Monday, 12 June 2023

DIO BULDANA NEWS 12.06.2023

 





आंतरराष्ट्रीय योग दिन 21 जूनला साजरा होणार

बुलडाणा, दि. 12 : यावर्षीही आंतरराष्ट्रीय योग दिन सर्वत्र साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांचे नियोजन करण्यासाठी नुकतीच बैठक पार पडली. जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुलात दि. 21 जून रोजी सकाळी 7 वाजता आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी उपशिक्षणाधिकारी श्री. अकाळ, विस्तार अधिकारी उमेश जैन, भारत स्काऊट गाईडचे जिल्हा संघटक एस. पी. आठवले, आर्ट ऑफ लिव्हींगचे संजय पोतदार, प्रशांत लहासे, योगांजली योगवर्ग योगविद्या धामच्या अंजली परांजपे, नेहरू युवा केंद्राचे धनंजय चाफेकर, विद्या भारतीचे श्रीकृष्ण शेटे, रविंद्र गणेशे, डॉ. प्रमोद ढवळे, राजेश शिरसाट, आयुष मंत्रालयाच्या डॉ. मंजू राजेजाधव, दिनेश गर्गे, योगाचार्य अच्युतराव उबरहंडे, कैलास डुडवा, मंगेश तायडे, हर्षल काळवाघे, योगेश पाटील, संदीप बर्डे, विश्वजीत देशमुख, एस. एन. जवंजाळ, सुशांत सुरुशे, धनंजय किंबहुणे, योगेश पाटील, पवन ठाकरे, श्रीमती बाहेकर, श्रीमती उर्मिला, अंजली परांजपे, डॉ. संजय सुर्यवंशी आदी उपस्थित होते.

यावर्षी जिल्हा आणि तालुकास्तरावर सर्व शालेय विद्यार्थी, युवक-युवती, नागरीकांमध्ये योग विषयक आवड निर्माण करणे, तसेच योगाचा प्रसार आणि प्रचार कण्याकरिता आंतरराष्ट्रीय योग दिनी दि. 21 जून रोजी सकाळी 7 ते 7.45 पर्यंत आंतरराष्ट्रीय योगदिनाचे आयोजन करण्यात येणार आहे.

या उपक्रमात सहभागी होण्यासाठी सामान्य योग प्रोटोकॉलप्रमाणे आधारीत जिल्हा प्रशासन, शालेय शिक्षण विभाग, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, शिक्षणाधिकारी माध्यमिक, प्राथमिक कार्यालय, आयुष मंत्रालय, जिल्हा योग संघटना, आरोग्य भारती, क्रीडा भारती, आर्ट ऑफ लिव्हींग, पतंजली योग समिती, नेहरु युवा केंद्र, विविध क्रीडा मंडळ, महिला मंडळ, विविध एकविध खेळ संघटना, जिल्हा शारीरिक शिक्षण शिक्षक संघटना, आयुर्वेद महाविद्यालय, नर्सिंग महाविद्यालय आणि योगक्षेत्रात कार्यरत संस्थांच्या वतीने युवक-युवती, योगाप्रेमी नागरिक, अधिकारी, कर्मचारी यांच्याकरीता आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुलात दि. 21 जून रोजी सकाळी 7 वाजता करण्यात आले आहे.  यावेळी स्थानिक शैक्षणिक संस्था, संघटना, शासकीय निमशासकीय कार्यालये, महाविद्यालये, जिल्ह्यातील नागरीक, युवक युवती, विद्यार्थी, खेळाडू, अधिकारी, कर्मचारी यांना सकाळी 6.30 वाजता उपस्थित राहून सहभागी होता येईल.

जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था, क्रीडा मंडळे, महिला मंडळे, विविध शासकीय, निमशासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, योगप्रेमी नागरिक, खेळाडू यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.

00000




जिल्हा रुग्णालयात जागतिक तंबाखू नकार दिवस साजरा

बुलडाणा, दि‍. 12 : जिल्हा रुग्णालयात जागतिक तंबाखू नकार दिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला.

अध्यक्षस्थानी जिल्हा न्यायाधीश न्या. राजेंद्र मेहरे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, जिल्हा पोलिस उपअधीक्षक श्री. वाघ, अन्न व औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त सचिन केदारे, प्राथमिक उपशिक्षणाधिकारी श्री. जैन, माध्यमिक शिक्षणाधिकारी मुकुंद प्रकाश, उर्मिलादीदी, कृषी मल्टीपर्पज फाऊंउेशनचे महेंद्र सोभागे, आयएमएचे अध्यक्ष डॉ. सिरसाट, श्री. जुमडे, जिल्हा प्रशिक्षण केंद्रप्रमुख डॉ. रविंद्र गोफणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भुसारी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राठोड, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. खर्चे, प्रमोद टाले उपस्थित होते.

यावर्षी 2023 हे वर्ष तृणधान्य वर्ष म्हणून घोषित झाले आहे. यावर्षीची संकल्पना आम्हाला अन्न हवे तंबाखू नाही ही आहे. त्यानुसार मान्यवरांचे स्वागत तृणधान्य देऊन करण्यात आले. मानसोपचार आणि व्यसनमुक्ती तज्‍ज्ञ जिल्हा सल्लागार डॉ. लता भोसले – बाहेकर यांनी प्रास्ताविकातून तरुण वयातील तंबाखू सेवनाच्या वाढत्या प्रमाणावर लक्ष वेधले. तंबाखू पिकाच्या लागवडीमुळे होणारी नापिक शेतजमीन, रोजगार, आरोग्याच्या समस्यांवर प्रतिबंधात्मक उपायांची आवश्यकता असल्याचे सांगितले.

नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध कला प्रदर्शित केल्या, यावेळी विद्यार्थ्यांना प्रामणपत्र देऊन गौरविण्यात आले. आहारतज्‍ज्ञ श्री. सोळंकी यांनी सूत्रसंचालन केले. मानसोपचार तज्‍ज्ञ श्री. मुळे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाचे समुपदेक लक्ष्मण सरकटे, सामाजिक कार्यकर्त्या अर्चना आराख यांनी पुढाकार घेतला.

00000

देगलुर येथील अपंग संस्थेत विनामूल्य प्रशिक्षण

बुलडाणा, दि. 12 : दिव्यांग कल्याण आयुक्तालयाच्या मान्यताप्राप्त नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथील शासकीय तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्रात विनामूल्य प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

या संस्थेमध्ये 18 ते 40 वयोगटातील अपंग, मुकबधीर, मतिमंद मुलांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. यात शिवण व कर्तन कला, कम्प्युटर अकाऊंटींग व ऑफिस ऑटोमेशन व वेल्डर कम फॅब्रिकेटर या अभ्यासक्रमांना प्रवेश देण्यात येणार आहे. प्रवेशितांच्या निवास व भोजनाची विनामूल्य व्यवस्था करण्यात येणार आहे.

प्रशिक्षणासाठी प्राचार्य, तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र, देगलूर, जि. नांदेड येथे किंवा ९९६०९००३६९ व 7378641136, 9403207100, 9420846887 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

ओबीसी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना

*अर्ज दाखल करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 12 : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाकडून ओबीसी विद्यार्थ्याकरिता देशांतर्गत शिक्षणासाठी 10 लाख, तर परदेशातील शिक्षणासाठी 20 लाख रुपये मर्यादेत कर्ज सुविधा राष्ट्रीयकृत बँकामार्फत उपलब्ध करून दिले जाणार आहे. या योजनेमध्ये उमेदवाराला बँकेमध्ये भरलेल्या व्याजाच्या 12 टक्के पर्यंत व्याज परतावा मिळणार आहे. यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत असे आवाहन करण्यात आले आहे.

या योजनेसाठी उमेदवाराचे वय हे 17 ते 30 वर्ष असावे, महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असल्याचा पुरावा, ओबीसी असल्याचा जातीचा दाखला, तहसिलदार यांचे 8 लाख रुपयापर्यतचा कौटुंबिक वार्षिक उत्पन्न दाखला किंवा नॉन क्रीमेलेअरच्या मर्यादेत, बारावीमध्ये 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण असावा. उमेदवार व पालक यांचे आधार कार्ड, फोटो, आधारकार्ड बचत खाते पासबुकला लिंक असावे. वयाचा पुरावा, शैक्षणिक अभ्यासक्रमाबाबत आवश्यक कागदपत्रे तसेच शैक्षणिक खर्चाचा तपशिलासह महामंडळाच्या msobcfdc.org या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाइन अर्ज सादर करावेत.

राज्य-देशांतर्गत तसेच परदेशी अभ्यासक्रमामध्ये येणाऱ्या अभ्यासक्रमात आरोग्य विज्ञानमध्ये सर्व पदवी व पदव्युतर अभ्यासक्रम. अभियांत्रिकीमध्ये सर्व पदवी व पदव्युतर अभ्यासक्रम. व्यावसायिक व व्यवस्थापन अभ्यासक्रमात कृषि, अन्न प्रक्रिया व पशू विज्ञान, दुग्ध विज्ञानमधील सर्व संबंधित अभ्यासक्रमांचा समावेश राहणार आहे.

व्याज परतावा व परतफेडीचा कालावधी हा शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत बँकेने वितरित केलेल्या कर्ज रक्कमेवरील व्याजाची नियमित परतफेड केलेल्या उमेदवाराला केवळ व्याजाचा परतावा उमेदवाराच्या आधार लिंक बँक खात्यात महामंडळ वर्ग करेल. कर्जाचा कालावधी जास्तीत जास्त 5 वर्षे राहणार आहे.

पात्र उमेदवारांनी अर्ज सादर करावेत तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, तळ मजला, त्रिशरण चौक, चिखली रोड, बुलढाणा, दूरध्वनी क्र. 07262-248285. यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना

बुलडाणा, दि. 12 : शेती व्यवसाय करताना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे आदी नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात, अन्य कोणत्याही कारणामुळे होणाऱ्या अपघातामुळे शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यास गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेतून लाभ देण्यात येतो.

अपघातामुळे मृत्यू ओढावतो किंवा काहींना अपंगत्व येते. कर्त्या व्यक्तीस झालेल्या अपघातामुळे कुटुंबाच्या उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते. अशा अपघातग्रस्त शेतकरी, त्यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरिता राज्यातील सर्व वहितीधारक खातेदार शेतकरी आणि वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले शेतकऱ्याच्या कुटुंबातील कोणत्याही एका सदस्यास आई-वडील, शेतकऱ्याची पती, पत्नी, मुलगा आणि अविवाहित मुलगी यापैकी कोणत्याही एका व्यक्ती १० ते ७५ वर्ष वयोगटातील एकूण २ जणांकरीता गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राबविण्यात येत आहे. सदर योजना १९ एप्रिल २०२३ पासून आवश्यकतेनुसार प्रथम ३ वर्षे राबविण्यात येणार आहे.

सदर योजनेच्या प्रयोजनार्थ कुटुंबातील वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले १ सदस्यांमध्ये आई-वडील, शेतकऱ्याची पती, पत्नी, मुलगा व अविवाहीत मुलगी यांचा समावेश ग्राह्य धरण्यात येणार आहे. कृषि गणनेनुसार निर्धारित केलेल्या वहितीधारक खातेदार शेतकरी आणि वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले शेतकऱ्यांच्या कुटुंबातील कोणताही १ सदस्य असे एकुण २ जणांकरीता गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत लाभ देण्यात येणार आहे. यात अपघाताच्या बाबीमध्ये आर्थिक सहाय्यात अपघाती मृत्यू झाल्यास दोन लाख रूपये, अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन हात किंवा दोन पाय निकामी झाल्यास दोन लाख रूपये, अपघातामुळे एक डोळा व एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास दोन लाख रूपये अपघातामुळे एक डोळा अथवा एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास एक लाख रूपये अनुदान देण्यात येणार आहे.

अपघातांमध्ये रस्ता, रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, जंतूनाशके हाताळताना अथवा अन्य कारणामुळे विषबाधा, विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात, वीज पडून मृत्यू, खून, उंचावरुन पडून झालेला अपघात, सर्पदंश व विंचुदंश, नक्षलवाद्याकडून झालेल्या हत्या, जनावरांचा हल्ल्या, चावण्यामुळे जखमी किंवा मृत्यू, बाळंतपणातील मृत्यू, दंगल, अन्य कोणताही अपघात, या अपघाताच्या बाबींचा समावेश आहे

अपघातामध्ये नैसर्गिक मृत्यू, विमा कालावधीपुर्वीचे अपंगत्व, आत्महत्येचा प्रयत्न, आत्महत्या किंवा जाणीवपूर्वक स्वतःला जखमी करुन घेणे, गुन्ह्याच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करताना झालेला अपघात, अंमली पदार्थाच्या अमलाखाली असताना झालेला अपघात, भ्रमिष्टपणा, शरीरांतर्गत रक्तस्त्राव, मोटार शर्यतीतील अपघात, युद्ध, सैन्यातील नोकरी, जवळच्या लाभधारकाकडून खून या बाबींचा समावेश राहणार नाही.

 

या योजनेंतर्गत लाभ प्राप्त होण्यासाठी अर्जासोबत ७/१२ उतारा, मृत्यूचा दाखला, शेतकऱ्यांचे वारस म्हणून गावकामगार तलाठ्याकडील गांव नमुना नं. ६ क नुसार मंजूर झालेली वारसाची नोंद, वारसदाराचे ओळखपत्र आधार कार्ड, पॅन कार्ड, बैंक पासबुक, निवडणूक ओळखपत्र, अपघातग्रस्ताचा वयाचा दाखला ज्यात जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, शाळेच्या मुख्याध्यापकाचे प्रमाणपत्र, ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना, पारपत्र, निवडणूक ओळखपत्र यापैकी कोणतेही एक कागदपत्र, प्रथम माहिती अहवाल, घटनास्थळ पंचनामा, पोलिस पाटील माहिती अहवाल, अपघाताच्या स्वरूपानुसार अंतिम विमा प्रस्तावासोबत सादर करावयाची कागदपत्रे सादर करावी लागणार आहे.

अपघातग्रस्त शेतकरी, शेतकऱ्यांचे वारसदारांनी सर्व निर्धारीत कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव संबंधीत तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे ३० दिवसाच्या आत सादर करावे लागणार आहे. यासाठी कृषि विभागाच्या सर्व क्षेत्रिय अधिकारी, कर्मचारी यांचे मार्गदर्शन घ्यावे. योजनेंतर्गत वारसदाराची निवड अपघातग्रस्ताची पत्नी, अपघातग्रस्त स्त्रिचा पती, अपघातग्रस्ताची अविवाहित मुलगी, अपघातग्रस्ताची आई, अपघातग्रस्ताचा मुलगा, अपघातग्रस्ताचे वडील, अपघातग्रस्ताची सून, अन्य कायदेशीर वारसदार याप्रमाणे करण्यात येणार आहे.

000000

No comments:

Post a Comment