Wednesday, 2 November 2022

DIO BULDANA NEWS 02.11.2022

 राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी नामांकन करण्याचे आवाहन

बुलडाणादि. 2 : केंद्र शासनाच्या युवा कार्यक्रम व खेल मंत्रालयातर्फे राष्ट्रीय युवा पुरस्‍कार सन 2020-21 या वर्षाकरीता नामांकने मागविण्यात आले आहे. अर्हता धारण करणाऱ्या युवक, युवती व संस्थांनी आपले नामांकन अर्ज, प्रस्ताव दि. 6 नोव्हेंबर 2022 पर्यंत सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सन 2020-21 या वर्षाचे राष्ट्रीय युवा पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. याबाबत सविस्तर माहिती awards.gov.in या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील युवक, युवती व संस्थांनी राष्ट्रीय युवा पुरस्कार सन 2020-21 या वर्षाकरीता नामांकनासाठी अर्ज, प्रस्ताव awards.gov.in या संकेतस्थळावर करावे लागणार आहे.

जिल्ह्यातील पात्र युवक, युवती व संस्थांनी आपले प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.

00000

किमान आधारभूत किंमत खरेदीत भरड धान्याची खरेदी सुरू

बुलडाणादि. 2 : किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत ज्वारी, बाजरी, मका, रागी या भरड धान्याची खरेदी करण्यात येणार आहे. खरीप पणन हंगामात भरडधान्य खरेदी दि. ३१ जानेवारी २०२३ पर्यंत आधारभूत किंमतीने करण्यात येणार आहे.

पिकाची आधारभूत किंमत आणि शेतकऱ्यांना प्रत्यक्ष द्यावयाचा दर हे पुढीलप्रमाणे आहेत. ज्वारी संकरित २ हजार ९७० रूपये, ज्वारी मालदांडी २ हजार ९९० रूपये, बाजरी २ हजार ३५० रूपये, मका १ हजार ९६२ रूपये, रागी ३ हजार ५७८ रूपये राहणार आहे. किमान आधारभूत किंमत खरेदी योजना ही केद्र शासनाची योजना आहे. शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा कमी किंमतीने धान्य विकावे लागू नये, यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. त्यासाठी राज्य शासनाने नियुक्त केलेल्या अभिकर्ता संस्थामार्फत, बिगर आदिसावी क्षेत्रात दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटीव्ह मार्केटींग फेडरेशन, मुंबई व आदिवासी क्षेत्रात, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ, नाशिक यांच्यामार्फत राज्यात एफएक्यू दर्जाच्या धान, भरड धान्याची खरेदी करण्यात येत आहे. त्यानुसार सन २०२२-२३ या हंगामामध्ये धान, भरड धान्य खरेदीच्या सुचना प्राप्त झाल्या आहेत.

पणन हंगाम २०२२-२३ मध्ये केंद्र शासनाने किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत भरड धान्याची ज्वारी, बाजरी, मका आणि ज्वारी खरेदी करण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्यानुसार तालुकानिहाय भरड धान्य खरेदी करण्याकरीता अभीकर्ता संस्थेद्वारे एजन्सीना मंजुरी देण्यात आली आहे. तसेच भरड धान्य खरेदी करण्याबाबत व त्याची शासकीय धान्य गोदामामध्ये साठवणूक करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.

भरडधान्य गोदाममध्ये साठवणूक करताना पूर्ण वजन करुन आणि दर्जाची खात्री करुनच ताब्यात घ्यावे. ते योग्य दर्जाचे असल्याबाबत खातरजमा करुन त्याबाबतचे प्रमाणपत्र घ्यावे. खरेदी केलेले भरडधान्य गोदामात साठवणूक करताना खरेदी केलेल्या धान्याबाबत लॉट एन्ट्री झाल्याची खातरजमा करावी. गोदामात धान्य साठवणूक करताना गुणवत्ता, दर्जा, आर्द्रता व वजन याबाबत खातरजमा करुन धान्याची साठवणूक करावी. खरेदी केंद्रावर आवश्यक सर्व मुलभूत सुविधा, तसेच सर्व प्रकारच्या सुचनाचे फलक आदी बाबींची संस्थेने पुर्तता करावी. कोविडचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी धान खरेदीच्या वेळी सर्व खरेदी केंद्रावर सुरक्षितरित्या खरेदी होण्यासाठी परस्परांमधील अंतर निर्जंतुकीकरण आदी बाबींचे पालन करण्याबाबत दक्षता घेण्यात यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. ह. पी. तुम्मोड यांनी केले आहे.

00000

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत

शिल्पनिदेशक, लिपिक पदांसाठी मुलाखती

बुलडाणा, दि. 2 : मोताळा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिल्पनिदेशकांची चार पदे तात्पुरत्या स्वरूपात घड्याळी तासिका तत्वावर आणि आयएमसी अंतर्गत भरण्यात येणार आहे. यासाठी दि. 15 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे.

या पदामध्ये कोपा 1 पद, ड्रेसमेकींग 1 पद, गणित, चित्रकला, एम्प्लाईबिलिटी स्किल 1 पद अशी तीन पदे आणि आयएमसी अंतर्गत एक लिपिक पद भरण्यात येणार आहे. यासाठी अर्हताप्राप्त उमेदवारांनी आवश्यक कागदपत्राच्या साक्षांकित प्रती सह दि. 11 नोव्हेंबर 2022 पर्यंत अर्ज पोहोच करावे लागणार आहे. उमदेवारांची संख्या जास्त झाल्यास लेखी परीक्षा घेवून उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. कौशल्य विकास विभागाच्या शासन निर्णयानुसार तासिका तत्वावरील पदाकरिता मानधन व अटी शर्ती राहतील, असे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य एस. डी. गंगावणे यांनी कळविले आहे.

00000

No comments:

Post a Comment