Friday, 2 June 2023

DIO BULDANA NEWS 02.06.2023

 


समूह सादरीकरणात जिल्हाधिकारी डॉ. तुम्मोड यांना दुसरा क्रमांक

बुलडाणा, दि. 2 : जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड मसुरी येथील लाल बहादुर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय अकादमी येथे मिड करियर ट्रेनिंग प्रोग्राममध्ये प्रशिक्षण घेत आहेत. या प्रशिक्षणादरम्यान गुरूवारी, दि. 1 जून 2023 रोजी घेण्यात आलेल्या समूह सादरीकरणात त्यांच्या सादरीकरणाला दुसरा क्रमांक मिळाला आहे.

प्रशिक्षणादरम्यानच्‍या समूह सादरीकरणात स्वाती शर्मा, सुरेंद्र सिंग, डॉ. ब्रीज मोहन मिश्रा, रणजित कुमार, डॉ. विपीन शर्मा, ई. रवेंदिरन, मनमिन कौर नंदा, अम्रिता सोनी, बंच्छा निधी पानी, अभिषेक क्रिष्णा यांच्यासह डॉ. तुम्मोड यांनी सहभाग नोंदविला होता. समूह सादरीकरणात दुसरा क्रमांक मिळाल्याबद्दल डॉ. तुम्मोड यांचा गौरव करण्यात आला. अभ्यासक्रम समन्वयक सौजन्या यांच्या हस्ते त्यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले. डॉ. तुम्मोड यांच्या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

00000

स्वाधार योजनेच्या माहितीसाठी आज कार्यशाळा

बुलडाणा, दि. 2 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची माहिती देण्यासाठी पंकज लद्धड इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट स्टडीज येथे शनिवार, दि. 3 जून 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता कार्यशाळा घेण्यात येणार आहे.

समाज कल्याण आयुक्त यांच्या निर्देशानुसार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेकरीता प्राचार्य, समन्वय अधिकारी, समान संधी केंद्रामार्फत प्रचार आणि प्रसिद्धी, तसेच महाविद्यालयातील प्रवेशित अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेची संपूर्ण माहिती मिळावी, यासाठी समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त विभाग यांच्या अध्यक्षतेखाली कार्यशाळा घेण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील महाविद्यालयातील प्राचार्य, समन्वय अधिकारी, समान संधी केंद्र यांनी कार्यशाळेस उपस्थित राहावे, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.

00000

दिव्यांग व्यक्तींनी योजनांचा लाभ घ्यावा

*दिव्यांग महामंडळाचे आवाहन

बुलडाणा, दि‍. 2 : दिव्यांग व्यक्तीच्या विकासासाठी दिव्यांग वित्त व विकास महामंडळातर्फे विविध योजना राबविण्यात येतात. या योजनांचा लाभ दिव्यांग व्यक्तींनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्या कर्ज योजनेंतर्गत सन 2023-24 या आर्थिक वर्षात 200 दिव्यांग व्यक्तींना कर्ज मागणी अर्ज वितरीत करण्यात येत आहे. महामंडळाच्या दिव्यांग स्वावलंबन कर्ज योजनेंतर्गत 100 अर्ज तसेच वैयक्तिक थेट कर्ज योजनेंतर्गत 100 अर्ज असे एकूण 200 अर्ज कार्यालयात उपलब्ध आहेत.

पात्र इच्छुक व्यक्तींनी ऑनलाईन असलेले कायम स्वरुपी दिव्यांग प्रमाणपत्र, तसेच युडीआयडी कार्डासह कर्ज मागणी संदर्भात महामंडळाचे जिल्हा कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, तळमजला, त्रिशरण चौक, चिखली रोड, बुलडाणा येथे संपर्क साधून कर्ज मागणी अर्ज प्राप्त करावे, तसेच याबाबत अडचणी किंवा शंका असल्यास महामंडळाचे रामेश्वर मिसाळ, सचिन सोनोने यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थपक एस. एस. धांडे यांनी केले आहे.

00000

शौर्य पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि‍. 2 : भारतीय बाल कल्याण परिषदेतर्फे कठीण प्रसंगात केलेल्या उल्लेखनीय शौर्याबद्दल दरवर्षी 6 ते 18 वयोगटातील बालकांना राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देण्यात येतात. या पुरस्कारासाठी इच्छुक अर्जदारांनी दि. 30 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अशोक मारवाडी यांनी आवाहन केले आहे.

000000

सैनिकी मुलांच्या वसतिगृहातील प्रवेश प्रक्रिया सुरू

*प्रथम फेरीकरीता 30 जूनपर्यंत अर्ज स्विकारणार

        बुलडाणा, दि. 6 : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या सैनिकी मुलांच्या वसतिगृहात सन 2023-24 या शैक्षणिक वर्षाकरिता प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी प्रवेश पुस्तकांची विक्री सुरू करण्यात आली आहे. प्रथम फेरी करिता प्रवेश अर्ज स्विकारण्याची अंतिम मुदत दि. 30 जून आहे.

वसतिगृहाची प्रवेश क्षमता 50 आहे. भोजन, निवास व सेवाकरासह सेवारत सैनिक, माजी सैनिक, सिविलियन साठी वेगवेगळे आहे. सेवारत सैनिकांसाठी अधिकारी यांच्यासाठी पाच हजार रुपये, जेसीओकरीता चार हजार रुपये, शिपाई, एनजीओ साठी 3 हजार 500 रुपये आहे. माजी सैनिकांसाठी अधिकारी व ऑनररी रँककरीता 4 हजार 500  रुपये, जेसीओ करीता 4 हजार आणि शिपाई, एनजीओ साठी 3 हजार 500 रुपये आहे. युद्ध विधवा, माजी सैनिक विधवा व माजी सैनिक अनाथ पाल्यांसाठी नि:शुल्क आहे. सिविलियन यांच्यासाठी भोजन निवास आणि सेवा करासह 5 हजार 500 रूपये दर आहेत. 

प्रवेश शुल्काव्यतिरिक्त अनामत रक्कम 5 हजार रूपये आकारण्यात येणार आहे. प्रवेश अर्ज संबंधित वसतिगृहात उपलब्ध करण्यात आलेले आहे. युद्ध विधवा, माजी सैनिकांच्या विधवांची सर्व पाल्य, माजी सैनिकांची अनाथ पाल्य, पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रम शिकणारी पाल्य, बीएड, डीएड, पदवी अभ्यासक्रम गुणवत्ता यादीप्रमाणे, इयत्ता बारावी, अकरावी दहावी याक्रमाने गुणवत्ता यादीनुसार, माजी सैनिकांचे दुसरे आणि तिसरे पाल्य, सेवारत सैनिकांचे पाल्य आणि जागा उपलब्ध असल्यास सिविलीयन पाल्य अशा प्राधान्यक्रमाने वसतिगृहात प्रवेश देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी सैनिकी मुलांचे वसतिगृह, बुलडाणा येथील 9922597671 क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

00000

सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन

बुलडाणा, दि. 2 : दर महिन्यात जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. जून महिन्याचा लोकशाही दिन सोमवार, दि. 5 जून 2023 रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे.

तक्रारदारांनी लोकशाही दिनी उपस्थित राहावे, उपस्थित राहणे शक्य नसल्यास तक्रारी रजिस्टर पोस्टाने लोकशाही दिनाआधी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचतील, असे पाठवावे, असे निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी कळविले आहे.

000000

 

No comments:

Post a Comment