समूह राष्ट्रगीत गायनास विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद
* जिल्ह्यातही एकाच वेळी झाले राष्ट्रगीत गायन
बुलडाणा, दि. 17: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त बुलडाणा येथील जिजामाता प्रेक्षागार आणि जिल्ह्यात विविध ठिकाणी आज समूह राष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रम पार पडला.
समूह राष्ट्रगीत गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा क्रिडा अधिकारी, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग आणि नगरपालिका यांच्यावतीने करण्यात आले. या उपक्रमात शहरातील विविध शाळांनी सहभाग नोंदवित हजारो विद्यार्थ्यांनी समूह राष्ट्रगीत गायन केले.
समूह राष्ट्रगीत गायनाच्या कार्यक्रमाला आमदार संजय गायकवाड, जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया, अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, तहसिलदार रूपेश खंडारे, जिल्हा क्रिडा अधिकारी गणेश जाधव आदी उपस्थित होते.
बुलडाणा येथील जिजामाता प्रेक्षागार येथे आज सकाळी 11 वाजता राष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रम पार पडला. पोलिस बॅण्डसह हजारो विद्यार्थ्यांनी उत्साहात एक ताल, एका सुरात राष्ट्रगीताचे समूह गायन केले.
आमदार श्री. गायकवाड यांनी राष्ट्रभावना जागृत करण्यासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध उपक्रम यशस्वी केल्याबद्दल अभिनंदन केले. जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती यांनी जिल्हावासियांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि हरघर तिरंगा उपक्रमात नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदविल्याबद्दल आभार मानले.
अतिशय नियोजनबद्ध असे या समूह राष्ट्रगीत गायन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
00000
No comments:
Post a Comment