Thursday, 28 October 2021

DIO BULDANA NEWS 28.10.2021

 कोरोना अलर्ट : प्राप्त 234 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 01 पॉझिटिव्ह         

बुलडाणा, (जिमाका) दि. 28 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 235 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 234 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 01 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये रॅपीड अँटीजेन चाचणीतील 1 अहवालाचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 44 तर रॅपिड टेस्टमधील 190 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 234 अहवाल निगेटीव्ह आहेत.                                                                                      

    पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे :  लोणार तालुका : बिबी 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आली आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात 01 रूग्ण आढळला आहे. 

     त्याचप्रमाणे आजपर्यंत 730364 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86930 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 86930 आहे.  आज रोजी 76 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 730364 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87609 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86930 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 05 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 674 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

                                                            *********

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये माजी सैनिकांसाठी पदभरती    

  • 3 नोव्हेंबर पर्यंत नाव नोंदणी करावी   

बुलडाणा, (जिमाका) दि. 28 : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये माजी सैनिक प्रवर्गातून राज्यात 7425 सुरक्षा रक्षक नियुक्त करावयाचे आहेत. त्या अनुषंगाने सदर पदाकरीता इच्छुक सैन्य दलातील सेवानिवृत्त झालेल्या व पात्रता पूर्ण करीत असलेल्या जिल्ह्यातील माजी सैनिकांनी लवकरात लवकर 3 नोव्हेंबर पर्यंत आपल्या डिस्जार्ज बुक, ओळखपत्र व रोजगार कार्डसह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात प्रत्यक्ष भेट देऊन नाव नोंदवावे, असे आवाहन सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी भास्कर निंबाजी पडघान यांनी केले आहे.

   या पदाकरीता माजी सैनिक 30 सप्टेंबर 1976 च्या अगोदरचा जन्म झालेला नसावा. शिक्षण कमीत कमी 8 वा वर्ग पास मात्र 12 वी उत्तीर्ण नसावा, सैन्य दलातील सेवा कमीत कमी 15 वर्ष झालेली असावी, सैन्यदलातील हुद्दा जास्तीत जास्त हवालदार किंवा त्यापेक्षा कमी असावा, सैन्य दलातील चारित्र्य कमीत कमी गुड असावे, तसेच सैन्य दलातून सेवानिवृत्त झाल्यानंतर उमेदवाराला कोणताही आजार, अपंगत्व नसावे. तो शारिरीकदृष्ट्या सक्षम असावा, तरी जास्तीत जास्त माजी सैनिकांनी नाव नोंदवावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

                                                                        *************   

खामगांव एमआयडीसीमध्ये खाद्यतेलाचा साठा जप्त; एफडीएची कारवाई

बुलडाणा, (जिमाका) दि. 28 : जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या निर्देशानुसार अन्न व औषध प्रशासन कार्यालयातर्फे अन्न आस्थापना तपासणी व अन्न नमुने घेण्याची मोहिम सुरू आहे. या मोहिमेतंर्गत रियुज्ड टिनचा वापर तसेच भेसळीच्या संशयावरून खामगांव एमआयडीसीमधील मे. फॅमिली ऑईल पॅकिंग या आस्थापनेकडून 27 ऑक्टोंबर रोजी रिफाईन सोयाबीन ऑईल (पी.एच.गोल्ड), आर. बी.डी पॉमोलीन ऑईल, रिफाईन सोयाबीन ऑयल (संस्कार), रिफाईन इडीबल ऑईल (लोटस) या सर्व खाद्यतेलाचे एकूण 5 अन्न नमुने विश्लेषणासाठी घेवून उर्वरित 5,79,057 रूपये किमतीचा एकूण 3833.06 कि. ग्रॅम साठा रियुज्ड टिनचा पॅकिंगसाठी वापर केल्यावरून व त्यांचा दर्जाबाबत संशय आल्यावरून जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी श्री. सोळंके, श्री. वसावे, दक्षता विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी श्री. घोसलवाड, श्री. महाल्ले, श्री. महागडे, श्री. विशे, श्री. दहातोंडे यांचे पथकाने केली, असे सहायक आयुक्त स.द केदारे यांनी कळविले आहे.

                                                                                                                *******

No comments:

Post a Comment