Tuesday, 29 September 2020

DIO BULDANA NEWS 29.9.2020


 जल जिवन आराखड्यातील कामे दर्जेदार करावीत

-          पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

  • जल जिवन मिशनची आढावा बैठक

बुलडाणा, (जिमाका) दि. 29 : शासनाने प्रत्येक गाव, वाडी व वस्त्यांना पिण्याचे स्वच्छ पाणी पुरविण्यासाठी जल जिवन मिशनची अंमलबजावणी सुरू केली आहे. प्रत्येक घराला दरडोई दररोज 55 लीटर पाणी प्रत्येक कुटूंबाला पुरविण्याचे उद्दिष्ट आहे. त्यानुसार या मिशनमध्ये नवीन नळयोजना प्रस्तावीत कराव्यात. मिशनमधील आराखड्यात समाविष्ट करण्यात आलेल्या योजनांची कामे दर्जेदारपणे पूर्ण करावीत, अशा सूचना पालकमंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज दिल्या.

  स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात  जलजीवन मिशन आढावा बैठकीचे आयोजन आज करण्यात आले होते. त्यावेळी आढावा घेताना पालकमंत्री बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जि. प मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन एस, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे उपस्थित होते. तसेच सभागृहात  ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. घोडे, उपविभागीय अभियंता एस आर वारे, पी एल लोखंडे आदी उपस्थित होते.

  या आराखड्यातंर्गत समाविष्ट गावांमध्ये आवश्यकतेनुसार पाणी पुरवठ्याची कामे करण्याच्या सूचना करीत पालकमंत्री महणाले, गावांमधील योजनांची पुनरावृत्ती टाळावीत. योजनेसाठी पाण्याचा कायमस्वरूपी स्त्रोत बघावा. पाण्याअभावी काही दिवसानंतर योजना बंद पडतात. परिणामी शासनाचा खर्च वाया जातो. त्यामुळे अंतर जास्त असले, तरी पाण्याचा कायमस्वरूपी स्त्रोत घ्यावा. प्रादेशिक योजनांवर जास्तीत जास्त भर द्यावा. गावाचा समोवश करताना तेथील गरज, लोकप्रतिनिधींची मागणी आदींचा विचार करावा. आराखडा अंतिम करून विहीत कालावधीत शासनास सादर करावा. याप्रसंगी तालुकानिहाय नवीन नळयोजना, प्रादेशीक नळयोजना, स्वतंत्र पाणी पुरवचठा योजना, क्षमतावृद्धी करण्यात येणाऱ्या योजना आदींचा आढावा घेण्यात आला.

                                                                                                *********  


  ‘मास्क नाही, प्रवेश नाही’ जाणीव जागृती मोहिमेची

पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्याकडून सुरूवात

  • वाहनाला स्टीकर लावून स्वत:पासून सुरू केली जनजागृती  

बुलडाणा, (जिमाका) दि. 29 :  माझे कुटूंब माझी जबाबदारी मोहीम जिल्ह्यात प्रभावपणे राबविण्यात येत आहे. या मोहिमेतंर्गत कोविडपासून बचावासाठी जनजागृती करण्यात येत आहे. या जनजागृतीसाठी मास्क नाही, प्रवेश नाही संदेश असणारा स्टीकर प्रकाशित करण्यात आले आहे. सदर स्टीकर आपल्या वाहनाला लावून राज्याचे अन्न व औषध प्रशासन तथा पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी जनजागृती सुरूपात स्वत:पासून केली आहे.

   कोविडपासून बचाव करण्यासाठी मास्क वापरणे, वारंवार हात धुणे व सोशल डिस्टसिंग या त्रिसुत्रींचा उपयोग करण्याचे आवाहन यावेळी पालकमंत्री डॉ शिंगणे यांनी केले आहे.  कोविडच्या काळात सतत विविध माध्यमातून शासन जनजागृती करीत आहे. माझे कुटूंब माझी जबाबदारी ही मोहिम त्यासाठी निर्णायक ठरणार आहे. या मोहिमेतंर्गत मोठ्या प्रमाणावर कोविडची जनजागृती करण्यात येत आहे. पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी स्वत: पासून सुरूवात करीत नागरिकांनी स्वत:चे व  कुटूंबाचे रक्षण करण्यासाठी मास्कचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. यावेळी जिल्हाधिकारी एस. राममूर्ती, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे आदी उपस्थित होते.

                                                                                                *******

 

मागासवर्गीय शेतकरी, महिलांना 100 टक्के अनुदानावर साहित्य वाटप

बुलडाणा, (जिमाका) दि. 29 : जिल्हा परिषद समाज कल्याण विभागातर्फे 20 टक्के सेसफेड योजनेअंतर्गत सन 2020-21 या वित्तिय वर्षासाठी मागासवर्गीय शेतकरी तसेच मागासवर्गीय आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा पत्नीस 100 टक्के अनुदानावर 5 एचपी विद्युत मोटार पंप देण्यात येणार आहे.  मागासवर्गीय महिलांकरीता शिलाई मशीन आणि 5 टक्के दिव्यांग कल्याण योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांकरीता मिनी पिठाची गिरणी देण्यात येणार आहे. तरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी मागासवर्गीय शेतकरी, महिला व दिव्यांग लाभार्थ्यानी अर्ज दि. 23 आक्टोबर 2020 पर्यत संबंधित गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांचेकडे सादर करावे.

   सदर योजनेचे अर्ज पंचायत समिती स्तरावर उपलब्ध आहे. योजनेचा लाभ मागासवर्गीय शेतकऱ्यांनी, महिलांनी अपंग लाभार्थ्यानी घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती सौ. पुनमताई विजय राठोड, जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनोज मेरत यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

0000000

कौशल्य विकास कार्यालयात अण्णासाहेब पाटील जयंती साजरी

बुलडाणा, (जिमाका) दि. 29 : स्थानिक जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता मार्गदर्शन कार्यालय येथे अण्णासाहेब पाटील यांची 87 वी जयंती 25 सप्टेंबर रोजी साजरी करण्यात आली. यावेळी अण्णासाहेब पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक पुरूषोत्तम अंभोरे, कौशल्य विकास मार्गदर्शन कार्यालयातील श्री. खोडे, श्रीमती वाकोडे,सिद्धेश खेडेकर, सचिन पवार, गणेश गावंडे व महामंडळाच्या योजनांचे लाभार्थी उपस्थित होते.

   महामंडळाच्या माध्यमातून जिल्ह्यात 653 बँक कर्ज प्रकरणे मंजूर झाली असून 553 लाभार्थ्यांना 3.33 कोटी एवढा व्याज परतावा देण्यात आला आहे. तसेच 4 शेतकरी उत्पादक कंपन्यांना 40 लक्ष रूपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात आले आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

                                                                                ********

कोरोना अलर्ट : प्राप्त 334 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 143 पॉझिटिव्ह

• 153 रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा,(जिमाका)दि.29 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालां पैकी एकूण 477 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 334 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 143 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 133 व रॅपिड टेस्टमधील 10 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 224 तर रॅपिड टेस्टमधील 110 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 334 अहवाल निगेटीव्ह आहेत. 

     पॉझिटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे :  खामगांव शहर : 19, खामगांव तालुका : बोरजवळा 9, गवंढळा 1, घाटपुरी 1,  जनुना 1, शिरसगांव 1,  शेगांव शहर : 18, शेगांव तालुका : जवळा 2, सवर्णा 2, मोताळा तालुका : जहांगीरपूर 2, घुस्सर 5,  पिंपळपाटी 1, आव्हा 1,   मोताळा शहर : 4, नांदुरा शहर : 12, नांदुरा तालुका : माटोडा 1, मलकापूर शहर : 7, मलकापूर तालुका : देवधाबा 1, चिखली शहर : 12, चिखली तालुका : पेठ 1, करतवाडी 1, संग्रामपूर शहर : 2, संग्रामपूर तालुका : टुनकी 1, वरवट बकाल 2, लोणार तालुका : पांग्रा डोळे 17, वढव 1,  लोणार शहर : 4, सिं. राजा तालुका : साखरखेर्डा 6, ताडशिवणी 1, तडेगांव 1, दे. राजा शहर : 1, बुलडाणा शहर : 3,  जळगांव जामोद तालुका : सुनगांव 1, मूळ पत्ता फर्दापूर ता. सोयगांव जि. औरंगाबाद 1 संशयीत व्यक्ती पॉझिटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 143 रूग्ण आढळले आहे.त्याचप्रमाणे उपचारा दरम्यान साखरखेर्डा ता. सिं. राजा येथील 45 वर्षीय पुरूष व मूळ पत्ता फर्दापूर ता. सोयगांव जि. औरंगाबाद येथील 75 वर्षीय पुरूष रूग्णाचा बुलडाणा स्त्री रूग्णालयात मृत्यू झाला आहे.  

      तसेच आज 153 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. 

कोविड केअर सेंटरनुसार आज सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे :  शेगांव : 19, खामगांव : 44, मलकापूर : 1 , नांदुरा : 15, दे. राजा : 27, बुलडाणा : आयुर्वेद महाविद्यालय 35, चिखली : 8, लोणार : 3, मेहकर : 1.   

   तसेच आजपर्यंत 29786 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 5820 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 5820  आहे.  

  आज रोजी 984 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 29786 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 6997 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 5820 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 1089 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 88  कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

******

पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचा आज शेवटचा दिवस

·        उमेदवारांनी आपल्या सेवायोजन कार्डाचा लॉग ईन आयडीतून अर्ज करावे

बुलडाणा,(जिमाका)दि.29 : जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजता मार्गदर्शन केंद्रामार्फत ऑनलाईन पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यांचे आयोजन 27 ते 30 सप्टेंबर 2020 या कालावधीत करण्यात आले आहे. त्यानुसार 30 सप्टेंबर हा ऑनलाईन रोजगार मेळाव्याचा शेवटचा दिवस आहे.  सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज या  www.rojgar.mahaswayam. gov.in संकेतस्थळावर भरावे.

        या ऑनलाईन मेळाव्यात नामांकित खाजगी उद्योजक कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित राहून 200 पेक्षा अधिक पदासाठी ऑनलाईन भरती प्रक्रिया राबविणार आहे. या भरतीमध्ये पात्र पुरुष, महिला उमेदवारांच्या ऑनलाईन मुलाखती घेण्यात येतील व पात्र उमेदवारांची निवड करण्यात येईल. तसेच उमेदवारांनी नांव नोंदणी केलेल्या दहावी, बारावी, पदवी, नर्सिग पदविका, (ए.

एन. एम., जी. एन. एस.) आय. टी. आय. पास, पदव्युत्तर पुरुष, महिला उमेदवारांनी आपले सेवायोजन कार्डचा आयडी व पासवर्डचा वापर करुन ऑनलाईन आपले लॉगईन मधुन ऑनलाईन अर्ज करुन सहभाग नोंदणी करुन रोजगार प्राप्त करावा.

रोजगार मेळाव्यात सहभागी होण्याकरीता कार्यालयात येण्याची गरज नाही. उमेदवार जेथे असतील त्याच ठिकाणावरुन आपल्या सेवायोजन कार्डचा युझर व पासवर्ड चा वापर करुन आपल्या लॉगइन मधुन ऑनलाईन रोजगार मेळाव्यात ऑनलाईन पध्दतीने सहभागी होऊ शकतात. पात्र असलेल्या पुरुष, महिला उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक पात्रतेच्या आधारे एका पेक्षा जास्त पदाकरिता सुध्दा ऑनलाईन अर्ज करु शकतात. उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करतांना काही अडचण आल्यास जिल्हा कौशलय विकास, रोजगार, उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयाच्या दुरध्वनी क्रमांक 07262-242342 वर संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

*****

सीईटी परीक्षेकरीता एसटी सोडणार विशेष बसेस

  • विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन

     बुलडाणा, (जिमाका) दि. 29 : राज्यात 1 ऑक्टोंबर ते 9 ऑक्टोंबर 2020 या कालावधीत सीईटी परीक्षेचे आयोजित करण्यात आलेले आहे. या परिक्षेसाठी जिल्ह्यातून शेकडो विद्यार्थी बसणार आहे. त्यासाठी एस. टीच्या बुलडाणा विभागाने विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी 30 सप्टेंबर व 10 ऑक्टोंबर या तारखेस विशेष बससेवा उपलब्ध करून दिली आहे. तसेच परतीच्या प्रवासासाठी देखील बसेस उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. राज्य सरकारने कोविड संसर्ग सुरक्षेसाठी घालून दिलेल्या अटी व शर्तीनुसार प्रवास करता येणार आहे. बस प्रवास करताना मास्कचा वापर करणे अनिवार्य आहे. परीक्षेसाठी जाणाऱ्या उमेदवारांचा गट तयार असल्यास त्यांचे जाणे-येणेसाठी आगाऊ रक्कम भरून बसेस पुरविण्यात येणार आहे. याकरीता संबंधीत आगार व्यवस्थापकांशी संपर्क साधावा. या संधीचा परीक्षार्थी उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक व विभागीय वाहतूक अधिकारी यांनी केले आहे. संपर्कासाठी आगारांचे क्रमांक पुढीलप्रमाणे बुलडाणा अगार : 07262-242392, चिखली आगार : 07264- 242099, खामगांव आगार : 07263- 252225, मेहकर आगार : 07268- 224544, मलकापूर आगार : 07267-222165, जळगांव जामोद आगार : 07266- 221502, शेगांव आगार : 07265-254173.   

 

वृध्द कलावंतानी मानधनासाठी अर्ज सादर करावे ; 10 ऑक्टोंबर अंतिम मुदत

     बुलडाणा, (जिमाका) दि. 29 : जिल्ह्यातील सर्व संबंधित वृध्द कलावंताना शासन निर्णय दि. 7 फेब्रुवारी 2014 च्या अनुसरुन सन 2020-21 साठी मानधन घेवू इच्छिणाऱ्या सर्व वृध्द कलांवतांनी लाभ मिळण्यासाठी आपल्या तालुक्याच्या संबंधित पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्या मार्फत लाभार्थ्यानी आपले परिपुर्ण अर्ज दि. 20 आक्टोबर 2020 पर्यत कार्यालयीन वेळेत संबंधित पंचायत समिती यांचेकडे सादर करावे.

   यापुर्वी योजनेसाठी केलेले सर्व अर्ज दप्तर जमा झाल्याने अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत, याची नोंद घ्यावी. अर्जातील नमुद अटींची पुर्तता करणाऱ्या आवश्यक त्या मुळ कागदपत्रांच्या छाननी अंतीचा पुरावा कागदपत्रांसह सादर केलेले फक्त वैध आणि योग्य अर्जच स्विकारले जाणार आहे. त्यामुळे अर्जदारांनी याबाबतीत असलेले अटी व शर्ती वाचुनच अर्ज करावे. मुदतीनंतर येणारे अर्ज किंवा पुर्वीचे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. अर्जाचा नमुना पंचायत समिती कार्यालय येथे उपलब्ध आहे. मानधन घेवू इच्छिणाऱ्या सर्व वृध्द कलांवतांनी योजनेचा लाभ घावा, असे आवाहन जिल्हा वृध्द कलावंत मानधन सतिीचे सदस्य सचिव तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

0000000

खुल्या मिठाई विक्रीवर ‘बेस्ट बिफोर’ तारीख अनिवार्य

  • 1 ऑक्टोंबर पासून नियम लागू

     बुलडाणा, (जिमाका) दि. 29 : स्वीटमार्ट व रेस्टॉरेंट मध्ये विविध प्रकारची मिठाई तयार करून विक्री करण्यात येत असते. ही मिठाई तयार करण्याकरीता मोठ्या प्रमाणात दुध व दुग्धजन्य पदार्थांचा वापर करण्यात येत असतो. त्यामुळे काही कालावधी नंतर त्याचा दर्जा कमी होतो. परिणामी सदर मिठाई किती दिवसापर्यंत खाण्यायोग्य आहे हे ग्राहकांना कळू शकत नाही. मात्र पॅकिंग मिठाईवर उत्पादनाची तारिख व खाण्यायोग्य तारीख नमूद असते. ती खुल्या स्वरूपात विक्री होणाऱ्या मिठाईवर नमूद नसते. तरी 1 ऑक्टोंबर पासून खुल्या स्वरूपात विकल्या जाणाऱ्या मिठाईच्या ट्रे किंवा कंटेनरवर ‘बेस्ट बिफोर’ किंवा खाण्यास योग्य तारीख टाकणे अनिवार्य आहे. हा नियम लागू करण्यात आला आहे. अन्न सुरक्षा व मानदे प्राधीकरण, नवी दिल्ली यांनी 25 सप्टेंबर 2020 रोजी याबाबत निर्देश दिले आहेत. त्याचप्रमाणे अन्न व्यावसायिक स्वेच्छेने उत्पादनाची तारिख अर्थात डेट ऑफ मॅन्युफॅक्चरींग मिठाई ठेवलेल्या ट्रे, कंटेनरवर टाकू शकतात. तरी जिल्ह्यातील सर्व स्वीट मार्ट, रेस्टॉरेंट व इतर मिठाई विक्रेत्यांनी विक्रीसाठी प्रदर्शित करण्यात येणाऱ्या मिठाईच्या ट्रे, कंटेनरवर बेस्ट बिफोर तारीख टाकावी. जेणेकरून ग्राहकांना चांगल्या दर्जाची मिठाई उपलब्ध होईल. नियमाचे उल्लंघन करणाऱ्या अन्न व्यावसायिकांवर अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातंर्गत कारवाई करण्यात येणार आहे, याची नोंद घ्यावी, असे सहाय्यक आयुक्त (अन्न) स.द केदारे यांनी कळविले आहे.

No comments:

Post a Comment