Monday, 26 December 2022

DIO BULDANA NEWS 26.12.2022

 गटई कामगारांनी स्टॉलसाठी अर्ज करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 26 : जिल्ह्यातील अनुसुचित जातीच्या गटई कामगारांनी पत्र्याचे स्टॉल मिळण्यासाठी सन 2022-23 या वर्षाकरीता अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पात्र लाभार्थ्यानी आपले अर्ज दि. 5 जानेवारी 2023 पर्यंत सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अर्जदाराने विहित नमुन्यातील अर्जावर पासपोर्ट फोटो चिकटविलेला व परिपूर्ण अर्ज सादर करावा, अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी आणि अनुसुचित जातीचा असावा, अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी 40 हजार रूपये आणि शहरी भागासाठी 50 हजार रूपयांपेक्षा अधिक नसावे. यासाठी तहसिलदाराने निर्गमित केलेला उत्पनाचा दाखला आवश्यक राहणार आहे. अर्जदार वय 18 वर्षापेक्षा कमी नसावे.

अर्जदार ज्या जागेत स्टॉल मागत असेल, ती जागा ग्रामपंचायत, नगरपालिका, छावनी बोर्ड (कॅटॉनर्मेन्ट बोर्ड) किंवा महानगरपालिका यांनी त्यास भाड्याने, करारनाम्याने, खरेदीने अगर मोफत परंतू अधिकृतरित्या ताब्यात दिलेली असावी किंवा ती त्याच्या स्व:मालकीची असावी इत्यादीपैकी एक प्रकारचे कागदपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.

अर्जदाराचा स्वत:चा प्राधिकृत अधिकाऱ्याने दिलेला जातीचा दाखला जोडणे आवश्यक आहे. शाळा सोडल्याचा दाखला, रेशन कार्डची प्रत, आधार कार्डची प्रत, रहिवाशी दाखला इत्यादी स्वसाक्षांकित प्रती अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.

या व्यवसाय योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या गरजू अर्जदारांनी विहित नमुना अर्ज विनामुल्य प्राप्त करुन घ्यावा. त्यासह आवश्यक कागदपत्रे, अर्जासोबत जोडून सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चिखली रोड, बुलडाणा येथे दि. 5 जानेवारी 2023 पर्यंत सादर करावेत. उशीरा आलेल्या अर्जाचा विचार केल्या जाणार नाही. अर्जदारांनी आवश्यक त्या कागपत्रासह परिपूर्ण अर्ज सादर करावेत, तसेच अर्जदारास अर्जातील त्रृटी पुर्तताबाबत या कार्यालयातून व्यक्तिगतरित्या कळविल्या जाणार नाही. अपुर्ण अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची नोंद घ्‍यावी, असे समाज कल्याण सहायक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी कळविले आहे.

00000

शेतकऱ्यांनी रब्बी पिक स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

          बुलडाणा, दि. 26 :  जिल्ह्यात पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात. अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी रब्बी पिक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यात शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कृषि विभागातर्फे करण्यात आले आहे.

प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकता बाबत प्रोत्साहन देऊन विजेत्या शेतकऱ्यांना गौरव  केल्यास, त्यांचे  मनोबल वाढण्यास मदत होऊन अधिक उमेदीने नवनवीन व अद्ययावत तंत्रज्ञानचा वापर केला जाईल. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल, तसेच मार्गदर्शक परिसरातील इतर शेतकऱ्याना होवून जिल्ह्याच्या पर्यायाने राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेवून कृषि विभागामार्फत पिक स्पर्धा योजना राबविण्यात येते.

सध्याच्या पिक स्पर्धेत जिल्ह्याकरिता रब्बी हंगामासाठी ज्वारी, गहू, हरभरा, करडई, जवस ही पिके समाविष्ट करण्यात आली आहेत. स्पर्धेत प्रती तालुका किमान स्पर्धक संख्या ही  सर्वसाधारण गटासाठी १० आणि आदिवासी गटासाठी ५ शेतकरी आहे. पिकस्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थीचे शेतावर त्या पिकाखालील किमान ४० आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. पुरेशे अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधित पिकाची पिकस्पर्धा संबधित तालुका कृषि अधिकारी जाहीर करतील. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल. सर्व गटासाठी पिकनिहाय प्रत्येकी ३०० रुपये  प्रवेश शुल्क राहणार आहे. यासाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत दि. ३१ डिसेंबर २०२२ आहे.

पिकस्पर्धेत सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी अर्ज विहित नमुन्यामध्ये भरून त्यासोबत ठरवून दिलेले प्रवेश शुल्क चलन, सात बारा, आठ अ चा उतारा व अनुसूचित जमातीचे असल्यास जात प्रमाणपत्र या कागदपत्रांची पूर्तता करून संबधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करावेत. या स्पर्धेत सर्वसाधारण व आदिवासी असे दोन गट राहणार आहे.

तालुका पातळीवर पहिले पाच हजार, दूसरे तीन हजार, तिसरे दोन हजार रूपये बक्षीस राहणार आहे. जिल्हा पातळीवर पहिले दहा हजार, दूसरे सात हजार, तिसरे पाच हजार रूपये बक्षीस राहणार आहे. राज्य पातळीवर पहिले 50 हजार, दूसरे 40 हजार, तिसरे 30 हजार रूपये बक्षीस राहणार आहे.

पिक स्पर्धेच्या मार्गदर्शक सूचना कृषि विभागाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. ज्वारी, गहू, हरभरा, करडई,जवस या पिकासाठी दि. ३१ डिसेंबर २०२२ पूर्वी अर्ज सादर करून पिक स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी एस.जी. डाबरे यांनी केले आहे.

00000

थेट कर्ज योजनेंतर्गत अर्ज करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 26 : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्यादितच्या थेट कर्ज योजनेतून कर्ज मिळविण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बुलडाणा जिल्हा कार्यालयास सन 2022-23 या आर्थिक वर्षाकरिता थेट कर्ज योजनेचे 20 उद्दिष्ट असून थेट कर्ज योजनेचे प्रस्ताव जिल्ह्यातील मातंग समाजातील 12 पोटजातीतील इच्छुक अर्जदाराकडून मागविण्यात आले आहेत.

यासाठी कर्जाचे अर्ज दि. 26 डिसेंबर 2022 ते दि. 24 जानेवारी 2023 पर्यंत दिले जातील. यात पुर्ण भरलेले कर्ज स्विकारले जातील. प्रकल्प मर्यादा 1 लाख रुपये, आर्थिक उद्दिष्ट 20 लाख रूपये आहे. जिल्ह्यातील मांग, मातंग समाजातील इच्छुक अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्षे असावे. वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. अर्जदाराने यापुर्वी महामंडळाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. नियमाप्रमाणे आवश्यक त्या कगदपत्राची पुर्तता करुन कर्ज प्रस्ताव दोन प्रतीत जिल्हा कार्यालयात स्वत: अर्जदाराने मुळ कागपदत्रासह उपस्थित राहून दाखल करावेत. त्रयस्थ, मध्यस्थांमार्फत कर्ज प्रकरण स्विकारण्यात येणार नाहीत.

कर्ज प्रकरणासोबत जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, दोन फोटो, व्यवसायाचे दरपत्रक, व्यवसाय ज्या ठिकाणी करावयाचे आहे, त्या ठिकाणची भाडेपावती, करारपत्र किंवा मालकी हक्काचा पुरावा (घर टॅक्स पावती), ग्रामपंचायत, नगरपालिका यांचे नाहरकत प्रमाणपत्र किंवा शॉप ॲक्ट परवाना, व्यवसाय संबंधित तांत्रिक प्रमाणपत्र, शैक्षणिक दाखला, अनुदान किंवा कर्जाचा लाभ न घेतल्याचे स्वयंघोषणापत्र, अर्जदाराचा सिबील क्रेडिट स्कोर किमान 500 असावा, अर्जदाराने आधार कार्ड जोडलेल्या बँक खात्याचा तपशील सादर करावा. कर्ज प्रकारणासोबतची सर्व कागदपत्रे स्वत:च्या स्वाक्षरीने साक्षांकित करावीत.

योजनेतील कर्ज प्रस्ताव महामंडळाच्या विहित नमुन्यातील अर्ज दि. 24 जानेवारी 2023 पर्यंत कार्यालयीन वेळेत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्यादित, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चिखली रोड, बुलडाणा येथे अर्ज मिळतील आणि स्विकारले जातील. अंतिम तारीखेनंतर अर्ज स्विकारले जाणार नाहीत, असे जिल्हा व्यवस्थापक जे. एम. गाभणे यांनी कळविले आहे.

0000000

सेल्फी विथ पौष्टिक तृणधान्य थाळी उपक्रम

बुलडाणा, दि. 26 : संयुक्त राष्ट्रसंघाने २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. त्याअनुषंगाने शेतकऱ्यांमध्ये या पिकांच्या उत्पादनवाढीसाठी आणि त्यांचा आहारातील वापर वाढविण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे.  यासाठी सेल्फी विथ पौष्टिक तृणधान्य थाळी उपक्रम राबविण्यात येत आहे.

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ साजरा करण्याबाबत जिल्हास्तरीय कार्यकारिणीची सभा पार पडली. आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ च्या अनुषंगाने सुरुवात स्वतःपासून ही मोहिम घ्यावयाची आहे. त्याअंतर्गत प्रत्येक महिन्यामध्ये किमान एकदा पौष्टिक तृणधान्य थाळी आपण कुटुंबासमवेत आपल्या आहारात समावेश करावयाचा आहे. त्यासाठी आपण स्वतः किंवा कुटुंबासमवेत सदर थाळीसोबत सेल्फी, फोटो काढून स्वतःचे नाव, मुख्यालय व पदनाम प्रत्येक महिन्याच्या शेवटी या कार्यालयास dsaobuldana@gmail.com या मेलवर तसेच ९४०४९५३०५९ किंवा ९७६३९४११५२ या व्हाटस्ॲपवर पाठवावे. पौष्टिक तृणधान्य थाळीमध्ये इतर पदार्थांबरोबर किमान एक किंवा दोन पौष्टिक तृणधान्याचे पदार्थ असावेत.

केंद्र आणि राज्य शासनाने घेतलेल्या या महत्वकांक्षी मोहिमेमध्ये सक्रीय सहभाग नोंदवून आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष साजरे करावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी एस. जी. डाबरे यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment