Wednesday, 30 September 2020

DIO BULDANA NEWS 30.9.2020

 


अतिवृष्टीमुळे बाधीत शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी

-          पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

  • अतिवृष्टीमुळे नुकसान मदतीसंदर्भात घेतला आढावा
  • एनडीआरएफमधून 50 टक्केपेक्षा जास्त बाधीत क्षेत्राला मदत मिळवून द्यावी

बुलडाणा, (जिमाका) दि. 30 :  जिल्ह्यात गत काही दिवसांपासून अतिवृष्टी झाली. तसेच अति पावसामुळे खरीप पिकांचे नुकसान झाले. याबाबत कृषि विभागाने तात्काळ पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून द्यावी.  त्याचप्रमाणे पिक विमा काढलेल्या पात्र शेतकऱ्यांना पिक विमा कंपनीने 100 टक्के मदत मिळवून द्यावी. शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा विषय अत्यंत संवेदनशील असून तेवढाच महत्वाचा आहे, त्यामुळे गांभीर्याने याबाबत कार्यवाही करावी, अशा सूचना पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिल्या आहेत.

   जिल्हाधिकारी कार्यालयातील पालकमंत्री यांच्या दालनात अतिवृष्टीमुळे नुकसानीबाबत शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन 29 सप्टेंबर रोजी करण्यात आले होते. त्यावेळी आढावा घेताना पालकमंत्री बोलत होते. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक, कृषि विकास अधिकारी अनिसा महाबळे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक श्री. हेडाऊ, उपविभागीय कृषि अधिकारी संतोष डाबरे,  रिलायन्स पिक विमा कंपनीचे जिल्हा व्यवस्थापक एस आर कोडीयातर, क्लस्टर हेड वाय व्ही अवघडे, ॲग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीचे दिलीप लहाने आदी उपस्थित होते.  अतिवृष्टीबाधीत भागातील खरीप पिकांची पाहणी केल्यानंतर पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी तात्काळ मदतीबाबत संबंधीत यंत्रणांची आढावा बैठक घेतली.

   पालकमंत्री पुढे म्हणाले, राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी अर्थात एनडीआरएफ मध्ये 50 टक्के पेक्षा जास्त पीकाचे नुकसान असल्यास जीरायत शेतीसाठी प्रती हेक्टरी 6800 व बागायती शेतीसाठी 13500 रूपयांची आर्थिक मदत देण्यात येते. त्याचप्रमाणे फळपिकांकरीता प्रती हेक्टरी 18000 रूपयांची आर्थिक मदत निकषानुसार देण्यात येते. जिल्ह्यात कृषी विभागाच्या सर्वेनुसार अतिवृष्टीमुळे 38 हजार 68 हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांचे नुकसान झालेले आहे. या नुकसानीपोटी बाधीत शेतकऱ्यांना 25 कोटी 95 लक्ष रूपयांची आर्थिक मदत मिळण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाच्यावतीने सादर करण्यात आला असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी पाठपुरावा करावा. या मदतीमुळे निश्चितच शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.  खरीप पिकांसाठी पिक विमा काढलेल्या शेतकऱ्यांनी संबंधीत पीक विमा कंपनी तसेच कृषि विभागाचे कार्यालयाला कळविले आहे, अशा शेतकऱ्यांचा तात्काळ सर्वे करून पंचनामे पूर्ण करावे.  त्यांना संबंधीत पिक विमा कंपनीने विम्यापोटी देण्यात येणारी आर्थिक परतावा 100 टक्के द्यावा, अशा सूचनाही पालकमंत्री यांनी यावेळी दिल्या.  

  पिक कर्ज वाटपाचा आढावा घेताना पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे म्हणाले, प्रत्येक बँकेने त्यांचेकडील महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतंर्गत लाभ झालेल्या सर्व शेतकऱ्यांना तात्काळ कर्जवाटप करावे. सर्व बँकांनी दिलेल्या उद्दिष्टाएवढे पात्र शेतकरी उपलब्ध नसल्याचे बँकांनी आढावा सभेमध्ये सांगितले होते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्जमुक्ती मिळालेल्या मात्र कर्जवाटप होऊ न शकलेल्या पात्र सभासदांची बँक / शाखा निहाय जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक कार्यालयास पाठविली आहे. बुलडाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या या सर्व पात्र शेतकऱ्यांना संबंधीत व्यापारी / ग्रामीण बँकांनी त्यांचे कार्यक्षेत्रामधील शेतकऱ्यांना तातडीने कर्जवाटप करावे व नियमित अहवाल सादर करावा.  याप्रसंगी संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.     

*******

 

 

कृषी विभागातर्फे सोयाबीनच्या उभ्या पिकातील शेंगामधील

बियाण्याची उगवण समस्या व उपायबाबत कृषी सल्ला

बुलडाणा, (जिमाका) दि. 30: संशोधन केंद्र वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांनी शेतकऱ्याकरीता शेतातील सोयाबीन पैदासवार, सोयाबीनच्या उभ्या पिकातील शेंगामधील बियाण्याची उगवण समस्या व उपायबाबत कृषी सल्ला खालीलप्रमाणे दिला आहे.

   अमरावती विभागातील सोयाबीनची पेरणी खरीप हंगाम 2020 मध्ये साधारणता 15 ते 30 जुन दरम्यान झालेली आहे. हे पीक सध्या शारिरीक पक्वतेच्या (शेंगा भरलेल्या) अवस्थेत आहे. मागील आठ ते दहा दिवसांपासून सतत ढगाळ वातावरण कमी सुर्यप्रकाश व पाऊस सुरु असल्यामुळे दिवसाचे तापाण 20 ते 25 डिग्री सेल्सिअस आहे. व आर्द्रता 90 टक्क्यापेक्षा जास्त आहे.

शारिरीक पक्वतेनंतर शेंगा वाळण्यासाठी व बियाण्यामधील ओलावा कमी होण्यासाठी तापमाण 30 ते 35 डिग्री सेल्सिअस असावे लागते. या काळात आर्द्रता 50 टक्क्यापेक्षा कमी असावी लागते. तसेच प्रखर सुर्यप्रकाश आणि निरभ्र आकाश असावे लागते. परंतु सद्या परिस्थिती मध्ये ही साखळी विस्कळीत झालेली असल्यामुळे काही ठिकाणी सोयाबीनच्या उभ्या पिकातील शेंगामधील बियाण्याची उगवण झालेली आहे. हे शारिरीक व्यंग असून सतत पडणाऱ्या पावसामुळे निर्माण झाले आहे.

उपाय शेतामध्ये चर काढून पाण्याचा निचरा करावा व शेतामध्ये हवा खेळती ठेवावी, पाऊस थांबताच सोयाबीन

    पिकाची काढणी करुन काडाचे छोटे छोटे ढीग करुन प्रखर सुर्यप्रकाशामध्ये शेतातच वाळवावे त्यानंतर प्रादृर्भाव, उगवण झालेल्या शेंगा बाजुला काढुन मळणी करावी, असे तंत्र अधिकारी विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे

कळविले आहे.

                                                                                    ***********

जिल्ह्यातील खरीप हंगामाची नजर अंदाज पैसेवारी जाहीर

बुलडाणा, (जिमाका) दि. 30:  सन 2020-21 या खरीप हंगामातील जिल्ह्यातील एकूण 1419 गावांमध्ये नजर अंदाज पैसेवारी 50 पैशांच्यावर जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने याबाबत तालुकानिहाय गावे व नजर अंदाज पीक पैसेवारी जाहीर केली आहे.  

   तालुकानिहाय नजर अंदाज पैसेवारी पुढीलप्रमाणे आहे : बुलडाणा तालुका : एकूण 98 गावांची  पैसेवारी 74, चिखली तालुका :  एकूण 144 गावांची पैसेवारी 71, दे. राजा तालुका :  64 गावांची पैसेवारी 68, मेहकर तालुका : 161 एकूण गावांची पैसेवारी 72, लोणार तालुका : एकूण 91 गावांची पैसेवारी 62, सिं. राजा तालुका : एकूण 114 गावांमध्ये पैसेवारी 64, मलकापूर तालुका :  एकूण 73 गावांची पैसेवारी  64, मोताळा तालुका : एकूण 120 गावांची पैसेवारी  71, नांदुरा तालुका : एकूण 112 गावांची पैसेवारी 71, खामगांव तालुका : एकूण 145 गावांची पैसेवारी 69, शेगांव तालुका : एकूण 73 गावांची 65, जळगांव जामोद तालुका : एकूण 119 गावांची पैसेवारी 62 आणि संग्रामपूर तालुका : एकूण 105 गावांची पैसेवारी 70 आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

*****

कर्जमाफी योजनेत त्रुटी असलेल्या शेतकऱ्यांनी बँकेत आधार कार्डची प्रत जमा करावी

  • स्टेट बँक ऑफ इंडियाचे आवाहन

बुलडाणा, (जिमाका) दि. 30: महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत त्रुटी असलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांच्या याद्या बँकेच्या शाखांमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे. यादीमध्ये नाव असलेल्या मात्र कर्जमाफी न मिळालेल्या शेतकऱ्यांनी  संबंधीत स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत आपले आधार कार्डची प्रत जमा करावी. जर यादीमधील व्यक्ती मयत झाली असल्यास, मयताचे मृत्यू प्रमाणपत्र, वारसाचे आधार आणि बचत खाते क्रमांक स्टेट बँक ऑफ इंडियाच्या संबंधीत शाखेत जमा करावी. आधार प्रमाणीकरण बाकी असणाऱ्या शेतकऱ्यांनी जवळच्या सेतू केंद्र किंवा आपले सरकार केंद्रावर आधार कार्ड व पासबुक घेवून जात आधार प्रमाणीकरण करून घ्यावे. तरी त्वरित आधार कार्डची प्रत जमा करावी. अन्यथा कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहील्यास ती जबाबदारी बँकेची राहणार नाही, असे स्टेट बँक ऑफ इंडियाने कळविले आहे.

                                                                        **********

कोरोना अलर्ट : प्राप्त 514 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 188 पॉझिटिव्ह

• 157 रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा,(जिमाका)दि.30 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालां पैकी एकूण 702 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 514 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 188 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 172 व रॅपिड टेस्टमधील 16 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 277 तर रॅपिड टेस्टमधील 237 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 534 अहवाल निगेटीव्ह आहेत. 

     पॉझिटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे :  चिखली शहर : 7, चिखली तालुका : धोत्रा 8, धोडप 1, सावखेड नजीक 4, काटोडा 1,   बुलडाणा शहर : 28, बुलडाणा तालुका : दहीद 1,   लोणार शहर : 7, लोणार तालुका : वडगांव 3, तांबोळा 4, वेणी 1, राजणी 1, वढव 1, सावरगांव मुंढे 2, देऊळगांव कंकाळ 1, बिबी 5,   सुलतानपूर 2, नांदुरा शहर : 19, नांदुरा तालुका : निमगांव 1, तरवाडी 2, जळगांव जामोद शहर : 1, सिं. राजा तालुका : गुंज 9, वारोडी 1, पिंपळगांव ठोसर 2, मलकापूर पांग्रा 1,  दे. राजा शहर : 3, दे. राजा तालुका : अंढेरा 3, रोहणा 2, वाकी 2, मलकापूर तालुका : दुधलगांव 1, नरवेल 1, मलकापूर शहर : 12, मोताळा तालुका : कालखेडा 1, रिधोरा 2, खेडी 1,  मोताळा शहर : 2, मेहकर तालुका : पिं. माळी 1, मोळामोळी 4, जानेफळ 4, मेहकर शहर : 3, खामगांव शहर : 23, खामगांव तालुका : खोलखेड 1, मांडका 1, निमकवळा 1, गवंढळा 1, शेगांव तालुका : पहुरजिरा 4 संशयीत व्यक्ती पॉझिटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 188 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान चिखली येथील 57 वर्षीय पुरूष, पळशी खु ता. खामगांव येथील 68 वर्षीय पुरूष, हिंगणा कारेगांव ता. खामगांव येथील 78 वर्षीय पुरूष, डोणगांव ता. मेहकर येथील 35 वर्षीय पुरूष, आदर्श कॉलनी दे .राजा येथील 66 वर्षीय महिला व गणपती नगर, मलकापूर येथील 90 वर्षीय महिला रूग्णाचा मृत्यू झाला आहे.  

      तसेच आज 157 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. 

कोविड केअर सेंटरनुसार आज सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे :  लोणार : 7, मोताळा : 7, दे. राजा : 6, बुलडाणा : आयुर्वेद महाविद्यालय 42, नांदुरा : 13, खामगांव : 22, चिखली : 23, मलकापूर : 9, सिं. राजा : 7, शेगांव : 18, मेहकर : 3.    

   तसेच आजपर्यंत 30300 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 5977 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 5977 आहे.  

  आज रोजी 900 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 30300 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 7185 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 5977 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 1114 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 94 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

 


No comments:

Post a Comment