अटींच्या अधीन राहून मंडप व लाईट डेकोरेशन, बँड पथकांना परवानगी
- सर्व साहित्य निर्जंतुकीकरण करून वापरावे
- ध्वनी प्रदुषण नियम 2000 अंगर्तत तरतुदींचे पालन करावे
- सोशल डिस्टसिंगचे पालन करून बँड वाजविणे बंधनकारक
बुलडाणा, (जिमाका) दि. 4 : जिल्ह्यात शासनाकडून वेळोवेळी शिथील करण्यात आलेले निर्बंध व सुट देण्यात आलेल्या बाबी कायम ठेवून टाळेबंदीचा कालावधी 30 नोव्हेंबर पर्यंत वाढविण्यात आला आहे. शासन आदेशानुसार लग्न समारंभाच्या कार्यक्रमासाठी सोशल डिस्टसिंगचे पालन करून जास्तीत जास्त 50 व्यक्तींनी लग्न समारंभात सहभागी होण्याची परवानगी आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार जिल्हादंडाधिकारी एस रामामूर्ती यांनी जिल्ह्यातील सर्व मंडप व लाईट डेकोरेशन, सर्व बँड पथकांना अटींच्या अधीन राहून परवानगी दिली आहे.
लग्न समारंभाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या 50 व्यक्तींमध्ये सर्व मंडप डोकोरेशन, लाईट डेकोरेशन व सर्व बँड पथकांच्या सदस्यांचा समावेश असेल. एकाच ठिकाणी गर्दी न करता सामाजिक अंतर राखून बँड वाजविणे बंधनकारक असणार आहे. मंडप व लाईट डेकोरेशन व सर्व बँड पथकांच्या मालकांनी पथकातील सर्व सदस्यांचे नियमित थर्मल स्कॅनींग करून नोंद करणे आवश्यक राहील. तसेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होवू नये यादृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेण्यात यावी.
मंडप व लाईट डेकोरेशन, सर्व बँड पथकांनी आवश्यक असणारे सर्व साहित्य नियमित निर्जंतुकीकरण करून वापरणे बंधनकारक राहणार आहे. कोविड 19 संबंधीत वेळोवेळी निर्गमीत होणारे शासन परिपत्रक, सुचनापत्रक, आदेश व निर्णय तसेच जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून वेळोवेळी निर्गमीत केलेल्या आदेशांचे कार्यक्रम आयोजित करताना काटेकोरपणे पालन होईल याची दक्षता घ्यावी. ध्वनी प्रदुषण (नियमन व नियंत्रण) नियम 2000 अंतर्गत निर्गमीत करण्यात आलेल्या तरतुदींचे पालन करणे बंधनकारक राहील. लाऊडस्पीकर लावण्यासाठी पोलीस विभागाची स्वतंत्र परवानगी घ्यावी लागणार आहे.
सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास साथरोग प्रतिबंधक कायदा, भारतीय दंड संहिता 1860 (45) चे कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 तरतुदीनुसार शिक्षेस पात्र असणार आहे, असे जिल्हादंडाधिकारी एस रामामूर्ती यांनी कळविले आहे.
नागरिकांनी मास्क लावल्याशिवाय घराबाहेर पडू नये
- जिल्हादंडाधिकारी यांचे आवाहन
बुलडाणा, (जिमाका) दि. 4 : सरकारने कोरोना संसर्ग टाळण्यासाठी मास्क वापरण्यासाठी यापूर्वी अनेक सुचना दिल्या आहेत. टाळेबंदीत शिथीलता देण्यात आल्यामुळे नागरीक उद्योगधंदे, व्यापार, व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणावर बाहेर पडत आहेत. विशेषत: नागरी भागातील नागरीक बाहेर पडताना मास्क किंवा प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब करताना दिसत नाही. त्यामुळे कोविड वर नियंत्रणासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना प्रभावी ठरणार नाहीत. तरी नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्कशिवाय बाहेर पडूच नये, असे आवाहन जिल्हादंडाधिकारी एस रामामूर्ती यांनी केले आहे. मास्कसाठी नगर परिषद, नगर पंचायत यांनी विशेष मोहिम राबवावी. यामध्ये मास्क वापराबाबत जागरूकता निर्माण करावी. ही मोहिम यशस्वी करण्यासाठी मुख्याधिकारी यांनी विशेष दक्षता घ्यावी. मास्क नाही, तर प्रवेश नाही ही मोहिम राबवावी. मोहिम राबवितांना त्यामध्ये सर्व सामान्य नागरिकांचा सहभाग कसा वाढेल, यासाठी नाविण्यपूर्ण कल्पनांचा अवलंब करावा. तसेच जे नागरीक मास्क किंवा प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब करण्याकडे दुर्लक्ष करीत असतील अशा नागरिकांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे, असे जिल्हादंडाधिकारी एस रामामूर्ती यांनी कळविले आहे.
कापूस पिकावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव; उपाययोजना करण्याचे आवाहन
बुलडाणा, (जिमाका) दि. 4 : विदर्भातील किटनाशक शास्त्राज्ञांचा ऑनलाईन आढावा सभा दि. 2 नोव्हेंबर 2020 रोजी आयोजीत करण्यात आली होती. सभेमध्ये ऑक्टोबर महिन्यांच्या पहिल्या पंधरवाडयात गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव 10 टक्क्यांपर्यत होता. परंतु त्यात वाढ होऊन ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवाडयात तो 15 ते 20 टक्के झाला. नोव्हेबर महिन्यातील वातावरण गुलाबी बोंड अळीच्या वाढीसाठी अत्यंत पोषक आहे. त्यामुळे गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सद्यस्थितीत कापुस उत्पादक शेतकऱ्यांच्या एक किंवा दोन वेचण्या झालेल्या आहेत. काही ठिकाणी कापसाच्या झाडाला 10 ते 15 बोंड तर कुठे 50 ते 60 बोंड आहेत. ज्या ठिकाणी कापसाला कमी बोंडे असून बोंड पक्क होण्याच्या अवस्थेत आहेत अशा ठिकाणी मिळणारे उत्पन्न लक्षात घेऊन फवारणीचा निर्णय घ्यावा, ज्या ठिकाणी बोंडाची संख्या जास्त आहे व बोंडे हिरवी आहेत अशा ठिकाणी खालील प्रमाणे उपाय करावे. प्रत्येक आठवडयाला एकरी शेतीचे प्रतिनिधीत्व करतील, अशी 20 झाडे निवडून निवडलेल्या प्रत्येक मध्यम आकाराचे मध्यम पक्क झालेले बाहेरुन किडके नसलेले एक बोंड असे 20 बोंडे तोडून ते भुईमुंगाच्या शेंगाप्रमाणे दगडाने ठेचून त्यामधील किडक बोंड व अळयांची संख्या मोजून ती दोन किडक बोंड किंवा दोन पांढूरक्या रंगाच्या लहान अळ्या आढळल्यास आर्थिक नुकसान पातळी 5 ते 10 टक्के समजून खालील सांगीतल्याप्रमाणे रासायनिक किटनाशकाची फवारणी करावी.
जेथे प्रादुर्भाव 5 ते 10 टक्क्या दरम्यान आहे. अशा ठिकाणी सायपरमेथ्रिन 10 टक्के ईसी 8 मिली किंवा सायपरमेथ्रिन 25 ईसी 3.5 मिली किवा इंडोक्झाकार्ब 15.8 ईसी 10 मिली किंवा डेल्टामेथ्रिन 2.8 ईसी 12 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आवश्यकता भासल्यास 15 दिवसांनी दुसरी फवारणी करावी. जेथे प्रादुर्भाव 10 टक्क्यांवर आहे अशा ठिकाणी आवश्यकते नुसार प्रादुर्भाव पुढे वाढू नये म्हणून खालील पैकी कोणत्याही एका मिश्र किटनाशकाची 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, ट्रायझोफॉस 35 टक्के डेल्टामेथ्रिन 1 टक्के 17 मिली किंवा क्लोरपायरीफॉस 50 टक्के सायपरमेथ्रिन 5 टक्के 10 मिली किंवा सायपरमेर्थिन 10 टक्के इंडोक्झाकार्ब 10 टक्के डब्लु, डब्लु एससी 12 मिली आवश्यकता भासल्यास 10 दिवसांनी दुसरी फवारणी करावी.
सद्यपरिस्थितीत बहुतांस ठिकाणी कापशीचे पिक चार ते पाच फुट उंचीचे असून त्याच्या फांदया ही दाटलेल्या आहेत, अशा परिस्थितीत किटनाशकाची फवारणी करतांना विषबांधा होऊ शकते म्हणून कपाशीवर फवारणी करतांना कटाक्षाने फवारणी किटचा वापर करुन फवारणी करावी. तसेच फवारणी करतांना सकाळी व वाऱ्याच्या दिशेने फवारणी करावी. सर्वेक्षण करतांना बोंडाध्ये गडद गुलाबी रंगाची तिसऱ्या ते चौथ्या अवस्थेतील अळी दिसून आल्यास ही अळी तीन ते चार दिवसात कोष अवस्थेत जाऊन पुढील 10 ते 15 दिवसांनी कोषातील पतंग निघून अंडे टाकण्यास सुरुवात करु शकतात. गुलाबी बोंड अळीच्या दुसऱ्या पिढीच्या प्रादुर्भावास सुरुवात होऊ शकते, अशा ठिकाणी वरीलप्रमाणे किटनाशकाची फवारणी करुन पतंगाच्या व्यवस्थापनासाठी फेरोमोन सापळयांचा वापर करावा. यासाठी एकरी दोन किंवा हेक्टरी पाव फेरोमोन सापळे लावावे, असे पंजाबराव देशमुख कृषी विभागाचे किटकशास्त्र विभाग प्रमुखांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
********
कोरोना अलर्ट : प्राप्त 719 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 87 पॉझिटिव्ह
- 68 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा,(जिमाका) दि.4: प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 806 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 719 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 87 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 84 व रॅपीड टेस्टमधील 3 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 469 तर रॅपिड टेस्टमधील 250 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 719 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : नांदुरा शहर : 7, नांदुरा तालुका : पोटळी 1, शेलगांव मुकूंद 1, निमगांव 1, शेंबा बु 1, मलकापूर शहर : 9, मलकापूर तालुका : देवधाबा 1, बुलडाणा तालुका : उबाळखेड 1, चांडोळ 1, वरवंड 1, हतेडी 1, बुलडाणा शहर : 13, मोताळा तालुका : बोराखेडी 2, आडविहीर 1, पोफळी 6, चिखली शहर : 2, चिखली तालुका : कव्हळा 2, सातगांव भुसारी 1, रायपूर 1, धोत्रा 1, जळगांव जामोद शहर : 3, जळगांव जामोद तालुका : वाडी खु 1, धानोरा महासिद्ध 1, मेहकर तालुका : बाभुळखेड 1, मोहोट 1, लोणी गवळी 2, पिंपळगांव 2, दे. माळी 1, दादुल गव्हाण 1, डोणगांव 1, देऊळगांव साकर्षा 1, जानेफळ 1, मेहकर शहर : 4, सिं. राजा तालुका : ताडशिवणी 1, दे.राजा तालुका : उंबरखेड 4, तुळजापूर 2, जवळखेड 2, पिंपळगांव 2, दे. राजा शहर : येथील 2 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 87 रूग्ण आढळले आहे. तसेच उपचारादरम्यान कव्हळा, ता. चिखली येथील 72 वर्षीय महिला रूग्णाचा मृत्यू झाला आहे.
तसेच आज 68 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : चिखली : 23, जळगांव जामोद : 1, सिं. राजा : 2, खामगांव : 2, बुलडाणा : आयुर्वेद महाविद्यालय 1, लोणार : 4, दे. राजा : 4, मलकापूर : 7, नांदुरा : 24.
तसेच आजपर्यंत 48841 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 9063 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 9063 आहे.
आज रोजी 3308 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 48841 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 9665 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 9063 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 474 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 128 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी दिली आहे.
*****
प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी
शेतकऱ्यांनी 15 डिसेंबर पर्यंत प्रस्ताव सादर करावे
बुलडाणा, (जिमाका) दि. 4 : जिल्ह्यात प्रधानमंत्री पिक विमा योजना रबी हंगाम वर्ष 2020-21 मध्ये राबविण्यात येत आहे. कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी बँकेकडे विमा हफ्त्यासह आपले प्रस्ताव 15 डिसेंबर पर्यत सादर करावे. तसेच कर्जदार शेतकरी पिक विमा काढण्यास इच्छुक नसल्यास त्या शेतकऱ्यांनी लेखी अर्ज बँकेस सादर करावा, असे आवाहन विभागीय कृषि सहसंचालक सुभाष नागरे यांनी केले.
प्रधानमंत्री पिक विमा योजना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी बंधनकारक असून कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. खातेदारांचे व्यतिरिक्त कुळाने किंवा भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. या योजने अंतर्गत विमा हप्ता दर 30 टक्के पेक्षा जास्त नमुद केला आहे. त्यासाठी वाढीव विमा हप्ता अनुदान भार राज्य शासनावर आकारण्यात येणार असून शेतकऱ्यांवरील विमा हत्याचा भार कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता हा रब्बी हंगामासाठी 1.50 टक्के व नगदी पिकांसाठी 5 टक्के असा मर्यादीत ठेवण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत खरीप व रब्बी हंगाम सन 2020-21 ते 2022-23 या तीन वर्षाकरीता जोखिमस्तर सर्व पिकांसाठी 70 टक्के असा निश्चित करण्यात आला आहे.
विमा क्षेत्र घटक योजना
ही योजना क्षेत्र हा घटक धरून राबविण्यात येणार असून पिक विमा निहाय अधिसुचित विमा क्षेत्र घटक म्हणजेच मंडळ किंवा गट आणि तालुका किंवा तालुका गट राहणार आहे. या योजनेअंतर्गत पिक कापणी प्रयोगाव्दारे मिळणारे उत्पन्नाचे अंदाज हे अचुक व दिलेल्या कालमर्यादेमध्ये प्राप्त करण्याकरीता उपग्रहाव्दारे प्राप्त प्रतिमांच्या साहाय्याने पिक कापणी प्रयोग आयोजित करणे, तसेच पिकांच्या मिळणारे उत्पन्नाचे अंदाजासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणेबाबत केंद्र शासनाने सुचित केले आहे.
या वर्षीच्या रब्बी हंगाम सन 2020-21 मध्ये पिक विमा योजनेमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होऊन पिक विमा योजनेचा लाभ घ्यावा. यासंबंधीच्या अधिक माहितीकरीता जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक, यांनी केलेले आहे.
****
No comments:
Post a Comment