Thursday, 17 September 2020

DIO BULDANA NEWS 17.9.2020

 जिल्ह्यात १८ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर दरम्यान जनता कर्फ्यु पाळावा                                                                                             - पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे

बुलडाणा, (जिमाका), दि. १७  - जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या नियंत्रित करण्यासाठी जिल्ह्यामध्ये 18 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत कडकडीत जनता कर्फ्यु पाळावा. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशा  सूचना जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाला आज जिल्हाधिकारी कार्यालयातील पालकमंत्री यांच्या दालनात आयोजित बैठकीदरम्यान पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी  दिल्या आहेत. यावेळी आमदार संजय गायकवाड, जिल्हाधिकारी एस राममूर्ती, जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी  षन्मुखराजन, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ दिलीप भुजबळ, अति जिल्हाधिकारी श्री. दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी रामेश्वर पुरी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ पंडित, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

 जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असल्याचे सांगत पालकमंत्री डॉ शिंगणे म्हणाले,  जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 5 हजाराच्यावर गेली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्ह्यात जनता कर्फ्यु घोषित करण्यात यावा अशी मागणी अनेक लोकप्रतिनिधी, संघटना यांनी केली होती. त्यानुसार जनता कर्फ्युची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये दूध डेअरी, मेडिकल, हॉस्पिटल, पेट्रोल पंप, बँक व शासकीय कार्यालय वगळता सर्व व्यापारी प्रतिष्ठाने, हॉटेल्स, आस्थापना बंद ठेवण्यात याव्या असे आवाहन करण्यात आले आहे. 

  ते पुढे म्हणाले, जे लोक नियमांचे उल्लंघन करतील त्यावर पोलीस प्रशासन व जिल्हा प्रशासनाच्या वतीने कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी व जनतेने जनता कर्फ्यु कडकडीत पाळणे गरजेचे आहे.शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेले 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या मोहिमे अंतर्गत शासनाच्या वतीने आरोग्य सर्वेक्षण करण्यात येत आहे. यामध्ये प्रत्येक नागरिकाने सर्वेक्षणाच्या वेळी घरी हजर राहणे आवश्यक आहे. त्यावेळी देखील हा जनता कर्फ्यु महत्वाचा ठरणार आहे. बैठकीत संबधित अधिकाऱ्यांनी कोरोना संसर्ग उपाय योजनांची माहिती दिली. 

No comments:

Post a Comment