कोरोना अलर्ट : प्राप्त 1270
कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 21 पॉझिटिव्ह
• 02 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा, (जिमाका) दि. 1 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व
रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1291 अहवाल प्राप्त
झाले आहेत. यापैकी 1270 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 21 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त
झाले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 19 व रॅपीड अँटीजेन चाचणीमधील
2 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालांमध्ये
प्रयोगशाळेतील 284 तर रॅपिड टेस्टमधील 986 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 1270
अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह
आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : दे. राजा
तालुका : पांगरी 1, दे. मही 1, चिंचखेड 1, नागणगांव 1, बुलडाणा शहर : 13, लोणार तालुका : कोयाळी दहातोंडे
4, संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आली आहे. अशाप्रकारे
जिल्ह्यात 21 रूग्ण आढळले आहे. तसेच आज 2 रूग्णांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे
रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे आजपर्यंत 692224 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत.
त्याचप्रमाणे आजपर्यंत 86699 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे
त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी
देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या
86699 आहे. आज रोजी 1350 नमुने
कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 692224 आहेत.
जिल्ह्यात आज अखेर एकूण 87439 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86699 कोरोनाबाधीत
रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी
देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 67 सक्रीय रूग्ण उपचार
घेत आहेत. तसेच आजपर्यंत 673 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी
उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
***********
किटकनाशक व तणनाशकांची फवारणी करताना
शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी
• जिल्हा परिषद कृषि विभागाचे आवाहन
बुलडाणा, (जिमाका) दि. 1 : शेतकऱ्यांकडून झालेल्या पिक पेरणीवर येणारे किड/ रोगावर किटकनाशके व
शेतातील तणाच्या उच्चाटनासाठी तणनाशके फवारणी करण्यात येत आहे. शेतात उत्पन्न
घेण्यासाठी शेतकरी विविध रासायनिक औषधे फवारतात, हेच रासायनिक औषधे शेतकरी शेतात,
झाडांवर फवारतांना मुख्यत: तीन प्रकारे धोका निर्माण होऊ शकतात. रासायनिक औषधांचे
झाडांवर अत्यंत बारीक कण हवे बरोबर श्वासोच्छवासासोबत शरीरात जातात, फवारणी करीत
असतांना त्वचेच्या संपर्कामधून तथा डोळयाव्दारे शरीरात जातात, फवारणी करतांना नकळत
तोंडाव्दारे खातांना, धुम्रपान करताना शरीरात जाऊ शकतात.
किटकनाशके वापरताना सर्वसाधारणपणे घ्यावयाची
काळजी : गळके फवारणी यंत्र न वापरता ते दुरूस्त करून वापरावे, किटकनाशके फवारणी
यंत्रात भरतांना सांडू नये यासाठी नरसाळयाच्या वापर करावा. तणनाशक फवारणीसाठी
वेगळा पंप वापरावा व तो पंप किटकनाशक फवारणीसाठी वापरू नये, किटकनाशक फवारतांना
संरक्षक कपडे वापरावे, फवारणीसाठी वापरलेले सर्व साहित्य पाण्याने स्वच्छ धुऊन
ठेवावे, झिजलेले, खराब झालेले नोझल्स बदलून घ्यावेत, किटकनाशकला हुंगणे किंवा
त्याचा वास घेणे टाळावे. फवारणीचे मिश्रण हाताने न ढवळता लांब लाकडी दांडयाचा
किंवा काठीचा वापर करावा, किटकनाशक पोटात जाण्याची शक्यता असल्याने फवारणीचे
मिश्रण करतांना अथवा फवारणीच्यावेळी तंबाखू खाणे अथवा धुम्रपान करणे टाळावे, पाऊस
येण्यापूर्वी किंवा पाऊस झाल्यानंतर तसेच तीव्र उन्हात फवारणी करू नये.
फवारणीचे काम पुर्ण झाल्यानंतर हात साबणाने
स्वच्छ धुऊन खाणे, पिणे करावे, फवारणीच्यावेळी लहान मुले, जनावरे पाळीव प्राणी
यांना त्या ठिकाणापासुन दुर ठेवावे, उपाशी पोटी फवारणी न करता फवारणीपुर्वी
न्याहरी करावी, फवारणी करतांना वापरलेली भांडी आदी साहित्य नदी, नाला किंवा
विहीरीजवळ धुवू नयेत. तर धुतांना वापरलेले पाणी त्यात विषारी अवशेष असल्याने पडीक
जमिनीत टाकावेत अथवा मातीत गाडावेत, किटकनाशकांच्या रिकाम्या बाटल्या वापरानंतर
नष्ट करून टाकाव्यात, फवारणी करतांना नोझल बंद पडल्यास ते स्वच्छ करण्यासाठी त्यास
तोंड लावून फुंकू नये अथवा हवा तोंडाने आत ओढू नये. त्यासाठी सोयीस्कर तार, काडी
किंवा टाचणी वापरावी, किटकनाशके फवारण्याचे काम करतांना वापरण्याचे कपडे स्वतंत्र
ठेवावे व वेळोवेळी स्वच्छ धुऊन काढावेत, किटकनाशके अंगावर पडू नये म्हणून
वा-याच्या विरूध्द दिशेने फवारणी करू नये, किटकनाशके मारलेल्या क्षेत्रावर गुरांना
चरण्यास किमान 2 आठवडे जाऊ देऊ नये, जमिनीवर सांडलेले किटकनाशक हातांनी न पुसता व
त्यावर पाणी न टाकता ती माती /चिखल यांच्या सहाय्याने शोषून घ्यावेत व जमिनीत
गाडून टाकाव्यात, डब्यांवरील मार्गदर्शक चिन्हांकडे काळजीपुर्वक लक्ष दयावे. त्यानुसार
हिरवा रंग कमी विषारी, निळा रंग मध्यम विषारी त्यानंतर पिवळा रंग तीव्र विषारी व
शेवटी लाल रंग अती तीव्र विषारी चिन्ह / खुण असलेली औषधी क्रमाने वापरावे.
विषबाधा
झाल्याची लक्षणे व उपाययोजना
विषबाधा
हि किटकनाशके / तणनाशके यांच्या त्वचेशी संपर्क अथवा पोटात गेल्यास होते. विषबाधा
व इतर आजार यांचा लक्षणात बरेचदा साम्य राहु शकते. विषबाधेची लक्षणे : अशक्तपणा व चक्कर येणे,
त्वेचेची जळजळ होणे, डाग पडणे, घाम येणे, डोळयांची जळजळ होणे, पाणी येणे, अंधुक
दिसणे, तोंडातुन लाळ गळणे, तोंडाची आग होणे, उलटी येणे, मळमळणे, हगवण होणे, पोटात
दुखणे, डोळेदुखी, अस्वस्थ होणे, स्नायुदुखी, जीभ लूळी पडणे, बेशुध्द होणे, धाप
लागणे, छातीत दुखणे, खोकला येणे, फिट्स येणे.
विषबाधेची शंका असल्यास खात्री करा, रोग्याचा
किटकनाशकांसह संपर्क आला होता काय, नेमके कोणते किटकनाशक वापरले, शरीरात किती गेले
व केव्हा गेले, ही डॉक्टरांसाठी माहिती महत्वाची आहे. रोग्यास शक्य तितक्या लवकर
दवाखान्यात पोहचवा. वापरलेल्या किटक नाशकाच्या रिकाम्या डब्यासह किंवा
माहितीपत्रक, फोटो काढुन उपचारासाठी डॉक्टरास उपलब्ध करून द्यावे.
विषबाधेनंतर
तातडीने करावयाचे प्रथमोपचार
किटकनाशकांची
पोटातुन, त्वचा, डोळे, श्वसनद्रीये आदीद्वारे विषबाधा होऊ शकतो. विषबाधा झाल्यास बाधीत व्यक्तीस अपघात
स्थळापासून दुर न्यावे. त्वचा अंगावरील कपडे बदलावे, त्याचे शरीर / बाधीत भाग
ताबडतोब साबणाने स्वच्छ धुवून व टॉवेलने पुसावे, किटकनाशक पोटात गेलेले असल्यास बाधीत
व्यक्तीस ताबडतोब उलटी / ओकारी करण्याची उपाययोजना करावी. रोग्याला पिण्यासाठी दूध
तसेच बिडी / सिगरेट व तंबाखु देवू नये. रोग्याला घाम येत असल्यस अंगावर पांघरून
द्यावे. रोग्याचा श्वासोच्छवास योग्य रितीने सुरू आहे का ते तपासावे. श्वासोच्छवास
अनियमित किंवा बंद झाल्यास त्वरित त्याच्या तोंडाला तोंड लावून कृत्रिम
श्वासोच्छवास सुरू करावा. रोग्याला झटके येत असल्यास त्याच्या दातामध्ये मऊ
कापडाची छोटी गुंडाळी टाकावी. रोगी बेशुद्ध पडल्यास त्याला शुद्धीवर आणावयाचे
प्रयत्न करावे. बेशुद्ध रोग्यास काहीही खाऊ घालण्याचे प्रयत्न करू नये.
*****
सोयाबीन पिकावर खोड पोखरणाऱ्या मरूका अळीचे
व्यवस्थापन करावे
- कृषि विभागाचे आवाहन
बुलडाणा, (जिमाका) दि. 1 : किटकशास्त्र विभाग व कृषि विभाग यांच्या संयुक्त चमुने
जिल्ह्यातील केळवद परीसरात केलेल्या सर्वेक्षणानुसार काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतातील
सोयाबीन पिकावर मारूका या किडींचा प्रादुर्भाव असल्याचे निदर्शनास आले आहे. ही कीड
मुख्यत: मुग, उडीद व तूर या कडधान्य पिकावरील शेंगा पोखरणारी पंतवर्गीय अळी असून
या भागामध्ये सर्वेक्षण चमुने शेतकऱ्यांसमवेत केलेल्या सर्वेक्षणानुसार उडीद व
सोयाबीन पिकाचे खोड पोखरत असल्याचे आढळून आले. याकिडीचा पतंग करड्या रंगाचा असून मागील पंखावर
पांढरे चट्टे आढळुन येतात.
मादी पतंग कळ्या,
फुले व शेंगावर अंडी घालतात. अळी पांढुरक्या रंगाची व अर्धपारदर्शक असून तिच्या
पाठीवर तपकीरी काळपट ठिपक्यांच्या सहा जोड्या आढळतात. अंड्यातून निघालेली अळी,
कळ्या, फुले व कोवळी पाने एकत्र करून त्यांचे झुपके तयार करते व त्यावर आपली
उपजिवीका करते. त्यामुळे फुलांचे शेंगामध्ये रूपांतर होत नाही. काही वेळेला अळी
मुख्य खोड व फांदीच्या जोडातून खोडात प्रवेश करते व खोडाच्या पोखरण्यामुळे झाडाला
होणाऱ्या अन्नद्रव्याचा पुरवठा विरूद्ध होतो. त्यामुळे शेंगा भरत नाहीत. शेतात या
किडीच्या बाह्य लक्षणांवरून प्रादुर्भाव ओळखणे कठीण जाते. प्रादुर्भाव
ओळखण्याकरीता सोयाबीनच्या एक एकर शेतातील वेगवेगळ्या ठिकाणचे 20 ते 25 झाडे उभी
चिरून त्यात अळीचे निरीक्षण करावे. निरीक्षणादरम्यान 5 ते 10 टक्के प्रादुर्भाव ग्रस्त
झाडे आढळल्यास आवश्यकतेप्रमाणे रासायनिक किटकनाशकांचा वापर करून या किडींचे
व्यवस्थापन करावे.
ही करा फवारणी : फ्लुबेंडामाईड 20
डब्ल्यु जी 6 ग्रॅम किंवा थायोडीकार्ब 75 डब्ल्यु पी. 20 ग्रॅम किंवा नोवालुरोन 5.25
अधिक ईडोक्साकार्ब 4.50 एसपी 16 मिली यापैकी एका किटकनाशकाची प्रती 10 लीटर
पाण्यात मिसळून फवारणी करावी. पावरस्प्रेने फवारणी करावयाची असल्यास किटकनाशकाचह
मात्रा तिप्पट करावी. गरज भासल्यास 15 दिवसांनी दुसरी फवारणी करावी. दुसऱ्या
फवारणीच्यावेळी किटकनाशकाची फवारणी आदला बदल करावी. या किटकनाशकासोबत इतर किटकनाशक,
बुरशीनाशक, संप्रेरके, खते, अन्नद्रव्ये आदी मिसळू नये. सदर किटकनाशकांच्या
शिफारशी तदर्थ स्वरूपाच्या असून शेतकरी बांधवांनी तात्काळ नियंत्रणाच्या दृष्टीने प्रसारीत
करण्यात येत आहे. तरी मरूका अळीचे व्यवस्थापन करावे, असे आवाहन उपविभागीय कृषि
अधिकारी संतोष डाबरे यांनी केले आहे.
*******
जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात राष्ट्रीय पोषण माहचे
आयोजन
· 1 ते 30 सप्टेंबर मार्च पर्यंत राष्ट्रीय
पोषण माह, विविध कार्यक्रमांचे आयोजन
बुलडाणा, (जिमाका) दि. 1 : राज्य पोषण संसाधन कक्ष, पोषण अभियान, मुंबई यांच्या आदेशान्वये 1 ते 30
सप्टेंबर 2021 हा राष्ट्रीय पोषण माह म्हणून साजरा करण्यात येणार आहे. त्यानुसार
दिनांक 1 सप्टेंबर पासून या पोषण माह ला सुरूवात होत आहे. पोषण माह जिल्हा,
प्रकल्प स्तरावर तसेच अंगणवाडी स्तरावर साजरा करण्यात येत आहे.
पोषण माहदरम्यन प्रारूप आराखड्यानुसार विविध
विभागांशी समन्वय साधुन कुपोषणाचे प्रमाण कमी करण्याचे दृष्टीने सॅम बालकांची आरोग्य
तपासणी करण्यात येणार आहे. त्यामधून सामाजिक परिक्षण करण्यात येणार आहे. पोषण माहमध्ये अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना
100 टक्के कोविड लसीकरण, गावात लसीकरण पर्यवेक्षण व स्वच्छता जनजागृती, गरोदर
माता, स्तनदा माता यांचेकरीता कोवडि लसीकरण आयोजन, अंगणवाडी केंद्रांना 100 टक्के
नळ जोडणी व भांडे स्वच्छ करणे, कोरडा दिवस पाळणे, परसबागेची आखणी व नियोजन, बाळ
कोपरा तयार करणे, गरोदर महिलांची आरोग्य तपासणी, गरोदर महिलांना समुपदेशन करण्याकरीता
अंगणवाडीच्या समन्वयाने गृहभेटी, शिक्षक दिनानिमित्ताने 5 सप्टेंबर रोजी माझे गुरू या विषयावर भाषण स्पर्धा, निबंध
स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे.
माझे मुल, माझी जबाबदारी अंतर्गत मुलांची
कोविड लक्षण तपासणी, गरोदर मातांना आरोग्य व पोषण तसेच आयएफए टॅब्लेट बाबत गृहभेटी,
सॅम बालकांची स्क्रीनींग करणे, आहार प्रदर्शनी आयेाजन, 3 ते 6 वर्ष वयोगटात
बालकांना ऑनलाईन पद्धतीने पुर्व शालेय शिक्षण देणे, सुदृढ बालक स्पर्धा, तरंग
सुपोषणमध्ये 100 टक्के नोंदणी व जनजागृती करणे, किशोर मुली तसेच नवविवाहीत महिला यांना
आरोग्य व स्वच्छतेबाबत मार्गदर्शन करणे, सोशल मिडीयावर पोषणविषयक कॅम्पेन करणे,
बागेतील भाजीपाला गरोदर व स्तनदा माता यांना वाटप करणे, समुदाय आधारीत
कार्यक्रमातंर्गत पहिल्या तिमाहीत गरोदर मातेची नाव नोंदणी व गरोदर पणात घ्यावयाची
काळजीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सामाजिक लेखापरीक्षण व
विविध स्पर्धेचे आयोजन करणे, परसबागेतील हंगामी भाज्यांबाबत माविम सोबत वेबिनार, भारतीय
आहरतज्ज्ञ सोबत वेबिनारचे आयोजन, अंगणवाडीमध्ये आहाराचे प्रात्याक्षिक करणे, आहार
प्रदर्शनी आयोजित करून गरोदर व स्तनदा माता यांना आहाराबाबत तसेच तीन लाडू
उपक्रमाबाबत मार्गदर्शन करणे, बेटी बचाओ, बेटी पढाओ बाबत जनजागृती व विविध
स्पर्धा, माझी कन्या भाग्यश्री योजनेविषयी प्रचार व प्रसिद्धी करण्यात येणार आहे. तसेच
माहदरम्यान किशोरींची एचबी तपासणी व मार्गदर्शन, बाळाचे 1000 दिवसाचे महत्व याबाबत
मार्गदर्शन, अंगणवाडी व परीसर स्वच्छता, सॅम बालकांना गृहभेटी, क्षेत्रीय
पर्यवेक्षण व परसबाग भेटी, आयसीडीएस सेवांविषयी जनजागृती, किशोरींना अस्मिता योजनेवियी
माहिती व तरंग सुपोषित बाबत जनजागृती करण्यात येणार आहे. पोषण थाळी, आहार
प्रदर्शनीमध्ये रानभाज्या व रानमेवा याचे महत्व विशेषत: सासु सासरे यांना
निमंत्रीत करण्यात येणार आहे, असे जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला व बालविकास,
जिल्हा परिषद, बुलडाणा यांनी कळविले आहे.
*****
प्रधानमंत्री मातृवंदन सप्ताहाचे आयोजन
- 1
ते 7 सप्टेंबर 2021 दरम्यान सप्ताह
बुलडाणा, (जिमाका) दि. 1 : प्रधानमंत्री मातृ वंदन योजनेतंर्गत मातृ वंदन सप्ताहाचे आयोजन 1 ते 7 सप्टेंबर
2021 दरम्यान करण्यात येणार आहे. ही योजना केंद्र शासनाची महत्वाकांक्षी योजना
आहे. या योजनेतंर्गत 1 जानेवारी 2017 रोजी अथवा तदनंतर पहिल्यांदा ज्या मातांची
प्रसुती झाली आहे किंवा गर्भधारणा झाली असेल व त्यांनी कोणत्याही शासकीय आरोग्य
संस्थेत नोंदणी केली असेल, अशा पात्र महिलांना प्रधानमंत्री मातृ वंदन योजनेचा लाभ
पहिल्या जिवीत अपत्यासाठी देण्यात येतो.
सदर
योजनेतंर्गत पात्र लाभार्थ्यांना 5 हजार रूपयांचा लाभ त्यांचे बँक खात्यात तीन
हप्त्यात टप्प्याटप्प्याने लाभ देण्यात येतो. पहिला टप्पा 1 हजार रूपये मासिक पाळीच्या शेवटच्या
तारखेपासून 150 दिवसात गर्भधारणा नोंदणी केल्यानंतर देण्यात येतो. दुसरा हप्ता 2 हजार
रूपये किमान एकदा प्रसवपुर्ण तपासणी केल्यास गर्भधारणेचे सहा महिने पुर्ण
झाल्यानंतर देण्यात येतो. तर तिसरा टप्पा 2 हजार रूपये प्रसुतीनंतर झालेल्या
अपत्याची जन्म नोंदणी व बालकास लसीकरणाचा पहिला टप्प पुर्ण झाल्यानंतर देण्यात येतो.
सदर योजना शासकीय सेवेत असणाऱ्या माता वगळून इतर सर्व मातांना पहिल्या खेपेसाठी
देय आहे.
योजनेचा
लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री
विसपुते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिनाक्षी बनसोडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.
नितीन तडस, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. रविंद्र गोफणे, निवासी वैद्यकीय
अधिकारी डॉ. यास्मीन चौधरी, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक वैभव खुजे, जिल्हा
कार्यक्रम समन्वयक रामेश्वर बांबल, जिल्हा कार्यक्रम सहाय्यक स्वप्नील म्हस्के, प्रधानमंत्री
मातृ वंदन कक्ष यांनी केले आहे.
******
विशेष गौरव पुरस्कारासाठी
14 ऑक्टोंबर पर्यंत अर्ज सादर करावे
- जिल्हा
सैनिक कल्याण कार्यालयाचे आवाहन
बुलडाणा, (जिमाका) दि. 1 : विविध क्षेत्रात अति उत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक,
पत्नी अथवा पाल्य यांना एकरकमी 10 हजार व 25 हजार रूपये विशेष गौरव पुरस्कार देण्यात
येणार आहे. या पुरस्कारासाठी माजी सैनिक, पत्नी अथवा पाल्य यांच्यापैकी पात्र
उमेदवारांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, बुलडाणा येथे 14 ऑक्टोंबर 2021 पर्यंत येवून
आपली उमेदवारी नोंदवावी. सदर पुरस्कारासाठी 14 ऑक्टोंबर नंतर येणाऱ्या अर्जांचा विचार
केल्या जाणार नाही.
यामध्ये राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर
खेळातील पुरस्कार प्राप्त खेळाडू, साहित्य, संगीत, गायन, वादन, नृत्य आदी क्षेत्रातील
पुरस्कार विजेते, यशस्वी उद्योजकांचा पुरस्कार मिळविणारे, संगणक क्षेत्रात अति
उत्कृष्ट कामगिरी करणारे, पूर, जळीत, दरोडा, अपघात व इतर नैसर्गिक आपत्तींमध्ये
बहुमोल कामगिरी करणारे, तसेच देश / राज्याची प्रतिष्ठा वाढवतील अशा स्वरूपाचे लक्षणीय
काम करणारे माजी सैनिक, पत्नी अथवा पाल्य यायंना अशा कार्याबद्दल त्यांच्या
सन्मानार्थ राष्ट्रीय स्तरावर 10 हजार व आंतरराष्ट्रीय स्तरावर 25 हजार रूपये पुरस्कार,
शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे. इयत्ता 10 वी व 12 वी मंडळाच्या परिक्षेमध्ये 90
टक्के पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण होणाऱ्या प्रत्येक मंडळातील पहिल्या पाच
माजी सैनिक, विधवा यांच्या पाल्यांना एकरकमी 10 हजार रूपये विशेष गौरव पुरस्कार
देण्यात येणार आहे. माजी सैनिक विधवांच्या पाल्यांमधून इयत्ता 10 वी व 12 वी
बोर्डाच्या परीक्षेत सर्वाधिक गुण पा्रप्त करून उत्तीर्ण होणारे विद्यार्थी यांना
एअर मार्शल व्ही. ए पाटकर विशेष गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. तरी पात्र
उमेदवारांनी अर्ज सादर करावे, असे आवाहन सहा. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी भास्कर
पडघान यांनी केले आहे.
*****
सप्टेंबर महिन्याचा लोकशाही दिन होणार ई
लोकशाही दिन
- मोबाईल क्रमांक
7249093265 वर ऑनलाईन तक्रारी कराव्यात
- व्हिडीओ
कॉलद्वारे तक्रारदाराशी साधणार संपर्क
बुलडाणा,(जिमाका) दि.1 :
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे जिल्हाधिकारी
कार्यालयात आयोजन करण्यात येते. या दिवशी जिल्हाधिकारी व इतर शासकीय
अधिकारी,नागरिकांच्या तक्रारींचे निरसन करतात. जर सोमवारला शासकीय सुट्टी असल्यास
पुढील दिवशी मंगळवारला आयोजन करण्यात येत असते. मात्र सध्या सुरू असलेल्या कोरोना
संसर्गाच्या पार्श्वभूमी व नियमित बस सेवा नसल्यामुळे सप्टेंबर महिन्याचा लोकशाही
दिन ई- लोकशाही दिन पद्धतीने घेण्यात येणार आहे. त्यानुसार सोमवार 6 सप्टेंबर रोजी
ई लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या लोकशाही दिनी तक्रारदारांनी ऑनलाईन
पद्धतीने 7249093265 या मोबाईल क्रमांकावर पीडीएफ स्वरूपात फाईल करून तक्रारी देण्यात
याव्यात. त्यामुळे तक्रारदारांना लोकशाही दिनाला स्वत: उपस्थित राहण्याची आवश्यकता
नाही. तक्रारदारांनी दिलेल्या व्हॉट्सॲप क्रमांकावर व्हिडीओ कॉल करून संपर्क साधण्यात
येणार आहे. तक्रारदाराने सदर मोबाईल व्हॉट्सॲप क्रमाकांचे त्याकाळात इंटरनेट सुरू
असण्याची खातरजमा करायची आहे. तालुका स्तरावरील लोकशाही दिनानंतर 1 महिन्याने
जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही दिनात अर्ज करता येतो. तसेच तक्रारदारांबरोबर
त्रयस्थाने येऊ नये. अर्जदाराने एका अर्जात एकच तक्रार सादर करावी. एकापेक्षा
जास्त तक्रारी असलेला अर्ज स्विकारला जाणार नाही. तक्रार, निवेदन वैयक्तिक
स्वरुपाची असावी, त्याचप्रमाणे न्यायप्रविष्ठ प्रकरणे, राजस्व/ अपिल, सेवा व
आस्थापना विषयक बाबी, विहित नमुन्यात नसलेले तसेच आवश्यक त्या कागदपत्रांच्या
प्रती न जोडलेले अर्ज, विविध न्यायालयात, प्राधिकाऱ्यांकडील, लोकआयुक्त यांच्याकडे
प्रलंबित असलेल्या प्रकरणांच्या तक्रारी स्विकारल्या जाणार नाहीत, असे अर्ज
संबंधित विभागाकडे आवश्यक कार्यवाहीसाठी 8 दिवसात पाठविण्यात येतील. त्याची एक
प्रत अर्जदारास पाठविण्यात येईल, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
*****
No comments:
Post a Comment