Monday, 8 November 2021

DIO BULDANA NEWS 8.11.2021

 


कोविड लसीकरणाचे उद्दिष्ट मिशन मोडवर पूर्ण करा

-          पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

·         कोविड लसीकरण आढावा बैठक

बुलडाणा, (जिमाका) दि. 8 :  कोविड या संसर्गजन्य आजाराने सर्व जगाला जेरीस आणले. अजूनही कोरोना संपूर्णपणे गेला नाही. जगातील काही देशात कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा डोके वर काढले आहे. अशा परिस्थितीत कोरोनाला दूर ठेवायचे असल्यास लसीकरण करून घेणे हाच पर्याय आहे. त्यामुळे 30 नोव्हेंबर पर्यंत पात्र लाभार्थ्यांचे 100 टक्के लसीकरण पूर्ण करावे. ही उद्दिष्टपूर्ती करण्यासाठी सर्व यंत्रणांनी मिशन मोडवर काम करावे, अशा सूचना पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज दिल्या.

  जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात लसीकरण आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी आढावा घेताना पालकमंत्री बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर आमदार संजय गायकवाड, जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, अप्पर जिल्हाधिकारी धनजंय गोगटे आदी उपस्थित होते. तसेच सभागृहात जि.प सभापती राजेंद्र पळसकर, रियाजखा पठाण, मलकापूर नगराध्यक्ष हरीष रावळ, सिं. राजा नगराध्यक्ष श्री. तायडे, पं.स सभापती व लोकप्रतिनिधी, मुस्लीम धर्माचे मौलाना उपस्थित होते.

  धर्मगुरूंनी आपआपल्या समाजात लसीकरणासाठी नागरिकांना प्रेरीत करण्याचे आवाहन करीत पालकमंत्री डॉ. शिंगणे म्हणाले, धर्मगगुरूंचे समाजातील नागरिक ऐकतात. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवतात. प्रथम त्यांनी लस घेतली नसल्यास ती घ्यावी. लस घेतानाचे व्हिडीओ, फोटो सोशल मिडीयातून प्रसारीत करावी. जेणेकरून त्यांचे बघून नागरिक लस घेण्यास येतील. लसीविषयी समाजात असलेले गैरसमजही त्यामुळे दूर होतील. लसीकरण मोहिमेमध्ये जनसहभाग वाढवून तीला चळवळीचे स्वरूप देण्यात यावे. यामध्ये लोकप्रतिनिधींचा सहभाग घ्यावा. सर्व विभागांनी त्यांच्याकडील शासकीय योजनांचा लाभ, कार्यालयातील प्रवेश व कार्यालयाच्या अन्य संदर्भातील बाबींविषयी कोविडचे दोन्ही डोसचे लसीकरण प्रमाणपत्र दाखविणे बंधनकारक करावे.

  ते पुढे म्हणाले, शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी आपल्या कुटूंबियांचेसुद्धा लसीकरण पूर्ण करावे. तशा पद्धतीचे बंधन अधिकारी व कर्मचाऱ्यांवर टाकण्यात यावे. स्वस्त धान्य दुकानात राशन घ्यावयाचे असल्यास लाभार्थ्याने लसीकरणाचे प्रमाणपत्र दाखविणे अनिवार्य करावे. लसीकरणासाठी प्रत्येक तालुक्याला मेगा कॅम्प घेण्यात यावा. गावनिहाय सुक्ष्म नियोजन करून लस न घेतलेल्या नागरिकांचे लसीकरण पूर्ण करावे. औषध प्रशासन विभागाने केमिस्ट असोसिएशनसोबत समन्वय ठेवून लसीकरण मेळावा घ्यावा. लसीकरण झाल्याबाबतचे बनावट प्रमाणपत्र दिल्याचे किंवा उपलब्ध असल्याचे निदर्शनास आल्यास अशांवर कडक कारवाई करावी. त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा. लसीबाबत गैरसमज पसरवित असलेल्यांचा शोध घेवून त्यांच्यावरही कारवाई करावी. सोशल मिडीयातून लसीकरणाचे फायदे सांगणारे व्हिडीओ, मेसेज प्रसारीत करावे. यावेळी आमदार संजय गायकवाड यांनीही लसीकरण वाढविण्याबाबत सूचना केल्या. तसेच मौलाना, अधिकारी यांनीसुद्धा लसीकरण वाढविण्याविषयी असलेल्या सुचना, अडचणी मांडल्या.  लसीकरणाची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे यांनी दिली. बैठकीला संबंधित विभागांचे विभागप्रमुख, अधिकारी उपस्थित होते.

                                                               *******


तृतीयपंथीयांना ओळखपत्राचे वितरण

बुलडाणा, (जिमाका) दि. 8 :  सामाजिक न्याय विभागाच्या वतीने तृतीयपंथीय बांधवांना मिळणाऱ्या विविध शासनाच्या योजनांचे लाभासाठी ओळखपत्र देण्यात येते. त्यानुसार आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात तृतीयपंथीय बांधवांना ओळखपत्राचे वितरण पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी आमदार संजय गायकवाड, जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, अप्पर जिल्हाधिकारी धनजंय गोगटे व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचलन सहायक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले. 

                                **********


अवैध विक्री होणाऱ्या गुटख्यावर प्रतिबंधासाठी विशेष मोहिम राबवा

-          पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

·         पोलीस विभागाची बैठक

बुलडाणा, (जिमाका) दि. 8 :  जिल्ह्यात अवैधरित्या गुटखा विक्री, वाहतूक होत असल्याचे निदर्शनास येत आहे. जिल्ह्यातून गुटखा हद्दपार झाला पाहिजे. जिल्ह्यातील गुटख्याचे एन्ट्री पॉईंट चिन्हीत करावेत. या पॉईंटवर पोलीसांनी नजर ठेवून कारवाई करावी. जिल्ह्यात गुटख्याची अवैध विक्री, वाहतूक होणार नाही, यासाठी पोलीस व अन्न, औषध प्रशासन विभागाने संयुक्तरित्या विशेष मोहिम राबवावी, अशा सूचना पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज दिल्या.

  जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या दालनामध्ये पोलीस विभागाची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी पालकमंत्री बोलत होते. याप्रसंगी आमदार संजय गायकवाड, जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया, अति. पोलीस अधिक्षक महेंद्र बनसोड, सहायक आयुक्त स.द केदारे, पोलीस निरीक्षक बळीराम गिते आदी उपस्थित होते.

   गुटखा विक्री, वाहतूकीची माहिती मिळण्यासाठी पोलीस विभागाप्रमाणे अन्न व औषध प्रशासन विभागाने खबऱ्यांचे जाळे विणण्याच्या सूचना करीत पालकमंत्री डॉ. शिंगणे म्हणाले, खबऱ्यांना योग्य बक्षीस देवून अवैध गुटखा विक्रीची माहिती घ्यावी. या माहितीची खातरजमा करीत धाडी टाकाव्यात. त्याचप्रमाणे अवैध दारू विक्री, वाहतूक याविरोधातही मोहिम उघडावी. कुठल्याही प्रकारे अवैध धंद्यांवर आळा घालावा. गांजा तस्करी, विक्री यावरही कारवाई करावी. त्याचप्रमाणे शाळांपासून 200 मीटर अंतरावर तंबाखुजन्य पदार्थ विक्री करता येत नाही. या नियमांचे पालन करावे. नियमांनुसार शाळांच्या 200 मीटरच्या आवारात तंबाखुजन्य पदार्थांची विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास कडक कारवाई करावी. यावेळी पोलीस विभागातील अधिकारी उपस्थित होते.

                                                               *******

                                    केमीस्ट व फार्मासिस्ट यांनी कोविड लसीकरण मोहिमेत सहभाग घ्यावा

बुलडाणा, (जिमाका) दि. 8 :  राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व केमीस्ट व फार्मासिस्ट यांनी कोविड लसीकरण मोहिमेत सक्रीय सहभाग घ्यावा. या मोहिमेत आपण व आपल्या नातेवाईकांचे तातडीने लसीकरण झालेले नसल्यास ते करून घ्यावे. तसेच आपल्याकडे येणारे रूग्ण व रूग्णाच्या नातेवाईकांना कोराना लसीकरणाबाबत प्रेरीत करावे. त्यांना लसीकरणाचे फायदे व सुरक्षीततेविषयी माहिती द्यावी. सक्रीय सहभाग घेवून ही मोहिम जनमोहिम बनवावी, असे आवाहन औषध निरीक्षक गजानन घिरके यांनी केले आहे.

                                                                                    ******

अनुकंपाधारक उमेदवारांची कागदपत्रे तपासणी आता 12 नोव्हेंबर रोजी

बुलडाणा,(जिमाका) दि.8: जिल्हा परिषद बुलडाणा अंतर्गत अनुकंपाधारक उमेदवारांचे एकूण 331 उमेदवारांची ज्येष्ठता यादीतील ज्येष्ठता सूची व शैक्षणिक  पात्रता धारण करणाऱ्या व सरळसेवेच्या आरक्षीत रिक्त पदांवर पात्र उमेदवारांची तात्पुरती निवड यादी यापूर्वी 15.9.2021 रोजी जि.पच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली. या यादीवर लेखी आक्षेप मागविण्यात आले होते. त्यानुसार तात्पुरत्या निवड यादीवर प्राप्त आक्षेपांची सुनावणी घेवून पडताळणी करण्यात आली आहे. अनुकंपाधारक उमेदवार यांचे शैक्षणिक पात्रतेचे मुळ कागदपत्र व इतर आवश्यक कागदपत्रांची तपासणी करून समुपदेशन प्रक्रिया 9 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती. मात्र अपरिहार्य कारणास्तव पात्र अनुकंपाधारक ही प्रक्रिया 12 नोव्हेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता श्री. छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, जि. प बुलडाणा येथे आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित रहावे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

                                                                        **********

 

No comments:

Post a Comment