Wednesday, 3 August 2022

DIO BULDANA NEWS 03.08.2022

                                                 


                            जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

बुलडाणा, दि. 3 :  क्रांतिसिंह नाना पाटील यांना त्यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात अभिवादन करण्यात आले.

अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी पुष्पार्पण करून अभिवादन केले.

00000



समाज कल्याण अधिकाऱ्यांचा शासकीय वसतिगृहात मुक्काम

* संवाद उपक्रमांतर्गत वसतिगृहास भेटी

*विद्यार्थ्याकडून उपक्रमांचे स्वागत

बुलडाणा, दि. 3 : समाज कल्याण विभागाच्या वसतीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या संवाद उपक्रमांतर्गत सहायक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी शासकीय वसतिगृहात मुक्काम केला.  डॉ. राठोड यांनी बुलडाणा येथील मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात मुक्काम करून उपस्थित विद्यार्थिनींसोबत संवाद साधला.

समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या शासकीय वसतिगृह योजनेबाबत विद्यार्थ्यांकडून सोयी सुविधांबाबत तक्रारी केल्या जातात. त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी संवाद कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

या संवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यातील सर्व अधिकारी यांनी थेट विद्यार्थ्यांसोबतच गुरूवार, दि. 28 जुलै रोजी शासकीय वसतिगृहात रात्रभर मुक्काम ठोकून विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

          संवाद उपक्रमांतर्गत सहायक आयुक्त डॉ. राठोड यांनी बुलडाणा येथील वसतिगृहात मुक्काम केला. यावेळी विद्यार्थ्यांनी मनमोकळ्या गप्पा केल्या. सहायक आयुक्त् यांनी वसतिगृह गृहपालांनी वसतिगृहात निवास करण्याबाबत निर्देश दिले. विद्यार्थ्यांच्या सुचना आणि मागणीनुसार त्यांना योग्य सुविधा पुरविण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी कौशल्य विकास कार्यक्रम, तसेच तज्‍ज्ञ व्यक्तींचे व्याख्यान आयोजित करण्याबाबत निर्देश देण्यात आले.

00000

आदिवासी मुलांच्या वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु

बुलडाणा, दि. 3 : आदिवासी विकास विभागाच्या बुलडाणा येथील आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहात 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.

दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकरिता प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज swayam.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर दि. 5 ऑगस्ट 2022 पर्यंत अर्ज करावे लागणार आहे.

वसतिगृहाच्या प्रवेशासाठी विद्यार्थी हा अनुसूचित जमातीचा असावा, विद्यार्थ्यांकडे व्यावसायिक आणि अव्यावसायिक अभ्यासक्रमासाठी जातपडताळणी प्रमाणपत्र आवश्यक आहे. चालू वर्षातील तहसिलदार यांचा उत्पन्नाचा मुळ दाखला आवश्यक आहे.‍ विद्यार्थ्यांचे स्वत:चे राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणे बंधनकारक आहे. हे खाते आधार कार्ड आणि मोबाईलशी संलग्न असावे. प्रवेश घेतलेल्या शाळा, महाविद्यालयाचे बोनाफाईड प्रमाणपत्र, कुटुंब प्रमुखाचे हमीपत्र असावे लागणार आहे. विद्यार्थ्यांचा शाळा, कॉलेज सोडल्याचा दाखला आणि गुणपत्रिका, आधारकार्ड, आई, वडील नोकरीवर नसल्याचे ग्रामसेवक, तलाठी यांचे प्रमाणपत्र, विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेले महाविद्यालय बुलडाणा शहराचे ठिकाणी असणे आणि मान्यताप्राप्त महाविद्यालय, संस्थांमध्ये मान्यताप्राप्त अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेला असणे गरजेचे आहे.

परिपूर्ण अर्जाची प्रत आणि आवश्यक दस्ताऐवज गृहपाल, आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह, बुलडाणा यांचे कार्यालय, चिखली रोड, मॉडेल डिग्री कॉलेजजवळ, विश्वास नगर, बुलडाणा येथे सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

                                                          oooooooo

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 3 : सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्ती सबलीकरण विभागाकडून दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या शालांतपूर्व आणि शालांत परिक्षोत्तर दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी उच्चश्रेणी शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

यासाठी शाळा, महाविद्यालयांनी पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांचे अर्ज राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल  scholarshrip.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन सादर करावयाचा आहे. सन 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी शिष्यवृत्ती योजना - दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शालांतपूर्व शिष्यवृत्ती, विद्यार्थी नोंदणी दि. 30 सप्टेंबर 2022, सदोष अर्ज पडताळणी दि. 16 ऑक्टोबर 2022, संस्था पडताळणी दि. 16 ऑक्टोबर 2022 पर्यंत करण्यात येणार आहे.

शिष्यवृत्ती योजना दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शालांत परिक्षोत्तर पोस्ट मॅट्रीक विद्यार्थी नोंदणी दि. 31 ऑक्टोबर 2022, सदोष अर्ज पडताळणी तारीख दि. 15 नोव्हेंबर 2022, संस्था पडताळणी दि. 15 नोव्हेंबर 2022 पर्यंत करण्यात येणार आहे. तसेच शिष्यवृत्ती योजना दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी उच्च श्रेणी शिक्षण शिष्यवृत्ती विद्यार्थी नोंदणी दि. 31 ऑक्टोबर 2022पर्यंत, सदोष अर्ज पडताळणी तारीख दि. 15 नोव्हेंबर 2022, तर संस्था पडताळणी दि. 15नोव्हेंबर 2022 पर्यंत करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांनी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनोज थोरात यांनी केले आहे.

oooooooo

No comments:

Post a Comment