Friday, 2 December 2022

DIO BULDANA NEWS 02.12.2022

 



पाच वर्षापर्यंतच्या बालकांची प्राधान्याने आधार नोंदणी करावी

-जिल्हाधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड

*नवजात बालकांसाठी तीन रूग्णालयात नोंदणी

*मागणीनुसार गावात आधार केंद्राची सोय होणार

बुलडाणा, दि. 2 : पाच वर्षापर्यंतच्या बालकांची जनगणनेत नोंदणी होत नाही. त्यामुळे त्यांचा डाटा उपलब्ध नाही. परिणामी या बालकांची आधार नोंदणी कमी प्रमाणात होत आहे. त्यामुळे येत्या काळात पाच वर्षापर्यंतची बालके लक्ष्य गट मानून आधार नोंदणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आधार नोंदणीबाबत बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक सारंग आवाड, यूआयडीएआयच्या उपसंचालक रुक्मिणी रामचंद्र, राज्याचे प्रकल्प व्यवस्थापक दीपक शिर्के, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस आदी उपस्थित होते.

डॉ. तुम्मोड म्हणाले, आधार ही आता सर्व ठिकाणी गरजेची बाब झाली आहे. त्यामुळे आधार नोंदणी आणि त्याचे अद्ययावतीकरणाला गती देणे गरजेचे आहे. त्यासोबतच नवजात ते पाच वर्षे वयोगटातील बालकांची नोंदणी होणे गरजेचे आहे. त्यासाठी बुलडाणा, शेगाव, खामगाव येथील शासकीय रूग्णालयात आधार नोंदणी केंद्र देण्यात येणार आहे. त्याच ठिकाणी बालकांची लगेच नोंदणी होऊ शकेल. सोबतच जिल्ह्यातील मोठ्या प्रसुतीगृहातही ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

जिल्ह्यात सर्व तालुकास्तरावर आधार नोंदणीची किट उपलब्ध करून देण्यात आली आहे. एखाद्या गावात नोंदणी करण्यासाठी सेवा केंद्र तात्पुरते स्थलांतरीत करण्याचे अधिकार तहसिलदारांना देण्यात आले आहे. अंगणवाडी आणि शाळांच्या मागणीनुसार आधार किट उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

सध्या विविध शासकीय योजनांची मदत बँक खात्यात करण्यात येत आहे. या मदतीसाठी बँकेत येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे अग्रणी बँकेने पुढाकार घेऊन आधार केंद्रासाठी बँकेत जागा उपलब्ध करून द्यावी. बँकेत फलक लावण्यात यावा, तसेच कामकाजानिमित्त येणाऱ्या नागरिकांना आधारच्या सुविधा देण्यात याव्यात.

00000



सामाजिक न्याय समता पर्वात युवागटाची कार्यशाळा

बुलडाणा, दि. 2 : सामाजिक न्याय पर्वात प्रत्येक दिवशी विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यानुसार गुरुवारी, दि. 1 डिसेंबर 2022 रोजी जिल्हास्तरावर युवागटाची कार्यशाळा घेण्यात आली. महात्मा फुले समाजकार्य महाविद्यालयात ही कार्यशाळा पार पडली.

युवागटाच्या कार्यशाळेची सुरवात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. सदर कार्यशाळेला समाज कल्याण सहायक आयुक्त डॉ. अनिता राठोड, समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य एन. ए. गायकवाड, प्रा. पद्माकर इंगळे, वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक पी. एम. धर्माधिकारी यांच्यासह महाविद्यालयीन विद्यार्थी, प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.     

कार्यशाळेत डॉ. राठोड आणि प्राचार्य श्री. गायकवाड यांनी युवागट विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून सांगितले. बदलत्या काळानुसार युवागटाने भविष्यात वैज्ञानिक दृष्टीकोन समोर ठेवून कार्य करण्याचे आवाहन केले.

00000

जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 2 : नेहरु युवा केंद्रातर्फे उल्लेखनीय कार्य करणाऱ्या युवा, महिला मंडळास जिल्हा युवा पुरस्कार देवून गौरविण्यात येते. यासाठी इच्छुकांनी अर्ज करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

या पुरस्काराचे स्वरुप 25 हजार रूपये आणि प्रमाणपत्र असे आहे. जिल्हा स्तरावर निवड झालेल्या मंडळाचा प्रस्ताव राज्यस्तरीय पुरस्काराकरीता पात्र राहणार आहे. राज्यस्तरीय पुरस्काराचे  स्वरूप प्रथम 75 हजार रूपये, द्वितीय 50 हजार रूपये, तृतीय 25 हजार रूपये असे आहे. राज्य स्तरावर निवड झालेल्या मंडळाचा प्रस्ताव राष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराकरीता शासनास पाठविण्यात येणार आहे. राष्ट्रीय स्तरावर तीन पुरस्कार निवडण्यात येतील. त्यात प्रथम पुरस्कार 3 लाख रुपये, द्वितीय पुरस्कार एक लाख रूपये आणि तृतीय पुरस्कार 50 हजार रुपये आणि प्रमाणपत्र असे आहे.

पुरस्काराबाबत अधिक माहितीसाठी नेहरू युवा केंद्र, फ्लॅट नं. 202, डीएसडी सिटी मॉल, बुलडाणा येथे संपर्क साधावा. अर्जाचा नमुना नेहरु युवा केंद्र कार्यालय विनामूल्य उपलब्ध आहे. जिल्ह्यातील इच्छुक युवा मंडळ, महिला मंडळांनी विहित नमुन्यातील अर्ज दि. 15 डिसेंबर 2022 पर्यंत नेहरु युवा केंद्राच्या कार्यालयात सादर करावे, असे आवाहन नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर यांनी केले आहे.

00000






नेहरू युवा केंद्रातर्फे संविधान दिवस

बुलडाणा, दि. 2 : नेहरु युवा केंद्र, मुकुल वासनिक विधी महाविद्यालय आणि महात्मा गांधी अध्यापक महाविद्यालयाच्या वतीने मुकुल वासनिक विधी महाविद्यालयात संविधान दिवस साजरा करण्यात आला.

विदर्भ युवक विकास संस्थेचे अध्यक्ष प्रा. संतोष आंबेकर अध्यक्षस्थानी होते. प्रमुख वक्‍ते म्हणून ज्येष्ठ साहित्यिक सुरेश साबळे, जिल्हा व सत्र न्यायालयाच्या सरकारी सहाय्यक अभियोक्ता अॅड. सोनाली सावजी उपस्थित होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून विदर्भ युवक विकास संस्थेच्या सचिव मिनल आंबेकर, प्राचार्य डी. एस चव्हाण, प्रा. गणेश बोचरे, नेहरू युवा केंद्राचे लेखा व कार्यक्रम पर्यवेक्षक अजयसिंग राजपूत उपस्थित होते.

श्री. साबळे यांनी संविधानाची महती विशद करताना म्हणाले, भारतीय संविधानात देशातील प्रत्येकाचे वर्तमान आणि भविष्य घडविण्याचे सामर्थ आहे. प्रत्येकाची साधना, पुजा प्रकार, आहार-विहार, भाषा भिन्न असूनही भारतीय संविधानाने सर्वांना एकसंघ बांधून ठेवले आहे. भारतीय संविधान हे सामान्य माणसाच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. भारतीय संविधानाने सजीव व निर्जीव या दोघांच्या अस्तित्वाचे भान ठेवले आहे. सजग नागरीक म्हणून आपण सत्यता जाणावी, असे आवाहन त्यांनी केले.

प्रा. आंबेकर म्हणाले, युवकांनी समाजात संविधानाविषयी जनजागृती करावी, तसेच संविधानातील नागरिकांचे अधिकार, कर्तव्य व जबाबदारीचे भान ठेवून संविधानाच्या रक्षणासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. अॅड. सावजी यांनी संविधाना संबंधी सविस्तर माहिती त्यांनी दिली.

नेहरू युवा केंद्राचे लेखा व कार्यक्रम पर्यवेक्षक अजयसिंग राजपूत यांनी प्रास्ताविक केले.  ईषिता डोंगरदिवे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.संजीवनी हाडे यांनी आभार मानले.

सुरुवातीला भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमासाठी नेहरू युवा केंद्राचे सहाय्यक धनंजय चाफेकर, राष्ट्रीय युवा स्वयंसेवक नितीन शेळके, अजय सपकाळ, उमेश बावस्कर, मुकुल वासनिक विधी महाविद्यालयाचे प्रा. शिल्पा ठाकरे, प्रा. छाया बावणे प्रा. सुरेखा इंगळे, प्रा. राजेंद्र हिवाळे, अमोल लहाने, प्रवीण नवघरे, विजयसिंग राजपूत यांनी पुढाकार घेतला.

00000

खरीप हंगामात 101 टक्के पिक कर्जाचे उद्दिष्ट साध्य

*जिल्हास्तरीय बँकर्स समिती बैठक

बुलडाणा, दि. 2 : खरीप हंगामामध्ये पिक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट साध्य करण्यात आले आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात 101 टक्के पिककर्ज वाटप करण्यात आल्याची माहिती जिल्हास्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत देण्यात आली.

जिल्हास्तरीय बँकर्स समितीची त्रैमासिक बैठक जिल्हाधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. अग्रणी जिल्हा व्यवस्थापक यांनी वार्षिक पत आरखड्याच्या उद्दिष्ट साध्यतेबाबत माहिती दिली. बँकानी या वर्षी खरीप हंगामामध्ये 101 टक्के पीक कर्जाचे उदिष्ट साध्य केले आहे. तसेच जिल्ह्याच्या यावर्षीचा पत आराखडा 4 हजार 350 कोटी रुपयाचा आहे. सप्टेंबर 2022 पर्यंत 3 हजार 996 कोटी रुपयांचे कर्जवाटप झाले आहे. यात 92 टक्के उद्दिष्ट साध्य झाले आहे. प्राथमिकता प्राप्त क्षेत्रामध्ये 4 हजार 95 कोटी रुपयांचे उद्दिष्ट असून सप्टेंबर अखेरपर्यंत 2 हजार 600 कोटी रुपये म्हणजे 63 टक्के उद्दिष्ट साध्य झाले आहे.

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेमध्ये यावर्षी 7 लाख 6 हजार 400 तर प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेमध्ये 1 लाख 43 हजार 864 नागरिकांनी विमा काढला आहे. जिल्हाधिकारी डॉ. तुम्मोड यांनी विमा योजना लोकहितकारी आहे. याचा प्रिमियम प्रत्येकी 20 रुपये आणि 436  रुपये असून तो अत्यंत कमी आहे. प्रत्येकी विमा रक्कम 2 लाख रुपये आहे. त्यामुळे ही योजना लोकांपर्यंत पोहचविण्याच्या सूचना त्‍यांनी केली. तसेच प्रधानमंत्री मुद्रा योजना व प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनांमध्ये बँकानी उद्दिष्ट साध्य करण्याच्या सूचना दिल्या.

00000




जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान दिन साजरा

बुलडाणा, दि. 2 : जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. यावेळी तहसिलदार श्यामला खोत, नायब तहसिलदार संजय बंगाळे, शिला पाल यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे सामुदायिक वाचन केले.

भारतीय संविधानाबाबत जनजागृती व्हावी, तसेच नागरीकांना संविधानाची ओळख व्हावी यासाठी राज्यात दरवर्षी 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्यात येतो.

00000





जिल्ह्यातील एड्स नियंत्रण कार्यक्रमाचे काम उत्कृष्ट

-जिल्हाधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड

बुलडाणा, दि. 2 : एड्स नियंत्रण कार्यक्रमात जिल्हा उत्कृष्ट कार्य करीत आहे. यामुळे जिल्ह्यातील एचआयव्ही संसर्गाचा दर कमी होत आहे. एड्स नियंत्रण कार्यक्रमातील अधिकारी व कर्मचारी यांच्या कार्यामुळे सकारात्मक परिणाम दिसत आहे. एचआयव्हीचा दर शुन्यापर्यंत येण्यासाठी आरोग्य यंत्रणा, जोखमीचे घटक आणि समाजातील सर्व महत्वाच्या व्यक्तींना प्रयत्न करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकरी डॉ. एच. पी. तुम्मोड यांनी केले.

एचआयव्ही एड्स विषयक जनजगृतीपर कार्यक्रमांचे आयोजन व एड्सविषयी जनजागृतीपर रॅलीचे आयोजन जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण विभागातर्फे करण्यात आले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांनी एड्स नियंत्रण कार्यक्रमात बुलडाणा जिल्हा राज्यस्तरावर प्रथम क्रमाकावर येईल असा संकल्प केला.

जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रमोद टाले यांनी प्रास्ताविक केले. यावेळी विविध स्पर्धांमधील विजेते आणि उत्कृष्ट कार्य करणारे अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवी संस्था यांचा गौरव करण्यात आला. आयसीटीसी सेंटर मलकापूर, मोताळा, शेगाव यांना अनुक्रमे गौरविण्यात आले. मातृभूमी फाऊंडेशन, नेटवर्क ऑफ बुलडाणा यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. फेस डिझाईनिंगमध्ये सहकार विद्यालय, मोताळा, केबीजे विद्यालय मोताळा, रांगोळी स्पर्धेमध्ये व्यंकटेश महाविद्यालय देऊळगाव राजा येथील विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.

जिल्हाधिकारी डॉ. तुम्मोड यांनी एड्स निर्मुलनाची शपथ दिली. तसेच रॅलीला हिरवी झेंडी दाखवली. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव हेमंत भुरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत पाटील, जिल्हा स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. वासेकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भुसारी, ठाणेदार श्री. काटकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. चौधरी, एआरटी सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजपूत, प्राचार्य परिचारिका प्रशिक्षण केंद्राच्या श्रीमती खेडेकर, मेट्रन श्रीमती कुलकर्णी, कुरुसिंगे आदी उपस्थित होते. वैशाली इंगळे यांनी सूत्रसंचालन केले. गजानन देशमुख यांनी आभार मानले.

0000000

तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांचे व्यवस्थापन

बुलडाणा, दि. 2 : तुरीच्या पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांच्या वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. या अळ्यांमुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी अळ्यांचे योग्य व्यवस्थापन करावे, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.

किटकशास्त्रज्ञांच्या वाशिम, अकोला व बुलढाणा जिल्ह्यातील सर्वेक्षणानुसार यावर्षी चांगला पाऊसमान असल्यामुळे तूरीचे पिक चांगले आहे. येत्या पंधरवड्यात हे पिक फुलोऱ्यावर येणार आहे. तूरीपासून चांगले उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र मागील आठवड्यातील रात्रीच्या थंड हवामानामुळे तूर पिकावरील शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या वाढीस पोषक आहे. या वातावरणामुळे तूर पिकाला शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांपासून नुकसान होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी पिकाची पाहणी करून वेळीच व्यवस्थापन करून उपाययोजना करावी.

शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांमध्ये शेंगा पोखरणारी अळी (हेलीकोवर्पा) ही आहे. या किडीची मादी पतंग तुरीच्या कळ्या, फुले आणि शेंगा यावर अंडी घालते. अंड्यातून निघालेल्या अळ्या तूरीच्या कळ्या आणि फुले खाऊन नुकसान करतात. पूर्ण वाढ झालेली अळी ३० ते ४० मिमी लांब, विविध रंग छटेत दिसून येते. यात पोपटी, फिक्कट गुलाबी व करड्या रंगाची असून तिच्या पाठीवर तुटक करड्या रेषा असतात. मोठ्या अळ्या शेंगाना छिद्र करून आतील दाणे पोखरून खातात.

पिसारी पतंग ही अळी १२.५ मिमी लांब हिरवट तपकिरी रंगाची असते. तिच्या अंगावर सुक्ष्म काटे व केस असतात. अळी शेंगावरील साल खरडून छिद्र करते. बाहेर राहून दाणे पोखरते. शेंगे माशी या माशीची अळी बारीक गुळगुळीत व पांढऱ्या रंगाची असून तिला पाय नसतात. तोंडाकडील भाग निमुळता व टोकदार असतो. ही अळी शेंगाच्या आत राहून शेंगातील दाणे अर्धवट कुरतडून खाते व त्यामुळे दाण्याची मुकनी होते.

या तिनही अळी कळ्या, फुले व शेंगावर आक्रमण करीत असल्यामुळे त्यांच्या व्यवस्थापनाकरीता सारखीच उपाययोजना करावी लागते. यासाठी प्रति हेक्टर २० पक्षी थांबे शेतात उभारावेत. त्यामुळे पक्षी किडीच्या अळ्या खाऊन फस्त करतात. अळ्यांचा प्रादूर्भाव जादा असल्यास तुरीच्या झाडाखाली पोते टाकून झाड हलवावे. त्यामुळे झाडावरील अळ्या पोत्यावर पडतात. त्या गोळा करुन नष्ट कराव्यात.

किडींच्या नियंत्रणासाठी जैविक, रासायनिक कीटकनाशके यांचा वापर करावा. ५० टक्के फुलोरा असताना पहिली फवारणी करावी. यात निंबोळी अर्क ५ टक्के किंवा दहा लिटर पाण्यात ५० मिली, अझॅडिरेक्टीन ३०० पीपीएम किंवा ५० मिली, अझॅडिरेक्टीन १५००  पीपीएम किंवा २५ मिली, एचएएनपीव्ही (१․१०९ पीओबी / मिली) किंवा ५०० एलई प्रती हेक्टर, बॉसिलस थुरिंनजिएसिस १५ मिली, क्विनॉलफॉस २५ ईसी किंवा २० मिली मिसळून प्रवारणी करावी. पहिल्या फवारणीनंतर १५ दिवसानी दुसरी  फवारणी करावी. इमामेक्टीन बेंझोएट ५ टक्के एसजी किंवा ३ ग्रॅम, लॅंबडा सायहॅलोथ्रीन ५ टक्के प्रवाही किंवा १० मिली, ईथिऑन ५० टक्के ईसी किंवा ४ मिली, क्लोरॅनट्रीनीलिप्रोल १८.५ टक्के एससी प्रवाही २.५ मिली दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

00000

 


लेख…

 

माझे आवडते शिक्षक मानकर सर…!

प्रत्येक मुलाच्या आयुष्यात त्याचे आई-वडील हे पहिले गुरू असतात. ते आपल्या मुलाला चांगले संस्कार करून घडवितात, पण आपण जेव्हा शाळेत प्रवेश करतो तेव्हा आपण एका छोट्याश्या जगातून मोठ्या जगात प्रवेश करतो आणि या मोठ्या जगात आपले शाळेचे शिक्षकच आपल्याला योग्य मार्ग दाखवितात.

बुलडाणा येथील माझ्या शाळेतील शिक्षक श्री. सुभाष मानकर सर  हे माझे सर्वांत आवडते शिक्षक होते. अत्यंत शिस्तप्रिय व मनमिळावू, प्रेमळ आणि मैत्रीपूर्ण असा त्यांचा स्वभाव होता. मानकर सर शिक्षक म्हणून नव्हे तर माणूस म्हणून देखील खूप चांगले होते. सर्व मुलांना वेळोवेळी मदत करणारे होते. जी मुले अभ्यासात कमजोर होते, त्या मुलांवर ते अधिक लक्ष ठेवत आणि त्यांना सर्व लक्षात येऊन देण्यासाठी परिपूर्ण प्रयत्न करत असे. मानकर सर आम्हाला घडवण्यासाठी खूप मेहनत घेत असे. मी नेहमी प्रार्थना करते की, असे शिक्षक सर्वांना लाभो. मला या सरांचा खूप अभिमान आहे आणि त्यांची मी खूप ऋणीही आहे.

मला आठवते, बुलडाण्याला माझ्या वडिलांची  (श्री. कमलाकर रणदिवे) बदली झाली होती. तो साधारण 90 चा काळ असेल. माझे वडील तेथील अध्यापक महाविद्यालयात नोकरीस होते. त्यामुळे त्या शहरात मी रणदिवे सरांची  मुलगी म्हणून ओळखली जाऊ लागले. इयत्ता 8 वी, 9 वी, 10 वी पर्यंतचे माझे शिक्षण बुलडाण्यातच झाले.  मानकर सरांच्या मार्गदर्शनामुळेच मी वर्गात इंग्रजी विषयात नेहमी पहिली येत असे. दहावीमध्ये मला 83 टक्के मार्कस मिळाले. माझ्या बाबांनी मला इंजिनियर करायचे ठरविले. मात्र, सायन्समध्ये मी पास होणार नाही, माझ्या वडिलांचे पैसे वाया जातील, अशी माझ्या मनात भीती होती. यावरुन घरात आठ दिवस वादविवाद सुरु होता. त्याकाळात म्हणजे 1997 ला दहावीत 83 टक्के म्हणजे खूप मार्कस होते. आनंदाने माझ्या बाबांनी पेढे वाटले,  पण मी मात्र, पेढा खाल्ला नाही. घरात माझ्या रडण्याचा धुमाकूळ सुरु होता. आठव्या दिवशी स्वतः मानकर सर माझ्या बाबांना भेटले व माझ्याबद्दल विचारले तेव्हा माझ्या बाबांनी त्यांना सर्व परिस्थिती सांगितली. मानकर सर माझ्या बाबांसोबत लगेच आमच्या घरी आले. मानकर सर मला समजावू लागले. तुझ्यात इंजिनिअर  होण्याची ताकद आहे. तू मागे हटू नको. त्यांनी समजून सांगितल्यानंतरही माझ्या मनात नापास होण्याची भिती कायम होती. सर मला म्हणाले, तू 12 वीचे काय घेऊन बसलीस तू अकरावीच्या पहिल्या सेमीस्टरमध्ये  नापास झालीस तर माझी 13 लाखांची प्रॉपर्टी तुझ्या नावे करतो. पण तू सायन्स साईड घे. त्यांच्या या वाक्यांनी माझे मन खंबीर झाले. मला विलक्षण बळ मिळाल्यासारखे वाटले.  मी तात्पुरते हो म्हणाले आणि सायन्स साईड घेतली. पुढे अकरावी उत्तमरित्या पास झाले. बारावीत 75 टक्के मार्कस मिळाले. पुढे मुंबईत एसएनडीटी इंजिनिअर कॉलेजमधून इलेक्ट्रॉनिक अँड टेलीकम्युनिकेशन  या विषयात इंजिनिअर झाले. त्यावेळी खूप आनंद झाला होता. मानकर सरांनी त्यावेळी मला दिलेल्या प्रोत्साहनामुळेच माझ्या जीवनाचा कायापालट झाला. देवदुतासारखे सर मला लाभले. सरांच्या आशिर्वादाने मला पतीही इंजिनिअरच मिळाला. मला दोन गुणी मुले आहेत. पुण्यासारख्या शहरात मी वास्तव्यास आहे. सध्या मॅनेजर म्हणून एका नामांकित संस्थेत मी जॉबही करत आहे.

लग्नानंतर  2007 ला सरांची योगायोगाने भेट झाली. त्यावेळी त्यांनी  मला  बिस्कीटपुडा भेट दिल्याचे अजूनही आठवते. सरांची आणि माझी ती शेवटची भेट होती. दि. 28 नोव्हेंबर 2022 रोजी अचानक त्यांच्या निधनाची बातमी जेव्हा मला समजली. त्यावेळी मला मोठा धक्का बसला. चांगल्या लोकांनाच देव लवकर का घेऊन जातो, अशी खंत मनात दाटून आली. मानकर सर कायम माझ्या स्मरणात राहतील. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, अशी ईश्वर चरणी प्रार्थना...!

कोणतीही अपेक्षा न करता मानकर सर मनापासून ज्ञानदानाचे पवित्र कार्य करीत होते. आजही सरांचे कार्य आठवले की मन थक्क होते. वाटते इतकी कार्यक्षमता आली कुठून. त्यांनी मला फक्त पुस्तकी ज्ञान दिले नाही तर माझ्या आयुष्याला आकार देण्याचे मोलाचे कार्य केले. असे हे मानकर सर माझे अतिशय आवडते शिक्षक होते. अशा प्रेमळ, कर्तव्यदक्ष, अष्टपैलू सरांना मी कधीच विसरणार नाही. त्यांना विनम्र श्रध्दांजली...!

 

-- अनघा कमलाकर रणदिवे

(Kamlakar Randive

MA M'Ed was

Lecturer in B'Ed कॉलेज 1990 Buldana)

00000

 

No comments:

Post a Comment