Monday, 14 November 2022

DIO BULDANA NEWS 14.11.2022

 

ओबीसी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना

*अर्ज दाखल करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 14 : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाकडून ओबीसी विद्यार्थ्याकरिता देशांतर्गत शिक्षणासाठी 10 लाख, तर परदेशातील शिक्षणासाठी 20 लाख रुपये मर्यादेत कर्ज सुविधा राष्ट्रीयकृत बँकामार्फत उपलब्ध करून दिले जाणार आहे. या योजनेमध्ये उमेदवाराला बँकेमध्ये भरलेल्या व्याजाच्या 12 टक्के पर्यंत व्याज परतावा मिळणार आहे. यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत असे आवाहन करण्यात आले आहे.

या योजनेसाठी उमेदवाराचे वय हे 17 ते 30 वर्ष असावे, महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असल्याचा पुरावा, ओबीसी असल्याचा जातीचा दाखला, तहसिलदार यांचे 8 लाख रुपयापर्यतचा कौटुंबिक वार्षिक उत्पन्न दाखला किंवा नॉन क्रीमेलेअरच्या मर्यादेत, बारावीमध्ये 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण असावा. उमेदवार व पालक यांचे आधार कार्ड, फोटो, आधारकार्ड बचतखाते पासबुकला लिंक असावे. वयाचा पुरावा, शैक्षणिक अभ्यासक्रमाबाबत आवश्यक कागदपत्रे तसेच शैक्षणिक खर्चाचा तपशिलासह महामंडळाच्या msobcfdc.org या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाइन अर्ज सादर करावेत.

राज्य-देशांतर्गत तसेच परदेशी अभ्यासक्रमामध्ये येणाऱ्या अभ्यासक्रमात आरोग्य विज्ञानमध्ये सर्व पदवी व पदव्युतर अभ्यासक्रम. अभियांत्रिकीमध्ये सर्व पदवी व पदव्युतर अभ्यासक्रम. व्यावसायिक व व्यवस्थापन अभ्यासक्रमात कृषि, अन्न प्रक्रिया व पशू विज्ञान, दुग्ध विज्ञानमधील सर्व संबंधित अभ्यासक्रमांचा समावेश राहणार आहे.

व्याज परतावा व परतफेडीचा कालावधी हा शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत बँकेने वितरित केलेल्या कर्ज रक्कमेवरील व्याजाची नियमित परतफेड केलेल्या उमेदवाराला केवळ व्याजाचा परतावा उमेदवाराच्या आधार लिंक बँक खात्यात महामंडळ वर्ग करेल. कर्जाचा कालावधी जास्तीत जास्त 5 वर्षे राहणार आहे.

पात्र उमेदवारांनी अर्ज सादर करावेत तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, तळ मजला, त्रिशरण चौक, चिखली रोड, बुलढाणा, दूरध्वनी क्र. 07262-248285. यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

एका दिवसात विद्यार्थ्यांना जातपडताळणी प्रमाणपत्र

बुलडाणा, दि. 14 : शैक्षणिक कार्यासाठी आवश्यक असणारे जातपडताळणी प्रमाणपत्रासाठी प्रवेशाच्या शेवटच्या दिवशी अर्ज दाखल केलेल्या विद्यार्थ्यांना त्याच दिवशी प्रमाणपत्र देऊन समितीने गतीमानतेचा परिचय दिला. जातपडताळणी समितीने केलेल्या कार्यवाहीमुळे विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाल्याने या कार्याचे कौतुक होत आहे.

प्रशासनातील अधिकाऱ्यांनी मनावर घेतले तर सामान्यांची अडलेली कामे तातडीने होऊ शकतात. असाच सुखद अनुभव जिल्हा जातपडताळणी समिती बुलडाणा विभागात शुक्रवार, दि. ११ नोव्हेंबर २०२२ रोजी आला. विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र नसल्याने व्यवसायिक अभ्यासक्रम सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षांत प्रवेश घेताना अडचण निर्माण झाली. या पाच विद्यार्थ्यांनी ऐन शेवटच्या दिवशी जातपडताळणी कार्यालयात अर्ज दाखल केला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जातपडताळणी समितीने त्याच दिवशी निर्णय घेऊन अर्ज निकाली काढले. एका दिवसात विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रणालीद्वारे जातपडताळणी प्रमाणपत्र मिळाले.

एकाच दिवसात प्रमाणपत्र मिळाल्याने विद्यार्थ्यांचा व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणे सुकर झाला आहे. मागासवर्गीय आणि अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणात आलेली अडचण दूर करण्याचे दायित्व घेतल्याबद्दल समितीच्या अधिकाऱ्यांचे कौतुक केले जात आहे, असे  जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य तथा उपायुक्त डॉ. मंगेश वानखडे यांनी कळविले आहे.

000000



जिल्हाधिकारी कार्यालयात पंडित जवाहरलाल नेहरू यांना अभिवादन

 

बुलडाणा, दि. 14 : देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात पंडित नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, तहसिलदार शामला खोत, प्रिया सुळे, नायब तहसिलदार संतोष बंगाळे आदी यावेळी उपस्थित होते.

0000

No comments:

Post a Comment