Wednesday, 16 November 2022

DIO BULDANA NEWS 16.11.2022

 भरडधान्य खरेदी नोंदणीसाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

बुलडाणा, दि. 16 : आधारभूत किंमत खरेदी योजनेत मका, ज्वारी, बाजरी खरेदीसाठी शेतकऱ्यांना नोंदणीसाठी दि. 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच दि. 1 नोव्हेंबर 2022 ते 31 जोनवारी 2023 पर्यंत खरेदीस मुदतवाढ देण्यात आली आहे. याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी यांनी केले आहे.

आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत राज्य शासनामार्फत भरडधान्य मका, ज्वारी व मका खरेदीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी करण्यासाठी जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयामार्फत खरेदी केंद्र उघडण्यात आली आहे. यामार्फत मका 50 हजार क्विंटल, ज्वारी 27 हजार 759 क्विंटल खरेदी करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांनी हमी दराचा लाभ घेण्यासाठी स्वत: केंद्रावर उपस्थित राहून खरेदीसाठी माल घेऊन यावा, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी पी. एस. शिंगणे यांनी केले आहे. 

00000



शासकीय सेवा योजनेच्या महामेळाव्यात लाभ

बुलडाणा, दि. 16 : राज्य विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा वकील संघ आणि जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे पॅन इंडिया अंतर्गत नागरिकांचे सक्षमीकरण आणि हक हमारा भी तो है, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शासकीय सेवा योजनेचा महामेळावा रविवारी, दि. १३ नोव्हेंबर २०२२ समाज कल्याण कार्यालयात पार पडला. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश स्वप्नील खटी यांच्या मार्गदर्शनाखाली हा मेळावा पार पडला.

उद्घाटनाला निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, कौटुंबिक न्यायालयाचे न्यायधीश आर. बी. रेहपाडे, उपविभागीय अधिकारी राजेश्वर हांडे, जिल्हा वकिल संघाचे अध्यक्ष अॅड. विजय सावळे, उपस्थित होते.

कार्यक्रमासाठी जिल्हा न्यायाधीश पी. ए. साने, दिवाणी न्यायाधीश श्रीमती एच. एस. भोसले, सहदिवाणी न्यायाधीश डी. बी. हंबीरे, सहदिवाणी न्यायाधीश ए. यू. सुपेकर, ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अध्यक्ष मनिष वानखेडे, सह दिवाणी न्यायाधीश डी. पी. काळे, सहदिवाणी न्यायाधीश श्रीमती एन. एम. जमादार, सह दिवाणी न्यायाधीश डब्ल्यू. डी. जाधव, नायब तहसिलदार प्रफुल्लीता सातपुते, जल जिवन मिशनचे प्रकल्प संचालक शिवशंकर भारसाकळे उपस्थित होते.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव हेमंत भुरे, तहसिलदार रुपेश खंडारे यांनी मेळाव्याचे आयोजन केले. वैशाली तायडे आणि सतिष बाहेकर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमासाठी प्रबंधक दि. च. तोमर, अधीक्षक एस. एस. अवचार, विजय बोरेकर, सुनिल मुळे, आकाश अवचार, गजानन मानमोडे, वैभव मिलके, जी. पी. वारे, ए. जी. डोळे, एस. डी. मांजरे, सचिन चंद्रे, प्रविण खर्चे, रमेश जाधव यांनी पुढाकार घेतला.

मेळाव्यात शासनाच्या विविध विभागांमार्फत सेवा योजनाचा लाभ ग्रामीण भागातील गरीब, गरजू व पात्र नागरिकांना देण्यात आला. सदर मेळाव्यात विविध विभागाच्या माहितीचे स्टॉल लावण्यात आले होते.

00000

सामूहिक शेततळे योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 16 : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत सन 2022-23 साठी सामूहिक शेततळे योजना राबविण्यात येत आहे. यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी अर्ज करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सामुहिक शेततळे घटक फलोत्पादन पिकासाठी संरक्षित सिंचनाची सुविधा निर्माण करणे आणि दुष्काळी भागामध्ये फलोत्पादन पिकांच्या क्षेत्र विस्तारासाठी सिंचन सुविधा निर्माण करण्यासाठी 100 टक्के अनुदानावर राबविण्यात येणार आहे. या घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकरी समुहाकडे फलोत्पादन पिके असणे आवश्यक आहे.

यातील पात्र शेतकऱ्यांना सामुहिक शेततळे घटकासाठी आकारमाननिहाय अनुदान देय राहणार आहे. 34x34x4.70 मीटर आकाराच्या सामुहिक शेततळ्यासाठी दोन हेक्टर ते पाच हेक्टर किंवा त्यापेक्षा जास्त फलोत्पादन क्षेत्र असणे आवश्यक आहे. यासाठी तीन लाख 39 हजार रूपये अनुदान देण्यात येणार आहे. 24x24x4 मीटर आकाराच्या सामुहिक शेततळ्यासाठी 1 हेक्टर ते 2 हेक्टर फलोत्पादन क्षेत्र असणे आवश्यक आहे. यासाठी एक लाख 75 हजार रूपये अनुदान देण्यात येणार आहे.

या योजनेच्या लाभ घेऊ इच्छ‍िणाऱ्या शेतकऱ्यांनी mahadbtmahait.gov.in या पोर्टलवर सिंचन सुविधा या घटकाखाली अर्ज करावेत, अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषि कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी एस. जी. डाबरे यांनी केले आहे.

00000

जिल्ह्यातील 279 ग्रामपंचायतींच्या निवडणूक कार्यक्रम घोषित

            बुलडाणा, दि. 16 : जिल्ह्यातील 279 ग्रामपंचायतींच्या सदस्य पदांसह थेट सरपंच पदाच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांनी घोषित केला आहे. यानुसार दि. 18 डिसेंबर 2022 रोजी मतदान होणार असून दि. 20 डिसेंबर 2022 रोजी मतमोजणी होणार आहे.

          राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमानुसार ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील 13 तालुक्यातील 279 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक पारंपारिक पद्धतीने राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहिर केल्यापासून निकाल जाहिर होईपर्यंत आचारसंहिता लागू असणार आहे. या क्षेत्रातील मतदारांवर विपरीत प्रभाव टाकणारी कोणतीही कृती, घोषणा मंत्री, खासदार, आमदार, तसेच संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकाऱ्यांना आचारसंहिता कालावधीत कुठेही करता येणार नाही.

सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी दि. 18 नोव्हेंबर 2022 रोजी संबंधित तहसीलदार निवडणुकीची सूचना प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्र दि. 28 नोव्हेंबर 2022 ते दि. 2 डिसेंबर 2022 दरम्यान दाखल करण्यात येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी दि. 5 डिसेंबर 2022 रोजी होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत दि. 7 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असेल व त्याच दिवशी दुपारी 3 वाजल्यानंतर निवडणूक चिन्हाचे वाटप होईल. मतदान दि. 18 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मतमोजणी दि. 20 डिसेंबर 2022 रोजी होईल. जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे दि. 23 डिसेंबर 2022 रोजी निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

00000

तासिका तत्वावर शिल्पनिदेशकासाठी अर्ज करण्याचे आवाहन

            बुलडाणा, दि. 16 : येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत तासिका तत्वावर शिल्पनिदेशकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी अर्ज करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

संस्थेमध्ये रिक्त असलेल्या पदांसाठी नियमित शिल्पनिदेशक नेमणुकीने किंवा बदलीने रूजू होईपर्यंत अत्यंक तात्पुरत्या स्वरूपात तासिका तत्वावर शिल्पनिदेशकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांनी दि. 21 नोव्हेंबर 2022 पर्यंत लेखी अर्ज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मलकापूर रोड, बुलडाणा येथे सादर करावे लागणार आहे. रिक्त पदे, आवश्यक व्यवसायनिहाय शैक्षणिक अर्हता, मानधन व इतर बाबींसाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य व्ही. बी. बचाटे यांनी केले आहे.

00000

सेसफंडातून मोटारपंप, शिलाई मशीन साठी अर्ज करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 16 : जिल्हा परिषदेचा समाज कल्याण विभागामार्फत सन 2022-23 या वर्षातील जिल्हा परिषदेच्या 20 टक्के सेसफंड योजनेमधून मागासवर्गीय शेतकरी आणि   मागासवर्गीय आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा पत्नीस 100 टक्के अनुदानावर विद्युत 5 एचपी मोटार पंप आणि मागासवर्गीय महिलांना‍ शिलाई मशिन पुरविण्यात येणार आहे. यासाठी दि. 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत अर्ज करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सदर योजनेचे अर्ज पंचायत समिती स्तरावर कार्यालयात उपलब्ध आहे. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी मागासवर्गीय शेतकरी आणि महिला लाभार्थ्यांनी परिपूर्ण अर्ज सर्व कागदपत्रांसह संबंधित गटविकास अधिकारी यांच्याकडे सादर करावीत.

या योजनेचा लाभ मागासवर्गीय शेतकरी आणि आत्महत्याग्रस्त विधवा महिलांनी घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनोज मेरत यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment