जिल्हाधिकारी कार्यालयात सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांना अभिवादन
बुलडाणा,(जिमाका) दि. 1: देशाचे पहिले गृह मंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 146 व्या जयंती निमित्ताने 31 ऑक्टोंबर रोजी त्यांच्या प्रतिमेला जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले. तसेच देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या स्मृतीदिनानिमित्ताने 31 ऑक्टोंबर रोजी त्यांच्या प्रतिमेलासुद्धा अभिवादन करण्यात आले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांनी प्रतिमांना पुष्पहार अर्पन करून अभिवादन केले. याप्रसंगी उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना पुष्प अर्पन करून अभिवादन केले. तसेच राष्ट्रीय एकात्मतेची शपथही यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांना देण्यात आली.
**********
जिल्ह्यातील एकूण 1419 गावांची सुधारीत पैसेवारी जाहीर
- 742 गावांची 50 पैशांच्या आत, तर 677 गावांची पैसेवारी 50 पैशांच्या वर
बुलडाणा,(जिमाका) दि.1: सन 2021 -22 या खरीप हंगामातील जिल्ह्याची सुधारित पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे. ही सुधारीत पैसेवारी जिल्ह्यातील एकूण 1419 गावांची आहे. यामध्ये 742 गावांची पैसेवारी 50 पैशांच्या आत आली असून 677 गावांची पैसेवारी 50 पैशांच्या वर आली आहे.
तालुकानिहाय 50 पैशांपेक्षा जास्त व 50 पैशांपेक्षा कमी सुधारीत पैसेवारी असलेल्या गावांची संख्या पुढीलप्रमाणे : बुलडाणा – एकूण गावे 98, पैसेवारी 50 पैशांच्या पेक्षा आत, सुधारीत पैसेवारी 46, चिखली : एकूण गावे 144, सर्व गावांची पैसेवारी 50 पैशांपेक्षा जास्त, सुधारीत पैसेवारी 57, दे. राजा : एकूण गावे 64, सर्व गावांची पैसेवारी 50 पैशांच्या आत, सुधारीत पैसेवारी 48, मेहकर : एकूण गावे 161, सर्व गावांची पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी, सुधारीत पैसेवारी 47, लोणार : एकूण गावे 91, सर्व गावांची पैसेवारी 50 पैशांपेक्षा जास्त, सुधारीत पैसेवारी 58, सिं. राजा : एकूण गावे 114, सर्व गावांची पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी, सुधारीत पैसेवारी 47, मलकापूर : एकूण गावे 73, सर्व गावांची पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी, सुधारीत पैसेवारी 48, मोताळा : एकूण गावे 120, सर्व गावांची पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी, सुधारीत पैसेवारी 47, नांदुरा : एकूण गावे 112, सर्व गावांची पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी, सुधारीत पैसेवारी 45, खामगांव : एकूण गावे 145, सर्व गावांची पैसेवारी 50 पैशांपेक्षा जास्त, सुधारीत पैसेवारी 54, शेगांव : एकूण गावे 73, सर्व गावांची पैसेवारी 50 पैशांपेक्षा जास्त, सुधारीत पैसेवारी 64, जळगांव जामोद : एकूण गावे 119, सर्व गावांची पैसेवारी 50 पैशांपेक्षा जास्त, सुधारीत पैसेवारी 56 आणि संग्रामपूर तालुक्यात एकूण गावे 105 असून या गावांची पैसेवारी 50 पैशांपेक्षा जास्त तर सुधारीत पैसेवारी 51 आहे.
तरी जिल्ह्यातील एकूण 1419 गावांपैकी बुलडाणा, दे. राजा, मेहकर, सिं.राजा, मलकापूर, मोताळा व नांदुरा तालुक्यातील सर्व एकूण 742 गावांची पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी आहे. तसेच चिखली, लोणार, खामगांव, शेगांव, जळगांव जामोद व संग्रामपूर तालुक्यांमधील सर्व 366 गावांची सुधारीत पैसेवारी 50 पैशांपेक्षा जास्त आहे. संपूर्ण जिल्ह्याची सुधारीत पैसेवारी 51 आहे, असे जिल्हाधिकारी एस राममूर्ती यांनी कळविले आहे.
*********
मतदार यादीतील दुरूस्ती, वगळणी व नविन नोंदणीसाठी विशेष मोहिम
· 11 नोव्हेंबरला विशेष ग्रामसभेचे आयोजन
· 13, 14 व 27, 28 नोव्हेंबर रोजी होणार विशेष मोहिम
बुलडाणा,(जिमाका) दि.1: उपसचिव व सह मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या पत्रानुसार 1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार यादी पुर्ननिरीक्षण कार्यक्रमानुसार 1 नोव्हेंबर 2021 रोजी प्रारूप मतदार याद्या जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघात पदनिर्देशीत ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. मतदार यादीतील नावात दुरूस्ती करणे, वगळणे किंवा नवीन नाव नोंदणी करण्यासाठी जिल्ह्यात 13, 14 व 27,28 नोव्हेंबर रोजी विशेष मोहिम आयोजित करण्यात आली आहे. ज्या मतदारांनी अद्यापही मतदार यादीमध्ये नाव नोंदविलेले नाही, अशा मतदारांनी या विशेष मोहिमेच्या दिनांकास आपले मतदान केद्रांवर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे आपले विहीत नमुन्यातील अर्ज सादर करावे. ग्रामविकास विभागाच्या परिपत्रकानुसार मतदार यादीतील नाव दुरूस्त करणे, नाव वगळणे तसेच नविन नाव नोंदणी प्रक्रिया गावातील नागरिकांपर्यंत सुलभतेने पोहचाव्यात याकरिता 16 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करून मतदार यादीचे वाचन होणार आहे. या विशेष ग्रामसभेस सर्व नागरिकांनी उपस्थित राहून आपली मतदार यादीतील नाव अद्ययावत, नवीन नोंदणी किंवा वगळायचे असल्यास वगळून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एस रामामूर्ती तथा उपजिल्हाधिारी श्रीमती गौरी सावंत यांनी केले आहे.
आरोग्याची योग्य ती खबरदारी घेवून दिपावली साजरी करावी
· मार्गदर्शक सुचना जारी
बुलडाणा,(जिमाका) दि.1: यावर्षी दि. 2 ते 6 नोव्हेंबर 2021 दरम्यान दिपावली उत्सव साजरा करण्यात येणार आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी अजूनही कोरोनाचा धोका कायम आहे. त्यामुळे नागरिकांनी उत्सव साजरा करताना आरोग्याच्या दृष्टीकोनातून योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन अपर जिल्हादंडाधिकारी दिनेश गिते यांनी केले आहे.
दिवाळीच्या अनुषंगाने गृह विभागाने मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहे. कोविड - 19 च्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता महाराष्ट्र शासन महसूल व वन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने दि. 4 जुन 2021, 11 ऑगस्ट 2021 तसेच 24 सप्टेंबर 2021 रोजीच्या ब्रेक द चेन अंतर्गत दिलेल्या सुधारित मार्गदर्शन सूचनांचे तंतोतंत पालन करावे. कोविड संसर्गामुळे बंद करण्यात आलेली धार्मिक स्थळे खुली करण्यात आली असली तरी दिपावली उत्सव घरगुती स्वरुपात मर्यादित राहील याची दक्षता घ्यावी. दिपावली उत्सवा दरम्यान कपडे, फटाके, दागदागिने व इतर वस्तू खरेदी करण्यासाठी दुकानांत व रस्त्यावर गर्दी होत असते. तथापि, नागरिकांनी शक्यतोवर गर्दी टाळावी. विशेष करुन ज्येष्ठ नागरिक तसेच लहान बालके यांनी घराबाहेर पडण्याचे टाळावे. तसेच मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे, जेणेकरून कोरोनाचा संसर्ग / संक्रमण वाढणार नाही.
दिपावली हा दिव्यांचा तसेच प्रकाशाचा उत्सव मानला जातो. या उत्सवा दरम्यान दरवर्षी मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येते. त्यामुळे वायु व ध्वनी प्रदुषणाची पातळी वाढून जनसामान्यांच्या तसेच प्राणीमात्रांच्या आरोग्यावर होणारे वितरीत परिणाम दिपावली उत्सवानंतर बराच कालावधीपर्यंत दिसून येतात. कोरोना आजार झालेल्या किंवा होऊन गेलेल्या नागरिकांना फटाक्यांच्या धुरामुळे वायु प्रदुषणाचे त्रास होण्याची भिती आहे. ही बाब विचारात घेऊन नागरिकांनी चालू वर्षी फटाके फोडण्याचे टाळावे. त्याऐवजी दिव्यांची आरास करून उत्सव साजरा करावा. कोरोनाचे नियम शिथील करण्यात आले असले तरी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर एकत्रित येण्यावर निर्बंध कायम ठेवले आहेत. त्यामुळे सार्वजनिक कार्यक्रम उदा. दिपावली पहाट आयोजित करताना 24 सप्टेंबर 2021 रोजीच्या ब्रेक द चेन अंतर्गत दिलेल्या मार्गदर्शक सूचनांमधील नियमांचे काटेकोर पालन होईल याची दक्षता घ्यावी. शक्यतोवर अशा कार्यक्रमांचे ऑनलाईन, केबल नेटवर्क, फेसबुक इ. माध्यमांद्वारे प्रसारण करण्यावर भर देण्यात यावा.
सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम किंवा शिबीरे (उदा. रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इ. आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता यांबाबत जनजागृती करण्यात यावी. मात्र त्या ठिकाणी देखील लोकांनी एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर एकत्रित येऊ नये, याची दक्षता घेण्यात यावी. सर्वोच्च न्यायालयाने दि. 23 ऑक्टोबर 2018 व 23 जुलै 2021 रोजी दिलेल्या आदेशांचे तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे. कोविड - 19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी वेळोवेळी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच यानंतर व प्रत्यक्ष उत्सव सुरू होण्याच्या मधल्या कालावधीत काही सूचना नव्याने प्रसिद्ध झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे, असे आदेशात नमूद आहे.
कोरोना अलर्ट : जिल्ह्यात 06 सक्रीय रूग्ण; आजचे पॉझीटीव्ह ‘शून्य’
बुलडाणा, (जिमाका) दि. 1 : पॉझीटीव्ह रूग्णसंख्येने जिल्हावासियांना आज 20 व्यांदा शून्याचा अनुभव दिला आहे. मात्र तरीही जिल्ह्यात उपचार घेत असलेले 07 सक्रीय रूग्ण आहे. त्यामुळे जिल्हावासियांनी मास्क वापरणे, हात वारंवार स्वच्छ धुणे किंवा सॅनीटाईज करणे व सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करणे या त्रि सुत्रींचा अवलंब करावा. तसेच पात्र लाभार्थ्यांनी कोविड लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 26 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी आज एकही पॉझीटीव्ह रूग्ण आढळून आला नाही. सर्वच 26 अहवाल कोरोना निगेटिव्ह प्राप्त झाले आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 23 व रॅपिड टेस्टमधील 3 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 26 अहवाल निगेटीव्ह आहेत.
त्याचप्रमाणे आजपर्यंत 731413 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86932 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 86932 आहे. आज रोजी 29 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 731413 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87612 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86932 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 06 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 674 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
No comments:
Post a Comment