Friday, 24 September 2021

DIO BULDANA NEWS 24.9.2021

 

                 व्यायामशाळा व क्रीडांगण विकास अनुदान योजनेअंतर्गत प्रस्ताव पाठवावे

  • अल्पसंख्यांक नोंद असलेल्या महाविद्यालये व विद्यालयांना मिळणार अनुदान

बुलडाणा, (जिमाका) दि. 23 : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलडाणा अंतर्गत व्यायामशाळा विकास अनुदान योजना अंतर्गत व्यायामशाळा बांधकाम करणे व व्यायाम साहित्य खरेदी करणे याकरीता प्रती बाब 7 रूपये लक्ष इतके अनुदान मंजुर करण्यात येते.  तसेच क्रीडांगण विकास अनुदान योजनेअंतर्गत क्रीडांगणे समपातळीत करणे, क्रीडांगणाभोवती संरक्षण भिंत बांधणे, क्रीडांगणावर विविध खेळांची प्रमाणीत क्रीडांगणे तयार करणे, प्रसाधनगृह बांधणे, भांडारगृह बांधणे, पिण्याच्या पाण्याची सुविधा, इ. बाबींसाठी प्रती बाब 7 रूपये लक्ष इतके अनुदान मंजुर करण्यात येते.   सदर अनुदान प्राप्तीकरीता अल्पसंख्यांक म्हणून प्रमाणपत्र प्राप्त तथा शिक्षण विभागाद्वारा मान्यताप्राप्त व 100 टक्के अनुदानीत विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय, इत्यादींनी या कार्यालयात कार्यालयीन वेळेत येऊन योजनेचा विहीत नमुना प्राप्त करुन परिपुर्ण कागदपत्रांसह प्रस्ताव तात्काळ या कार्यालयास सादर करावा.  प्रस्ताव सादर करतांना अल्पसंख्यांक प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे असे  जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश कुळकर्णी यांनी कळविले आहे.  

***********

मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुर्ननिरीक्षण कार्यक्रम जाहीर

  • मतदार नोंदणीकरीता व्होटर हेल्पलाईन ॲपचा वापर करावा

बुलडाणा, (जिमाका) दि. 23 : भारत निवडणूक आयोगाने दि. 1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचा विशेष पुर्ननिरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार दिनांक 1 नोव्हेंबर 2021 रोजी मतदान केंद्रावर प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. सदर प्रारूप मतदार यादीमध्ये आपले नाव समाविष्ट आहे किंवा नाही याची मतदारांनी खात्री करून घ्यावी. प्रारूप मतदार यादीमध्ये ज्या मतदारांची नावे आढळून आलेली नाही, तसेच दिनांक 1 जानेवारी 2022 रोजी ज्या मतदाराचे वय 18 वर्ष पूर्ण होईल, अशा मतदारांनी दिनांक 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीमध्ये मतदार नोंदणी करून घ्यावी. मतदारांना मतदार नोंदणी करणे सोयीचे व्हावे, याकरीता भारत निवडणूक आयोगाने व्होटर हेल्पलाईन ॲप विकसित केले आहे. तरी सर्व नागरिकांनी मतदार नोंदणीकरीता सदर ॲपचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एस रामामूर्ती व उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती गौरी सावंत यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

**********

 


                      कृषी आधारीत वस्तुंच्या निर्यातीसाठी नवउद्योजकांनी पुढे यावे

-          जिल्हाधिकारी एस रामामूर्ती

  • जिल्हा उद्योग केंद्राच्यावतीने एक्सपोर्टर कॉन्क्लेव्हचे आयोजन

बुलडाणा, (जिमाका) दि. 23 : जिल्ह्याची अर्थव्यवस्था कृषीवर आधारीत आहे. कृषीवर आधारीत प्रक्रिया उद्योग, मुल्य साखळी वृद्धींगत करणारे उद्योग उभारणे गरजेचे आहे. उद्योगांमध्ये नवउद्योजक आले पाहिजे. जिल्ह्यात प्रक्रिया उद्योगासाठी शेतमाल सहज उपलब्ध होवू शकतो. त्यामुळे नवउद्योजकांनी कृषी आधारीत वस्तुंच्या निर्यातीसाठी पुढे यायला पाहिजे, असे आवाहन जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी केले आहे.  जिल्हा उद्योग केंद्राच्यावतीने बुलडाणा अर्बन रेसीडेंन्सी क्लब येथे एक्स्पोर्टर कॉन्क्लेव्ह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते.  याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक नरेंद्र हेडाऊ, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक चेतन पाटील, व्यवस्थापक सुनील पाटील आदी उपस्थित होते.

  उद्योगात पुढे येण्यासाठी सकारात्मक मानसिकता अंगीकारण्याचे आवाहन करीत जिल्हाधिकारी म्हणाले, उद्योग उभारण्यासाठी इच्छाशक्ती असावी. नकारात्मकता येवू देवू नये. संकुचीत विचारशैली असल्यास उद्योगात प्रगती करता येत नाही. तसेच जिल्ह्यात उपलब्ध असलेला कच्चा माल, कुशल मनुष्यबळ, मार्केटचा वेध, ग्राहकांचा कल, आंतरराष्ट्रीय बाजार आदींचा विचार करून उद्योगात पुढे जाता येते. त्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभही घ्यावा.

   जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. नाईक यावेळी म्हणाले, जिल्ह्यात मिरची, कांदा, कापूस, सोयाबीन आदींचे मोठ्या प्रमाणावर उत्पन्न घेण्यात येते. या शेतमालावर आधारीत उद्योग उभारून प्रक्रिया केलेल्या वस्तुंच्या निर्यातीला आपणाला वाव आहे. त्यासाठी कृषि विभागाच्या योजनाही लाभकारक आहे.  महाव्यवस्थापक चेतन पाटील यांनी निर्यात प्लॅन सादर केला. या प्लॅनवर उद्योजकांसोबत चर्चा करण्यात येवून जिल्ह्यात उपलब्ध असलेली नैसर्गिक साधन सामुग्री व त्यावरील अडचणी संदर्भात मार्गदर्शन केले. निर्यातदार संकल्प तायडे व सुबोध पाटील यांनी नव उद्योजकांना निर्यातीची कार्यपद्धती, शासकीय योजना व विविध शासकीय परवानग्या आदींबाबत मार्गदर्शन केले. प्रास्ताविक, संचलन व आभार प्रादर्शन व्यवस्थापक सुनील पाटील यांनी केले. कार्यक्रमाला निर्यातदार, संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

                                                            **********

 

कोरोना अलर्ट : प्राप्त 1166 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 10 पॉझिटिव्ह

बुलडाणा, (जिमाका) दि. 23 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1176 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1166 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 10 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 4 व रॅपिड अँटीजेन चाचण्यांमधील 6 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 268 तर रॅपिड टेस्टमधील 898 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 1166 अहवाल निगेटीव्ह आहेत.                                                                                      

    पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे :  सिं.राजा तालुका : कुंबेफळ 6, लोणार शहर : 2, बुलडाणा शहर : विश्वास नगर 1, चिखली शहर : 1, संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आली आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात 10 रूग्ण आढळले आहे.                                           

     त्याचप्रमाणे आजपर्यंत 714802 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86865 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 86865 आहे.  आज रोजी 719 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 714802 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87560 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86865 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 22 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 673 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

*****

आयुष्यमान भारत पंधरवड्याला जिल्ह्यात थाटात सुरूवात

  • 30 सप्टेंबर पर्यंत चालणार पंधरवडा

बुलडाणा, (जिमाका) दि. 23 : आयुष्मान भारत पंधरवड्याला जिल्ह्यात सर्व अंगीकृत रूग्णालयांच्या माध्यमातून थाटात सुरूवात करण्यात आली आहे. हा पंधरवडा 30 सप्टेंबर 2021 पर्यंत साजरा करण्यात येणार आहे. मोफत उपचार करिता एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना  आहे. आयुष्मान भारत योजनेचे लाभार्थी देशामध्ये इतर राज्यात देखील उपचार घेऊ शकतात. तसेच इतर राज्यातील लाभार्थी देखील महाराष्ट्रातील अंगीकृत रुग्णालयात उपचार घेऊ शकतात. देशात 23 सप्टेंबर हा दिवस आयुष्यमान भारत दिवस म्हणून ओळखल्या जातो. त्यामुळे आजपासून आयुष्यमान भारत पंधरवड्याला जिल्हा सामान्य रूग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांच्या उपस्थितीत सुरूवात करण्यात आली.  आयुष्यमान भारत ही जगातील सर्वात मोठी शासनाची मोफत आरोग्य विमा सेवा देणारी योजना म्हणून ओळखल्या जाते.  जिल्ह्यात योजनेमध्ये 25 अंगीकृत रूग्णालये आहेत. येथे मोफत आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड वाटप सुरू आहे. पात्र कुटूंब निवड अधिकार केवळ केंद्र शासनाला आहे. पंधरवाड्यादरम्यान अंगीकृत रूग्णालयांमध्ये आरोग्य मित्र मोफत गोल्ड कार्ड वितरीत करून योजनेबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. तसेच माहितीपत्रकांचे वाटप करण्यात येत आहे. प्रधानमंत्री यांच्याकडून प्राप्त निमंत्रण पत्र घेवून लाभार्थी यांनी आपले गोल्ड कार्ड तयार करून घ्यावे. प्रशासन योजनेला अधिकाधिक लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न करीत आहे. योजनेला आज तीन वर्ष पुर्ण होत आहे.  एकत्रित योजनेतंर्गत 1743 कोविड लाभार्थी व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना अंतर्गत जिल्ह्यात लाभार्थी संख्या 51 हजार 270 आहे. या लाभार्थ्यांना 117 कोटी रूपयांचा लाभ देण्यात आला आहे. तसेच महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना  अंतर्गत एकूण 1 लक्ष 3 हजार 249 लाभार्थी असून त्यापोटी 246.39 कोटी रूपये लाभ देण्यात आला आहे. किडनी रूग्णांची संख्या 1942 व दिलेला लाभ 12.86 कोटी रूपये, बुरशीजन्य म्युकर मायकोसिस 49 रूग्णांना लाभ देण्यात आला आहे. योजनेसाठी जिल्ह्यात 38 आरोग्य मित्र, 25 वैद्यकीय समन्वयक, 25 शिबिर समन्वयक व 5 जिल्हास्तरीय अधिकारी कार्यरत आहेत.  जिल्ह्यात गोल्ड कार्डचे वितरण 39.3 टक्के पुर्ण झाले असून लाभार्थी संख्या 7 लक्ष 22 हजार आहे.   

   नागरिकांनी सीएससी सेतू केंद्र ,नागरी  सुविधा कॉमन सर्विस सेंटर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत मध्ये आपले सरकार सेवा केंद्र चालक देखील आयुषमान भारत गोल्ड कार्ड वितरित करत आहेत. आयुषमान भारत गोल्ड कार्ड  प्राप्त करण्यासाठी आरोग्य मित्राकडून शिधापत्रिकेच्या आधारे व आधार कार्ड किंवा माननीय प्रधानमंत्री यांच्याकडून आलेले निमंत्रण पत्र किंवा इतर शासकीय फोटो ओळखपत्र याच्या माध्यमातून आयुष्यमान चे लाभार्थी आयुष्मान भारत से कार्ड प्राप्त करू शकतात . तरी जास्तीत जास्त  नागकरिकांनी गोल्डन कार्ड प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

 

योजनेच्या लाभासाठी संपर्क करावा

 योजनेच्या माहितीसाठी 1800111565 या क्रमांकावर संपर्क करावा किंवा आरोग्य मित्रास भेटावे.  महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेसाठी  18002332200 वर संपर्क करावा.  निवडक  रुग्णालयात मोफत उपचार रूग्ण घेऊ शकता.  जिल्ह्यातील  योजने मधील २५  अंगीकृत रुग्णालय येथे मोफत आयुष्मान भारत चे  कार्ड  वाटप सुरु आहे. जिल्ह्यातील २ लक्ष ७६ हजार ७०४ पात्र कुटुंबा करिता आयुष्मान भारत चे कार्ड वटप सुरु आहे.

जिल्ह्यातील अंगीकृत रूग्णालये

जिल्हा रुग्णालय बुलडाणा, सामान्य रुग्णालय खामगाव, उपजिल्हा रुग्णालय शेगांव, ग्रामीण रुग्णालय  सिंदखेड राजा, ग्रामीण रुग्णालय देऊळगांव राजा, उपजिल्हा रुग्णालय मलकापूर, साई बाल रुग्णालय खामगाव, ग्रामीण रुग्णालय जळगाव जामोद, ग्रामीण रुग्णालय वरवट बकाल,माऊली डायलेसिस सेंटर शेगाव, मेहेत्रे होस्पिटल बुलढाणा, संचेती हृदयालय हॉस्पिटल बुलडाणा, अमृत हृदयालय हॉस्पिटल बुलडाणा, चोपडे हॉस्पिटल मलकापूर, कोलते हॉस्पिटल मलकापूर, आसथा हॉस्पिटल मलकापूर, मानस हॉस्पिटल मलकापूर, मेहकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मेहकर, राठोड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मेहकर, सिटी हॉस्पिटल बुलडाणा, सोनटक्के हॉस्पिटल खामगाव, सिलवरसिटी हॉस्पिटल खामगाव (केवळ डायलिसिस व आयुष्मान भारत कार्ड गोल्ड कार्ड साठी ), धनवे हॉस्पिटल चिखली, तुळजाई हॉस्पिटल चिखली, कोठारी हॉस्पिटल चिखली.

********

                        ग्रामसेवकांची तात्पुरती सेवा ज्येष्ठता यादी प्रसिद्ध

बुलडाणा, (जिमाका) दि. 23 : शासन निर्णय 31 मार्च 2017 नुसार ग्रामपंचायत विभाग, जिल्हा परिषद, बुलडाणा अंतर्गत ग्रामसेवक संवर्गाच्या सन 2000 ते 2021 पर्यंतच्या एकत्रित व वर्षनिहाय सुधारीत तात्पुरती सेवा ज्येष्ठता सुची 12.8.21 अन्वये प्रसिद्ध करण्यात आली आहे.  तरी ग्रामसेवक संवर्गातील कार्यरत, सेवानिवृत्त कर्मचारी यांनी त्या त्याय पंचायत समितीला जावून सेवाज्येष्ठता याद्यांचे अवलोकन करावे, असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रा.पं यांनी केले आहे.

                                                                ********

No comments:

Post a Comment