Wednesday, 29 September 2021

DIO BULDANA NEWS 29.9.2021

 शौर्य पुरस्कारासाठी प्रस्ताव आमंत्रित

• 5 ऑक्टोंबर 2021 पर्यंत प्रस्ताव सादर करावे

बुलडाणा, (जिमाका) दि. 29 - इंडियन कौन्सील फॉर चाईल्ड वेलफेअर, नवी दिल्ली यांनी मुलांचे शौर्य पुरस्कार -2021 करीता नामांकन प्रस्ताव मागितले आहे. सदर प्रस्ताव जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, जोशी नेत्रालयाच्या बाजुला, मुठ्ठे ले आऊट, बस स्टॅण्डच्या मागे, बुलडाणा या कार्यालयात 5 ऑक्टोंबर 2021 पर्यंत सादर करावेत.

 सदर शौर्य पुरस्कार पराक्रमाच्या तोडीने स्वत:चा जीव धोक्यात घालून सामाजिक अपराध किंवा गुन्ह्याविरूद्ध धिटाईने, धैर्याने कृत्य केलेल्या दृष्यमान आणि सुस्पष्ट कामगिरीबद्दल दरवर्षी मुलांना देण्यात येतो.

   पुरस्कारासाठी अर्ज www.iccw.co.in या संकेतस्थळावर करण्यात यावे. पुरस्काराच्या प्रस्तावावर संबंधीत शाळा / महाविद्यालये यांचे प्राचार्य, जिल्हाधिकारी किंवा समकक्ष अधिकारी, पोलीस अधिक्षक यांची शिफारस असणे आवश्यक आहे. यासाठी मुलाचे वय 6 ते 18 वर्षापर्यंत असावे. या पुरस्कारासंदर्भात अधिक माहितीसाठी महिला व बालविकास अधिकारी कार्यालयात 5 ऑक्टोंबर 2021 पूर्वी संपर्क साधावा, असे जिल्हा माहिला व बालविकास अधिकारी अशोक मारवाडी यांनी कळविले आहे.

*****


मतदारांनी वोटर हेल्पलाईन ॲपचा उपयोग करावा

-          उपजिल्हाधिकारी गौरी सावंत

  • 1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर मतदार नोंदणी

बुलडाणा, (जिमाका) दि. 29: उपसचिव व सहमुख्य निवडणूक अधिकारी व भारत निवडणूक आयोगाच्या पत्रानुसार 1 जानेवारी 2020 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुर्ननिरीक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. तरी मतदार म्हणून नोंदणी झालेली नसलेल्या वंचित नागरिकांना मतदार नोंदणीसाठी संधी मिळावी व त्याचा मतदार यादीत समावेश करण्यासाठी हा कार्यक्रम जाहीर झाला आहे. नागरिक घरबसल्या मतदार नोंदणी, नाव दुरूस्ती, नाव वगळणे आदी सुविधा वोटर हेल्पनलाईन ॲपचा उपयोग करून मिळवू शकणार आहे. तरी नागरिकांनी वोटर हेल्पलाईन ॲपचा उपयोग करावा, असे आवाहन उपजिल्हाधिकारी (निवडणूक) गौरी सावंत यांनी केले आहे. मतदार यादी संक्षिप्त पुर्ननिरीक्षण कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पत्रकार परीषद आयोजित करण्यात आली. त्यावेळी त्या बोलत होत्या.

   पुर्व पुर्ननिरीक्षण उपक्रमामध्ये दुबार अथवा समान नोंदणी, एकापेक्षा अधिक नोंदी, तार्किक त्रुटी दूर करणे, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेद्वारा घरोघरी भेट देऊन तपासणी करणे, मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण व प्रमाणीकरण करणे, योग्यप्रकारे विभाग / भाग तयार करणे आदी बाबी 31 ऑक्टोंबर 2021 पर्यंत  राबविण्यात येत आहे. एकत्रीकृत प्रारूप मतदार यादी 1 नोव्हेंबर 2021 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.  या यादीवर दावे व हरकती 1 नोव्हेंबर 2021 ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत स्वीकारण्यात येणार आहे. दावे व हरकती 20 डिसेंबर 2021 पूर्वी निकाली काढण्यात येणार आहेत. मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी 5 जानेवारी 2022 रोजी करण्यात येणार आहे.  

     तरी सदर कालावधीमध्ये मतदार यादीमध्ये आपले नाव असल्याची खात्री करणे, नाव समाविष्ट करणे, दुरुस्ती करणे आदी प्रकारची कामे होणार असल्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उपजिल्हाधिकारी (निवडणूक) श्रीमती गौरी सावंत यांनी केले आहे.

******

 

 

अन्न व्यावसायिकांसाठी 1 ते 7 ऑक्टोंबर दरम्यान परवाना व नोंदणी मोहिम

बुलडाणा,दि.29 (जिमाका) : अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार अन्न व्यवसायिकांना परवाना घेणे किंवा नोंदणी करणे बंधनकारक आहे. त्याअनुषंगाने अन्न व्यावसायिकांना जिल्हास्तरावर परवाना व नोंदणी करण्याकरीता अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे दि. 1 ते 7 ऑक्टोंबर विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे, या मोहिमेचा लाभ घ्यावा असे आवाहन अन्न व औषध प्रशासनचे सहाय्यक आयुक्त स. द. केदारे यांनी केले आहे.

    जिल्ह्यातील ज्या अन्न व्यवसायिकांनी अद्यापपर्यंत परवाना घेतला नाही अथवा नोंदणी केली नाही, अशांकरीता ही मोहिम आहे. ज्या अन्न व्यवसायिकांची वार्षिक उलाढाल 12 लाखाच्या आत आहे, असे अन्न व्यावसायिक, यात प्रामुख्याने हातगाडीवर अन्नपदार्थ विक्री करणारे विक्रेते, चहा स्टॉलधारक, फळे व भाजीपाला विक्रेते, पाणीपूरी, भेळपूरी, वडापाव स्टॉलधारक व तत्सम किरकोळ विक्रेते यांचा समावेश होतो. तसेच ज्या अन्न व्यावसायिकांची वार्षिक उलाढाल ही 12 लाखापेक्षा जास्त आहे, अशा अन्न आस्थापनांनी परवाना प्राप्त करुन घेणे आवश्यक आहे. याच गटातील व्यावसायिकांनी केवळ नोंदणी घेतली असेल त्यांनी परवानासाठी अर्ज करणे बंधनकारक आहे.

    सर्व अन्न पदार्थ उत्पादक यांनी त्यांच्या अन्न पदार्थाच्या वर्गिकरणानूसार परवाना करणे आवश्यक आहे. अन्न सुरक्षा व मानके कायद्याअंतर्गत सर्व अन्न व्यावसायिकांनी https:foscos.fssai.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने किंवा जवळच्या सीएससी सेंटरवर परवाना व नोंदणीसाठी अर्ज करावा. अर्ज करताना अडचण उद्भवल्यास किंवा अधिक माहितीकरीता सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, तळमजला, प्रशासकीय इमारत, बस स्थानकासमोर, बुलडाणा येथे संपर्क साधावा. तसेच ऑनलाईन अर्ज करणाऱ्या अर्जदारांना कार्यालयात वेगळा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. परवाना व नोंदणी मंजूर झाल्यानंतर ती अन्न व्यवसायीकांच्या खात्यात किंवा ईमेलवर पीडीएफ स्वरुपात उपलब्ध होईल. त्याची प्रत आपल्या आस्थापनेच्या दर्शनी भागात लावावी. जिल्ह्यातील सर्व अन्न व्यावसायिकांनी विशेष मोहिम कालावधीत पात्रतेनुसार परवाना व नोंदणी प्राप्त करुन घ्यावी. परवाना व नोंदणी न करणाऱ्यावर कायद्यानुसार कार्यवाही करण्यात येईल, असे सहायक आयुक्त श्री. केदारे यांनी कळविले आहे.

*******

 

पीक नुकसानीची माहिती देताना ऑनलाईन अडचण असल्यास ऑफलाईन द्यावी

-          पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

बुलडाणा,दि.29 (जिमाका) : मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पिक विमा काढला असल्यास तातडीने पिक विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांक, ॲप, संबंधित बँक शाखा, नजीकच्या कृषी विभागाचे कार्यालयाला नुकसानीची माहिती द्यावी. पीक नुकसानीची माहिती देताना ऑनलाईन अडचण येत असल्यास नजीकचे कृषी विभागाचे कार्यालय, संबंधित कृषि पर्यवेक्षक, कृषि सहायक यांचेकडे ऑफलाईन नुकसानीची माहिती द्यावी.  जेणेकरून अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विम्यची मदत मिळेल.  त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी ऑनलाईन माहिती देताना अडचण येत असल्यास तातडीने ऑफलाईन पद्धतीने पीक नुकसानीची माहिती द्यावी, आवाहन पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी केले आहे.  कृषी विभागाने संबंधीत शेतकऱ्यांनी ऑफलाईन माहिती स्वीकारावी. कुणीही विमाधारक शेतकरी पिक विम्याच्या मदतीपासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी घ्यावी, अशा सूचनाही पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिल्या आहे.  

*********

विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणी अर्ज सादर करावे

  • इयत्ता 12 वी विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेल विद्यार्थी
  • 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत अंतिम मुदत

बुलडाणा,दि.29 (जिमाका) : सन 2020-21 या शैक्षणिक सत्रात इयत्ता 12 वी विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणी अर्ज 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत सादर करावेत. तसेच अर्ज सादर करतेवेळी इयत्ता 12 वी विज्ञान शाखेत प्रवेशित विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज barti.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर CCVIS  प्रणालीवर अर्ज करावेत.  ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर फायनल सबमिशन करावेत, जेणेकरून समिती कार्यालयास ऑनलाईन द्वारे अर्ज आढळून येईल व समिती अर्जाची तपासणी करता येईल. ऑनलाईन अर्ज करताना फॉर्म – 15 ए व त्यावर प्राचार्यांची सही, शिक्का व शिफारस पत्र घ्यावे. जात प्रमाणपत्र पडताळणी नियमावली मधील नमुना क्रमांक 3 व 17 अन्वये 100 रूपये स्टॅम्पवर प्रतिज्ञापत्र / नोटरी केलेले सादर असावेत. इयत्ता 12 वी विज्ञान शाखेत प्रवेशीत विद्यार्थ्यांनी माहे नोव्हेंबर 2021 पर्यंत जात प्रमाणपत्र पडताळणी अर्जाची प्रक्रिया ऑनलाईन अर्जाद्वारे पुर्ण करावी. तसेच वंशावळीनुसार आजोबा / पणजोबा यांचे शालेय /महसूली पुरावे अपलोड करून त्याची हार्ड कॉपी समिती कार्यालयास सादर करावी. महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणी प्रस्तावासोबत जोडलेल्या कागदपत्रांची सक्षम प्राधिकाऱ्याकडून प्राप्त केले असल्याची स्वत: खात्री करावी. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 10.8.1950 पुर्वी, विजाभज प्रवर्गासाठी 21.11.1962 पूर्वी आणि इमाव, विमाप्र प्रवर्गासाठी 13.10.1967 पूर्वीचे महाराष्ट्राचे रहिवासी व जातीचे पुरावे आवश्यक आहेत. समिती कार्यालय विद्यार्थ्यांचे ऑनलाईन प्राप्त झालेले अर्ज महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याचे पडताळणी विनियमन) अधिनियम 2000 व जात पडताळणी नियमावली 2012 नुसार कार्यवाही करण्यत येते. तेव्हा आपले प्राचार्यांनी महाविद्यालयात प्रवेशीत विद्यार्थ्यांचे अर्ज नमूद केलेल्या बाबीनुसार तपासणी करून या कार्यालयास सहकार्य करावे,   असे आवाहन सदस्य सचिव मनोज मेरत यांनी केले आहे.

******

                         जिल्हा सर्वेक्षण अहवालानुसार रेतीघाटांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध

बुलडाणा, दि.29 (जिमाका) : जिल्हा सर्वेक्षण अवाहल यापूर्वी तयार करण्यात आला आहे. तसेच वाळू / रेती लिलाव सन 2021-22 करीता योग्य असलेल्या रेतीघाटांची यादी www.buldhana.nic.in  या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तरी सदर जिल्हा सर्वेक्षण अहवालावर आक्षेप नोंदवायचे असल्यास 26 ऑक्टोंबर 2021 पावेतो नोंदवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

****

बेरोजगारांच्या कार्यरत सेवा सहकारी सोसायट्यांसाठी सफाईगार पदांची कामे प्राप्त

· 30 सप्टेंबर 2021 पर्यंत प्रस्ताव सादर करावे

बुलडाणा, (जिमाका) दि. 29 : शासकीय तंत्र माध्यमिक शाळा केंद्र, बुलडाणा येथे कंत्राटी पद्धतीचे 1 सफाईगार पद असून ते रिक्त आहे. या पदासाठी नोंदणीकृत सुशिक्षीत बेरोजगार सेवा सहकारी संस्थांना काम वाटपाकरीता काम प्राप्त झाली आहे. स्वच्छतेच्या दृष्टीने सफाईगार पदाची कामे करुन घेणे गरजेचे आहे. सफाईगार पदांची कामे बेरोजगार सोसायटयांकडून ठेका पध्दतीने करुन घ्यावयासाठी कौशल्य विकास कार्यालयाकडे प्राप्त झाली आहे. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कार्यालयामार्फत सुशिक्षीत बेरोजगारांच्या कार्यरत सेवा सहकारी सोसायट्या आहेत. नोंदणीकृत सेवा सहकारी संस्था वरील काम करण्यास इच्छूक असल्यास 7 ऑक्टोंबर 2021 रोजी सायंकाळी 4 वाजेपर्यंत जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय इमारत, बस स्टॅंड समोर, बुलडाणा येथे प्रस्ताव सादर करावा.

    सदर संस्था ही ऑगस्ट 2000 नंतरची सहकार कायदा 1960 अन्वये नोंदणीकृत असावी, सदर कामासाठी सेवा सहकारी संस्था इच्छुक व पात्र असावी, तशी लेखी सहमती कळवावी. सेवा सहकारी संस्थेचे राष्ट्रीयकृत अथवा सहकारी बँकेत खाते असावे, मागील आर्थिक वर्षाचे लेखा परीक्षण केलेले असावे, समितीमार्फत काम मिळविण्यासाठी सहकारी सेवा सोसायटी अथवा लेाकसेवा केंद्र किमान 6 महिने कार्यरत असावे. त्यांनी यापूर्वी काम केलेले असणे आवश्यक आहे. सेवा सहकारी संस्थेमधील सदस्याबाबतचे प्रतिज्ञापत्र आवश्यक आहे. अर्जासोबत अंकेक्षण अहवाल, नोंदणी प्रमाणपत्र प्रत, संस्थेच्या अनुभवाची कागदपत्रे, बँकेच्या पासबुकाची प्रत सोबत जोडावी. प्राप्त प्रस्तावांचा विचार काम वाटप समितीमार्फत काम वाटपासाठी करण्यात येणार नाही, याबाबत नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय तंत्र माध्यमिक शाळा, बुलडाणा येथे संपर्क साधावा, असे सहायक आयुक्त प्रा. यो बारस्कर यांनी   प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

*********

मागासवर्गीय शेतकरी व आत्महत्याग्रस्त विधवेस 100 टक्के अनुदानावर ताडपत्री

• जि.प सेसफंडातून योजना, 14 ऑक्टोंबर पर्यंत अर्ज सादर करावे

बुलडाणा, (जिमाका) दि. 29 : जिल्हा परिषदेचा समाज कल्याण विभागामार्फत सन 2021-22 वर्षाकरीता जिल्हा परिषद 20 टक्के सेसफंड योजनेमधून मागासवर्गीय शेतकरी / मागासवर्गीय आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा पत्नीस 100 टक्के अनुदानावर ताडपत्री देण्यात येणार आहे. सदर योजनेचे अर्ज पंचायत समिती स्तरावर कार्यालयात उपलब्ध आहे. अर्ज विहीत नमुन्यात परिपूर्ण असावा. अर्जासोबत सर्व कागदपत्रे असावीत. सदर अर्ज पंचायत समिती कार्यालयात 14 ऑक्टोंबर 2021 पर्यंत आवश्यक कागदपत्रांसह मागासवर्गीय शेतकरी लाभार्थ्यांनी मोठ्या संख्येने सादर करावे. या योजनेचा मागासवर्गीय शेतकरी व आत्महत्याग्रस्त विधवा महिला लाभार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण सभापती सौ. पुनमताई राठोड व जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनोज मेरत यांनी केले आहे.

**************

शासकीय व खासगी आस्थापनांनी त्रैमासिक ई- आर विवरण पत्र सादर करावे

• 30 ऑक्टोंबर 2021 अंतिम मुदत

बुलडाणा ,(जिमाका) दि. 29: सर्व शासकिय, निमशासकिय कार्यालये, खासगी आस्थापना औद्योगीक आस्थापना तसेच अनुदानीत विना अनुदानीत शाळा महाविद्यालये यांनी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता संचालनालय, नवी मुंबई (पुर्वीचे रोजगार व स्वयंरोजगारसंचालनालय) यांनी विकसित केलेल्या www.mahaswayam.gov.in वेबपोर्टलवर रोजगार विषयक सेवा ऑनलाईन पध्दतीने देण्यात येत आहे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडे नोंदणीकृत सर्व उद्योजक/आस्थापना यांनी सेवायोजन कार्यालये यांना रिक्तपदे अधिसूचित करणे सक्तीचे कायदा 1959 अन्वये या कार्यालयास सादर करावयाची आहे.

  माहे सप्टेंबर 2021 अखेरचे त्रैमासिक इ आर-1 विवरण पत्र संकेतस्थळावर ऑनलाइन पध्दतीने सादर करावे व त्याबाबतचे ऑनलाईन प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे. सदर विवरण पत्र सादर करण्याची अंतीम 30 ऑक्टोंबर 2021 आहे. त्यानंतर वेबपोर्टलवरील ही सुविधा बंद होणार आहे. कसुरदार आस्थापनावर नियमानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे. तरी सर्व आस्थापना /उद्योजक यांनी विहीत मुदतीत आपले विवरण पत्र ऑनलाईन पध्दतीन संकेतस्थळावर सादर करावे, याची सर्वांनी नोंद घ्यावी. ऑनलाइन ई आर-1 सादर करण्यात काही अडचण आल्यास जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र बुलडाणा या कार्यालयाशी प्रत्यक्ष अथवा दुरध्वनी क्र .07262- 242342 यावर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त श्रीमती प्रां. यो बारस्कर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.  

                                                                                ***********

गाय, म्हैस, शेळी पालन व्यवसायाचे प्रशिक्षणाचे ऑनलॉईन पद्धतीने आयोजन

• प्रवेश नोंदणी 7 ऑक्टोंबर पर्यंत करावी

बुलडाणा,(जिमाका) दि.29 : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED) द्वारा जिल्हा उद्योग केंद्र मार्फत उद्योग अथवा व्यवसाय सुरु करु इच्छिणाऱ्या सुशिक्षीत बेरोजगार युवक, युवतींसाठी बुलडाणा येथे गाय, म्हैस, शेळी व कुक्कुट पालन या प्रशिक्षण कार्यक्रमाचे ऑनलाईन पध्दतीने आयोजन करण्यात आले आहे. सदर प्रशिक्षण 7 ते 11 ऑक्टोंबर 2021 दरम्यान पाच दिवसांमध्ये आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाकरीता प्रवेश नोंदणी दि. 7 ऑक्टोंबर 2021 पर्यंत कार्यालयीन वेळेत प्रकल्प अधिकारी गणेश गुप्ता यांच्याकडे किंवा त्यांच्या मोबाईल क्रमांक 8275093201, 9011578854 वर करावी. तसेच उद्योजकता विकास केंद्र द्वारा जिल्हा उद्योग केंद्र, मलकापुर रोड, बुलडाणा येथे संपर्क करावा.

   तसेच प्रशिक्षणास भाग घेणारा उमेदवार किमान 5 वा वर्ग पास असणे आवश्यक असून त्याचे वय 18 ते 50 वर्षे असावे. प्रशिक्षण यशस्वीपणे पुर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र दिल्या जाणार आहे. प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश सुशिक्षीत बेरोजगार युवकांनी तंत्रशुध्द प्रशिक्षण घेऊन स्वत:चा उद्योग व्यवसाय सुरु करण्याचा आहे. सदर प्रशिक्षणात गाय, म्हैस, शेळी व कुक्कुट पालनाचे तंत्र, गाय, म्हसीचे प्रकार व त्यांच्या जाती, लसीकरण, संशोधन रोग व लक्षणे, खाद्य निर्मिती व चाऱ्याचे प्रकार, शेळी केंद्रास प्रत्यक्ष भेट, शासकीय योजनांची माहिती देण्यात येणार आहे. प्रशिक्षणात मार्गदर्शन तज्ज्ञ व्यक्ती करणार आहे. तरी प्रशिक्षणासाठी प्रवेश नोंदणी करावी, असे आवाहन एसीईडी चे विभागीय अधिकारी प्रदीप इंगळे यांनी केले प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

0000000

आजी व माजी सैनिक अत्याचार निवारण समित्यांच्या बैठकांचे आयोजन

बुलडाणा,(जिमाका) दि.29 : युद्ध विधवा, विरमाता, विरपिता, माजी सैनिक, कार्यरत सैनिक, विधवा पत्नी व अवलंबित यांच्या कुटूंबीयांवर होणा-या अन्याय, जमीन अतिक्रमण, शेतीसाठी पांदण रस्ते, गावगुंडाकडून होणाऱ्या त्रासाबाबत, मालमत्ता कराबाबत आदी अत्याचार दूर करण्यासाठी तालुकास्तरीय समित्यांची स्थापना करण्यात आली  आहे. या समित्यांच्या बैठकांचे नियोजन 4 ऑक्टोंबर पासून करण्यात आले आहे. समितीची बैठक तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक, नगर परिषद मुख्याधिकारी उपस्थित राहणार आहे. तक्रारी बाबतचे अर्ज संबंधित कार्यालयात व जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात तात्काळ सादर करावे. उशीरा प्राप्त अर्जांवर कार्यवाही करण्यात येणार नाही, याची नोंद घ्यावी. तालुका समितीच्या बैठकीमध्ये जास्तीत जास्त माजी सैनिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सहा. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी भास्कर पडघान यांनी केले आहे.

                                                            अशा होणार बैठका

बुलडाणा : 4 ऑक्टोंबर रोजी सकाळी 11 वाजता तहसिल कार्यालय येथे, चिखली: 8 ऑक्टोंबर रोजी सकाळी 11 वाजता पंचायत समिती सभागृह येथे, दे. राजा : 11 ऑक्टोंबर रोजी सकाळी 11 वाजता पंचायत समिती सभागृह येथे, सिं.राजा : 18 ऑक्टोंबर रोजी सकाळी 11 वाजता पंचायत समिती सभागृह येथे, मेहकर : 25 ऑक्टोंबर रोजी सकाळी 11 वाजता पंचायत समिती सभागृह येथे, लोणार : 1 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता तहसिल कार्यालय येथे, मलकापूर: 8 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता तहसिल कार्यालय येथे, मोताळा : 15 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता पंचायत समिती सभागृह येथे, जळगांव जामोद : 22 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता पंचायत समिती सभागृह येथे, संग्रामपूर : 29 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता पंचायत समिती सभागृह येथे, नांदुरा : 1 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता तहसिल कार्यालय किंवा पंचायत समिती सभागृह येथे, खामगांव : 7 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता तहसिल कार्यालय येथे आणि शेगांव येथे 13 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता तहसिल कार्यालय किंवा पंचायत समिती सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे.

************

कोरोना अलर्ट : जिल्ह्यात 15 सक्रीय रूग्ण; आजचे पॉझीटीव्ह ‘शून्य’

बुलडाणा, (जिमाका) दि. 29 :  पॉझीटीव्ह रूग्णसंख्येने जिल्हावासियांना आज आठव्यांदा शून्याचा अनुभव दिला आहे. मात्र तरीही जिल्ह्यात उपचार घेत असलेले 15 सक्रीय रूग्ण आहे. त्यामुळे जिल्हावासियांनी मास्क वापरणे, हात वारंवार स्वच्छ धुणे किंवा सॅनीटाईज करणे व सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करणे या त्रि सुत्रींचा अवलंब करावा. तसेच पात्र लाभार्थ्यांनी कोविड लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

   प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 509 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी आज एकही पॉझीटीव्ह रूग्ण आढळून आला नाही. सर्वच 509 अहवाल कोरोना निगेटिव्ह प्राप्त झाले आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 108 तर रॅपिड टेस्टमधील 401 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 509 अहवाल निगेटीव्ह आहेत.

  त्याचप्रमाणे आजपर्यंत 717764 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86876 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 86876 आहे. आज रोजी 479 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 717764 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87564 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86876 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 15 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 673 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

*****


No comments:

Post a Comment