Friday, 22 October 2021

DIO BULDANA NEWS 22.10.2021

कोरोना अलर्ट : जिल्ह्यात 08 सक्रीय रूग्ण; आजचे पॉझीटीव्ह ‘शून्य’ 6 रूग्णांना मिळाली सुट्टी बुलडाणा, (जिमाका) दि. 22 : पॉझीटीव्ह रूग्णसंख्येने जिल्हावासियांना आज 15 व्यांदा शून्याचा अनुभव दिला आहे. मात्र तरीही जिल्ह्यात उपचार घेत असलेले 08 सक्रीय रूग्ण आहे. त्यामुळे जिल्हावासियांनी मास्क वापरणे, हात वारंवार स्वच्छ धुणे किंवा सॅनीटाईज करणे व सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करणे या त्रि सुत्रींचा अवलंब करावा. तसेच पात्र लाभार्थ्यांनी कोविड लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 656 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी आज एकही पॉझीटीव्ह रूग्ण आढळून आला नाही. सर्वच 656 अहवाल कोरोना निगेटिव्ह प्राप्त झाले आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 50 तर रॅपिड टेस्टमधील 606 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 656 अहवाल निगेटीव्ह आहेत. तसेच आज उपचार अंती 6 रुग्णांना रूग्णलयातून वैद्यकीय प्रोटोकॉल प्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आजपर्यंत 728512 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86924 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 86924 आहे. आज रोजी 83 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 728512 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87606 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86924 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 08 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 674 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे. ************* जिल्ह्यात चित्रपटगृहे, बंदीस्त सभागृहे, जलतरण तलाव, नाट्यगृहे सुरू एकूण आसन क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेला परवानगी जलतरण तलावसाठी खेळाडूचे लसीचे दोन्ही मात्रा आवश्यक बुलडाणा, (जिमाका) दि. 22 : जिल्ह्यात चित्रपटगृहे, बंदीस्त सभागृहे, नाट्यगृहे एकूण आसन क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेसह सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच जलतरण तलाव सुरू करण्यासह परवानगी देण्यात आली आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, भारतीय साथरोग अधिनियम, फौजदारी प्रक्रिया संहीता 1973 चे कलम 144 अन्वये जिल्हादंडाधिकारी एस रामामूर्ती यांनी कोरोना संसर्ग नियम पाळून चित्रपट गृहे, बंदीस्त सभागृहे, नाट्यगृहे व जलतरण तलाव सुरू करण्यास आदेशान्वये परवानगी दिली आहे. प्रतिबंधीत क्षेत्र वगळता चित्रपट प्रदर्शन सुरू करण्याकरीता ही परवानगी असणार आहे. चित्रटगृह व नाट्यगृहांसाठी अशी आहे नियमावली : प्रेक्षागार, सामायिक क्षेत्रात व प्रतीक्षा क्षेत्रात किमान 6 फुट सुरक्षीत अंतर राखावे, नेहमी तोंड व नाकावर मुखपट्टी असावी, प्रवेश व निर्गमनाच्या मार्गांवर, सामायिक क्षेत्रात सॅनीटायझर उपलब्ध असावे, श्वसनविषयक शिष्टाचाराचे काटोकोरपणे पालन करावे,थुंकण्यास सक्त मनाई असावी, कोविड प्रतिबंधक लसीकरण झाल्याबाबतचे अंतिम प्रमाणपत्र भेट देणाऱ्यांनी दाखवावे, खाद्यगृहांमध्ये नियुक्त केलेले कर्मचारी, प्रेक्षकांना जागा दाखविणारे कर्मचारी, स्वच्छतेसाठी नियुक्त केलेले कर्मचारी यांचेसह सर्व कर्मचारी वर्गाचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण झालेले असावे, चित्रपट / नाट्याचे तिकिट दाखविल्यावरच प्रवेश द्यावा, प्रवेश द्वारावर तापमान तपासणी करावी, लक्षणे नसलेल्या व्यक्तींनाच प्रवेश द्यावा, प्रेक्षागार, प्रवेश व निर्गमनाच्या ठिकाणी प्रेक्षकांकरीता रांगेसाठी आखीव खुणा कराव्यात, आतील आसन व्यवस्था पर्याप्त सुरक्षीत अंतर राखले जाईल अशी असावी, जी आसने वापरायची नसतील त्या आसनावर आसनांचा वापर करू नये असे स्पष्ट खुण करावी, मध्यंतरामध्ये सामायिक जागा, लॉबी व प्रसाधनगृहात गर्दी होवू नये याची दक्षता घ्यावी, गर्दी टाळण्यासाठी विविध पडद्यांवरील प्रदर्शनाच्या वेळांमध्ये योग्य अंतर राखावे, मल्टीप्लेक्समध्ये दोन पडदे असल्यास दोन्ही पडद्यावरील चित्रपट / नाट्य प्रदर्शनाच्या वेळा वेगवेगळ्या असाव्या, तिकट आरक्षणावेळी डिजीटल, संपर्करहीत व्यवहारांना अधिक प्राधान्य द्यावे, संपर्क व्यक्तीचा शोध घेणे सुकर होण्यासाठी आरक्षणावेळी संपर्क क्रमांक घ्यावे, तिकट काढतेवेळी रांगांचे व्यवस्थापन करावे, चित्रपट गृह / नाट्यगृह परीसरातील दांडे, कठडे आदींचे वारंवार निर्जंतुकीकरण करावे, प्रत्येक प्रदर्शनानंतर प्रेक्षागाराचे निर्जंतुकीकरण करावे, सर्व कर्मचाऱ्यांनी मोबाईलमध्ये आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करून ॲप अद्ययावत ठेवावे, चित्रपट / नाटयगृह परीसरात प्रवेशद्वारे, तिकिट विक्री ठिकाणे, प्रसाधनगृहे आदी ठिकाणी काय करावे व काय करू नये याबाबतच्या सुचना लावाव्यात, कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण व संसर्ग सुरक्षा नियम आदी घोषणा चित्रपट प्रदर्शनापूर्वी, मध्यंतरामध्ये व प्रदर्शनच्या शेवटी कराव्यात, लसीकरण मोहिमेची जनजागृती करावी, वातानुकूलीत उपकरणांचे तापमान 24 ते 30 अंश से. मर्यादेत असावे, सापेक्ष आर्द्रता 40 ते 70 टक्क्यांच्या मर्यादेत असावी, हवेचे पुर्नचक्रण टाळावे, केवळ आवेष्टीत खाद्यपदार्थ व पेय पदार्थ यांनाच परवानगी देण्यात येईल, चित्रपटगृहातील पडदा असलेल्या प्रेक्षागाराच्या आत खाद्यपदार्थ व पेय यांना मनाई असेल. बंदीस्त सभागृह / मोकळ्या जागेत होणारे इतर सांस्कृतिक कार्यक्रम नियमावली : प्रवेशद्वारावर तापमान तपासणी करावी, एकूण बैठक क्षमतेच्या 50 टक्के इतक्या मर्यादेपेक्षा अधिक प्रेक्षक संख्या असू नये, उपस्थित सर्वांनी मास्क वापरावे, सामाजिक सुरक्षा अंतर राखावे, सादरकर्त्या कलाकारांची वेळोवेळी वैद्यकीय तपासणी करावी, सर्व कलाकार / आयोजनप व साह्यभूत कर्मचारी यांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण दोन्ही मात्रा झालेली असावी, कार्यक्रमाच्या वेळी वापरण्यात येणारे सर्व उपकरणे निर्जंतुकीकरण केलेली असावी, प्रेक्षकांना कालाकार कक्षात जाण्याची परवानगी नसावी, प्रवेश व निर्गमन, सामाईक क्षेत्रात हात स्वच्छ करण्यासाठी निर्जंतुक द्रव्य उपलब्ध असावे, कार्यक्रम संपल्यावर सभागृहाचे निर्जंतुकीकरण करावे, थुंकी उत्पन्न करणारे पदार्थ व तंबाखूजन्य पदार्थ बाळगण्यास मनाई असावी, नशा आणणाऱ्या द्रव्यांचे सेवन करू नये, गर्दी नियंत्रणासाठी सुरक्षा व्यवस्था असावी, कार्यक्रमाच्या ठिकाणी कोरोना पार्श्वभूमीवर घ्यावयाची काळजी यबाबत ध्वनीफित किंवा फलक लावावे. जलतरण तलाव नियमावली : जलतरण तलावातील जलतरणासाठी मुभा देण्यात आलेले वय 18 वरील खेळाडू व व्यवस्थापन, कर्मचारीवृंद यांचे कोविड लसीकरणाच्या दोन्ही मात्रा पूर्ण घेऊन 14 दिवस पूर्ण झालेले असावे, वय 18 वर्षाखालील खेळाडूंच्या सरावासाठी संबंधित खेळाडूच्या पालकांचे संमतीपत्र व वयाचा पुरावा सोबत असावा. तरी या सर्व आदेशांचे कोणत्याही व्यक्ती, समूह, संस्था अथवा संघटनांनी उल्लंघन केल्यास, त्यांचेविरूद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा, साथरोग अधिनियम, भारतीय दंड संहीता 1860 नुसार शिक्षेस पात्र असणार आहे, असे जिल्हादंडाधिकारी एस रामामूर्ती यांनी आदेशीत केले आहे. ********** कर्जमाफीच्या यादीमधील शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणिकरणासाठी विशेष मोहिम महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी सन्मान योजना आधार प्रमाणीकरण न झालेल्या शेतकऱ्यांना प्रमाणीकरणाचे जिल्हा उपनिबंधक यांचे आवाहन 15 नोव्हेंबर पर्यंत चालणार विशेष मोहिम बुलडाणा, दि. 22 (जिमाका) : राज्य शासनाने 27 डिसेंबर 2019 च्या शासन निर्णयानुसार 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 या कालावधीत पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी “महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना – 2019” ही महत्वाकांक्षी योजना सुरू केली. जिल्ह्यात या योजनेतंर्गत 1,78,179 पात्र कर्ज खात्यांच्या याद्या विशिष्ट क्रमांकासह प्राप्त झालेल्या आहे. त्यापैकी 1,73,806 खातेदारांनी आधार प्रमाणीकरण केलेले आहे. मात्र 4372 खातेदारांचे आधार प्रमाणीकरण होणे बाकी आहे. योजनेतील 4372 पात्र कर्ज खात्यांना विशिष्ट क्रमांक असतानाही संबंधित लाभार्थ्यांनी अद्याप आधार प्रमाणीकरण केलेले नसल्याने त्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळालेला नाही. त्या अनुषंगाने योजना अंमलबजावणीमधील आधार प्रमाणीकरण व तक्रार निराकारण या टप्प्यावरील प्रलंबित कामकाज विशेष कालमर्यादेत मोहिमेद्वारे पूर्ण करण्यात येणार आहे. त्यासाठी 15 नोव्हेंबर पर्यंत प्रलंबित आधार प्रमाणीकरण तसेच जिल्हा व तालुकास्तरीय तक्रारींच्या निराकरणासाठी जिल्ह्यात विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. आधार प्रमाणीकरण बाकी असलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या बँक शाखा, संस्था कार्यालय व ग्रामपंचायत कार्यालयांच्या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या विशेष मोहिमे अंतर्गत आधार प्रमाणीकरण करणे बंधनकारक असून आधार प्रमाणीकरण करण्यासाठी ही अंतिम संधी आहे. या कालावधीत आधार प्रमाणीकरण न केल्यास कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळू शकणार नाही. यासाठी सर्व संबंधित लाभार्थ्यांनी आधार प्रमाणीकरणासोबतच तालुका व जिल्हास्तरीय तक्रारींच्या निराकरणासाठी तालुका सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था व जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांचे कार्यालय व बँक शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक संगमेश्वर बदनाळे यांनी केले आहे. ****** पुर्नरचित हवामान आधारीत फळपिक विमा योजनेचे फळपिकांना मिळणार ‘कवच’ मोसंबी, केळी व आंबा फळपिकाकरिता 31 ऑक्टोंबर, तर संत्रा फळासाठी 30 नोव्हेंबर अंतिम मुदत डाळींब फळपिकासाठी 14 जानेवारी 2022 अंतिम मुदत गारपीट नुकसानीला मिळणार अतिरिक्त संरक्षित विमा रक्कम बुलडाणा, (जिमाका) दि. 22 – प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत पुर्नरचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना सन 2021-22, 2022-23 व 2023-24 या तीन वर्षांसाठी आंबिया बहारासाठी 18 जुन 2021 च्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये ही योजना संत्रा, मोसंबी, केळी, आंबा व डाळींब या फळपिकांकरिता राबविण्यात येणार आहे. योजनेतंर्गत फळपिकनिहाय विमा संरक्षण रक्कम शासनाने मंजूर केलेली आहे. त्यामुळे निश्चितच फळपिकांना विम्याचे कवच प्रदान होणार आहे. अवेळी पाऊस, कमी तापमान, वेगाचा वारा, जास्त तापमान, जादा आर्द्रता, जास्त पाऊस, कमी पाऊस, पावसाचा खंड व गारपीट या हवामान धोक्यापासून निर्धारित केलेल्या कालावधीत शेतकऱ्यांना विमा संरक्षण देण्यात येणार आहे. तसेच आर्थिक सहाय्य देणे व फळपीक नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधीत राखणे हा मुख्य उद्देश या योजनेचा आहे. शेतकऱ्यांनी कर्जदार व बिगर कर्जदार योजनेतील सहभागाचा अर्ज सादर करणे, विमा हप्त्याची रक्कम कर्जदार किंवा बिगर कर्जदार शेतकऱ्यांच्या बँक खात्यातून प्राथमिक सहकारी संसथा /बँक/ आपले सरकार केंद्र, विमा प्रतिनिधी यांनी कपात करणे तसेच शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम फळपिकनिहाय वेगवेगळी आहे. मोसंबी, आंबा व केळी फळपिकाकरीता 31 ऑक्टोंबर, संत्रा फळपिकासाठी 30 नोव्हेंबर, डाळींबकरीता 14 जानेवारी 2022 अंतिम मुदत आहे. गारपीट या हवामान धोक्यापासून विमा संरक्षणासाठी अतिरिक्त विमा हप्ता लागू आहे. ज्या शेतकऱ्यांना गारपीट या हवामान धोक्याचा अतिरिक्त विमा संरक्षण घ्यायचे असलयास मुळ हवामान धोक्यासहीत केवळ बँकेमार्फत विमा प्रस्ताव सादर करणे अनिवार्य आहे. सर्व शेतकऱ्यांनी अधिसूचीत हवामान धोके विचारात घेवून विमा करावा. प्रती शेतकरी सर्व पिके मिळून जास्तीत जास्त 4 हेक्टर क्षेत्राचा विमा करता येणार आहे. फळबाग उत्पादक शेतकऱ्यांनी बँकेशी किंवा तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक, कृषि सहायक यांचेशी संपर्क साधून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नरेंद्र नाईक यांनी केले आहे. ********** जिल्हा चालक पोलीस भरतीसाठी 28 ऑक्टोंबर रोजी उमेदवारांची कागदपत्रे तपासणी बुलडाणा, (जिमाका) दि. 22 – जिल्हा पोलीस दलातील चालक पोलीस भरती 2019 जाहीराती प्रमाणे 52 व वाढीव मंजूर झालेले 8 पदे अशा एकूण 60 रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेच्या कागदपत्र पडताळणी साठी 142 उमेदवारांची यादी प्रसारीत करण्यात आली आहे. ही यादी जिल्हा पोलीस नियंत्रण कक्ष, बुलडाणा येथील बोर्डवर, पोलीस मुख्यालय, बुलडाणा येथील बोर्डवर, प्रत्येक पात्र उमेदवारास त्यांचे ईमेल व मोबाईल क्रमांकावर एसएमएस द्वारे, www.buldhanapolice.gov.in या संकेतस्थळावर प्रसारीत करण्यात आली आहे. कागदपत्र पडताळणीसाठी पात्र उमेदवारांनी आपले मूळ कागदपत्रांसह व मूळ कागदपत्रांच्या दोन छायांकित प्रती तसेच 2 पासपोर्ट आकाराचे फोटो घेवून 28 ऑक्टोंबर रोजी सकाळी 9 वाजता पोलीस मुख्यालय, बुलडाण येथे हजर रहावे, असे आवाहन सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल बेहेरानी यांनी केले आहे. *********

No comments:

Post a Comment