कडधान्य स्वयंपूर्णता कार्यशाळेत तूरीबाबत मार्गदर्शन
बुलडाणा, दि. 5 : जिल्ह्यात पिक विविधीकरण आणि कडधान्य पिकामध्ये स्वयंपूर्णता आणण्यासाठी मोताळा येथे मंगळवार, दि. 2 ऑगस्ट रोजी कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेत प्रामुख्याने तूर पिकाची उत्पादकता वाढविण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.
कार्यशाळेत कडधान्य पिकाचे क्षेत्र आणि उत्पादकता वाढविण्याच्या दृष्टीने सखोल चर्चा करण्यात आली. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातून तूर, मसूर आणि उडीद पिकाबाबत विशेष कार्यक्रम यावर्षात राबविण्यात येणार आहे. त्यानुसार मोताळा येथील जय सरदार शेतकरी उत्पादक कंपनी येथे एक दिवसीय कार्यशाळा पार पडली.
कार्यशाळेत तूर पिकाची उत्पादकता वाढ यासाठी स्वतंत्र रोडमॅप तयार करणे, प्रामुख्याने तूर पिकाचे क्षेत्र आणि उत्पादकता वाढविण्याच्या दृष्टीने बेंचमार्क निश्चित करावयाचा आहे. तूर पिकाचे क्षेत्र उत्पादकता वाढीसाठी एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन, एकात्मिक कीड व्यवस्थापन, सिंचन सुविधा साधने आदींचा समावेश करून योग्य ते नियोजन व पुढील दिशा ठरविण्यासाठी उत्पादन ते प्रक्रिया चक्र यशस्वी करण्यासाठी कार्यशाळा घेण्यात आली.
कार्यशाळेच्या अनुषंगाने तूर लागवड तंत्रज्ञान, तूर पिकक्षेत्र वाढीमधील आव्हाने, सुधारित लागवड पद्धती आणि व्यवस्थापनात जमिन ही मध्यम ते भारी पाण्याचा चांगला निचरा होणारी असावी. वाण हे जमिनीच्या पोतानुसार आणि संरक्षित ओलीत देण्याची सोय असल्यास उशिरा परिपक्व होणाऱ्या वाणाची निवड करावी. मध्यम जमीन असल्यास मध्यम कालावधीत येणाऱ्या वाणाची निवड करावी. बीजप्रक्रिया ही जैविक व रासायनिक बुरशीनाशके वापरावी. तुरीवरील मर रोगाच्या व्यवस्थापनासाठी रोगप्रतिबंधक जाती पेराव्यात तसेच ट्रायकोडर्मा ४ ग्राम प्रती किलो बियाण्यांना लावावे. तसेच कार्बोक्सीन ३७.५ टक्के अधिक थायरम ३७.५ टक्के ३ ग्रॅम प्रती किलो बियाण्याला लावावे. पेरणीच्या नाविन्यपूर्ण पद्धतीचा वापर करून बीबीएफ, टोकन पद्धती वापरावी. ओलिताची सोय उपलब्ध असल्यास लागवडीनंतर पहिली शेंडा खुडणी ४० ते ४५ दिवस, दुसरी शेंडा खुडणी ७० ते ७५ दिवसांनी करावी. विद्राव्य खते, फवारणी, 19:19:19 किंवा 20:20:20 पिकाच्या सुरवातीच्या वाढीच्या अवस्थेत, 12:61:00 पिक फुलोरा अवस्थेत, 00:52:34 किंवा 13:40:13 पिकाचा फुलोरा ते फळ धारणेच्या अवस्थेत, 13:00:45 किंवा 00:00:50 फळ वाढीच्या अवस्थेत खतांचे प्रमाण ०.५ ते १.० टक्क्याप्रमाणे ठेवावा, ५० ते १०० ग्रॅम प्रती १० लिटर पाणी वापरून फवारणी सकाळी किंवा संध्याकाळी वाऱ्याचा वेग व सूर्यप्रकाश कमी असताना करावी. पाणी व्यवस्थापनामध्ये जमिनीच्या पोतानुसार कळी अवस्था, शेंगा लागताना आणि दाने भरताना पाणी द्यावे. कीड व्यवस्थापनात तुरीवरील शेंगा पोखरणारी अळीच्या नियंत्रणासाठी इथीऑन ५० इसी १० मिली किंवा इमामेक्टीन ५ एस. जी. ४.४ ग्रॅम किंवा क्लोरॅनटीनिलिप्रोल १८.५ एससी २.५ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
मुंग आणि उडीद पिकांचे वाण आणि बिजोत्पादन कार्यक्रम आणि कृषि व संलग्न विभाग योजनाचे एकत्रिकरण याबाबत शास्त्रज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेला जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सं. गं. डाबरे, जळगाव जामोद कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ प्रा. अनिल गांभने, प्रा. संजय उमाळे, विषय विशेषज्ञ डॉ. भारती तिजारे, कीटक शास्त्रज्ञ पी. पी. देशपांडे यांनी मार्गदर्शन केले.
00000
समाज कल्याण कार्यालयात माहिती अधिकार,
निपुण भारत या विषयावर कार्यशाळा संपन्न
बुलडाणा, दि. 5 : स्वातंत्राचा अमृत महोत्सवाच्या निमित्ताने समाज कल्याण कार्यालयात माहिती अधिकार आणि निपुण भारत विषयावर कार्यशाळा पार पडली.
कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी सहायक आयुक्त अनिता राठोड होत्या. जिल्हा क्रिडा अधिकारी गणेश जाधव, प्रदीपकुमार धर्माधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून होते. ॲड. राजेंद्र पांडे हे कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
श्री. पांडे यांनी माहिती अधिकाराबाबत मार्गदर्शन केले. शासकीय कामाच्या माहितीबाबत कायद्याची भिती न बाळगता हा कायदा व्यवस्थितपणे समजावून घेणे आवश्यक आहे. कायद्याची परिपूर्ण माहिती असल्यास शासकीय कामकाज करताना कोणतीही अडचण येत नाही. नागरिकांशी सुसंवाद साधून वाद मिटवता येतात. शासकीय माहिती मागितल्यास कशाप्रकारे आणि किती दिवसात द्यावी याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच माहिती अधिकाराची संकल्पना समजावून सांगितली. यावेळी उपस्थितांच्या शंकाचे निरासन त्यांनी केले.
डॉ. राठोड यांनी प्रास्ताविकातून कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट केला. श्री. जाधव यांनी समाज कल्याण विभागाच्या मदतीबद्दल सांगितले. निपुन भारत योजनेबाबत श्रीमती राठोड यांनी माहिती दिली. श्री. वाघ यांनी निपुन भारतची कार्यपद्धती याबाबत माहिती दिली. समन्वयक सतिश बाहेकर सूत्रसंचालन केले. अरुण इंगळे यांनी आभार मानले. कार्यशाळेसाठी प्रदीप धर्माधिकारी यांनी पुढाकार घेतला.
00000
No comments:
Post a Comment