अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त
जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
बुलडाणा, दि. 1 : साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले.
निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी नायब तहसिलदार संजय बंगाळे, अव्वल कारकून एस. जे. पाल. अपेक्षा जाधव यांच्यासह उपस्थित अधिकारी आणि कर्मचारी यांनी अभिवादन केले.
00000
जिल्हास्तर नेहरु कप हॉकी क्रीडा स्पर्धेचे आयोजन
बुलडाणा, दि. 1 : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालया अंतर्गत नेहरु कप हॉकी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा दि. 5 ते दि. 6 ऑगस्ट या दरम्यान पार पडतील.
सदर स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंकरीता सबज्युनिअर (15 वर्षाआतील मुले) क्रीडा स्पर्धा मुले वयोगटासाठी दि. 1 नोव्हेंबर 2007 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेला असावा. तसेच ज्युनिअर 17 वर्षाखालील मुले व मुलीसाठी दि. 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेला असावा.
जिल्हास्तरीय नेहरु कप हॉकी सबज्युनिअर, ज्युनिअर क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांनी दि. 4 ऑगस्ट 2022 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, क्रीडा नगरी, जांभरुन रोड, बुलडाणा येथे ऑफलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. स्पर्धेत सहभागी खेळाडूंकडे जन्मदाखला, आधारकार्ड, खेळाडू ओळखपत्र, पासपोर्ट सर्व मूळ प्रतीत असणे अनिवार्य आहे.
या स्पर्धा दि. 5 ते 6 ऑगस्ट 2022 रोजी 15 वर्षाआतील मुले (सबज्युनिअर) 17 वर्षाआतील मुले (ज्युनिअर), 17 वर्षाआतील मुली (ज्युनिअर) होणार आहे. यासाठी सर्व वयोगटातील खेळाडूंनी स्पर्धेच्या दिवशी सकाळी 9 वाजता सहकार विद्या मंदिर, चिखली रोड, बुलडाणा येथे उपस्थित राहावे लागणार आहे.
प्रवेश अर्जावर खेळाडूचे संपूर्ण नाव, जन्मतारीख, वर्ग, आधार क्रमांक, शाळेचे नाव, पत्ता, शाळेचा युडायस क्रमांक, खेळाडू स्वाक्षरी, रजिस्टर नंबर, मोबाईल क्रमांक, संस्था प्रमुख, मुख्याध्यापक यांच्या स्वाक्षरीने पाठवावे लागणार आहे. तसेच स्पर्धेकरीता आवश्यक किट सोबत आणणे आवश्यक आहे.
जिल्ह्यातील शाळा, संघांनी नेहरु कप हॉकी क्रीडा स्पर्धेत सहभागी व्हावे, अधिक माहितीसाठी राज्य क्रीडा मार्गदर्शक अनिल इंगळे यांच्याशी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, क्रीडा नगरी, जांभरुन रोड, बुलडाणा येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.
00000
समाज कल्याण अधिकाऱ्यांचा शासकीय वसतिगृहात मुक्काम
* संवाद उपक्रमांतर्गत वसतिगृहास भेटी
*विद्यार्थ्याकडून उपक्रमांचे स्वागत
बुलडाणा, दि. 1 : समाज कल्याण विभागाच्या वसतीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या संवाद उपक्रमांतर्गत सहायक आयुक्त डॉ. अनिला पवार यांनी शासकीय वसतिगृहात मुक्काम केला. डॉ. राठोड यांनी बुलडाणा येथील मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात मुक्काम करून उपस्थित विद्यार्थिनींसोबत संवाद साधला.
समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या शासकीय वसतिगृह योजनेबाबत विद्यार्थ्यांकडून सोयी सुविधांबाबत तक्रारी केल्या जातात. त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी संवाद कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
या संवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यातील सर्व अधिकारी यांनी थेट विद्यार्थ्यांसोबतच गुरूवार, दि. 28 जुलै रोजी शासकीय वसतिगृहात रात्रभर मुक्काम ठोकून विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
संवाद उपक्रमांतर्गत सहायक आयुक्त डॉ. राठोड यांनी बुलडाणा येथील वसतिगृहात मुक्काम केला. यावेळी विद्यार्थ्यांनी मनमोकळ्या गप्पा केल्या. सहायक आयुक्त् यांनी वसतिगृह गृहपालांनी वसतिगृहात निवास करण्याबाबत निर्देश दिले. विद्यार्थ्यांच्या सुचना आणि मागणीनुसार त्यांना योग्य सुविधा पुरविण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी कौशल्य विकास कार्यक्रम, तसेच तज्ज्ञ व्यक्तींचे व्याख्यान आयोजित करण्याबाबत निर्देश देण्यात आले.
00000
कृषि यांत्रिकीकरण योजनेसाठी उत्पादक, विक्रेत्यांकडून प्रस्ताव आमंत्रित
बुलडाणा, दि. 1 : कृषि यांत्रिकीकरण योजनेसाठी उत्पादक, विक्रेत्यांची सूची तयार करण्यात येत आहे. यासाठी उत्पादक आणि विक्रेत्यांनी दि. 20 ऑगस्ट 2022 पर्यंत प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन कृषि विभागातर्फे करण्यात आले आहे.
सद्यस्थितीत राज्यात कृषि यांत्रिकीकरण उपअभियान, राज्य पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण, राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत कृषि यांत्रिकीकरण प्रकल्प, राष्ट्रीय फलोद्यान अभियान, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, पोकरा आदी योजनेतून कृषि यांत्रिकीकरण घटकासाठी शेतकऱ्यांना विविध यंत्रे, अवजारासाठी अनुदान देण्यात येत आहे.
कृषि आयुक्तालय स्तरावर उत्पादक आणि त्यांच्या अधिकृत विक्रेत्यांची सुचि करण्यासाठी ऑफलाईन प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. सादर करावयाच्या अर्जाचा नमुना, अटी व शर्ती, करारनामा, ज्या यंत्रे, औजारांसाठी करावयाच्या सूचिची यादी आदी तपशील कृषि विभागाच्या krishi.maharashtra.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ज्या उत्पादकांचा या प्रक्रियेद्वारे अनुदानावर पुरवठा करण्यासाठी पात्र सुचिमध्ये समावेश करण्यात येईल, त्यांच्यामार्फत पुरवठा होणाऱ्या औजाराना अनुदान अनुज्ञेय राहील.
या प्रक्रियेसाठी प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत दि. 20 ऑगस्ट 2022 आहे. अधिक माहितीसाठी कृषि विभागाच्या krishi.maharashtra.gov.in संकेतस्थळाला भेट द्यावी आणि सदर प्रस्ताव प्रत्यक्षरित्या कृषि उपसंचालक (किटकनाशके व औजारे, गुनि-५), निविष्ठा व गुणनियंत्रण विभाग, कृषि आयुक्तालय, मध्यवर्ती इमारत, पुणे येथे सादर करावे, असे कृषि संचालक दिलीप झेंडे यांनी कळविले आहे.
00000
गोदाम बांधकाम या घटकासाठी अर्ज घेण्यास सुरवात
बुलडाणा, दि. 1 : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, अन्नधान्य पिके व राष्ट्रीय खाद्यतेल अभियान, गळीतधान्य पिके अंतर्गत सन २०२२-२३ या वर्षासाठी फ्लेक्झी घटकांतर्गत गोदाम बांधकामासाठी इच्छुक शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी उत्पादक गटांकडून तालुका कृषि अधिकारी कार्यालय, उपविभागीय कृषि अधिकारी कार्यालयामध्ये ऑफलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
गोदाम बांधकामाचा लाभ हा नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी उत्पादक संघांना होणार आहे. यासाठी दि. 18 ऑगस्ट 2022 पर्यंत अर्ज करावा करावा लागणार आहे. विहित मुदतीत अर्ज करणाऱ्या नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी उत्पादक संघ यांचाच विचार केला जाणार आहे. जिल्ह्यास गोदाम बांधकाम करणे साठी दोन लक्षांक प्राप्त झाला आहे. लक्षांकापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास त्याची स्थानिकरित्या सोडत काढून लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे.
जिल्ह्यांमध्ये योजनेंतर्गत २५० मेट्रिक टन क्षमतेचे गोदाम बांधकामासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या ५० टक्के किंवा १२.५० लाख यापैकी जे कमी असेल त्याप्रमाणे अनुदान अनुज्ञेय राहणार आहे. सदर बाब बँक कर्जाशी निगडीत असून इच्छुक अर्जदार शेतकरी उत्पादक संघ, कंपनी यांनी केंद्र शासनाच्या ग्रामीण भंडारण योजना, नाबार्डच्या मार्गदर्शक सूचनांनुसार बँकेकडे प्रकल्प सादर करावा लागणार आहे. बँकेने कर्ज मंजूर केल्यानंतर संबधित अर्जदार कंपनी लाभास पात्र राहणार आहे. त्यानुसार जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयातून निवड पत्र मिळाल्यावर आणि बांधकाम पूर्ण झाल्यावर अनुदान अदायगी होईल, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सं. गं. डाबरे यांनी कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment