Thursday, 23 September 2021

DIO BULDANA NEWS 23.9.2021

 


हातभट्टी दारू व्यवसायावर उत्पादन शुल्क विभागाची टाच

  • समुळ उच्चाटनासाठी उत्पादन शुल्क विभागाची 8 ऑक्टोंबर पर्यंत विशेष मोहिम
  • मागील 15 दिवसांत 10 लक्ष 12 हजार 380 रूपयांचा मुद्देमाल जप्त
  • अवैध दारू धंद्याचे 84 गुन्हे, 75 आरोपींना अटक

बुलडाणा, (जिमाका) दि. 23 : उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त यांच्या आदेशानुसार हातभट्टीच्या दारूचे उत्पादन, वाहतुक व विक्री या विरूद्ध कडक कारवाई करून हातभट्टी दारूचे समुळ उच्चाटनासाठी उत्पादन शुल्क विभागाने विशेष मोहिम सुरू केली आहे. ही मोहिम 8 ऑक्टोंबर पर्यंत चालणार असून यामुळे हातभट्टी दारू व्यवसायावर उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईची टाच दिसून येत आहे. ही मोहिम 5 सप्टेंबरपासून सुरू करण्यात आली. या मागील 15 दिवसात विभागाने जिल्हाभरात अवैध दारू धंद्यावर 84 गुन्हे नोंदविले. त्यामध्ये एकूण 73 वारस गुन्हे नोंदवून एकूण 75 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

   त्याचप्रमाणे विभागाने 11 बेवारस गुन्हे नोंदविले आहे. या कारवाईमध्ये 947 लिटर हातभट्टी दारू,17 हजार 429 लिटर रसायन, 306.59 लिटर देशी दारू व 6.84 लिटर विदेशी दारू तसेच 25 लिटर ताडी जप्त केली आहे.  या मोहिमेमध्ये अवैध मद्य वाहतुक अथवा विक्री करणारे एकूण 9 वाहने जप्त करण्या आली आहे. त्यापैकी 8 दुचाकी व 1 तिन चाकी वाहन आहे. जप्त वाहनांची एकूण किंमत 4,51,000 रूपये आहे. तसेच वाहनाखेरीज इतर जप्त मुद्देमालाची किंमत 5,61,380 रूपये इतकी असून एकूण जप्त मुद्देमालाची किंमत 10 लक्ष 12 हजार 380 रूपये इतकी आहे.

  मोहिमेदरम्यान 8 सप्टेंबर रोजी बिबी ता. लोणार येथे मेहकरचे दुय्यम निरीक्षक एस. डी चव्हाण यांनी 1 वारस गुन्हा नोंदवून 47 हजार 930 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यामध्ये 45 हजार रूपये किंमतीची 1 दुचाकी आहे. तसेच 11 सप्टेंबर रोजी मलकापूर तालुक्यातील झोडगा शिवारात दुय्यम निरीक्षक अमित अडळकर यांनी 1 वार गुन्हा नोंदवून 37 हजार 200 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये 36 हजार रूपये किंमतीच्या दुचाकीचा समावेश आहे. त्याचप्रमाणे 12 सप्टेंबर रोजी पिं. काळे ता. जळगांव जामोद शिवारात शेगावचे दुय्यम निरीक्षक एन. के मावळे यांनी 1 वारस गुन्हा नोंदवीत 70 हजार 760 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यामध्ये 65 हजार रूपये किमतीची एक दुचाकी आहे. तसेच 17 सप्टेंबर रोजी गव्हाण फाटा ता. खामगांव येथे दुय्यम निरीक्षक आर. के फुसे यांनी 1 वारस गुन्हा नोंदविला आहे. याठिकाणी 71 हजार 540 रूपये किंमतीचा मुद्देमालामध्ये 60 हजार रूपये किंमतीची दुचाकीही जप्त केली आहे. मलकापूर तालुक्यातील हरसोडा जुने येथे 22 सप्टेंबर रोजी दुय्यम निरीक्षक अमित अडळकर यांनी 1 वारस गुन्हा नोंदवित 70 हजार 550 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यामध्ये 65 हजार रूपये किमतीची दुचाकी आहे. त्याचप्रमाणे 6 सप्टेंबर रोजी प्र. निरीक्षक, भरारी पथक आर. आर उरकुडे यांनी एक दुचाकी, 22 सप्टेंबर रोजी 1 दुचाकी व 1 तीन चाकी वाहन जप्त केले आहे. त्याची किंमत 1 लक्ष 6 हजार 860 रूपये आहे.

   अशाप्रकारे जिल्ह्यात सुरू असलेल्या या मोहिमेमध्ये नागपूरचे विभागीय उपआयुक्त मो. सु. वर्धे, अधिक्षक श्रीमती भाग्यश्री पं. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक जी. आर गावंडे, दुय्यम निरीक्षक एन. के मावळे, आर. के फुसे, अमित अडळकर, रविराज सोनुने, एस. डी चव्हाण, आर.आर उरकुडे, वा.रा बरडे, पी.व्ही मुंगडे व सर्व जवान, जवान नि वाहनचालक यांनी सहभाग घेतला, असे अधिक्षक श्रीमती भाग्यश्री जाधव यांनी कळविले आहे.

                                                            *********** 

 

कोरोना अलर्ट : जिल्ह्यात 12 सक्रीय रूग्ण; आजचे पॉझीटीव्ह ‘शून्य’

• 06 रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा, (जिमाका) दि. 23 : जिल्ह्यात कोरोना विषाणू बॅकफूटवर गेल्याचे आजच्या आकडेवारीवरून पुन्हा एकदा समोर आले आहे. जिल्हावासियांना आज सहाव्यांदा नवीन संसर्गीत रूग्णाच्या शून्याने दिलासा दिला आहे. मात्र तरीही जिल्ह्यात उपचार घेत असलेले 12 सक्रीय रूग्ण आहे. त्यामुळे जिल्हावासियांनी मास्क वापरणे, हात वारंवार स्वच्छ धुणे किंवा सॅनीटाईज करणे व सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करणे या त्रि सुत्रींचा अवलंब करावा. तसेच पात्र लाभार्थ्यांनी कोविड लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

   प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 875 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी आज एकही पॉझीटीव्ह रूग्ण आढळून आला नाही. सर्वच 875 अहवाल कोरोना निगेटिव्ह प्राप्त झाले आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 72 तर रॅपिड टेस्टमधील 803 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 875 अहवाल निगेटीव्ह आहेत.

   तसेच आज 06 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे आजपर्यंत 713636 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86865 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 86865 आहे. आज रोजी 848 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 713636 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87550 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86865 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 12 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 673 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

******

 

एस टी बसमध्ये विनातिकिट प्रवास करू नये

  • एस टी महामंडळाचे आवाहन

बुलडाणा, (जिमाका) दि. 23 : राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी विना तिकिट प्रवास करून नये. आपली तिकिटे काळजी पुर्वक जपून ठेवावीत. मोटार वाहन कायदा 1988 नुसार विना तिकिट प्रवास करणाऱ्या व्यक्तीकडून त्याने चुकविलेल्या भाड्या व्यतिरिक्त प्रवास करणाऱ्या व्यक्ती कडुन त्याने चुकविलेल्या भाड्या व्यतिरिक्त प्रवास भाड्याच्या दुप्पट रक्कम किंवा 100 रूपये यापैकी जी रक्कम अधिक असेल ती दंड म्हणून वसुल करण्यात येईल. तपासणी अधिकारी यांनी बस तपासणीच्या प्रवाशांनी प्रवास केलेल्या मार्गाचे तिकिट दाखविणे आवश्यक राहणार आहे. तरी प्रवाशांनी प्रवासाचे तिकिट काढून राज्य परिवहन महामंडळास सहकार्य करावे, असे आवाहन विभाग नियंत्रक यांनी केले आहे.

*****

भगवान महावीर फाऊंडेशन संस्थेच्या पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करावे

  • 30 सप्टेंबर पर्यंत प्रस्ताव सादर करण्यासाठी अंतिम मुदत

बुलडाणा, (जिमाका) दि. 23 : भगवान महावीर फाऊंडेशन संस्था, चेन्नई यांचे भगवान महावीर फाऊंडेशन करीता नामनिर्देशन पाठविण्याचे आयुक्त, महिला व बालविकास, पुणे यांनी कळविले आहे. त्यानुसार या संस्थेमार्फत सामाजिक क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या नि:स्वार्थी व्यक्तींना प्रोत्साहनपर स्वरूपाचे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यामध्ये अहिंसा व शाकाहार, शिक्षण, वैद्यकीय मदत, समाजसेवा अशा चार क्षेत्रातील अतुलनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा समावेश असणार आहे.

   ज्या व्यक्तींनी सामाजिक क्षेत्रात नि:स्वार्थ भावनेतून प्रोत्साहनात्मक कार्य केले आहे. त्यांनी नमूद केलेल्या निकषांप्रमाणे पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवायचे आहे. प्रस्ताव पाठविण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2021 आहे. इच्छूक व्यक्तींनी या पुरस्कारासाठी पात्र प्रस्ताव bmfawrds@gmail.com या ईमेल आयडीवर परस्पर पाठवून त्याची एक प्रत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, सुवर्ण नगर, बस स्टँण्डच्या मागे, मुठ्ठे ले आऊट, बुलडाणा यांच्या कार्यालयात पाठविण्यात यावी. तसेच या संबंधातील अर्ज व अधिक माहिती www.bmfawrds.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी कळविले आहे.

*******

 

बुलडाणा तालुक्यात विशेष लसीकरण सत्र; 9311 लाभार्थ्यांना लसीकरण

  • तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाचे आयोजन

बुलडाणा, (जिमाका) दि. 23 : ग्रामीण भागातील जनतेच्या कोविड लसीकरणामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग वाढविण्यासोबतच लसीकरणापासून कुणीही वंचित राहू नये, या उदात्त हेतुने तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाचे वतीने 23 सप्टेंबर रोजी विशेष लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले. या सत्रांमध्ये 9311 लाभार्थ्यांना लसीकरण करण्याचे नियोजन होते. याबाबत तहसिलदार रूपेश खंडारे यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय बैठकही घेण्यात आली. यामध्ये तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र सरपाते, गटविकास अधिकारी श्री. सावळे, गट शिक्षणाधिकारी संजय पवार, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी गजानन शिंदे, तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी आणि लसीकरण क्षेत्र सनियंत्रक  दिपक महाले, कार्यक्रम सहायक सचिन हिवाळे आदी उपस्थित होते. याप्रसंगी अंगणवाडी सेविका, शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी सहभागी होवून कार्यक्रम यशस्वीतेसाठी पुढकार घेण्याबाबतच्या सुचनाही तहसिलदार यांनी दिल्या, असे तालुका आरोग्य अधिकारी यांनी कळविले आहे.

******


कोविडने पतीचा मृत्यू होवून विधवा झालेल्या महिलांना शासकीय योजनांची लाभ द्यावा

- जिल्हाधिकारी

 * जिल्हा कृती दल आढावा बैठक

 * अनाथ व एक पालक असलेल्या बालकांची शैक्षणिक कागदपत्रे त्वरित द्यावी

बुलडाणा, (जिमाका) दि. 23 : कोविडमुळे लहान मुले जशी अनाथ किंवा एक पालक झाली, तशाच पद्धतीने अनेक विवाहीत महिलांचे पती मृत्यू पावल्यामुळे महिलाही विधवा झाल्या आहेत. अशा महिलांचे पुनर्वसन करण्यासाठी शासनाने मिशन वात्सल्य उपक्रम सुरू केला आहे. त्यानुसार जिल्ह्यात कोविडमुळे पतीचा मृत्यू होवून विधवा झालेल्या महिलांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यात यावा,  अशा सूचना जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी आज दिल्या.

    जिल्हाधिकारी कार्यालयात कोविडमुळे मृत्यू झालेल्या पालकांच्या बालक व पतीच्या मृत्यूमुळे विधवा महिलांच्याप्रकरणी जिल्हा कृती दलाची आढावा बैठक 23 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी गुलाबराव वाघ, महिला व बालविकास अधिकारी श्री. मारवाडी, बाल संरक्षण अधिकारी श्री. मराठे आदी उपस्थित होते.

    जिल्ह्यात कोविडमुळे एक पालक अथवा अनाथ झालेल्या बालकांची शैक्षणिक कागदपत्रे त्वरित देण्याच्या सूचना करीत जिल्हाधिकारी म्हणाले, शिक्षण विभागाने संबंधित एक पालक अथवा अनाथ मुलांची शैक्षणिक कागदपत्रे संबंधीत शाळांकडून घेवून बाल कल्याण समितीला द्यावी. जेणेकरून अशा बालकांना शैक्षणीक मदत करता येणे शक्य होईल. त्यांचे शैक्षणिक शुल्क, भविष्यातील शिक्षणाच्या सुविधा यासाठी तजवीज करता येईल. चाईल्ड लाईनने 1098 या टोल फ्री क्रमांकाला जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रूग्णालय, शासकीय रूग्णालय, उपकेंद्र, सर्व शासकीय कार्यालये, सार्वजनिक स्थळे, रेल्वे स्थानक, बस स्थानकांवर प्रसिद्धी द्यावी. एक आदर्श प्रसिद्धी नमुना बनवून 1098 टोल फ्री क्रमांकाचे स्टीकर, बॅनर बनवून लावावे. जेणेकरून समितीसमोर न आलेली अनाथ, एक पालक बालके समाजाच्या माध्यमातून समोर येतील.

  ते पुढे म्हणाले, दोन्ही आई वडील गेल्यामुळे अनाथ झालेल्या बालकांना 5 लक्ष रूपयांचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी सर्वांचे बँक खाते काढण्यात आले आहे. या खात्यामध्ये शासनाकडून निधी प्राप्त होणार आहे. तरी संबंधित विभागाने या अनाथ बालकांची सर्व कागदपत्रे ऑनलाईन पोर्टलवर अपलोड करावी. प्रलंबित ठेवू नये. विधवा महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देण्यासाठी सर्व महिलांचे प्रकरणे तयार करावीत. त्यांना या योजनेतून अर्थसहाय्य देण्यात येईल. विधवा महिलांना त्यांच्या मागणीनुसार कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात यावे. महिला आर्थिक विकास महामंडळाकडून व्यवसायाकरीता अर्थसहाय्य देण्यात यावे. तसेच अधिकाधिक विधवा महिलांचा शोध घेवून त्यांचा यामध्ये समावेश करावा.

कोविड काळातील जिल्ह्यातील बालकांची स्थिती

कोविडमुळे अनाथ झालेली बालके 14 (मुले 4 व मुली 10), एक पालक झालेले बालकांची संख्या 376 (मुले 205 व मुली 171), बाल कल्याण समिती मार्फत गृह चौकशी आदेश 306, सामाजिक गृह चौकशी करण्यात आलेल्या बालकांची संख्या 306, बाल कल्याण समितीमार्फत समक्ष सादर करण्यात आलेल्या बालकांची संख्या 306, बाल कल्याण समितीमार्फत एक पालक असलेल्या आणि ताबा घेतलेल्या बालकांची संख्या 293 व अनाथ बालकांची संख्या 13, बाल कल्याण समिती मार्फत बालकांच्या संपत्ती बाबत चौकशी आदेश 9, चाईल्ड लाईन 1098 टोल फ्री संपर्क क्रमांकामार्फत आलेली प्रकरणे 59, प्राप्त प्रकरणांपैकी कार्यवाही पुर्ण प्रकरणे 55. 

                                                                        ***********

जिल्ह्यात दमदार पाऊस…!

• सरासरी 9.6 मि.मी पावसाची नोंद

• लोणार तालुक्यात सर्वात जास्त 31.7 मि.मी पाऊस

बुलडाणा, (जिमाका) दि.23 : जिल्ह्यात कालही कमी अधिक प्रमाणात पावसाने आपली हजेरी लावली. काही तालुक्यांमध्ये त्याची जोरदार बॅटींग अनुभवयाला आली, तर काही ठिकाणी विश्रांती घेत पाऊस बरसत होता. पावसाने आपली दमदार हजेरी लावत सरासरी 9.6 मि.मी नोंद केली.

  जिल्ह्यात लोणार तालुक्यात सर्वात जास्त 31.7 मि.मी पावसाची नोंद करण्यात आली आहे. आज सकाळी 8 वाजेपर्यंत महसूल विभागाकडील नोंदीनुसार सरासरी 9.6 मि.मी पाऊस जिल्ह्यात झाला आहे. जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंत नोंदविलेला पाऊस पुढीलप्रमाणे : कंसातील आकडेवारी आजपर्यंत झालेल्या पावसाची. बुलडाणा : 9 मि.मी (741.8, चिखली : 7.2 (713.4), दे.राजा : 23.6 (662.8), सिं. राजा : 23.9 (848.5), लोणार : 31.7 (869.6), मेहकर : 4.8 (1013.4), खामगांव : 4 (639.3), शेगांव : 3.5 (466.3, मलकापूर : 7.2 (521.5), नांदुरा : 2 (548.8, मोताळा : 3.8 (581.2), संग्रामपूर : 2.7 (598.4), जळगांव जामोद : 1.5 (431.6)

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 8636.6 मि.मी पावसाची नोंद झाली असून त्याची सरासरी 664.4 मि.मी आहे. आतापर्यंत सर्वात कमी 431.6 मि.मी पावसाची नोंद जळगांव जामोद तालुक्यात झाली आहे. त्याची टक्केवारी 61.04 आहे.

जिल्ह्यातील जलसाठ्यात वाढ

जिल्ह्यातील तीन मोठ्या व 7 मध्यम प्रकल्पांत जलसाठा पुढीलप्रमाणे : आजचा पाणीसाठा व कंसात टक्केवारी – नळगंगा : 43.83 दलघमी (63.27), पेनटाकळी : 36.34 दलघमी (60.58), खडकपूर्णा : 83.81 दलघमी (89.74), पलढग : 4.77 दलघमी (63.51), ज्ञानगंगा : 33.01 दलघमी (100), मन : 36.37 दलघमी (98.77), कोराडी : 15.12 दलघमी (100), मस : 9.33 दलघमी (62.03), तोरणा : 6.76 दलघमी (85.61) व उतावळी : 19.79 दलघमी (100).

100 टक्के भरलेले लघु व मध्यम पाटबंधारे प्रकल्प

जिल्ह्यात 100 टक्के भरलेले लघुपाटबंधारे प्रकल्प : देऊळगांव कुंडपाळ ता. लोणार, गुंधा ता. लोणार, तांबोळा ता. लोणार, कंडारी ता. नांदुरा, घनवटपूर ता. मेहकर, मिसाळवाडी ता. दे.राजा, अंचरवाडी -1 ता. दे. राजा, अंचरवाडी -2 ता. दे. राजा, टाकळी ता. खामगांव, निमखेड ता. खामगांव, पांगरखेड ता. मेहकर, कळमेश्वर ता. मेहकर, चायगांव ता. मेहकर, टिटवी ता. लोणार, शिवणी जाट ता. लोणार, गांधारी ता. लोणार, पिंपळनेर ता. लोणार, झरी ता. बुलडाणा, गारखेड ता. सिं.राजा, विद्रुपा ता. सिं.राजा, दहीद ता. बुलडाणा, हराळखेड ता. चिखली, पाटोदा ता. चिखली, अंढेरा ता. दे.राजा, मेंडगांव ता. दे .राजा, शिवणी आरमाळ ता. दे. राजा, बोरजवळा ता. खामगांव, पिंपळगा नाथ, ता. मोताळा,पळशी ता. मेहकर, मांडवा ता. सि. राजा, ढोरपगांव ता. खामगांव, ब्राम्हणवाडा ता. चिखली, मासरूळ ता. बुलडाणा, मध्यम प्रकल्प : मध्यम पाटबंधारे प्रकल्प दुर्गबोरी ता. मेहकर,

*****

No comments:

Post a Comment