट होऊन रुग्णांना मिळतो, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.

000000

No comments:

Post a Comment