Tuesday, 13 December 2022

DIO BULDANA NEWS 13.12.2022

 


निर्यातक्षम उद्योग उभारण्यासाठी सुविधा द्याव्यात

-जिल्हाधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड

बुलडाणा, दि. 13 : जिल्ह्यात जमीन, वीज, पाणी आणि मनुष्यबळ मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. जिल्ह्याच्या या स्थितीमुळे याठिकाणी अनेक निर्यातक्षम उद्योग उभे राहू शकतात. यासाठी अशा उद्योग उभारणीसाठी सुविधा पुरविण्यात याव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हा उद्योग मित्र, आजारी उद्योग पुनर्वसन, जिल्हा सल्लागार समिती आणि स्थानिक लोकांना रोजगार समितीची बैठक पार पडली. यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक सुनिल पाटील, आदी उपस्थित होते. बैठकीत देऊळगाव राजा, चिखली, खामगाव, शेगाव येथील औद्योगिक वसाहतीलमधील समस्यांबाबत चर्चा करण्यात आली.

खामगाव आणि चिखली येथील औद्योगिक वसाहतीमध्ये उद्योगांची जागेची मागणी असल्यामुळे याठिकाणी अतिरिक्त वसाहतीसाठी प्रयत्न करण्यात यावेत. नवीन वसाहतीसाठी जमिनी घेताना थेट खरेदीद्वारे जमीन घेण्यावर भर द्यावा. या ठिकाणी उद्योगासाठी आवश्यक असणाऱ्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्यास जिल्ह्याचा विकास होण्यास मदत मिळेल. खामगाव येथील उद्योगांना ग्रामपंचायत आणि औद्योगिक विकास महामंडळ या दोघांकडून कराची आकारणी होत आहे. यावर नियमानुसार महामंडळाने करवसुली करून त्यातील 50 टक्के कर हा ग्रामपंचायतीला वितरीत करण्याच्या सूचना केल्या.

उद्योगांसाठी वीज आणि पाणी महत्वाचे आहे. वीज वारंवार खंडीत झाल्यामुळे उत्पादनावर परिणाम होत असल्याने विजेचा पुरवठा अखंडीत होण्यासाठी वीज मंडळाने कार्य करावे. तसेच पाण्याची सोय होणे महत्वाचे आहे. उद्योगाच्या ठिकाणी सांडपाणी आणि पाण्याचा निचरा होण्यासाठी सुविधा निर्माण करण्यात याव्यात. आजारी उद्योगांसाठी शासकीय योजना आहेत. याचाही लाभ देण्यात यावा.

रोजगार निर्मिती हे राज्याचे धोरण आहे. यासाठी पूरक म्हणून महास्वयंम हे पोर्टल विकसित करण्यात आले आहे. प्रामुख्याने स्थानिक ठिकाणी रोजगार करण्याची मानसिकता असल्यामुळे रोजगार देण्यासाठी नोंदणी करावी, यातून बेरोजगारांना रोजगार मिळण्यासाठी मदत होणार आहे. एक जिल्हा एक उत्पादना अंतर्गत जिल्ह्यात बियाणे उत्पादन हाती घेण्यात आला आहे. सध्या एकूण बियाण्यापैकी 25 टक्के बियाणे जिल्ह्यात निर्माण होत असून हे क्षेत्र विकसित करण्यात येणार आहे.

उद्योगांनी निर्यात होणारे उद्योग उभारणीसाठी प्रयत्न करावे. यासाठी प्रशासनाचे पूर्ण सहकार्य देण्यात येईल. यासाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येतील. निर्यातीसाठी आवश्यक असणाऱ्या चाचणीसाठी प्रयोगशाळा उभारण्यात येतील. निर्यात वाढविण्यासाठी सहकाऱ्यांना सोबत घेऊन उद्योग उभारणी करावे, असे आवाहनही डॉ. तुम्मोड यांनी केले.

000000





आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षासाठी कार्यकारिणी गठीत

बुलडाणा, दि. 13 : संयुक्त राष्ट्र संघ 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे करणार आहे. यानिमित्ताने जिल्हाधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी, दि. 12 डिसेंबर रोजी बैठक पार पडली. यानिमित्ताने वर्षभर उपक्रम राबविण्यात येणार आहे.

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष साजरे करण्यानिमित्त जिल्हा कार्यकारीणी समितीची सभा झाली. या सभेत जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुख, शास्त्रज्ञ, कृषि संशोधन केंद्र, कृषि विज्ञान केंद्र, प्राचार्य, कृषि महाविद्यालय, कृषि तंत्र विद्यालय, उपविभागीय कृषि अधिकारी आणि तालुका कृषि अधिकारी उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीला पौष्टिक तृणधान्य नाचणी पासून बनवलेला केक कापण्यात आला. 

संयुक्त राष्ट्र संघाने सन २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. पौष्टिक तृनधान्य पिकांच्या उत्पादनात वाढ करणे, मूल्यवर्धित उत्पादने तयार करणे व लोकांच्या आहारातील त्यांचा वापर वाढविण्याच्या दृष्टीने कृषि व इतर कृषि संलग्न विभागांच्या सहकार्याने विविध उपक्रमांचे आयोजन यानिमित्ताने करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष साजरे करण्यासाठी जिल्हास्तरीय कार्यकारिणीची निवड करण्यात आली. तसेच जानेवारी २०२३ ते डिसेंबर २०२३ दरम्यान करावयाच्या कामांचे नियोजन करण्यात आले.

बदलत्या हवामान आणि पिक परिस्थितीनुसार शेती पद्धतीत बदल झाले आहेत. एकेकाळी ज्वारी, बाजरी, नाचणी पिके प्रमुख अन्नधान्य पिके होती. त्यांची जागा आता सोयाबीन, कापूस, ऊस पिकांनी घेतली आहे. पौष्टिक तृणधान्य या पिकांमध्ये विपरीत हवामान परिस्थितीत सामोरे जाण्याची क्षमता आहे. त्यामुळे कोणत्याही स्थितीत ही पिके उत्पादन देऊन शेतकऱ्यांना कठीण परिस्थितीत उत्पन्न देतात.

पिकाखालील क्षेत्राची घट आणि आरोग्यविषयक समस्यांच्या वृद्धीचा सर्वसाधारण कालावधी एकच असल्याने आहारतज्‍ज्ञानी याबाबत केलेल्या अभ्यासात या पिकाचे पोषणमूल्य निदर्शनास आले आहे. शेतकऱ्यांना या पिकापासून मिळणारे कमी उत्पन्न व आहारातील वाढते महत्व विचारात घेऊन केंद्र शासनाने या पिकांना पौष्टिक तृणधान्य पिके म्हणून घोषित केले आहे. याआधीही सन २०१८-१९ या वर्षात राष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष साजरे करण्यात आले आहे.

000000












विभागीयस्तरीय शालेय रस्सीखेच क्रीडा स्पर्धा उत्साहात

बुलडाणा, दि. 13 : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषदेच्या वतीने 14, 17, 19 वर्षाआतील मुलांची विभागीयस्तरवरील शालेय रस्सीखेच क्रीडा स्पर्धा शुक्रवार, दि. 9 डिसेंबर 2022 रोजी जिल्हा क्रीडा संकुलात पार पडली.

जिल्हा रस्सीखेच एकविध खेळ संघटनेचे सचिव उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. दिलीप यंगड उपस्थित होते. क्रीडा स्पर्धेसाठी अमरावती विभागातील 14, 17, 19 वर्षातील मुले व मुलींचे 32 संघ सहभागी झाले. पंचाधिकारी म्हणून आंतरराष्ट्रीय पंचाधिकारी श्रीराम निळे, ॲड. दिलीप यंगड, राजेंद्र बिलगे, सुनिल शिरे यांनी कामकाज पाहिले. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. राजपूत व त्यांची चमू उपस्थित होती.

स्पर्धेत 14 वर्षे मुले प्रथम सेंट्रल पब्लिक स्कुल, मेहकर, जि. बुलडाणा, द्वितीय राज इंग्लिश मिडीयम स्कुल, यवतमाळ, तृतीय कानडे इंटरनॅशनल स्कुल, वाशिम, तृतीय गोल्डन किड्स इंग्लिश स्कुल व कनिष्ठ महाविद्यालय, अमरावती. 17 वर्षे मुले प्रथम सहकार विद्या मंदिर, मोताळा, जि. बुलडाणा, द्वितीय गोल्डन किड्स इंग्लिश स्कुल व कनिष्ठ महाविद्यालय, अमरावती, तृतीय श्री शिवाजी हायस्कुल, राजंदा, ता. बार्शीटाकळी, जि. अकोला. 17 वर्षे मुली प्रथम सेंट्रल पब्लिक स्कुल, मेहकर, जि. बुलडाणा, द्वितीय श्रीमती हिराबाई गोयंका कन्या विद्यालय, धामगांव रेल्वे, जि. अमरावती, तृतीय श्री शिवाजी हायस्कूल, राजंदा, ता. बार्शीटाकळी, जि. अकोला. 19 वर्षे मुली प्रथम अकोला आर्टस्, कॉमर्स ॲण्ड सायन्स कॉलेज, अकोला, द्वितीय शाहबाद ज्युनिअर कॉलेज उर्दू, पातूर, जि. अकोला, तृतीय जिल्हा परिषद हायस्कूल, पिंपळगाव राजा, जि. बुलडाणा हे संघ विजयी ठरले.

00000000

No comments:

Post a Comment