"हरभरा प्रमाणित बियाणे वितरण सप्ताह" मोहीमेचे आयोजन
बुलडाणा, (जिमाका) दि. 14 : राज्यात चांगला पाऊस झाल्याने रब्बी हंगामात हरभरा पिकाखालील क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. सन 2021-22 मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान-अन्नधान्य पिके अंतर्गत रब्बी हंगाम मध्ये हरभरा पिकाचे प्रमाणित बियाणे वितरण या बाबीचे नियोजन करण्यात आलेले आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान-अन्नधान्य पिके अंतर्गत रब्बी हंगामात हरभरा पिकाचे 10 वर्षाआतील पीडीकेव्ही कांचन, फुले विक्रांत, फुले विक्रम, आरव्हीजी-202 व बीडीएनजीके-798 या वाणांचे एकूण 89606 प्रमाणित बियाणे रक्कम रुपये 2500 प्रति क्विंटल अनुदानावर वितरणाचे नियोजन करण्यात आलेले आहे.
तसेच प्रात्यक्षिके अंतर्गत 22 हजार 339 क्विंटल हरभरा बियाणे मोफत वितरीत करण्यात येणार आहे. सदर अभियानात
प्रमाणित बियाणे वितरणासाठी एका शेतकऱ्याला 2 हेक्टर मर्यादेत लाभ देय आहे. तसेच सन 2021-22 बियाणे व लागवड उप अभियानाअंतर्गत ग्राम बीजोत्पादन कार्यक्रम अंतर्गत 10 वर्षावरील जॉकी-9218 या वाणाचे एकूण 85000 क्विंटल प्रमाणित बियाणे रक्कम रुपये 2500 प्रति क्विंटल अनुदानावर वितरणाचे नियोजन करण्यात आले आहे. सदर योजनेत प्रमाणित बियाणे वितरणासाठी एका शेतकऱ्याला 1 एकर मर्यादेत लाभ देय आहे. सदर सप्ताहात जास्तीत जास्त शेतकऱ्यांना हरभरा पिकाचे बियाणे वितरण होणार आहे. तसेच सदर सप्ताहासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांना आमंत्रित
करण्यात येणार आहे.
ग्राम कृषी विकास समिती व बियाणे पुरवठादार संस्थांच्या समन्वयाने हरभरा प्रमाणित बियाणे वितरण करण्यात येणार आहे. तसेच या मोहिमेअंतर्गत हरभरा बियाण्यास बीजप्रक्रिया प्रात्यक्षिकाचे आयोजन करून बीज प्रक्रियेचे महत्त्व शेतकऱ्यांना अवगत करण्यात येणार आहे. महाडीबीटी पोर्टलवर प्राप्त अर्जदारांना प्राधान्याने लाभ देण्यात येणार आहे, असे कृषि विभागाच्यावतीने कळविण्यात आले आहे.
********
कोरोना अलर्ट : प्राप्त 150 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 01 पॉझिटिव्ह
• 01 रुग्णाला मिळाली सुट्टी
बुलडाणा, (जिमाका) दि. 18 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 151 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 150 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 01 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 1 अहवालाचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 141 तर रॅपिड टेस्टमधील 9 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 150 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : संग्रामपूर तालुका : मनार्डी 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आली आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात 01 रूग्ण आढळले आहे. तसेच वैद्यकीय प्रोटोकॉल प्रमाणे उपचाराअंती 01 रुग्णाला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे आजपर्यंत 726651 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86915 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 86915 आहे. आज रोजी 301 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 726651 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87602 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86915 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 13 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 674 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
मका, ज्वारी व बाजरीच्या शासकीय खेदीसाठी नाव नोंदणीस मुदतवाढ
• 31 ऑक्टोंबर 2021 पर्यंत करावी नोंदणी
बुलडाणा, (जिमाका) दि. 18 : शासनाच्या आदेशान्वये पणन हंगाम 2021-22 मध्ये केंद्र शासनाची आधारभूत किंमत खरेदी योजनेतंर्गत हमी दराने मका, ज्वारी, बाजरी या शेतमालाची शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यास मान्यता मिळाली आहे. त्यासाठी जिल्ह्यात 14 खरेदी केंद्रांना मान्यताही देण्यात दिली आहे. त्यानुसार जिल्ह्यात मका, ज्वारी व बाजरी खरेदीसाठी नाव नोंदण्याकरीता 15 ऑक्टोंबर 2021 पर्यंत मुदत होती. मात्र नाव नोंदणी करण्यास मुदतवाढ देण्यात आली असून 31 ऑक्टोंबर पर्यंत मुदत देण्यात आली आहे. हमी दराने मका प्रती क्विंटल 1870, ज्वारी प्रती क्विंटल 2738 व बाजरी शेतमालासाठी 2250 रुपये हमी दर आहे. शेतकऱ्यांनी 15 ऑक्टोंबर पर्यंत मकासाठी 3630, ज्वारी 2741 अशी एकूण 6371 नोंदणी केलेली आहे.
जिल्ह्यात तालुका खरेदी विक्री संघ बुलडाणा, दे. राजा, खामगांव, लोणार, मेहकर, संग्रामपूर, मलकापूर, जळगांव जामोद व शेगांव, स्वराज्य शेतीपुरक सहकारी संस्था चिखली, संत गजानन कृषि विकास शेतकरी उत्पादक कंपनी मोताळा, सोनपाऊल ॲग्रो प्रोड्युसर कंपनी अंजनी खु केंद्र साखरखेर्डा ता. सिं.राजा, मा. जिजाऊ कृषि विकास शेतकरी कंपनी नारायणखेड केंद्र सिं.राजा, नांदुरा ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी नांदुरा केंद्र वडी ता. नांदुरा या खरेदी केंद्रांना मान्यता मिळाली आहे. या ठिकाणी ऑनलाईन शेतकरी नाव नोंदणी सुरू आहे. शेतकऱ्यांनी नाव नोंदणीसाठी आधार कार्ड, सन 2021-22 चा पीक पेरा, बँक पासबुक झेरॉक्स, जनधन योजनेचे बँक खाते असल्यास देण्यात येवू नये, चालु वर्षाच सात बारा अशा संपूर्ण कागदपत्रांसह संबंधित तालुक्यातील संस्थेशी संपर्क साधावा. शेतकऱ्यांनी नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी यांनी केले आहे.
मुदतठेव रकमेतून बालकांनी त्यांच्या पालकांची स्वप्ने साकारावी
- पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे
- कोविडमुळे अनाथ झालेल्या बालकांना अनाथ प्रमाणपत्र व मुदतठेव प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम
बुलडाणा, (जिमाका) दि. 18 : कोविडच्या साथीने जगासह, देश, राज्य व जिल्ह्यातही थैमान घातले होते. कोविडचा काळ हा अत्यंत हलाखीचा होता. या काळात नको असतानाही अनेक गोष्टी कराव्या लागल्या. या साथीत अनेकांनी आपले आप्तेष्ट, आई – वडील, मित्र गमावले. अशा परिस्थितीत कोविडमुळे एक किंवा दोन्ही पालक गमावलेले मुले यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. शासनाने अशा बालकांचे भविष्य घडविण्यासाठी 5 लक्ष रूपये मुदतठेव देण्याचा निर्णय घेतला. तरी शासनाने दिलेल्या मुदतठेव रकमेतून अशा बालकांनी आई – वडीलांची त्यांच्या विषयी असलेली स्वप्ने साकारावी, असा आशावाद पालकमंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज व्यक्त केला.
महिला व बालविकास विभागाच्या वतीने कोविडमुळे अनाथ झालेल्या बालकांना अनाथ प्रमाणपत्र आणि 5 लक्ष रूपये मुदतठेव रक्कम प्रमाणपत्राचे वितरण आज 18 ऑक्टोंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात करण्यात आले. त्यावेळी पालकमंत्री डॉ. शिंगणे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया, बाल कल्याण समिती अध्यक्ष श्रीमती कस्तुरे, समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त डॉ. अनिता राठोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अशोक मारवाडी आदी उपस्थित होते.
कोरोना काळात लॉकडाऊन हा शब्द पहिल्यांदा माहिती पडल्याचे सांगत पालकमंत्री डॉ. शिंगणे म्हणाले, या काळात सार्वजनिक ठिकाणे बंदच होती. कोविडवर मात करण्यासाठी लसीकरण करून घेणे महत्वाचे आहे. राज्य शासनाने लसीकरण वाढविण्यासाठी कवच कुंडल मोहिम सुरू केली आहे. या मोहिमेतंर्गत लसीकरण करून घ्यावे. लसींचे दोन्ही डोस पूर्ण करून घ्यावे, असे आवाहनही यावेळी पालकमंत्री डॉ. शिंगणे यांनी केले. ते पुढे म्हणाले, कोरोना काळात अनाथ, एक पालक झालेल्या बालकांना कायमस्वरूपी मदत व्हावी, याकरीता शासनाने 5 लक्ष रूपयांची मुदतठेव दिली आहे. जिल्ह्यात दोन्ही पालक गमावलेल्या 13 बालकांना 5 लक्ष रूपयांची मुदतठेव देण्यात आली. तरी या व्यतिरिक्तसुद्धा अनाथ बालके, एक पालक असलेली बालके जिल्ह्यात आहेत. अशा बालकांच्या संबंधित विभागाने शोध घ्यावा. त्यांच्यासाठी सुद्धा शासन मदत करणार आहे.
प्रास्ताविकात जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्री. मारवाडी यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका विषद केली. ते म्हणाले कोरोना सुरू झाल्यापासून जिल्ह्यात 414 बालके एक पालक किंवा दोन पालक गमावलेली आहेत. अशी अनाथ बालके असल्यास त्यांची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाला देण्यात यावी, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी पालकमंत्री डॉ. शिंगणे यांच्याहस्ते 13 अनाथ बालकांना अनाथ प्रमाणपत्र व 5 लक्ष रूपये मुदतठेव प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. त्याचप्रमाणे कोविड काळात अनाथ बालकांना सहकार्य करणारे ॲड मिरा बावस्कर, डॉ. अश्विनी शेवाळे, अदिती अर्बन बँकेचे संचालक सुरेश देवकर यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले. कार्यक्रमाचे संचलन सरीता जाधव यांनी, तर अनाथ बालकांची माहिती व आभार प्रदर्शन बाल संरक्षण अधिकारी दिवेश मराठे यांनी केले. कार्यक्रमाला अनाथ बालके, त्यांचे पालकमत्व स्वीकारलेले कुटूंबीय, संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
*******
अल्पसंख्याक विद्यार्थ्यांनी प्रि- मॅट्रीक शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करावे
- 15 नोव्हेंबर 2021 पर्यंत मुदत
बुलडाणा, (जिमाका) दि. 18 : सन 2021-22 साठी केंद्र शासन पुरस्कृत अल्पसंख्याक समाजातील इयत्ता 1 ली ते 10 वी च्या विद्यार्थ्यांना मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजना कार्यान्वीत आहे. या योजनेतंर्गत ऑनलाईन अर्ज www.scholarship.gov.in या संकेतस्थळावर स्वीकारणे सुरू आहे. प्रि- मॅट्रीक शिष्यवृत्तीचे ऑनलाईन अर्ज भरणे व नुतनीकरणासाठी विद्यार्थ्यांना 15 नोव्हेंबर 2021 अंतिम मुदत देण्यात आली आहे. ही योजना पूर्णपणे केंद्र पुरस्कृत असून शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत दरवर्षी राबविण्यात येते. तरी पात्र अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज सादर करावे, असे आवाहन अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण विभागाचे संचालक तु. ना तुपे यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment