राज्य निपुणता केंद्रातर्गत सायकलिंग खेळाच्या प्रवेशाकरीता क्रीडा नैपुण्य चाचणीचे आयोजन
बुलडाणा, (जिमाका) दि. 25 : आंतरराष्ट्रीय व ऑलिम्पिक दर्जा खेळाडू घडविण्यासाठी राज्यातील प्रतिभावान खेळाडूंची निवड करुन त्यांचा शास्त्रोक्त प्रशिक्षण, संतुलीत आहार व अद्यावत क्रीडा सुविध पुरविुन त्यासाठी सुसंघटीत प्रयत्न करणे आवश्यक आहे. क्रीडा क्षेत्रात खेळाडूंनी दर्जेदार कामगिरी करण्यासाठी लहान वयात मुलांना क्रीडा विषयक प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे व केंद्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने (खेलो इंडीया एक्सलन्स सेंटर) राज्य निपुणता केंद्र मंजुर करण्यात आलेले आहेत. यानुसार ॲथलेटीक्स, शुटींग व सायकलींग या तीन खेळांचे निपुणता केंद्र कार्यान्वीत करण्यात आले आहे.
सायकलींग या खेळाबाबतची निवड चाचणी तज्ञ समितीमार्फत समक्ष गुणानुक्रमे देऊन प्रवेश निश्चीत केली जाणार आहे. सायकलींग या खेळाच्या प्रवेशाकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलडाणा मार्फत क्रीडा नैपुण्य चाचण्यांचे आयोजन दि.29 ऑक्टोंबर 2021 रोजी सकाळी 9 वाजता, जिल्हा क्रीडा संकुल, क्रीडानगरी, जांभरुन रोड, बुलडाणा येथे करण्यात आले आहे.
निवड प्रक्रीयेकरीता जिल्हास्तरावर 12 ते 14 वर्ष या वयोगटातील मुले व मुली सहभागी होऊ शकतील. या निवड चाचणी प्रक्रीयेमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंकरीता जन्म 2007 ते 2009 या वर्षातील असावा. तर मुलांकरीता 1600 मि. धावणे, उभी लांब उडी (Standing Broad Jump), उभी उंच उडी (Standing Vertical Jump), खेळाडूची उंची (Players Hight) या चार बाबींचा तर मुलींकरीता 800 मी. धावणे, उभी लांब उडी (Standing Broad Jump), उभी उंच उडी (Standing Vertical Jump), खेळाडूची उंची (Players Hight) या चार बाबींचा समावेश असणार आहे. जिल्हास्तर निवड चाचणीकरीता येणाऱ्या खेळाडूंना सोबत आधार कार्ड, जन्माचा दाखला, राज्य / राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा प्राविण्य प्रमाणपत्राची छायांकीत प्रत सोबत आणावी. बुलडाणा जिल्ह्यातील जे खेळाडू सायकलिंग या खेळामध्ये राज्य व राष्ट्रीय स्तरावर सहभागी झालेले आहेत अशा खेळाडूंना थेट राज्यस्तर क्रीडा चाचण्यांकरीता पाठविण्यात येईल. जिल्हास्तर निवड चाचणीमधुन प्रथम 2 मुले व 2 मुली यांची निवड दिनांक 11 नोव्हेंबर 2021 रोजी होणाऱ्या शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे, बालेवाडी, पुणे येथे राज्यस्तर निवड चाचणीकरीता करण्यात येईल. तसेच वरील कार्यक्रमानुसार बुलडाणा खेळाडूंनी उपस्थित रहावे असे जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी कळविले आहे.
********
भ्रष्टाचार विरोधात दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन
बुलडाणा, (जिमाका) दि. 25 : केंद्रीय दक्षता आयोगाच्या सुचनेनुसार प्रतिवर्षी देशामध्ये सर्वत्र दक्षता जनजागृती सप्ताह साजरा केला जातो. त्यानुसार राज्यात 26 ऑक्टोंबर ते 1 नोव्हेंबर 2021 या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे. या सप्ताह कालावधीत भ्रष्टाचार विरोधातील कारवाई संबंधीत विविध माध्यमाद्वारे नागरिकांशी संपर्क साधुन त्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
भ्रष्टाचार विरोधात महसूल, नगर परिषद, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, तहसिल कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस, विद्युत महामंडळ, व्यवसाय विभाग, आयकर, नगर रचना विभाग, जिल्हा उपनिबंधक, दुय्यम उपनिबंधक, कोषागार, सहकारी पतसंस्था, राज्य परिवहन महामंडळ, उपप्रादेशिक परिवहन विभाग, शासनाकडुन अनुदान मिळणाऱ्या सर्व संस्था व शैक्षणिक संस्था, सर्व शासकीय कार्यालय तसेच अन्य सर्व महामंडळे, सर्व लोकसेवक व खाजगी व्यक्ती यांच्या विरूद्ध तक्रार करता येते.
भ्रष्टाचार मार्गाने अधिकारी, कर्मचारी, लोकसेवकांनी बेहिशोबी संपत्ती जमविण्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिल्यानंतर त्यातील सत्यता व विश्वासर्हता पडताळल्यानंतर कार्यवाही करण्यात येते, तक्रार कर्त्याचे नाव गुप्त ठेवण्यात येते. जनतेमध्ये भ्रष्टाचार विरोधी जनजागृती करण्याचे उद्देशाने भ्रष्टाचारासंबधी माहिती असल्यास अथवा लाच मागणाऱ्या शासकीय अधिकारी व कर्मचारी लोकसेवकांबद्दल तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. किंवा कार्यालयाच्या 07262-242548, मोबाईल क्रमांक 8888768218, 8668627737 व टोल फ्री क्रमांक 1064 वर संपर्क साधावा असे आवाहन पोलीस उपअधिक्षक, ॲन्टी करप्शन ब्युरो, बुलडाणा यांनी केले आहे.
कोरोना अलर्ट : जिल्ह्यात 05 सक्रीय रूग्ण; आजचे पॉझीटीव्ह ‘शून्य’
बुलडाणा, (जिमाका) दि. 25 : पॉझीटीव्ह रूग्णसंख्येने जिल्हावासियांना आज 17 व्यांदा शून्याचा अनुभव दिला आहे. मात्र तरीही जिल्ह्यात उपचार घेत असलेले 05 सक्रीय रूग्ण आहे. त्यामुळे जिल्हावासियांनी मास्क वापरणे, हात वारंवार स्वच्छ धुणे किंवा सॅनीटाईज करणे व सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करणे या त्रि सुत्रींचा अवलंब करावा. तसेच पात्र लाभार्थ्यांनी कोविड लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 17 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी आज एकही पॉझीटीव्ह रूग्ण आढळून आला नाही. सर्वच 17 अहवाल कोरोना निगेटिव्ह प्राप्त झाले आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये रॅपिड टेस्टमधील 17 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 17 अहवाल निगेटीव्ह आहेत.
त्याचप्रमाणे आजपर्यंत 729304 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86928 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 86928 आहे. आज रोजी 20 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 729304 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87607 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86928 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 05 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 674 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
******
जागृती ॲग्रो फुड्स इंडिया कंपनीने फसवणूक केली असल्यास संपर्क साधावा
- आर्थिक गुन्हे शाखेचे आवाहन
बुलडाणा,(जिमाका) दि. 25 : जागृती ॲग्रो फुड्स इंडिया प्रा.लि. मार्केट यार्ड, चेंबर भवन, सांगली या कंपनीने गुंतवणूकीवरील परताव्याचे पैसे परत न करता विश्वासघात करून फसवणूक केली आहे. अशी फिर्याद 16.9.2015 रोजी बुलडाणा शहर पोलीस स्टेशन येथे दिली आहे. त्यानुसार पोलीसांनी राज गणपत गायकवाड व इतर 10 आरोपीविरूद्ध कलम 420, 406, 34 भादंवि सह कलम 3, 4 महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय आस्थापनामधील) हितसंबंधाचे रक्षण करण्याबाबत अधिनियम 1999 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
तरी राज गणपत गायकवाड व इतर 10 आरोपींनी अन्य जनतेची देखील अशा प्रकारची फसवणूक केल्याची शक्यता आहे. अशा प्रकारची फसवणूक झालेले आणखी जिल्ह्यातील काही व्यक्ती असल्यास त्यांनी आर्थिक गुन्हे शाखा, बुलडाणा येथे संपर्क साधावा किंवा स्वत: आपला जबाब नोंदविणे कामी आपल्याजवळ असलेल्या मूळ कागदपत्रांसह आर्थिक गुन्हे शाखा, भारत शाळेचे समोर, पोलीस स्टेशन, बुलडाणा शहरचे आवार, बुलडाणा येथे उपस्थित रहावे किंवा मोबाईल क्रमांक 9823327105 व 07262-245989 वर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक अलका निकाळजे आर्थिक गुन्हे शाखा, बुलडाणा यांनी केले आहे.
*******
सायकल रॅली काढून जिल्हा परिषदेने दिला पर्यावरण व स्वच्छतेचा संदेश
बुलडाणा,(जिमाका) दि. 25 : जिल्ह्यात पर्यावरण संतुलन प्लास्टिक बंदी स्वच्छ भारत मिशन ग्रामीण ची व्यापक अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषद अंतर्गत आज 25 ऑक्टोंबर रोजी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्ष मनिषा ताई पवार व जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष कमलताई बुधवत यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीचा शुभारंभ केला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, अर्थ व बांधकाम सभापती रियाजखान पठाण, महिला व बालकल्याण सभापती ज्योतीताई पडघान, जिल्हा आरोग्य अधिकारी श्री. सांगळे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय चोपडे, स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंदनसिंग राजपूत, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. राठोड, शिक्षणाधिकारी श्री. मुकुंद व श्री. जगताप यांची उपस्थिती होती.
प्रास्ताविक पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंदन सिंग राजपूत यांनी केले. यावेळी त्यांनी सायकल रॅली बाबत पार्श्वभूमी विषद करताना सांगितले पर्यावरण, प्लास्टिक बंदी व स्वच्छतेची मोठ्या प्रमाणात कृती होणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदने सायकल रॅलीचे आयोजन केले आहे. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी त्या म्हणाल्या, निसर्गाचा पर्यावरणाचा समतोल बिघडल्याने आज अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तसेच गावागावात प्रत्येक नागरिकांने शौचालयाचा नियमित वापर करून आपले गाव स्वच्छ व सुंदर ठेवले पाहिजे. प्रत्येक नागरिकाने आपले योगदान दिले पाहिजे. जिल्हा ओडीएफ प्लस करण्यासाठी प्रत्येक गावाने स्वच्छतेच्या या चळवळीत आपला सहभाग नोंदवावा.
जिल्हा परिषद अध्यक्ष मनिषाताई पवार अध्यक्षीय भाषणात म्हणाल्या, पर्यावरणाचे संतुलन राखणे ही आज काळाची गरज बनली आहे. एकदा वापरात येणारे प्लास्टिकचा वापर प्रत्येकाने टाळून आपल्या घरातून प्लास्टिकला हद्दपार करणे गरजेचे आहे. गावाने स्वच्छते विषयक संकल्प करून आपले गाव स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी नियमितपणे शौचालयाचा वापर करणे, गावात घनकचरा व सांडपाणीचे योग्य व्यवस्थापन करणे यासाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेतल्यास आपण गावाचा चेहरामोहरा बदलू शकतो. यासाठी प्रत्येकाने पर्यावरण व स्वच्छतेच्या पवित्र कार्यात आपला सहभाग नोंदवला पाहिजे.
या रॅलीमध्ये जिल्हा परिषद कर्मचारी, प्रबोधन विद्यालय, भारत विद्यालय, जिजामाता महाविद्यालय, नेहरू युवा केंद्र, पर्यावरण ग्रुप बुलडाणा प्राध्यापक, शिक्षक यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. रॅलीची सुरुवात जिल्हा परिषद येथून 12 वाजता होऊन संगम चौक, राठोड भवन, शासकीय विश्रामगृह, चिंचोले हॉस्पिटल, सर्क्युलर रोड, त्रिषरण चौक, कारंजा चौक, आनंद ज्वेलर्स, बाजार गल्ली, जयस्तंभ चौक या मार्गे जिल्हा परिषदेत रॅलीचा समारोप करण्यात आला. रॅली दरम्यान स्वच्छ भारत मिशन ग्रामीण चा स्वच्छता रथाद्वरे ध्वनिक्षेपकद्वारे विविध घोषणा देण्यात आल्या. प्रत्येक नागरिकाने पर्यावरण व स्वच्छतेच्या या पवित्र कार्यात आपला सहभाग नोंदवून आपले घर व परिसर स्वच्छ सुंदर ठेवूया असे आवाहन यावेळी मान्यवरांनी केले.
रोज वाढणारे प्रदूषणाला आळा बसण्यासाठी जिल्हा परिषदे अंतर्गत सर्व विभाग व कार्यालयातील अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी महिण्यातील शेवटच्या कार्यालयीन दिवशी कुठलेही वाहन न वापरता सायकल किंवा पायी कार्यालयात येवून प्रदूषण टाळावे, असे आवाहन यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी केले.
बेरोजगारांच्या कार्यरत सेवा सहकारी सोसायट्यांसाठी सफाईगार पदाची कामे मिळणार
- 1 नोव्हेंबर 2021 पर्यंत प्रस्ताव सादर करावे
बुलडाणा, (जिमाका) दि. 25 : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जळगांव जामोद, सिं. राजा, संग्रामपूर येथे प्रत्येकी कंत्राटी पद्धतीचे 1 सफाईगार पद व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, खामगांव येथे सफाईगारचे दोन पदे असून अशी एकूण 5 पदे रिक्त आहे. या पदासाठी नोंदणीकृत सुशिक्षीत बेरोजगार सेवा सहकारी संस्थांना काम वाटपाकरीता कामे प्राप्त झाली आहे. स्वच्छतेच्या दृष्टीने सफाईगार पदाची कामे करुन घेणे गरजेचे आहे. सफाईगार पदांची कामे बेरोजगार सोसायटयांकडून ठेका पध्दतीने करुन घ्यावयासाठी कौशल्य विकास कार्यालयाकडे प्राप्त झाली आहे. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कार्यालयामार्फत सुशिक्षीत बेरोजगारांच्या कार्यरत सेवा सहकारी सोसायट्या आहेत. नोंदणीकृत सेवा सहकारी संस्था सफाईगार पदांसाठी काम करण्यास इच्छूक असल्यास प्राथमिक छाननी करीता 1 नोव्हेंबर 2021 रोजी दुपारी 3 वाजेपर्यत जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय इमारत, बस स्टॅंड समोर, बुलडाणा येथे प्रस्ताव सादर करावा.
सदर संस्था ही ऑगस्ट 2000 नंतरची सहकार कायदा 1960 अन्वये नोंदणीकृत असावी, सदर कामासाठी सेवा सहकारी संस्था इच्छुक व पात्र असावी, तशी लेखी सहमती कळवावी. सेवा सहकारी संस्थेचे राष्ट्रीयकृत अथवा सहकारी बँकेत खाते असावे, मागील आर्थिक वर्षाचे लेखा परीक्षण केलेले असावे, समितीमार्फत काम मिळविण्यासाठी सहकारी सेवा सोसायटी अथवा लेाकसेवा केंद्र किमान 6 महिने कार्यरत असावे. त्यांनी यापूर्वी काम केलेले असणे आवश्यक आहे. सेवा सहकारी संस्थेमधील सदस्याबाबतचे प्रतिज्ञापत्र आवश्यक आहे. अर्जासोबत अंकेक्षण अहवाल, नोंदणी प्रमाणपत्र प्रत, संस्थेच्या अनुभवाची कागदपत्रे, बँकेच्या पासबुकाची प्रत सोबत जोडावी. प्राप्त प्रस्तावांचा विचार काम वाटप समितीमार्फत काम वाटपासाठी करण्यात येणार नाही, याबाबत नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जळगांव जामोद, खामगांव, संग्रामपूर व सिं. राजा येथे संपर्क साधावा, असे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
अनुकंपाधारक उमेदवारांची कागदपत्रे तपासणी आता 9 नोव्हेंबर रोजी
बुलडाणा,(जिमाका) दि.25: जिल्हा परिषद बुलडाणा अंतर्गत अनुकंपाधारक उमेदवारांचे एकूण 331 उमेदवारांची ज्येष्ठता यादीतील ज्येष्ठता सूची व शैक्षणिक पात्रता धारण करणाऱ्या व सरळसेवेच्या आरक्षीत रिक्त पदांवर पात्र उमेदवारांची तात्पुरती निवड यादी यापूर्वी 15.9.2021 रोजी जि.पच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली. या यादीवर 20 सप्टेंबर रोजी लेखी आक्षेप मागविण्यात आले होते. त्यानुसार तात्पुरत्या निवड यादीवर प्राप्त आक्षेपांची सुनावणी घेवून पडताळणी करण्यात आली आहे. अनुकंपाधारक उमेदवार यांचे शैक्षणिक पात्रतेचे मुळ कागदपत्र व इतर आवश्यक कागदपत्रांची तपासणी करून समुपदेशन प्रक्रिया 26 ऑक्टोंबर रोजी आयोजित करण्यात आली होती. मात्र अपरिहार्य कारणास्तव पात्र अनुकंपाधारक ही प्रक्रिया 9 नोव्हेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता श्री. छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, जि. प बुलडाणा येथे आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित रहावे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
एसटीच्या रातराणी सेवेसाठी आता सामान्य बस सेवेच्या भाड्याचीच आकारणी !
- मध्यरात्रीपासून एसटीची 17.17 टक्के भाडेवाढ
बुलडाणा,(जिमाका) दि.25: राज्य परिवहन महामंडळाने आता रातराणी बससेवेच्या भाड्यामधील अतिरिक्त भाडे कमी केले आहे. रातराणी बससेवेला आकारले जाणारे अतिरिक्त भाडे यापूढे आकारण्यात येणार नसून सामान्य बससेवेच्या भाड्याचीच आकारणी यापुढे रातराणी बससेवेला होणार आहे. त्यामुळे निश्चितच प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. इंधन, सुटे भाग याचे वाढते दर लक्षात घेता एस टी महामंडळाने आज मध्यरात्रीपासून बस प्रवास भाड्यात 17.17 टक्के भाडेवाढ केली आहे. ही भाडेवाढ आज मध्यरात्रीपासून एसटीच्या सर्व बस सेवांसाठी लागू होणार आहे. तरी प्रवाशांनी याबाबत नोंद घ्यावी, असे आवाहन विभाग नियंत्रक संदीप रायलवार यांनी केले आहे.
****
कोविड 19 ने मृत्यू पावलेल्यांच्या वारसांना 50 हजार रूपये सानुग्रह अनुदान
- जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार निवारण समिती स्थापन
बुलडाणा,(जिमाका) दि.25: कोविड 19 ने मृत्यू पावलेल्यांच्या वारसांना 50 हजार रूपये सानुग्रह अनुदान मिळणार आहे. मा. सर्वोच्च न्यायालयाचे 30 जुन 2021 रोजीच्या आदेशानुसार कोविड 19 या आजाराने मयत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना 50 हजार रूपये एवढे सानुग्रह अनुदान देण्यासाठी राज्यांना सूचीत केले आहे. त्यानुसार प्रधान सचिव, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग यांनी त्यांच्या पत्राअन्वये 50 हजार रूपये सानुग्रह अनुदान वाटपासाठी प्राधिकरण स्थापन करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी हे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. याबाबत तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आलेली असून समितीचे सदस्य सचिव जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रूग्णालय,बुलडाणा हे आहेत. याबाबतची तक्रार निवारण समितीचे सदस्य सचिव हे सर्व कार्यवाही करतील. सानुग्रह अनुदान 50 हजार रूपयांचे वाटप होण्यासाठी मदत व पुनर्वसन विभाग यांच्याकडून अर्ज सादर करण्याची कार्यपद्धती लवकरच अधिसूचीत करण्यात येणार आहे. त्याबाबत स्वतंत्रपणे कळविण्यात येणार आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
पाणी वापर करणाऱ्या यंत्रणांनी थकबाकी तातडीने भरावी
- जिल्हाधिकारी एस रामामूर्ती
- पाणी आरक्षण समिती सभा
बुलडाणा,(जिमाका) दि.25: जिल्ह्यामध्ये सिंचन व बिगर सिंचनाकरीता पाण्याची मागणी असते. याबाबत विविध पाणी वापर यंत्रणा कार्यरत आहेत. पाणी वापराची थकबाकी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. तरी पाणी वापर करणाऱ्या यंत्रणांनी आपल्याकडील थकबाकी तातडीने भरावी, असे निर्देश जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात पाणी आरक्षण समितीची सभा आज 25 ऑक्टोंबर रोजी आयोजित करण्यात आली. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, बुलडाणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एस. एस सोळंके, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी प्रविण कथने आदी उपस्थित होते.
खकडपूर्णा नदीच्या काठावरील 44 गावांकरीता नदीपात्रात पाण्याच्या मागणीचा आढावा घेताना जिल्हाधिकारी म्हणाले, खकडपूर्णा नदीपात्रात पाणी सोडण्याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जिल्हा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने संयुक्तरित्या कायमस्वरूपी पाणी आरक्षणाचा प्रस्ताव तयार करून शासनाला पाठवावा. तसेच मोताळा तालुक्यातील व्याघ्र नाला प्रकल्पात केवळ 35 टक्के पाणीसाठा असल्यामुळे या प्रकल्पातील संपूर्ण पाणीसाठा पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षणानुसार राखून ठेवावा. बिगर सिंचन थकबाकी बाबत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, खामगांव यांच्याकडील थकबाकी प्रामुख्याने वसूल करावी. बैठकीचे सादरीकरण, संचलन व आभार प्रदर्शन सहा. अभियंता योगेश तरंगे यांनी केले. जिल्ह्यात बिगर सिंचनाची एकूण थकबाकी 253.04 लक्ष आहे. सभेला उपकार्यकारी अभियंता क्षितीजा गायकवाड, कनिष्ठ अभियंता विजयसिंह राजपूत, व्ही. पी वैराळकर आदींसह विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
मोठे प्रकल्पात उपलब्ध पाणीसाठा 222.69 दलघमी असून बाष्पीभवन वगळून उपलब्ध होणारे पाणीसाठा 155.88 दलघमी आहे. यामध्ये पिण्यासाठी 11.98 दलघमी राखून ठेवण्यात आला आहे. मध्यम प्रकल्पात उपलब्ध पाणीसाठा 136.11 दलघमी आहे. यामधील बाषीभवन वगळून उपलब्ध होणारा पाणीसाठा 95.27 दलघमी असून पिण्याचे पाण्याचे आरक्षण 8.36 दलघमी आहे. लघू प्रकल्पात 156.82 दलघमी उपलब्ध पाणीसाठा आहे. यामध्ये 109.77 दलघमीचे बाषीभवन वगळून 3.76 दलघमी पिण्यासाठी आरक्षीत आहे. अशाप्रकारे एकूण 515.62 दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामधील 360.92 दलघमी पाणीसाठ्याचे बाषीभवन गृहीत धरण्यात आले आहे. तर 24.11 दलघमी पाणीसाठा पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षीत आहे.
********
No comments:
Post a Comment