Tuesday, 3 November 2020

DIO BULDANA NEWS 3.11.2020

 


ग्रामपंचायत स्तरावर पर्जन्यमापक यंत्र बसविण्याची कार्यवाही करावी

-          पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

बुलडाणा, (जिमाका) दि. 3 : सध्या महसूल मंडळ ठिकाणी पर्जन्यमापक यंत्र लावण्यात आलेले आहे. त्यामुळे महसूल मंडळातील 10 ते 12 गावांतील पर्जन्याची आकडेवारी संपूर्ण महसूल मंडळाची गृहीत धरल्या जाते. मात्र अनेक मंडळात मंडळाच्या गावात पाऊस कमी झाला, पण मंडळातील अन्य गावांमध्ये पाऊस जास्त झाला. त्यामुळे त्या गावातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले. मात्र मंडळाच्या ठिकाणी पडलेल्या कमी पावसाची नोंद संपूर्ण मंडळात गृहीत धरल्यामुळे त्या गावातील नुकसानग्रस्त शेतकरी नुकसान असूनही मदतीपासून वंचित राहू शकतात. त्यामुळे पुढील काळात ग्रामपंचायत स्तरावर पर्जन्यमापक यंत्र बसविण्याबाबत चाचपणी करून कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचना पालकमंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केल्या आहेत.

   स्थानिक विश्राम गृह येथे 2 नोव्हेंबर 2020 रोजी नुकसानीबाबत बैठकीचे आयेाजन करण्यात आले होते. त्यावेळी पालकमंत्री बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी एस राममूर्ती, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नरेंद्र नाईक,  निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते आदी उपस्थित होते.

     अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळणार असून मदतीच्या निकषात न बसलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी अन्य पर्यायांचा अवलंब करण्याच्या सूचना करीत पालकमंत्री डॉ. शिंगणे म्हणाले, पर्यायांचा अवलंब करताना कुणीही पात्र नुकसानग्रस्त शेतकरी  मदतीपासून सुटणार नाही, याबाबत काळजी घ्यावी. अतिवृष्टी व पुरामुळे  जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. याबाबत कृषी विभागाने खऱ्या नुकसानीच्या परिस्थितीबाबत जनजागृती करावी.  जिल्ह्याची सुधारीत पीक पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये बरेच तालुके 50 पैशांच्या पेक्षा जास्त आहेत. तरी अंतिम पैसेवारी काढताना 50 पैशांच्या आत काढण्याचा प्रयत्न करावा. ही पैसेवारी 50 पैशांच्या आत आल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. यावेळी पिक विमा, पैसेवारी आदींबाबत चर्चा करण्यात आली.

                                                                                *********

 

निर्यातक्षम द्राक्ष,आंबा, डाळिंब,संत्रा व भाजीपाला पिकांच्या नोंदणीसाठी हॉटीनेट प्रणाली

  • प्रणालीवर फार्म रजिस्‍ट्रेशन मोबाईल अॅपव्‍दारे नोंदणी करण्‍याचे आवाहन

बुलडाणा, (जिमाका) दि. 3 : किडनाशक उर्वरित अंश व किड रोगमुक्‍त उत्‍पादनाची हमी देण्‍यासाठी अपेडाने निर्यातक्षम बागांच्‍या नोंदणी करणेसाठी ग्रेपनेट,मॅगोनेट,अनारनेट,सिट्रसनेट व व्‍हेजनेट या प्रणाली विकसीत केलेल्‍या आहेत. याअंतर्गत शेतक-यांना नोंदणी व नुतनीकरणासाठी अपेडाने विकसीत केलेल्‍या सुधारीत मानक पध्‍दतीमधील अॅनेक्‍झर-1 नुसार शेतक-यांनी ऑफलाईन व ऑनलाईन पध्‍दतीने नोंदणी अधिकारी तथा जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी यांचेकडे विहीत प्रपत्रात अर्ज सादर करतात. यावर्षी राज्‍यात निर्यातीस चालना देण्‍यासाठी मोठया प्रमाणात निर्यातक्षम बागांच्‍या नोंदणीचा लक्षांक कृषि विभागाच्‍या क्षेत्रीय कार्यालयांना देण्‍यात आलेला आहे.

   सद्या देशात कोविड-19 या महामारीच्‍या प्रादुर्भावामुळे शेतक-यांना कृषि विभागाकडे जाणे - येणे अडचणी पासून मुक्‍तता करणेसाठी फलोत्‍पादन विभागाने अपेडा कार्यालयामार्फत ‘फार्म रजिस्‍ट्रेशन कनेक्‍ट मोबाईल अॅप’व्‍दारे निर्यातक्षम बागांच्‍या नोंदणीसाठी राज्‍य पातळीवर दिनांक 24 ऑक्टोंबर 2020 रोजी सर्व संबंधित अधिकारी, सहभागी संस्‍था व प्रगतीशील शेतक-यांची वेबिनारव्‍दारे कार्यशाळा घेण्‍यात आली. सदर कार्यशाळेमध्‍ये निर्यातक्षम बागांच्‍या नोंदणीसाठी शेतक-यांनी अॅड्राईड मोबाईल अॅपमध्‍ये गुगल प्‍ले स्‍टोअरव्‍दारे अपेडाने विकसीत केलेल्‍या फार्म रजिस्‍ट्रेशन मोबाईल अॅप डाऊनलोड करण्‍यासाठी  https://play.google.com /store/apps/details?id=in.gov.apeda.apedaapp या लिंकवर क्लिक करावे.

   त्‍यामध्‍ये देण्‍यात आलेल्‍या माहितीत स्‍वतःचे नांव, मोबाईल क्रमांक, आधारकार्ड नंबर व ई- मेल आयडी ही माहिती भरल्‍यानंतर शेतक-यांना ऑनलाईन पध्‍दतीने नोंदणी अधिका-याकडे अर्ज करण्‍याची सुविधा ऑनलाईन उपलब्‍ध होत आहे. राज्‍यातील फलोत्‍पादन उत्‍पादक शेतक-यांनी त्‍याचेकडील निर्यातक्षम बागांची नोंदणी अपेडाने विकसीत केलेल्‍या फार्म रजिस्‍ट्रेशन मोबाईल अॅपव्‍दारे करावी व आपणाकडील जास्‍तीत जास्‍त कृषि उत्‍पादीत मालाची निर्यात करावी. याप्रकरणी काही अडचणी आल्‍यास जिल्‍हास्‍तरावर जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी तथा नोंदणी अधिकारी यांचेशी संपर्क साधावा व यावर्षी विहीत मुदतीत बागांचे नोंदणी / नुतनीकरण करणेसाठी मोबाईल अॅपचा वापर करावा, असे आवाहन संचालक फलोत्‍पादन यांचेकडून करण्‍यात आले आहे.

*******

कोरोना अलर्ट : प्राप्त 1066 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 65 पॉझिटिव्ह

  • 84 रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा,(जिमाका) दि.3: प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1131 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1066 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 65 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 58 व रॅपीड टेस्टमधील 7 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 604 तर रॅपिड टेस्टमधील 462 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 1066 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : चिखली तालुका : खैरव 1, देऊळगांव धनगर 1, गोदरी 3, एकलारा 1,  चिखली शहर : 4, बुलडाणा शहर : 10, बुलडाणा तालुका : उबाळखेड 1, चांडोळ 2, वरवंड 1,  मेहकर शहर : 1,  मेहकर तालुका : सारशीव 1,  नांदुरा तालुका : टाकरखेड 1, जळगांव जामोद शहर : 1,  जळगांव जामोद तालुका : सताळी 3, आसलगांव 1,  सिं. राजा तालुका : आडगांव राजा 2, खामगांव तालुका : किन्ही 1, आंबेटाकळी 8, लांजुड 1, हिंगणा कारेगांव 1, दे. राजा शहर : 6, शेगांव शहर : 2, शेगांव तालुका : जवळा 1, नांदुरा शहर : 3, नांदुरा तालुका : निमगांव 3, सिं. राजा तालुका : साखरखेर्डा 1, पळसखेड चक्का 1, सिं. राजा शहर : 2,  मोताळा तालुका : आडविहीर येथील 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 65 रूग्ण आढळले आहे. तसेच उपचारादरम्यान चौबारा चौक, जळगांव जामोद येथील 70 वर्षीय महिला रूग्णाचा मृत्यू झाला आहे.

      तसेच आज 84 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.

कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : दे. राजा : 20, खामगांव : 6, लोणार : 3, शेगांव : 5, सिं. राजा : 8, मेहकर : 17,  जळगांव जामोद : 4,  संग्रामपूर : 6,  बुलडाणा : अपंग विद्यालय 1, आयुर्वेद महाविद्यालय 11, मोताळा : 3.          

   तसेच आजपर्यंत 48122 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 8995 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 8995 आहे. 

  आज रोजी 2885 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 48122 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 9578 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 8995 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 456 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 127 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे. 


--

No comments:

Post a Comment