Monday, 25 January 2021

DIO BULDANA NEWS 25.1.2021

  


जिल्हा नियोजन समितीच्या निधीचा उपयोग जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी करावा

- पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे

* वित्तीय कमाल मर्यादेत सर्वसाधारणसाठी 216.36 कोटी, अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 127.05 कोटी

* आदिवासी उप योजनेसाठी 14.20 कोटी रूपये

नगर पालिका क्षेत्रातील घरकुलांचे डीपीआर तयार करणारी एजन्सी बदलवावी

जिल्ह्यातील अतिक्रमणे तातडीने काढावीत

पुर संरक्षण भिंतींचे प्रस्ताव सादर करावे

पलढग प्रकल्पाच्या क्षेत्रात पक्षी अभयारण्याचा प्रस्ताव द्यावा

 बुलडाणा, (जिमाका) दि‍. 25 -  सन 2021-22 करिता जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून शासनाने घालून दिलेल्या वित्तीय मर्यादेत जिल्हा वार्षिक योजना, अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी उपयोजना मिळून 357.60 कोटी रूपयांचा प्रारूप आराखडा तयार करण्यात आला आहे. सर्वसाधारण योजनेचा 216.36, अनुसूचित जाती उपयोजनेचा 127.05 व आदिवासी उपयोजनेसाठी 14.20 कोटी रूपयांचा त्यामध्ये समावेश आहे. समितीने प्रस्तावित केलेल्या आराखड्यातील निधीमधून आरोग्य, शिक्षण, रस्ते व ग्रामविकासावर प्राधान्य देणार आहे. या निधीचा उपयोग जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी करण्यात यावा, अशा सूचना राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज दिल्या.

   जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे आयोजन आज जिल्हा नियोजन भवन येथे करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर खासदार प्रतापराव जाधव, जिल्हा परिषद अध्यक्षा मनिषा नितीन पवार, पंचायत राज समितीचे अध्यक्ष तथा आमदार डॉ संजय रायमूलकर, जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया, जिल्हा नियोजन अधिकारी सुनय लाड, उपवनसंरक्षक श्री. गजभिये आदी व्यासपीठावर उपस्थित होते. तसेच सभागृहात आमदार सर्वश्री डॉ. संजय कुटे, ॲड आकाश फुंडकर, संजय गायकवाड, श्रीमती श्वेताताई महाले, राजेश एकडे, जि.प उपाध्यक्षा कमलताई बुधवत आदींसह नियोजन समितीचे सदस्य उपस्थित होते.

      सन 2020-21 मध्ये कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे आरोग्य विभागाला कोविड नियंत्रणासाठी निधी देण्यात आल्याचे सांगत पालकमंत्री डॉ. शिंगणे म्हणाले,  जिल्हा नियोजन समितीमधून देण्यात आलेल्या निधीचा उपयोग कोरोनाच्या अनुषंगाने आरोग्य यंत्रणा सुदृढ करण्यासाठी करण्यात यावा.  जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत नगर पालिका क्षेत्रात घरकुले देण्यात येतात. मात्र काही नगर पालिका वगळता जिल्ह्यातील घरकुलांचा डीपीआर मंजूर नाही. त्यासाठी नियुक्त केलेली एजन्सी काम करीत नाही. त्यामुळे ती बदलण्यात यावी. तसेच नगर पालिकांना डीपीआर मंजूरीचे अधिकार असल्यास त्यांनी आपले शासनाच्या नियमानुसार डिपीआर मंजूर करून घ्यावे.

    मेहकर नगर पालिका क्षेत्रात कामांच्या एमबी मेकॅनीकल इंजीनीयरने रेकॉर्ड केल्याबाबत चौकशी करण्याचे सूचीत करीत पालकमंत्री श्री. शिंगणे म्हणाले,  तसेच नगर पालिकेच्या संदर्भातील कामांबाबत विषयसूची तयार करून नगर विकास मंत्र्यांकडे बैठक लावण्यात येईल. जिल्ह्यातील सर्व क्षेत्रातील अतिक्रमणे काढून टाकण्यात यावीत. याबाबतीत पुढील 8 दिवसांत कारवाई करावी. यंत्रणांनी लोकप्रतिनिधींच्या तक्रारींची दखल घ्यावी, याबाबत योग्य ती कारवाई करून लोकप्रतिनिधींच्या प्रश्नांचे निरसन करावे. जिल्ह्यातील सर्व तलावांचे सर्वे करून दुरूस्ती आवश्यक असलेल्या तलावांची कामे प्राधान्याने करण्यात यावी.  त्यासाठी राज्य शासनाकडून निधी मिळविण्यात येईल.

  

     ते पुढे म्हणाले, जिल्ह्यात पांदण रस्ते निर्मितीची मोठी मागणी आहे व शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे पांदण रस्त्यांसाठी प्रस्ताव द्यावेत. तसेच पूर संरक्षण भिंतींची मागणीही आहे. यामध्ये सुद्धा प्रस्ताव सादर करावे. प्रेताचे शवविच्छेदन त्याच संबंधित तालुक्यांमध्ये होत असल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र याबाबतीत संबंधीत गावासाठी जवळील तालुका असेल, तर तेथे शवविच्छेदनाला परवानगी द्यावी.   जिल्ह्यात दोन नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र निर्माण करण्यात आली आहे. या नवीन पीएचसींमध्ये यंत्रसामुग्रीसाठी प्रस्ताव पाठवावा. शासनाकडून मंजूरात आण्ण्यात येईल. अंबाबारवा अभयारण्यात पर्यटनीयदृष्टया विकास करण्यात यावा. यामध्ये विविध कामांसाठी निधी प्रस्तावित करण्यात येईल. अभयारण्यात व्याघ्र दर्शन होत असल्यास त्याबाबत प्रचार – प्रसिद्धी करण्यात यावी.  पलढग प्रकल्पाच्या परीसरात पक्षी अभयारण्य होत असल्यास तसा प्रस्ताव तयार करावा. जेणेकरून या भागातील पर्यटन वाढेल. पर्यटन वाढीसाठी गेरू माटरगांव बोटींगची व्यवस्था करण्यात यावी. लोणार सरोवर विकासासंदर्भात प्राधिकरण स्थापन करण्याची मागणी आहे, त्यादृष्टीने कार्यवाही करावी.

  कृषि विभागाने पिक विमा मिळण्याची कारवाई करण्याच्या सूचना करीत पालकमंत्री म्हणाले, 50 पैशांच्या आत पैसेवारी आल्यामुळे सर्व विमाधारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल यादृष्टीने काम करावे. राहेरी पुलावरील जड वाहनांची वाहतूक बंद असल्यामुळे पर्यायी पुलाचे काम गतीने पूर्ण करावे. त्यामुळे जड वाहतूक सुरू होवून या भागातील व्यवसाय पुन्हा सुरू होतील.

            खासदार प्रतापराव जाधव यांनी जिल्हा विकासाच्या दृष्टीने विविध मुद्दे मांडले. ते म्हणाले महावितरण कंपनीने उर्जा नियामक कायदा 2003 ची अंमलबजावणी करावी. शेतकऱ्यांना आकारलेल्या वीज देयकांची तपासणी करून तक्रारी आल्यास शेतकऱ्यांच्या कृषी पंप वीज देयकात सुधारणा करून द्यावी.   यावेळी लोकप्रतिनिधींनी विविध समस्या मांडल्या. या समस्यांवर पालकमंत्री यांनी संबंधित यंत्रणेकडून उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. बैठकीत जिल्हा नियोजन अधिकारी सुनय लाड यांनी सादरीकरण केले. तसेच प्रारूप आराखडा 2021-22 चे सादरीकरण सहा. जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ यांनी केले.  बैठकीला जिल्हा नियोजन समितीचे सदस्य, विभागप्रमुख, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आदींची उपस्थिती होती.

 

*****

कोरोना अलर्ट : प्राप्त 1724 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 73 पॉझिटिव्ह

• 98 रूग्णांना मिळाली सुट्टी

  बुलडाणा,(जिमाका) दि. 25 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1797 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1724 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 73 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 72 व रॅपीड अँटीजेन टेस्टमधील 1 अहवालाचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 1648 तर रॅपिड टेस्टमधील 76 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 1724 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : खामगांव शहर : 22, खामगांव तालुका : मांडका 1, भालेगांव 1, गणेशपूर 1, घाटपुरी 1, पळशी 1,  चिखली शहर : 4, चिखली तालुका : सवडत 1,  शेगांव तालुका : माटरगांव 1, टाकळी धारव 1, जवळा 1, सगोडा 2, शेगाव शहर : 9,  बुलडाणा शहर : 8, मोताळा तालुका : पोफळी 3, मोताळा शहर : 1, मेहकर शहर : 10, दे. राजा शहर : 1, नांदुरा शहर : 1,  मलकापूर शहर : 2 येथील संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 73  रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान राजे संभाजी नगर, बुलडाण येथील 82 वर्षीय महिला व मेहकर येथील 77 वर्षीय पुरूष रूग्णाचा मृत्यू झाला आहे.  

      तसेच आज 98 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.

विविध तालुक्यातील कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे :  बुलडाणा : स्त्री रूग्णालय 1, सिद्धीविनायक हॅस्पीटल 1, अपंग विद्यालय 26, मलकापूर : 3,  चिखली : 11, दे. राजा : 10, खामगांव : 5, शेगांव : 15, मेहकर : 7,  नांदुरा : 1, जळगांव जामोद : 5, मोताळा : 9, सि. राजा : 4.  

  तसेच आजपर्यंत 102647  रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 13209 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 13209 आहे. 

  तसेच 3491 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 102647 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 13363 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 13209 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 288 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 166 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी  यांनी दिली आहे.

                                                                        **********

राष्ट्रध्वजाचा राखा सन्मान.. वाढेल देशाचा अभिमान !...

·         हँण्ड स्पून राष्ट्रध्वज पायदळी तुडवू नका

   बुलडाणा,(जिमाका) दि. 25 : दरवर्षी 26 जानेवारी, 1 मे, 15 ऑगस्ट व अन्य राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा सामन्यांच्या वेळी विद्यार्थी व नागरिक प्लास्टीक राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येतो. सदर कार्यक्रम पार पाडल्यानंतर फाटलेले कागदी राष्ट्रध्वज तसेच प्लास्टीकचे राष्ट्रध्वज मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्तत: पडलेले दिसतात, असे राष्ट्रध्वज पायदळी तुडविले जातात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो.                               

    राष्ट्रध्वजाचा उचित सन्मान राखण्यासाठी भारतीय ध्वज संहितेच्या कलम 1.2 ते 1.5 मध्ये राष्ट्रध्वजाच्या उचित वापराबाबतच्या तरतुदी आहेत. राष्ट्रध्वज हा हँण्ड स्पून आणि हस्तनिर्मित वूल, कॉटन, सिल्क आदीमध्ये असावा. राष्ट्रध्वजाचा आकार आयाताकृती, त्याची उंची व रुंदी 3:2 असावी. राष्ट्रध्वजाचा आकार 9 प्रकारात पुढीलप्रमाणे असायला पाहिजे. त्याचा आकार प्रकारानुसार लांबी व रुंदी दिली आहे. प्रकार 1 -  लांबी,  रुंदी अनुक्रमे 6300 व 4200 मीटर, प्रकार 2 – लांबी व रुंदी अनुक्रमे 3600 व 2400, प्रकार 3- लांबी, रुंदी अनुक्रमे 2700 व 1800, प्रकार 4- लांबी, रुंदी अनुक्रमे 1800 व 1200, प्रकार 5 - लांबी, रुंदी अनुक्रमे 1350 व 900, प्रकार 6 - लांबी, रुंदी अनुक्रमे 900 व 600, प्रकार 7- लांबी, रुंदी अनुक्रमे 450 व 300, प्रकार 8-  लांबी, रुंदी अनुक्रमे 225 व 150, प्रकार 9 -  लांबी, रुंदी अनुक्रमे 150 व 100 मीटर असावी. राष्ट्रध्वजाचा व्हीव्हीआयपी विमानासाठी आकार 450 बाय 100 मीटर, मोटार कारसाठी 225 बाय 150 मीटर आणि टेबलसाठी 150 बाय 100 मीटर असावा.

     भारतीय ध्वजसंहितेमध्ये दिलेल्या तरतूदीनुसार राष्ट्रध्वजाचा वापर करताना खराब झालेल्या, माती लागलेल्या ध्वजाची विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. परंतु तसे होत नसल्याने राष्ट्रध्वजाचा अवमान होत असल्याचे निदर्शनास आले आहे. दरवर्षी 26 जानेवारी, 1 मे, 15 ऑगस्ट व अन्य राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा सामन्यांच्या वेळी विद्यार्थी व नागरिक प्लास्टीक राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येतो. याठिकाणी पायदळी तुडविलेले राष्ट्रध्वज गोळा करून तालुका व जिल्हा स्तरावर निर्मित करण्यात आलेल्या यंत्रणेस सुपूर्द करण्याचे अधिकार अशासकीय संस्था तसेच इतर संघटनांना देण्यात आले आहे. त्यांनी असे राष्ट्रध्वज जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्याकडे सुपूर्द करावे. खराब झालेले, माती लागलेले राष्ट्रध्वज गोणी किंवा कापडामध्ये व्यवस्थित बांधून शिवून बंद करावे. अशाप्रकारे बांधलेले राष्ट्रध्वज सुर्यास्तानंतर व सुर्योदयापूर्वी जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयांमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली स्वच्छ जागेत सन्मानपूर्वक जाळून नष्ट करावे. हे करताना उपस्थितांनी उभे रहावे व जाळून पुर्णपणे नष्ट होईपर्यंत जागा सोडू नये, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे. 

                                                                                    ********

सरपंच आरक्षण सोडतसाठी मोताळा येथे सभेचे आयोजन

बुलडाणा,(जिमाका) दि.25 : लोणार तालुक्यातील सन 2020 ते 2025 दरम्यान सार्वत्रिक निवडणूकीद्वारे गठीत होणाऱ्या ग्रामपंचायत सरपंच पदाकरीता आरक्षण सोडत (महिला आरक्षण वगळून) तहसिलदार तथा निवडणूक अधिकारी, लोणार यांचे अध्यक्षतेखाली बुधवार, दि. 27 जानेवारी 2021 रोजी दुपारी 12.30 वाजता तहसिल कार्यालय, मोताळा येथे सभागृहात आयोजित करण्यात आलेले आहे.  तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागास प्रवर्गातील यामधील महिलांसाठी जागांची सोडत जिल्हाधिकारी बुलडाणा यांचे अध्यक्षतेखाली 29 जानेवारी 2021 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा येथे निश्चित करण्यात येणार आहे. तरी कोविड 19 बाबत सोशल डिस्टसिंगचे पालन करून संबंधीत इच्छुकांनी सदर सोडतीस हजर रहावे, असे आवाहन तहसिलदार मोताळा यांनी केले आहे.  

                                                                                **************

 

आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी करावी

·        राज्य परिवहन महामंडळात शिकावू उमेदवारांकरीता भरती

बुलडाणा,(जिमाका) दि.25 :  राज्य परिवहन महामंडळ बुलडाणा विभागामार्फत 2021-22 साठी तांत्रिक व्यावसायिक, आय.टी. आय. उत्तीर्ण कार्यशाळा शिकाऊ उमेदवार भरती करावयाचे आहे. त्याकरीता  यांत्रिक मोटारगाडी, पत्रे कारागीर, ॲटो विजतंत्री, पेंटर, टर्नर, वेल्डर, वायरमन या व्यवसायांकरीता आय टी आय उत्तीर्ण उमेदवारांनी www. apprenticeshipindia.org या संकेस्थळावर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे.

  शिकाऊ उमेदवार तसेच इच्छूक असलेल्या उमेदवारांनी नमुद केल्याप्रमाणे नोंदणी केल्‍यानंतर एम.एस.आर.टी.सी. बुलडाणा

विभाग आस्थापने करीता ऑनलाईन अर्ज करावे.  ऑनलाईन झालेल्या शिकाऊ उमेदवारांकरीता इच्छूक असणाऱ्या उमेदवारांना कार्यालयाचा छापील नमुन्यातील अर्ज भरावे लागतील. सदरचे छापील अर्ज आस्थापना शाखा, राज्य परिवहन महामंडळ, विभागीय कार्यालय, मलकापुर रोड,  बुलडाणा येथे दि. 27 जानेवारी 2021 ते 10 फेब्रुवारी 2021 पर्यत सकाळी

10.ते 3 वाजेपर्यत मिळतील. तसेच तेथे लगेच स्विकारले जातील.  अर्जाची किंमत (जीएसटी 18 टक्के सहीत राहील) खुल्या

प्रवर्गातील उमेदवारांसाठी 590 रुपये, मागासवर्गीय शिकाऊ उमेदवारांसाठी 295 रुपये असून शुल्क उमेदवारांनी राष्ट्रीयकृत

बॅंकेचा डिमांड  ड्राफ्ट किंवा भारतीय डाक घर येथील पोस्टल ऑर्डर याद्वारे एम.एस.आर.टी. सी. FUND A/C BULDANA नावाने काढून अर्जासोबत सर्व कागदपत्रांसह कार्यालयात दि. 10 फेब्रुवारी 2021 पर्यत 6 वाजेपर्यत सादर करावे.

   तसेच खालील प्रमाणे व्यवसायनिहाय पदे भरावयाची आहे. व्यवसाय तांत्रिक मोटारगाडी (मोटार मेकॅनिकल व्हेईकल – एम एम व्हि, 30 पदे, पत्रे कारागिर  14 पदे, ॲटो विजतंत्री  6 पदे, पेंटर 4 पदे, टर्नर 2 पदे, वेल्डर 6 पदे, वायरमन 2 पदे असे एकुण 64 पदे शिकाऊ उमेदवारांनी पदे भरावयाची आहे. सदर नमुद केलेल्या संकेतस्थळावर जे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करतील त्याच उमेदवारांना रा. प. महामंडळ बुलडाणा विभागामध्ये शिकावू उमेदवारी करता येईल. त्यांनाच शिकाऊ उमेदवार  म्हणून विभागास भरती करण्यात येईल, असे विभाग नियंत्रक राज्य परिवहन विभाग यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000000

सन 2021-22 शैक्षणिक वर्षाची आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया सुरू

बुलडाणा,(जिमाका) दि.25 :   जिल्हा परिषद शिक्षणविभागातर्फे बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार खाजगी विना अनुदानित, कायम विना अनुदनित, स्वयअर्थ सहाय्यीत शाळांमध्ये प्रवेश स्तरावर 25 टक्के जागा वंचीत दुर्बल घटकातील मुलांसाठी राखीव ठेवण्याची तरतुद आहे. त्यानुसार 2021-22 या वर्षातील 25 टक्के प्रवेश प्रक्रिया राबविण्याच्या सुचना दि. 20 जानेवारी 2021 शासन स्तरावर देण्यात आल्या आहे.

  सदरची प्रक्रियेबाबत संभाव्य वेळापत्रक शासनाने rte25admission.maharasharahtra.gov.in संकेस्थळावर उपलब्ध आहे. तसेच पालकांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी दि. 9 ते 26 फेब्रुवारी 2021 कालावधी असून प्रवेश लॉटरीची सोडत दि. 5 ते 6 मार्च 2021 राहणार आहे. यांची जिल्ह्यातील सर्व शाळा पालक यांनी नोंद घ्यावी. तसेच आर. टी. ई. 25 टक्के प्रवेश प्रक्रिये करीता माहितीकरीता पालकांनी rte25admission.maharasharahtra.gov.in वेबासाईटला भेट देवून सर्व सूचना प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी पाहावी. जिल्ह्यातील जास्तीत पालकांनी 25 टक्के प्रवेश प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन शिक्षण विभाग (प्राथमिक) कार्यालयाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

                                                                                                **********

सरपंच आरक्षण सोडतसाठी बुलडाणा येथे सभेचे आयोजन

बुलडाणा,(जिमाका) दि.25 : लोणार तालुक्यातील सन 2020 ते 2025 दरम्यान सार्वत्रिक निवडणूकीद्वारे गठीत होणाऱ्या ग्रामपंचायत सरपंच पदाकरीता आरक्षण सोडत (महिला आरक्षण वगळून) तहसिलदार तथा निवडणूक अधिकारी, लोणार यांचे अध्यक्षतेखाली बुधवार, दि. 27 जानेवारी 2021 रोजी दुपारी 12.30 वाजता तहसिल कार्यालय, बुलडाणा येथे सभागृहात आयोजित करण्यात आलेले आहे.  तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागास प्रवर्गातील यामधील महिलांसाठी जागांची सोडत जिल्हाधिकारी बुलडाणा यांचे अध्यक्षतेखाली 29 जानेवारी 2021 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा येथे निश्चित करण्यात येणार आहे. तरी कोविड 19 बाबत सोशल डिस्टसिंगचे पालन करून संबंधीत इच्छुकांनी सदर सोडतीस हजर रहावे, असे आवाहन तहसिलदार बुलडाणा यांनी केले आहे.  


No comments:

Post a Comment