Monday, 22 August 2022

DIO BULDANA NEWS 22.08.2022

 

जिल्ह्यातील आठ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम घोषित

*दि. 19 सप्टेंबर 2022 रोजी मतदान

*आचार संहिता लागू राहणार

बुलडाणा, दि. 22 : राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील पाच तालुक्यातील 8 ग्रामपंचायतीसाठी सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. त्यानुसार दि. 18 सप्टेंबर 2022 रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या कालावधीत आचार संहिता लागू राहणार आहे.

घोषित करण्यात आलेला निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. तहसिलदार यांनी दि. 18 ऑगस्ट 2022 रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिध्दी करावयाची आहे. दि. 24 ऑगस्ट 2022 ते दि. 1 सप्टेंबर 2022 पर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत सार्वजनिक सुट्टी वगळून नामनिर्देशन पत्रे मागविणे आणि सादर करता येतील. नामनिर्देशन पत्र छाननी दि. 2 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून छाननी संपेपर्यंत करण्यात येतील. दि. 06 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र मागे घेता येईल. याचे दिवशी निवडणूक चिन्ह नेमून तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी दुपारी 3 नंतर प्रसिद्ध करण्यात येईल.

आवश्यक असल्यास दि. 18 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत मतदान घेण्यात येणार आहे. दि. 19 सप्टेंबर 2022 रोजी मतमोजणी करण्यात येईल. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना दिनांक 22 सप्टेंबर 2022 पर्यंत प्रसिध्द करण्यात येईल.

या निवडणूक कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील 5 तालुक्यातील 8 ग्रामपंचायतीसाठी सार्वत्रिक निवडणुका होत असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहिर केल्यापासून निवडणुकीचा निकाल जाहिर होईपर्यंत आचारसंहिता लागू राहणार आहे, असे जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती यांनी कळविले आहे.

0000000

गणेशोत्सवाच्या मिरवणुकीसाठी परवानगी काढण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 22 : जिल्ह्यात यावर्षी दि. 31 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर 2022 या कालावधीत गणेशोत्सव साजरा होणार आहे. या काळात शांतता आणि सुव्यवस्था कायम राहावी, यासाठी गणेशोत्सवासाठी जाहिरनामा घोषित करण्यात आला आहे. यानुसार गणेशोत्सवाच्या मिरवणुकीसाठी पोलिसांची परवानगी घेणे आवश्यक आहे.

जिल्हयातील सर्व शहर, गाव, खेड्यात सार्वजनिक रस्त्यावर अगर रस्त्याच्या आसपास सार्वजनिक शांतता भंग न होण्याच्या हेतूने गणेशोत्सवानिमित्त होणारे मेळावे, दिंडी, अगर मिरवणूकीत भाग घेणाऱ्या लोकांचे नियमनाकरीता मुंबई पोलिस कायदा 1951 चे कलम 33, 37 व 40 याप्रमाणे विविध निर्बंध घालण्यात आले आहे.

जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या कालावधीत दोन्ही दिवस धरुन श्री गणपती स्थापनेप्रित्यर्थ अगर विर्सजनाप्रित्यर्थ मेळावे किंवा पालख्या किंवा  वाद्यांसह मिरवणूक काढावयाची झाल्यास, अगर नाच-गाणे किंवा कुस्त्यांचे सामने करावयाचे असल्यास त्या व्यक्तीने संबंधित पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याकडून लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे. लेखी परवानगीशिवाय सदर कालावधीत कोणतीही मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली आहे. ज्यांना हे परवाने पाहिजे असतील त्यांनी अशी मिरवणूक काढावयाच्या 36 तास अगोदर लेखी अर्जाद्वारे संबंधित पोलिस ठाण्याच्या ठाणेदाराकडे विहित माहिती भरुन देणे गरजेचे आहे. मुख्य आयोजकाचे पूर्ण नाव व पत्ता, ज्या कारणासाठी परवाना पाहिजे ते कारण, मेळावा अगर मिरवणुकीचे वर्णन आणि मंडळाचे नाव, कोण कोणत्या ठिकाणी जाण्याकरीता परवाना पाहिजे ती तारीख आणि वेळ, ज्या रस्त्याने मिरवणूक अगर मेळावा जाणार असेल तो रस्ता, ज्या तारखेचा किंवा वेळेचा परवाना पाहिजे ती तारीख व वेळ, मिरवणूक चालक आणि सदस्यांचे पूर्ण नाव व पत्ता, मुख्य आयोजकाने मिरवणुकीतील किंवा मेळाव्यातील प्रत्येक व्यक्तीचे योग्य शांत वर्तनाबद्दल तो स्वत: जबाबदार आहे, असे अर्जावर लिहून देणे आवश्ययक आहे.

मिरवणुकीत वापरायचे वाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडून तपासून घेतल्याचे प्रमाणपत्र, अशा प्रकारची मिरवणूक अगर मेळाव्यातील प्रत्येक व्यक्तीचे योग्य शांत वर्तनाबद्दल तो स्वत: जबाबदार आहे, असे अर्जावर लिहून द्यावे लागणार आहे. अशा प्रकारची मिरवणूक अगर मेळावा सार्वजनिक जागेतून नेताना संबंधित व्यक्ती जवळ बाळगणे गरजेचे आहे. दंडाधिकारी अगर पोलिस अंमलदार यांनी तो  पहावयास मागितल्यास त्यांना दाखवला जावा. श्री गणपती विर्सजनाचे दिवशी मिरवणूक अगर मेळावा रात्री 10 वाजेपर्यंत मिळालेल्या परवान्यात नमूद केलेल्या रस्त्यानेच व वेळेनुसार काढण्यात यावी. दुसऱ्या रस्त्याने त्यांना जावू दिले जाणार नाही व वहीवाट अगर इतर सबब ऐकली जाणार नाही. मिरवणुकीमुळे इतर मिरवणुकीस अगर रहदारीस अडथळा निर्माण होणार नाही. याची खबरदारी घेतली पाहिजे. अडथळा झाला तर त्याबद्दल तो मुख्य आयोजक जबाबदार धरला जाईल.

मिरवणूक विर्सजन वेळेच्या आत केले पाहिजे. कोणत्याही प्रसंगी मिरवणूक अथवा मेळावा यांनी प्रेतयात्रेला अग्रक्रम दिला पाहिजे. व्यक्ती, प्रेत अगर त्यांच्या प्रतिमा यांचे सर्वाजनिक  जागेत प्रदर्शन करण्यास मनाई आहे. उत्सवाच्या काळात सभ्यता अगर नितीमत्तेचे बिघाड होईल किंवा कायद्याविषयी तिरस्कार निर्माण होईल किंवा निरनिराळ्या जमातीतील शांतता धोक्यात येईल, असे कोणतेही कृत्य किंवा गैरवर्तन करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याप्रमाणे तंटे, बखेडे निर्माण होतील अगर निरनिराळ्या भागात किंवा जमातीत संघर्ष निर्माण होईल, असे कोणतेही कृत्य, भाषण, जाहिरात प्रदर्शन, अंगविक्षेप, सोंग काढणे यास सक्त मनाई करण्यात येत आहे.

000000

 

No comments:

Post a Comment