स्वाधार
योजनेच्या माहितीसाठी कार्यशाळा उत्साहात
बुलडाणा, दि. 6 : समाज कल्याण आयुक्तालयाच्या
निर्देशनानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योनजेची माहिती देण्यासाठी शनिवार,
दि. 3 जून रोजी एक दिवशीय कार्यशाळा उत्साहात पार पडली.
कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी समाजकल्याण
सहायक आयुक्त डॉ. अनिता राठोड होत्या. प्रमुख मार्गदर्शक म्हणून सामाजिक न्याय विभागाचे
प्रादेशिक उपायुक्त सुनील वारे होते. यावेळी प्राचार्य नंदूराम गायकवाड, समाज
कल्याण निरीक्षक प्रदिप धर्माधिकारी उपस्थित होते.
कार्यशाळेसाठी प्राचार्य आणि योजनेशी संबधित
कर्मचारी उपस्थित होते. श्रीमती राठोड यांनी प्रास्ताविकातून कार्यशाळेचे महत्त्व आणि
उद्देश सांगितला. स्वाधार योजनेतून विद्यार्थ्यांना होणारी शैक्षणिक मदत मिळत
असल्याचे सांगितले. श्री. वारे यांनी योजनेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. योजनेच्या
माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम जागृत व्हावे, त्यांच्यामध्ये राष्ट्राप्रती
उन्न्तीची भावना निर्माण व्हावी. स्व:ताच्या विकासाबरोबर सर्वांगीण विकास साधावा. समान
संधी केंद्राच्या माध्यामातून अनुसूचित जाती,
इतर मागासवर्ग विद्यार्थ्यांसाठी विविध
योजना आहेत. यातील परदेशातील शिक्षणासाठी शिष्यवृती, वसतिगृह योजना विद्यार्थ्यांपर्यंत
पोहचणे आवश्यक आहे. यासाठी समानसंधी उपक्रम राबवून एकाच ठिकाणी महाविद्यालयातील विद्यार्थी
एकत्र येऊन चर्चाव्दारे विविध समस्या सोडवू शकतात. यासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी
विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचा सहभाग घेऊन नवनवीन विषयाची माहिती द्यावी. स्पर्धा
परीक्षा, जयंती, विविध विषयावर परिसंवाद साधून नवउपक्रम निर्मिती करावी. यासाठी समाजकल्याण
विभाग संपूर्ण सहकार्य करणार असल्याचे सांगितले.
तालुका समन्वयक सतीश बाहेकर यांनी सूत्रसंचालन
केले. प्रदीप धर्माधिकारी यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी समाज कल्याण निरीक्षक वाय.
एम. पर्वतकर, लद्धड कॉलेज ऑफ फार्मसी आणि सामाजिक न्याय विभागातील कर्मचाऱ्यांनी पुढाकार
घेतला.
00000
व्यायाम विकास योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
बुलडाणा, दि. 6 : क्रीडा व युवक सेवा संचालनालयांतर्गत जिल्हा क्रीडा
अधिकारी कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या व्यायाम शाळा विकास आणि क्रीडांगण विकास
अनुदान योजनेंतर्गत सात लाख रूपयांपर्यंतचे अनुदान मंजूर करण्यात येते. यासाठी दि.
22 जून 2023 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अल्पसंख्यांक संस्थांतर्फे चालविण्यात
येणाऱ्या विविध अनुदानित शाळांना व्यायाम शाळा बांधकाम करणे, व्यायाम शाळा साहित्य
खरेदी करण्यासाठी सात लाख रूपयांपर्यंत अनुदान मंजूर करण्यात येते. तसेच क्रीडांगण
विकास अनुदान योजनेंतर्गत विविध क्रीडा विषयक बाबीकरिता जास्तीत जास्त सात लाख रूपयांचे
अनुदान मंजूर करण्यात येते.
या योजनेतून अनुदान घेऊ इच्छिणाऱ्या शिक्षण विभागाने
अनुदानित, तसेच संबंधीत संस्थेस पाच वर्षापुर्वी अनुदानाचा प्रथम टप्पा 20 टक्के मिळणे
आवश्यक आहे. यासाठी प्राथमिक, माध्यमिक विद्यालये आणि कनिष्ठ महाविद्यालये पात्र राहतील.
या दोन्ही योजनेंतर्गत अनुदान प्राप्त करण्यासाठी विहित नमुन्यातील
अर्ज, गत वर्षाचे लेखा विवरण, जागेच्या मालकीचे अथवा कमीत कमी 33 वर्षे नोंदणीकृत असलेला
जागेचा भाडेपट्टा, ठराव, पदाधिकारी यादी व बदल असल्यास चेंज रिपोर्ट, शासकीय अभियंता
यांच्याद्वारा प्रमाणित अंदाजपत्रक व आराखडा त्यामध्ये 500 चौरस फुट आकाराचा कारपेट
एरिया असलेला हॉल, कार्यालय व स्वच्छता गृह, घटना, नोंदणी प्रमाणपत्र, व्यायामशाळा
बांधकामाची एनओसी, नियोजित जागेचे जी.पी.एस. लोकेशन दर्शविणारे छायाचित्र, जागेचा चर्तुसिमा
नकाशा, 100 रूपयांच्या स्टॅम्पपेपरवर हमीपत्र, 100 रूपयांचे कोर्ट स्टॅम्प तिकीट लावलेले
प्रतिज्ञापत्र, अंदाजपत्रक 7 लाख रूपयांपेक्षा जास्त असल्यास जास्त असलेल्या रक्कमेचे
बँक बॅलंस प्रमाणपत्र, संस्था अल्पसंख्यांक दर्जा प्राप्तीचे शासनाद्वारे निर्गमित
केलेले प्रमाणपत्र प्रस्तावासोबत सादर करावे लागणार आहे.
आवश्यक कागदपत्रांची
पुर्तता करणाऱ्या संस्थांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून दि. 15 जून 2023पर्यंत
विहित नमुना प्राप्त करावा, आवश्यक कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव दि. 22 जुन,
2023 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव
यांनी केले आहे.
00000
मतदारयादीचा
विशेष पुनरिक्षण कार्यक्रम जाहिर
बुलडाणा,
दि. 6 : भारत निवडणूक आयोगाने दि. 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित मतदारयादीचा
विशेष संक्षीप्त पुनरिक्षण कार्यक्रम दि. 7 जून ते 16 ऑक्टोंबर 2023 या कालावधीकरीता
निर्धारित केला आहे.
सदर
पुनरिक्षण कालावधीमध्ये 18 वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकांनी मतदान नोंदणी करावी. नागरिकांच्या
सोईसाठी भारत निवडणूक आयोगाने ऑनलाईन पद्धतीने मतदार नोंदणी करण्यासाठी nvsp.in ही
वेबसाईट उपलब्ध केली आहे. त्याचप्रमाणे नागरिकांना भारत निवडणूक आयोगाचे वोटर हेल्पलाईन
ॲप मोबाईल अप्लीकेशनद्वारे देखील मतदार नोंदणी करता येईल. त्याचप्रमाणे नागरिकांना
संबंधित मतदार नोंदणी अधिकारी, बीएलओ यांच्याकडे देखील मतदार नोंदणी ऑफलाईन पद्धतीने
करता येईल.
या
कालावधीत मतदारांना आपले मतदान ओळखपत्र दुरुस्ती, नवमतदार नोंदणी, मतदान ओळखपत्र आधार
कार्डासोबत जोडणी, मतदार यादीतील नाव कमी करणे, अशी सर्व काम करता येणे शक्य होईल.
मतदारयादी विशेष पुनरीक्षण कार्यक्रमाचा लाभ नागरीकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी
तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुहासिनी
गोणेवार यांनी केले आहे.
0000000
सोमवारी डाक अदालतीचे
आयोजन
बुलडाणा, दि. 6 : पोस्ट विभागाच्या तक्रारी
सोडविण्यासाठी बुलडाणा डाकघर विभागातर्फे सोमवार, दि. 12 जून 2023 रोजी सकाळी 11 वाजता
डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
पोस्टाच्या कार्याविषयी किंवा कामकाजाबद्दल
सहा आठवड्यात तक्रारींचे निवारण झालेले नसल्यास अशा तक्रारींची दखल डाक अदालतीमध्ये
घेतल्या जाणार आहे. देशातील पोस्टाची सेवा ही सामाजिक आणि आर्थिक जीवनाचा एक अभिन्न
भाग आहे. देशातील प्रत्येक नागरिकांच्या मनामध्ये पोस्टाच्या सेवेने वेगळ्या प्रकारचे
स्थान निर्माण केले आहे. पोस्ट खाते हे लोकांना चांगल्या प्रकारची सेवा देण्याचा व
ग्राहकांचे जास्तीत जास्त समाधान करण्याचा प्रयत्न करते. ही सेवा देताना संभाषण, पत्रव्यवहार
किंवा सेवेमधील त्रृटीमुळे पोस्टाच्या सेवेबद्दल तक्रारी होतात. तक्रारींचा योग्यप्रकारे
न्याय निवडा करण्यासाठी पोस्ट खात्यातर्फे डाक अदालत घेण्यात येते.
000000000
दामिनी ॲपचा
उपयोग करण्याचे आवाहन
*जीपीएसनुसार
वीज पडण्याची माहिती देणार
बुलडाणा, दि. 6 : भारत सरकारच्या पृथ्वी
मंत्रालयाने विज पडून जिवीत हानी होऊ नये या करीता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून
नवी दिल्ली यांनी ‘दामिनी’ अॅप तयार केले या ॲपचा नागरिकानी उपयोग करावा, असे
आवाहन करण्यात आले आहे.
मान्सून कालावधीत विशेषतः जून आणि जुलै
महिन्यात वीज पडून जिवीत हानी होते. वीज पडून जिवीत हानी होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक
उपाययोजना म्हणून दामिनी अॅप तयार केले आहे. हे ॲप प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. सुरक्षात्मक
उपाययोजना म्हणून तालुक्यातील सर्व शासकीय यंत्रणा, शासकीय अधिकारी, कर्मचारी, नागरीक,
क्षेत्रिय अधिकारी, मंडळ अधिकारी, अव्वल कारकून, महसूल सहायक, गावस्तरावरील सरपंच,
पोलिस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, कृषिसेवक, कोतवाल, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य
सेवक, ग्रामपंचायत डाटा एंट्री ऑपरेटर यांनी अॅप डाउनलोड करून त्याचा वापर करावा.
सदरचे अॅप जीपीएस लोकेशननुसार कार्य करते.
वीज पडण्याच्या १५ ते २० मिनिटापूर्वी सदर अॅपमध्ये स्थिती दर्शविण्यात येते. सदर अॅपमध्ये
सभोवताल वीज पडत असल्यास त्या ठिकाणापासून सुरक्षित स्थळी जावे. यावेळी झाडाचा आश्रय
घेऊ नये. ॲपमध्ये प्राप्त होणाऱ्या सुचनेनुसार आवश्यक पूर्वसूचना गावातील नागरिकांना
देऊन होणारी जिवीत हानी टाळावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
00000
No comments:
Post a Comment