कोरोना अलर्ट : प्राप्त 500 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 01 पॉझिटिव्ह
• 2 रुग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा, (जिमाका) दि. 27 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 501 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 500 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 01 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 1 अहवालाचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 131 तर रॅपिड टेस्टमधील 369 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 500 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : खामगांव शहर : वाडी 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आली आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात 01 रूग्ण आढळला आहे. तसेच उपचाराअंती 2 रुग्णांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे आजपर्यंत 730130 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86930 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 86930 आहे. आज रोजी 18 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 730130 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87608 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86930 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 04 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 674 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
‘ऑन फार्म ट्रेनिंग’मधून कृषि विकासाला संधी
- शेतकरी अभ्यास दौऱ्यासाठी शेतकऱ्यांकडून 1 नोव्हेंबर पर्यंत अर्ज मागविले
बुलडाणा, (जिमाका) दि. 27 : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातील मनुष्यबळ विकास कार्यक्रमातंर्गत शेतकऱ्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण कार्यक्रम अर्थात ऑन फार्म ट्रेनिंग राबविण्यात येत आहे. फलोत्पादन तसेच कृषि क्षेत्राशी निगडीत काम करणाऱ्या संशोधन संस्था, भारतीय कृषि अनुसंधान परिषदेतंर्गत संशोधन संस्था, कृषि विज्ञान केंद्र, पुणे, अहमदनगर, व सोलापूर या ठिकाणी कार्यरत आहेत. तसेच फलोत्पादन आणि प्रक्रिया क्षेत्रात काम करणारे शेतकरी, प्रक्रिया केंद्र याठिकाणी भेट देवून प्रत्यक्ष माहिती घेण्यासाठी शेतकरी अभ्यास दौरा व प्रशिक्षणाचे नियोजन उपविभागीय कृषि अधिकारी, खामगांव कार्यालयामार्फत करण्यात येणार आहे.
या 5 दिवशीय प्रशिक्षण दौऱ्यासाठी शासनामार्फत अनुदानावर सहलीसाठी इच्छुक शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. प्रत्यक्ष अनुभवावर आधारीत राबविलेल्या उपक्रमाची पाहणी करून शेती क्षेत्रात उत्पन्न वाढीसाठीच्या संधीचा अभ्यास शेतकऱ्यांना करता येणार आहे. फळबाग लागवड, कांदाचाळ, संरक्षीत शेती, काढणी पश्चात व्यवस्थापन, प्राथमिक प्रक्रिया याबाबत लाभ घेतलेल्या तसेच लाभ घेवू इच्छित असलेल्या शेतकऱ्यांनी उपविभागीय कृषि अधिकारी कार्यालय, खामगांव येथे 1 नोव्हेंबर 2021 पर्यंत अर्ज प्रत्यक्ष अथवा कार्यालयाच्या sdaokhamgaon1@gmail.com या इमेलवर सादर करावे, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी दिपक पटेल यांनी केले आहे.
नोव्हेंबर महिन्याचा लोकशाही दिन होणार ई लोकशाही दिन
- मोबाईल क्रमांक 7249093265 वर ऑनलाईन तक्रारी कराव्यात
- व्हिडीओ कॉलद्वारे तक्रारदाराशी साधणार संपर्क
बुलडाणा,(जिमाका) दि.27: प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन करण्यात येते. या दिवशी जिल्हाधिकारी व इतर शासकीय अधिकारी,नागरिकांच्या तक्रारींचे निरसन करतात. जर सोमवारला शासकीय सुट्टी असल्यास पुढील दिवशी मंगळवारला आयोजन करण्यात येत असते. मात्र सध्या सुरू असलेल्या कोरोना संसर्ग पार्श्वभूमी व नियमित बस सेवा नसल्यामुळे नोव्हेंबर महिन्याचा लोकशाही दिन 1 नोव्हेंबर रोजी ई- लोकशाही दिन पद्धतीने करण्यात येणार आहे. हा लोकशाही दिन 1 वाजेनंतर होणार आहे.
या लोकशाही दिनी तक्रारदारांनी ऑनलाईन पद्धतीने 7249093265 या मोबाईल क्रमांकावर पीडीएफ फाईल तयार करून तक्रारी द्याव्यात. त्यामुळे तक्रारदारांना लोकशाही दिनाला स्वत: उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही. तक्रारदारांना दिलेल्या व्हॉट्सॲप क्रमांकावर व्हिडीओ कॉल करून संपर्क साधण्यात येणार आहे. तक्रारदाराने सदर मोबाईल व्हॉट्सॲप क्रमाकांचे त्याकाळात इंटरनेट सुरू असण्याची खातरजमा करायची आहे.
तालुका स्तरावरील लोकशाही दिनानंतर 1 महिन्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही दिनात अर्ज करता येतो. जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही दिनानंतर दोन महिन्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयातील लोकशाही दिनात व विभागीय लोकशाही दिनानंतर दोन महिन्यांनी मंत्रालय लोकशाही दिनात अर्ज सादर करता येईल. अर्ज विहीत नमुन्यात असावा, चारही स्तरांवरील लोकशाही दिनाकरीता अर्जदाराने अर्ज विहीत नमुन्यात 15 दिवस आधी 2 प्रतीत पाठविणे आवश्यक राहील. तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावी, त्याचप्रमाणे न्यायप्रविष्ठ प्रकरणे, राजस्व/ अपिल, सेवा व आस्थापना विषयक बाबी, विहित नमुन्यात नसलेले तसेच आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज, जे अर्ज लोकशाही दिनाकरीता स्वीकृत करता येवू शकणार नाहीत, असे अर्ज संबंधित विभागाकडे आवश्यक कार्यवाहीसाठी 8 दिवसात पाठविण्यात येतील. त्याची एक प्रत अर्जदारास पाठविण्यात येईल, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
मिठाई व नमकीन उत्पादनांवर बेस्ट बिफोर तारीख नमूद करावी
- स. द. केदारे
- स्वीट मार्ट चालकांची बैठक
बुलडाणा,(जिमाका) दि.27: सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणावर नागरिकांकडून विविध प्रकारच्या मिठाई व नमकीन पदार्थांची खरेदी होत असते. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या निर्देशानुसार सणा सुदीच्या काळात ग्रहकांना निर्भेळ व चांगल्या दर्जाचे मिठाई, नमकीन व इतर अन्नपदार्थ मिळायला पाहिजे. मिठाई व नमकीन यांचा दर्जा उत्तम असावा. आस्थापनेत स्वच्छता असावी. तसेच मिठाई व नमकीन उत्पादनांवर बेस्ट बिफोर तारीख नमूद करावी, अशा सूचना सहायक आयुक्त अन्न स. द. केदारे यांनी आज दिल्या. स्थानिक बुलडाणा अर्बन रेसिडेंशी क्लब येथे जिल्ह्यातील स्वीट मार्ट चालक – मालक यांची बैठक आयोजित करण्यात आली. त्यावेळी श्री. केदारे बोलत होते. याप्रसंगी अन्न सुरक्षा अधिकारी जी. के. वसावे, र. द्वा. सोळंके आदी उपस्थित होते.
ते पुढे बोलताना म्हणाले, खाद्यतेलाचा पुर्नवापर अन्न पदार्थ बनविताना करू नये. त्यामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. तसेच अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 तसेच नियम व नियमन 2011 अंतर्गत विविध तरतूदींची माहिती देऊन त्याचे कसोसीने पालन करावे. बेठकीतील निर्देश, सुचनांचे पालन न केल्यास संबंधितावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही बैठकीत देण्यात आला. बैठकीस जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतील स्वीट मार्ट चालक उपस्थित होते. यावेळी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी अन्न व्यावसायिकांच्या शंकाचे निरसन केले.
बुलडाणा येथे 29 ऑक्टोंबर रोजी कर्ज मेळाव्याचे आयोजन
बुलडाणा, (जिमाका) दि. 27 : भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार क्रेडिट आऊटरिच अभियान राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने गर्दे हॉल, बुलडाणा येथे शुक्रवार, दिनांक 29 ऑक्टोंबर 2021 रोजी दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली भव्य कर्ज मेळाव्याचे आयोजन केलेले आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संजय गायकवाड उपस्थित राहणार आहे. मेळाव्यात मान्यवरांच्या हस्ते कर्ज वितरण करण्यात येणार आहे. मेळाव्यामध्ये बुलडाणा येथील सर्व सरकारी व खाजगी बँकेद्वारे विविध सरकारी योजनांमध्ये कर्ज वाटप केले जाणार आहे. तसेच याठिकाणी बँका आपला स्टॉल लावून बँकेच्या योजनांची माहिती देणार आहे व कागदपत्रे पूर्ण असल्यास तात्काळ कर्ज मंजूर करणारआहेत. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या कर्ज मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन अग्रणी जिल्हा बँक व्यवस्थापक श्री. हेडाऊ यांनी केले आहे.
· 1 नोव्हेंबर 2021 पर्यंत प्रस्ताव सादर करावे
बुलडाणा, (जिमाका) दि. 27 : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदुरा येथे कंत्राटी पद्धतीचे 1 सफाईगार पद रिक्त आहे. या पदासाठी नोंदणीकृत सुशिक्षीत बेरोजगार सेवा सहकारी संस्थांना काम वाटपाकरीता कामे प्राप्त झाली आहे. स्वच्छतेच्या दृष्टीने सफाईगार पदाची कामे करुन घेणे गरजेचे आहे. सफाईगार पदांची कामे बेरोजगार सोसायटयांकडून ठेका पध्दतीने करुन घ्यावयासाठी कौशल्य विकास कार्यालयाकडे प्राप्त झाली आहे. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कार्यालयामार्फत सुशिक्षीत बेरोजगारांच्या कार्यरत सेवा सहकारी सोसायट्या आहेत. नोंदणीकृत सेवा सहकारी संस्था सफाईगार पदांसाठी काम करण्यास इच्छूक असल्यास प्राथमिक छाननी करीता 1 नोव्हेंबर 2021 रोजी दुपारी 3 वाजेपर्यत जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय इमारत, बस स्टॅंड समोर, बुलडाणा येथे प्रस्ताव सादर करावा.
सदर संस्था ही ऑगस्ट 2000 नंतरची सहकार कायदा 1960 अन्वये नोंदणीकृत असावी, सदर कामासाठी सेवा सहकारी संस्था इच्छुक व पात्र असावी, तशी लेखी सहमती कळवावी. सेवा सहकारी संस्थेचे राष्ट्रीयकृत अथवा सहकारी बँकेत खाते असावे, मागील आर्थिक वर्षाचे लेखा परीक्षण केलेले असावे, समितीमार्फत काम मिळविण्यासाठी सहकारी सेवा सोसायटी अथवा लेाकसेवा केंद्र किमान 6 महिने कार्यरत असावे. त्यांनी यापूर्वी काम केलेले असणे आवश्यक आहे. सेवा सहकारी संस्थेमधील सदस्याबाबतचे प्रतिज्ञापत्र आवश्यक आहे. अर्जासोबत अंकेक्षण अहवाल, नोंदणी प्रमाणपत्र प्रत, संस्थेच्या अनुभवाची कागदपत्रे, बँकेच्या पासबुकाची प्रत सोबत जोडावी. प्राप्त प्रस्तावांचा विचार काम वाटप समितीमार्फत काम वाटपासाठी करण्यात येणार नाही, याबाबत नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदुरा येथे संपर्क साधावा, असे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
*****
मुक्तार मदार शाह यांनी उपोषणापासून परावृत्त होण्याचे उपवनसंरक्षक यांचे आवाहन
बुलडाणा, (जिमाका) दि. 27 : मुक्तार मदार शाह ऊर्फ इमरान शाह, रा. जामोद, ता. जळगांव जामोद हे 21 ऑक्टोंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसलेले आहे. या उपोषणापासून परावृत्त होण्याबाबत 20 ऑक्टोंबर रोजी पत्र क्रमांक 1262 अन्वये त्यांना विनंती करण्यात आलेली आहे. तथापी तक्रारकर्ते हे उपोषणास बसलेले आहे. मुक्तार मदार शाह करीत असलेले उपोषण योग्य नसल्याने त्यांनी उपोषणापासून परावृत्त व्हावे. उपोषण करीत असताना काही विपरीत घटना घडल्यास यास वनविभाग जबाबदार राहणार नाही. त्यांनी उपोषणापासून परावृत्त व्हावे, असे आवाहन उपवनसंरक्षक अक्षय गजभिये यांनी केले आहे.
त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, तक्रारदार यांचा जळगांव जामोद वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या मानसिक व शारीरिक आर्थिक दिलेल्या त्रासाबाबत व मजूरी हडप केल्याबाबत उचित कार्यवाही होवून कामावर पुन्हा रुजू करून घेण्याबाबत तक्रार अर्ज प्राप्त झाला होता. सदर तक्रारीचे अनुषंगाने तक्रारदार मुक्तार मदार शाह ऊर्फ इमरान शाह यांना 31 मे 2021 रोजी पत्र क्रमांक 222, 18 ऑगस्ट 2021 रोजी पत्र क्रमांक 583, 20 ऑक्टोंबर रोजी पत्र क्रमांक 1262 अन्वये प्रकरणी केलेल्या चौकशी व कार्यवाहीबाबत अवगत केले व उपोषणापासून परावृत्त होण्याबाबत विनंती केली आहे. तक्रारदार यांचे तक्रारीचे अनुषंगाने वनपरिक्षेत्र अधिकारी जळगांव जामोद यांनी सादर केलेल्या अहवालावरून तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी प्र. एस. जी. खान यांचे कालावधीत मुक्तार मदार शाह हे मग्रारोहयो अंतर्गत सुरू असलेल्या मेंढामारी रोपवाटीकेत हंगामी मजूर म्हणून कामावर होते, हजर असलेल्या दिवसाची मजूरी मस्टरप्रमाणे त्यांचे बँक खात्यात जमा झालेली आहे. त्यानंतर हंगामी मजूर म्हणून संरक्षणाचे काम त्यांना देण्यात आले होते, सदर कालावधीचे कामाची मजूरी त्यांचे खात्यात जमा केलेली आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी बि. डी कटारीया हे रूजू झाल्यापासून तक्रारदार हे कुठल्याही कामावर नाहीत. तक्रारदार यांनी पुन्हा कामाची मागणी केली असता वनपरिक्षेत्र अधिकारी जळगांव जामोद यांनी तक्रारदारास हंगामी रोजंदारी मजूरीचे कामावर येण्याबाबत मौखिकरित्या कळविले होते. परंतु तक्रारदार कामावर हजर झाले नाही, असे वनपरिक्षेत्र अधिकारी यांचे अहवालामध्ये नमूद आहे. तक्रारदार मुक्तार मदार शाह यांचे तक्रारीचे अनुषंगाने चौकशी करून केलेल्या कार्यवाहीबाबत त्यांना अवगत केलेले आहे, असे उपवनसंरक्षक श्री. गजभिये यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
महिला व बालविकास मंत्री ॲड यशोमती ठाकूर यांदा दौरा
बुलडाणा, (जिमाका) दि. 27 : राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अॅड यशोमती ठाकूर 28 ऑक्टोंबर रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे : दि. 28 ऑक्टोंबर रोजी सकाळी 5.10 वा हावडा एक्सप्रेसने मलकापूर रेल्वे स्थानक येथे आगमन, सकाळी 5.15 वा शासकीय वाहनाने बुलडाणा अर्बन रेसिडेन्सी क्लब, बुलडाणा कडे प्रयाण, सकाळी 6 वाजता बुलडाणा अर्बन रेसीडेन्सी क्लब येथे आगमन व राखीव, सकाळी 9 वाजता बुलडाणा रेसीडेन्सी क्लब येथे जिल्हा काँग्रेस कमेटी पदाधिकाऱ्यांसमवेत भेट व चर्चा, सकाळी 10 वा शासकीय वाहनाने चिखली विश्रामगृहाकडे प्रयाण, सकाळी 10.30 वा चिखली विश्रामगृह येथे आगमन व चिखली तालुका काँग्रेस कमिटीने आयोजित केलेल्या कार्यक्रमास उपस्थिती, दुपारी 12 वा शासकीय वाहनाने चिखली येथून डाबकी जहांगीर जि. अकोलाकडे प्रयाण करतील.
No comments:
Post a Comment