Saturday, 30 October 2021

DIO BULDANA NEWS 30.10.2021

 कर्ज मेळाव्यात 1846 खातेदारांना 60.92 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर

* बुलडाणा येथे कर्ज मेळावा उत्साहात 
बुलडाणा, (जिमाका) दि. ३०: वित्त मंत्रालय भारत सरकार यांच्या निर्देशानुसार देशामध्ये 7 ते 30 ऑक्टोंबर 21 पर्यंत क्रेडिट आऊट रिच अभियान राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये दिनांक २९ ऑक्टोंबर रोजी स्थानिक  गर्दे हॉल मध्ये दुपारी 12 वाजता कर्ज मेळाव्याचे उत्साहात आयोजन करण्यात आले.  कर्ज मेळाव्यात अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती होते, तर आमदार संजय गायकवाड,  मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्यश्री विसपुते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच नाबार्डचे विक्रम पठारे, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अशोक खरात, जिल्हा उद्योग केन्द्राचे महाव्यवस्थापक सुनील पाटील व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजेश इंगले उपस्थित होते. या कर्ज मेळावामध्ये सर्व बँकांनी मिळून 1846 खातेदारांना 60 कोटी 92 लक्ष 46 हजार 870 रूपये एवढे कर्ज मंजूर करण्यात आले. 
 अग्रणी बँक सेंट्रल बँक ऑफ़ इंडियाच्या पुढाकराने भव्य कर्ज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.  यामध्ये बुलडाणा येथील सर्व सरकारी व खाजगी बँकेद्वारे विविध सरकारी योजनांमध्ये कर्ज वाटप केले गेले.  यापैकी बऱ्याचशा खातेदारांना आमदार   संजय गायकवाड यांच्या हस्ते कर्ज वाटप करण्यात आले, तर काही खातेदारांना वाहनाच्या च्याव्या देण्यात आल्या.
   याप्रसंगी आमदार संजय गायकवाड़ म्हणाले,  सर्व बँकांनी मिळून असा कर्ज मेळावा घेणे ही खरोखर कौतुकाची बाब आहे. बँका कर्ज वाटपमध्ये आता सकारात्मक आहे, मात्र काही शाखामध्ये अजूनही ग्राहकांना नाहक त्रास दिल्या जातो, ते चित्र बदलायला पाहिजे. आधी प्रत्येकाला असे वाटायचे की ५ हजार रुपयांची नौकरी असली तरी चालेल पण आता चित्र बदलत आहे मराठी माणूस सुद्धा व्यावसायिक होत आहे. तेव्हा बँकांनी सहजरीत्या त्यांना कर्ज उपलब्ध करुन द्यावे. बुलडाणा येथे 2500 दुकानांचा प्रोजेक्ट सुरु करण्यात येणार आहे.  तेव्हा बँकांनी त्यांना कर्ज उपलब्ध करुन द्यावे.
  आपल्या प्रस्ताविकामध्ये स्टेट बँकेचे क्षेत्रीय प्रबंधक सुहास ढोले म्हणाले, यावर्षी जिल्ह्याचा वार्षिक कर्ज आराखडा हा 3710 कोटीचा असून आतापर्यंत 3000 कोटी पेक्षा जास्त कर्ज वाटप झालेले आहे. डिसेंबर 2021 च्या अखेरपर्यंत उद्दीष्ट पूर्ण करण्यात येणार. त्यांनी बँकेच्या विविध योजना व शासकीय योजनांमध्ये बँकेचे भागीदारी याविषयी माहिती दिली. बँकेचे ओ टी एस योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले.  संचालन अग्रणी जिल्हा व्यवस्थापक नरेश हेड़ाऊ यांनी तर आभार प्रदर्शन अग्रणी बँकेचे विजय गवळी यांनी केले. कार्यक्रमच्या यशस्वीतेसाठी वैशाली गायकवाड व राजू पोपलघाट यांनी प्रयत्न केले. 
*********
               कृषी  योजनांच्या लाभार्थ्यांनी कागदपत्रे महाडीबिटी पोर्टलवर अपलोड करावी
बुलडाणा, (जिमाका) दि. ३०: डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेतील जिल्ह्यात सन 2020- 21, 2021-22 करिता 4 हजार 853 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड महाडीबिटीद्वारे नवीन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती, इतर लाभ यासाठी ऑनलाईन पद्धतीने करण्यात आली आहे.  त्यापैकी अद्याप 1 हजार 715 लाभार्थ्यांचे कागदपत्रे अपलोड करणे बाकी आहे. निवड झाल्यापासून ३० दिवसाच्या आत सर्व कागदपत्रे ऑनलाईन करणे अनिवार्य आहे. तरी लाभार्थ्यांनी लाभापासून वंचित राहू नये यासाठी तातडीने आवश्यक कागदपत्रे जसे ७/१२, ८ अ, सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जातीचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, आधार कार्ड संलग्नित बँक पासबुक, उत्पन्नाचा दाखला, करारनामा व सामायिक जमीन असल्यास रेशन कार्ड, संमतीलेख सादर करावीत,  असे आवाहन कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद बुलडाणा यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment