Monday, 15 August 2022

DIO BULDANA NEWS 15.08.2022

 







जिल्ह्याचा पर्यटनातून विकास साधण्यावर भर देणार

-जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती

*जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

*उपस्थितांना तंबाखू मुक्तची शपथ

बुलडाणा, दि. 15 : जिल्‍ह्यात ऐतिहासिक, आध्यात्मिक आणि वन पर्यटनाची स्थळे आहेत. पर्यटनात लाभलेली ही वैविध्यता जिल्ह्याला संपन्न बनवू शकते. त्यामुळे पर्यटनाच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास साधण्यावर भर देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती यांनी केले.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजवंदन आणि संचलन सोहळा पार पडला. यावेळी आमदार संजय गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया, अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, उपवनसंरक्षक श्री. गजभिये यांच्यासह स्वातंत्र्य सैनिकांचे कुटुंबिय उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थितांना तंबाखू मुक्तीची शपथ देण्यात आली.

जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती यांनी, यावर्षीच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव असल्याने विशेष महत्व आहे, असे सांगून देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या स्वातंत्र्य सैनिकांप्रती ऋण व्यक्त करुन अभिवादन केले. विविधतेचे प्रतिबिंब जिल्ह्यात उमटले आहे, असे सांगून मातृतिर्थ सिंदखेड राजा, लोणार सरोवर, शेगाव, मेहुणा राजा यासोबत ज्ञानगंगा सारख्या वन पर्यटनामुळे जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीने समृद्ध आहे.  या स्थळांचा विकास करण्यात येत आहे. ही कामे दर्जेदार करून उत्कृष्ट पायाभूत सोयीसुविधा उभारण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. पर्यटनामुळे रोजगारात वाढ होण्यास मदत होणार आहे. 

जिल्हा प्रशासनाने बुलडाणा, नांदुरा आणि मलकापूर येथील हुतात्मा स्मारकांचे सुशोभिकरण केले. विद्यार्थ्यांमध्ये जाणीव जागृतीसाठी वकृत्व, निबंध आणि चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. नागरिकांनी घरावर राष्ट्रध्वज उभारावा, यासाठी दि. 13 ते दि. 15 ऑगस्ट दरम्यान हरघर तिरंगा अभियान राबविण्यात आले. यास नागरिकांनी प्रतिसाद दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. या उपक्रमांबरोबर स्वराज्य महोत्सवही यशस्वी झाला आहे.

समूह राष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रम बुधवार, दि. 17 ऑगस्ट रोजी सकाळी ठिक 11 वाजता होणार आहे. जिजामाता प्रेक्षागार येथे शालेय विद्यार्थी यांनी एकत्र जमायचे आहे, तर नागरिकांनी आहे त्या ठिकाणी उभे राहून राष्ट्रगीत म्हणावयाचे आहे. यात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. देश आणि राज्याच्या प्रगतीसाठी सर्व घटकांच्या विकासासाठी विविध योजना राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

राष्ट्र निर्माणासाठी प्रत्येकाने सकारात्मक विचारातून प्रगतीकडे वाटचाल करण्याचा संकल्प करावा, गेल्या कठिण काळात नागरिकांनी संयम बाळगल्याबद्दल प्रशंसा करून समस्येवर धैर्याने मात करण्याचे आवाहन केले. धैर्य आणि चिकाटीने देशाला प्रगतीपथावर नेण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती यांनी केले.

00000


No comments:

Post a Comment