Wednesday, 14 December 2022

DIO BULDANA NEWS 14.12.2022

 निवृत्तीवेतनधारकांनी बचत प्रमाणपत्र सादर करावीत

*कोषागार कार्यालयाचे आवाहन

बुलडाणा, दि. 14 : राज्य शासनाच्या निवृत्तीवेतनधारकांनी सन 2022-23 या वर्षात आयकर निर्धारण करण्यासाठी बचतीची प्रमाणपत्रे कोषागार कार्यालयात दि. 10 जानेवारी 2023 पर्यंत सादर करावीत, असे आवाहन कोषागार कार्यालयाने केले आहे.

निवृत्तीवेतनधारकांची सन 2022-23 या आर्थिक वर्षासाठी आयकर निर्धारण करण्यात येणार आहे. त्यासाठी बचतीचा तपशिल सादर करणे आवश्यक आहे. निवृत्तीवेतनधारकांनी बचतीची प्रमाणपत्रे सादर केली नसल्यास उत्पन्नानुसार कर निर्धारण करून टीडीएस कपात करण्यात येणार आहे. त्यामुळे निवृत्तीवेतनधारकांनी बचतीचा तपशील, पॅनकार्डची छायांकित प्रत जिल्हा कोषागार कार्यालयात सादर करावी, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी ऋषिकेश वाघमारे यांनी केले आहे.

00000बांधकाम कामगारांनी अमिषाला बळी पडू नये

*कामगार मंडळाचे आवाहन

बुलडाणा, दि. 14 : बांधकाम कामगारांनी कोणत्याही अमिषाला बळी न पडता नोंदणी व नुतनीकरण करुन घ्यावे, फसवणूक झाल्यास कार्यालयाची जबाबदारी राहणार नाही. तसेच अतिरिक्त रक्कम मागणी करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध नजिकच्या पोलिस ठाण्यात परस्पर तक्रार नोंदवावी, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी आ. शि. राठोड यांनी केले आहे.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या असंघटित कामगारांची नोंदणी, नूतनीकरण व विविध योजनांच्या लाभ वाटपाचे काम सरकारी कामगार अधिकारी कार्यालयातर्फे ऑनलाईन पद्धतीने केले जाते. या कामकाजासाठी कोणत्याही खासगी प्रतिनिधी अथवा एजंट, दलाल यांची नेमणूक करण्यात आली नाही. संबंधित कामगारांना अर्ज नोंदणीसाठी वार्षिक एक रुपये शुल्क आकारण्यात येत आहे. त्याची रीतसर पावती देण्यात येते. या व्यतिरिक्त या कार्यालयाकडून कोणतेही शुल्क आकारले जात नसल्याचे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने कळविले आहे.

00000

मेहकर आयटीआयमध्ये निर्लेखित साहित्यासाठी निविदा आमंत्रित

बुलडाणा, दि. 14 : मेहकर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत निर्लेखित करण्यात आलेल्या साहित्याचा लिलाव करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुकांनी दि. 20 डिसेंबर 2022 पर्यंत निविदा सादर करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मेहकर, जि. बुलडाणा येथील कार्यरत विविध व्यवसायाचे प्रशिक्षणासाठी वापरण्यात येऊन पुर्णपणे खराब झालेल्या तसेच कालबाह्य झालेल्या निरुपयोगी मशिनरी लिलाव किंवा निविदा पद्धतीने विकण्यात येत आहे. सदर मशिनरी, साहित्य कार्यालयीन वेळेत दि. 20 डिसेंबर 2022 पर्यंत सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संस्थेत पाहण्यासाठी ठेवण्यात आले आहे. साहित्य खरेदीसाठी इच्छुकांनी सदर साहित्याची निविदा दि. 20 डिसेंबर 2022 पर्यंत दुपारी 1 वाजेपर्यंत भरुन कार्यालयात स्वहस्ते, पोस्टाद्वारे सादर करावी. सदर साहित्याची निविदा, लिलाव दि. 20 डिसेंबर 2022 रोजी त्याच दिवशी 2 वाजता सर्वासमक्ष उघडण्यात येईल, असे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांनी कळविले आहे.

00000

हरभरा पिकावरील घाटे अळीचे व्यवस्थापन करावे

*कृषि विभागाचे आवाहन

बुलडाणा, दि. 14 : जिल्‌ह्यातील हरभरा पिकावर घाटेअळीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. या घाटेअळीचे शेतकऱ्यांनी वेळीच व्यवस्थापन करावे, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.

सद्य परिस्थितीत ढगाळ वातावरण असल्यामुळे हरभरा पिकावरील घाटेअळीचा प्रादूर्भाव वाढण्याची शक्यता आहे. तसेच आंधारीरात्र असल्यामुळे घाटेअळीचे पतंग मोठ्या प्रमाणावर अंडे देऊ शकतात. या सर्व बाबी घाटेअळीस पोषक असल्यामुळे सध्या घाटेअळीचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. बऱ्याच ठिकाणी या अळीने प्रादूर्भाव करण्यास सुरुवात केली आहे. ही कीड बहुभक्षी असून विशेषतः पिक फुलोरा आणि प्रामुख्याने घाटे अवस्थेत नुकसानकारक असते. लहान अळ्या सुरुवातीला कोवळी पाने, व फुले कुरतडुन खातात. घाटे लागल्यानंतर अळ्या घाटे कुरतडुन त्याला छिद्र पाडून डोके आत खुपसुन आतील दाणे खातात. साधारणत: एक अळी तीस ते चाळीस घाट्यांचे नुकसान करु शकते. सद्या आढळणारी कीड ही अंडी अवस्था व प्रथम अवस्थेतील अळी अवस्था असल्यामुळे वेळीच उपाययोजना केल्यास कमी खर्चात किडींचे प्रभावी नियंत्रण होऊ शकते.

घाटेअळीचे एकात्मिक व्यवस्थापन करताना कोळपणी किंवा निंदणी करुन पिक तणविरहित ठेवावे तसेच घाटेअळीच्या मोठ्या अळ्या हाताने वेचून त्यांना नष्ट करावे. घाटेअळीच्या सर्वेक्षणासाठी ५ कामगंध सापळे प्रति हेक्टरी जमिनीपासुन १ मिटर उंचीवर लावावेत. कामगंध सापळ्यामध्ये 8 ते 10 पतंग प्रति सापळा सतत 2 ते 3 दिवस आढळल्यास किटकनाशकाची फवारणी करावी. त्यामध्ये पक्षी बसण्यासाठी पिकाच्या किमान एक ते दोन फूट उंचीवर पक्षी थांबे हेक्टरी ५० ते६० ठिकाणी उभारावेत. यामुळे पक्ष्यांना अळ्यांचे भक्षण करणे सोपे जाईल.

पिकाच्या सुरुवातीच्या काळात ५ टक्के निंबोळी अर्काची किंवा अझॅडिरेक्टिन ३०० पीपीम ५ मिली प्रति लिटर पाण्यातून प्रतिबंधात्मक फवारणी करावी. घाटेअळी लहान अवस्थेत असताना एच.ए.एन.पी.व्ही. ५०० एल ई १ मिली प्रति लिटर पाण्यात ५ ग्रॅम निळ टाकून सायंकाळी फवारणी करावी. किडींचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्यावर आढळून आल्यास इमामेक्टीन बेन्झोएट ५ एसजी ४.४ ग्रॅम किंवा फ्ल्युबेन्डामाईड ३९.३५ एससी २ मिली किंवा क्लोरॅनट्रीनीलीप्रोल १८.५ एससी २५ मिली यापैकी एका कीटकनाशकाची प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

कीटकनाशकांचे प्रमाण नॅपसॅक पंपासाठी असून पेट्रोल पंपासाठी मात्रा तीनपट वापरावी. शेतात कीटकनाशकाचे द्रावण तयार करताना व फवारणी करताना चष्मा, हातमोजे व तोंडावर मास्कचा वापर करावा तसेच गुटखा, तंबाखु खाऊ नये व बीडी पिऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

000000

तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीचे व्यवस्थापन करावे

*कृषि विभागाचे आवाहन

बुलडाणा, दि. 14 : जिल्‌ह्यातील ढगाळ हवामानामुळे तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादूर्भाव वाढण्याची शक्यता आहे. यामुळे पिकांचे नुकसान होणार असल्याने फुलोरा अवस्थेपासून शेंगा पोखरणाऱ्या अळीचे व्यवस्थापन करावे, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.

सद्या परिस्थितीत तूर पिक फुले व शेंगा लागण्याच्या अवस्थेत असून मागील ३-४ दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीचे पतंग मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. तसेच अंधारीरात्र असल्यामुळे शेंगा पोखरणाऱ्या अळीचे पतंग मोठ्या प्रमाणावर अंडे देऊ शकतात. या सर्व बाबी तुरीवरील घाटेअळी, शेंगा पोखणारी अळीस पोषक असल्यामुळे सध्या शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येऊ शकतो. काही ठिकाणी अळीने तुरीवरील कळ्या, फुले व शेंगा फस्त करण्यास सुरुवात केली आहे. या किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादूर्भाव झाल्यास ७० टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते. सध्या आढळणारी कीड ही अंडी अवस्था व प्रथम अवस्थेतील अळी असल्यामुळे वेळीच उपाय योजना केल्यास कमी खर्चात किडींचे नियंत्रण होऊ शकते.

शेंगा पोखरणाऱ्या अळ्या सुरुवातीच्या काळात पिकाच्या कोवळ्या पानांवर, फुलावर किंवा शेंगावर उपजीविका करतात, नंतर शेंगा भरताना त्या दाणे खातात. दाणे खात असताना त्या शरीराचा पुढील भाग शेंगामध्ये खुपसून व बाकीचा भाग बाहेर ठेऊन आतील कोवळ्या दाण्यावर उपजीविका करतात.

तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीचे एकात्मिक व्यवस्थापन करताना पाने व फुलांची जाळी करणारी अळीची प्रादूर्भावग्रस्त जाळी गोळा करून अळीसहीत नष्ट करावीत. तसेच शेंगा पोखरणारी अळीच्या मोठ्या अळ्या हाताने वेचून त्यांचा नायनाट करावा. तूर पिक कळी लागण्याच्या अवस्थेत आल्यापासून एकरी २ कामगंध सापळे (फेरोमोन ट्रॅप) पिकाच्या वर एक फूट उंचीवर लावावे व निरीक्षण करावे. शेतामध्ये पक्षी बसण्यासाठी पिकाच्या किमान एक ते दोन फूट उंचीवर पक्षी थांबे हेक्टरी ५० ते ६० ठिकाणी उभारावेत, यामुळे पक्ष्यांना अळ्यांचे भक्षण करणे सोपे जाईल.

पीक कळी अवस्थेत असताना निंबोळी अर्क ५ टक्केची किंवा अझॅडीरॅक्टिन ३०० पीपीएम ५ मिली प्रति लिटर पाण्यातून फवारणी करावी. अळी प्रथम व द्वितीय अवस्थेत असताना एचएएनपीव्ही विषाणूची ५ मिली १० लिटर पाण्यातून संध्याकाळच्या वेळेस फवारणी करावी. जर किडींचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या वर आढळून आल्यास इमामेक्टीन बेन्झोएट ५ एसजी ४.४ ग्रॅम किंवा फ्ल्युबेन्डामाईड ३९.३५ एससी २ मिली किंवा क्लोरॅनट्रीनीलीप्रोल १८.५ एससी ३ मिली किंवा क्लोरॅनट्रीनीलीप्रोल ९.३+ लॅमडा साहॅलोथ्रीन ४.६ झेडसी ४ मिली यापैकी एका किटकनाशकाची प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. मारुका किडीसाठी इंडोक्झाकार्ब १४.५ एससी ८ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

किटकनाशकाचे प्रमाण नॅपसॅक पंपासाठी असून पेट्रोल पंपासाठी मात्रा तीनपट वापरावी. शेतात किटकनाशकांचा वापर करताना हातमोजे व तोंडावर मास्कचा वापर करावा व सुरक्षिततेची योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.

00000

गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी कपाशीची फरदड घेण्याचा मोह टाळावा

बुलडाणा, दि. 14 : राज्यातील काही जिल्ह्यात कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादूर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. यावर उपाययोजना करताना शेतकऱ्यांनी चालू हंगामात कपाशीची फरदड घेण्याचा मोह टाळावा, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.

मागील दोन आठवड्यापासून कृषि कीटकशास्त्र विभागाच्या शास्त्रज्ञांनी क्रॉपसॅप प्रकल्पाअंतर्गत परभणी जिल्ह्यातील परभणी, सेलू, मानवत, पाथरी, नांदेड जिल्ह्यातील नांदेड, लोहा, कंधार, हिंगोली जिल्ह्यातील वसमत, औंढा, बीड मधील अंबाजोगाई, परळी, केज, जालना जिल्ह्यातील परतूर, मंठा, अंबड, घनसावंगी, जाफ्राबाद, बदनापूर तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील औरंगाबाद, पैठण इत्यादी तालुक्यातील प्रक्षेत्र भेटी दिल्या असता गुलाबी बोंडअळीचा प्रादूर्भाव ४ ते ५ टक्के च्या दरम्यान दिसून आला असून पुढील काळात वाढण्याची शक्यता आहे.

यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे मराठवाड्यातील बऱ्याच भागात विहिरी, कुपनलिका व कालव्याच्या माध्यमातून सिंचनासाठी पाणी उपलब्ध आहे. त्याबरोबरच कापसाला चांगला उठाव असल्याने कपाशीचे पीक काढण्याऐवजी पाणी व खताच्या मात्रा देऊन कपाशीचा पुनर्बहार (फरदड) घेण्यावर शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे.

फरदड कापूस म्हणजे कापसाच्या वेचण्या झाल्यानंतर एखाद पाणी (सिंचन) देऊन पुन्हा कापूस पीक घेतले जाते. फरदड पिकामध्ये जोमदार उत्पादन मिळण्यासाठी पाणी, खते, किटकनाशकांचा वापर केला जातो. या पद्धतीमुळे कापूस पीक शेतामध्ये फेब्रुवारी-मार्च महिन्यानंतरही राहते. कपाशी वेचणीनंतर रब्बी पश्चात हंगामामध्ये नवीन पीक घेण्यासाठी जमिनीची मशागत करावी लागते. त्यामुळे मशागत, पेरणी आणि बियाणे अशा बाबींवरील खर्च वाढतो. हा खर्च टाळण्यासाठी खरीप हंगामामध्ये लागवड झालेल्या कापूस पिकापासूनच फरदड कापसाचे वाढीव उत्पादन घेण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न असतो. या कारणामुळे फरदड पीक घेण्याची पद्धत शेतकऱ्यांना फायद्याची वाटते. मात्र, या पद्धतीमुळे शेतीमध्ये दीर्घकाळ पीक राहिल्याने गुलाबी बोंडअळीच्या वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण होते. गुलाबी बोंडअळीचा जीवनक्रम लक्षात घेता तिचे शाश्वत व्यवस्थापन करण्यासाठी वेळेवर हंगाम संपविणे गरजेचे आहे. म्हणून कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांनी फरदड घेऊ नये, असे आवाहन करण्यात येत आहे.

पुढील हंगामातील गुलाबी बोंडअळीचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी कपाशीची फरदड घेऊ नये. वेळेवर कपाशी वेचणी करुन डिसेंबरनंतर शेतामध्ये कपाशीचे पीक ठेवू नये. हंगाम संपल्यानंतर शेतामध्ये जनावरे किंवा शेळ्या, मेंढ्या चरण्यासाठी सोडाव्यात. हंगाम संपल्यावर ताबडतोब पऱ्हाटीचा बंदोबस्त करावा, शेतात किंवा शेताजवळ पऱ्हाटी रचून ठेवू नये. पऱ्हाटीत गुलाबी बोंड अळीच्या सुप्त अवस्था असतात. रोटावेटरऐवजी चुरा करणारे यंत्र श्रेडरच्या सहाय्याने पऱ्हाटीचा बारीक चुरा करुन कंपोस्ट खतासाठी उपयोग करावा. जिनिंग मिल व साठविलेल्या ठिकाणी कामगंध सापळ्याचा वापर करावा, असेही कृषि विभागाने सूचविले आहे.

00000

No comments:

Post a Comment