शेगाव येथे शुक्रवारी रोजगार मेळावा
*खाजगी क्षेत्रात नोकरीची संधी
*600 पदांसाठी होणार मुलाखती
बुलडाणा, दि. 20 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे शेगाव येथील श्री संत गजानन महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरींग येथे पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा शुक्रवार, दि. 23 डिसेंबर 2022 रोजी आयोजित करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी रोजगार मेळाव्यामध्ये १३ पेक्षा अधिक उद्योजकांनी ६०० पेक्षा अधिक रिक्त पदे अधिसुचित केली आहे. सदर कार्यालयाकडे नोंदणीकृत उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने या रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्याद्वारे टाटा, महिंद्रा, हिताची सारख्या नामांकित कंपनीच्या प्रतिनिधीद्वारे गरजू व रोजगार इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येवुन त्यांची प्राथमिक निवड करण्यात येणार आहे. यासोबतच जिल्ह्यातील उमेदवारांना कौशल्य विकास प्रशिक्षणाची संधीसुध्दा नि:शुल्क उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. टाटा या नामांकित कंपनीमध्ये प्रत्यक्ष प्रशिक्षणाची संधी या मेळाव्याद्वारे उपलब्ध होणार आहे.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नाव नोंदणी केलेल्या दहावी, बारावी, आयटीआय, पदवीधर पुरुष, महिला उमेदवारांनी दि. 23 डिसेंबर, २०२२ रोजी शेगाव येथील श्री संत गजानन महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून रोजगार प्राप्त करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या रोजगार मेळाव्यात सहभागी होण्याकरीता कार्यालयात येण्याची गरज नाही.
पात्र, गरजू व नोकरी इच्छुक उमेदवार आपल्या शैक्षणिक पात्रतेच्या आधारे एकापेक्षा जास्त पदासाठीही अर्ज करु शकतील. तरी शेगाव येथे आवश्यक त्या कागदपत्रांसह सकाळी १० वाजता उपस्थित राहून नाव नोंदणी करावी आणि उपस्थित कंपन्यांच्या प्रतिनिधी समवेत मुलाखत द्यावी. जिल्ह्यातील उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त प्रां. यो. बारस्कर यांनी केले आहे. याबाबत काही अडचण आल्यास जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बुलडाणा कार्यालयाच्या (07262-242342) या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
00000
आज जिल्हा दक्षता समितीची सभा
बुलडाणा, दि. 20 : जिल्हा दक्षता समितीची सभा बुधवार, दि. 21 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 4 वाजता आयोजित करण्यात आली आहे. तसेच भ्रष्टाचार निर्मूलन समितीची सभा दि. 28 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 12.10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.
जिल्हा दक्षता समिती सभा आणि जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समिती सभा यामध्ये आपल्या तक्रारी दाखल करावयाच्या असतील, त्यांनी प्रतिज्ञालेखासहित तक्रारी स्पष्ट शब्दात सबळ पुराव्यानिशी समितीसमोर दाखल करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.
00000
अनुसूचित जातीच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टरचा पुरवठा
*बचतगटांनी प्रस्ताव सादर करण्यासाठी मुदतवाढ
बुलडाणा, दि. 20 : अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना 3 लाख 50 हजार रुपयांच्या मर्यादेत 9 ते 18 अश्वशक्तीचा मिनी ट्रॅक्टर व त्याची कल्टिवेटर, रोटॅव्हेटर, ट्रेलर ही उपसाधने पुरवठा करण्याची योजना राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी दि. 31 डिसेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
सदर योजनेसाठी दि. 15 डिसेंबर 2022 पर्यंत अर्ज सादर करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. आता या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनामध्ये वस्तू स्वरुपात मिळणाऱ्या लाभांचे हस्तांतरण रोख स्वरुपात लाभार्थ्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यात जमा करण्याबाबत सुधारणा करण्यात आली आहे.
सदर योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना 3.50 लाख रूपयांच्या मर्यादेत 90 टक्के शासन अनुदान आणि 10 टक्के स्वयंसहाय्यता बचत गट हिस्सा याप्रमाणे 9 ते 18 अश्वशक्तीचा मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. लाभार्थी स्वयंसहाय्यता बचतगटांना अनुज्ञेय असणाऱ्या किमान 9 ते 18 अश्वशक्तीपेक्षा जास्त अश्वशक्तीचा ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी करता येतील. मात्र त्याची किंमत कमाल शासकीय अनुदानापेक्षा जास्त असल्यास कमाल अनुज्ञेय अनुदानाव्यतिरीक्त जादाची रक्कम बचत गटांनी स्वत: खर्च करावी लागणार आहे. मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांची कमाल किंमत 3.50 लाख रुपये राहिल. त्यामध्ये 90 टक्के म्हणजेच 3.15 लाख रुपये शासकीय अनुदान व स्वयंसहाय्यता बचतगटाचा हिस्सा 10 टक्के म्हणजे 35 हजार रूपये इतका असेल.
सदर योजनेंतर्गत लाभार्थी बचतगटाची निवड झाल्यानंतर बचतगटाने निर्धारीत केलेल्या प्रमाणकानुसार मान्यताप्राप्त उत्पादकांकडून मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने शासनाने निर्धारीत केलेल्या किंमतीपर्यंत खरेदी करावी लागणार आहे. स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी केल्याची पावती सादर केल्यानंतर व खातरजमा करुन लाभार्थी बचतगटाला शासकीय अनुदानाचा 50 टक्के हप्ता बचतगटाच्या आधार संलग्न खात्यावर जमा करण्यात येईल. उर्वरीत 50 टक्के अनुदान मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांची आरटीओ कार्यालयाकडे नोंद झाल्यानंतर बचतगटांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येईल किंवा स्वयंसहाय्यता बचतगटाने मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांची आरटीओ कार्यालयाकडे नोंद केल्याचे पुरावे सादर केल्यास 100 टक्के अनुदान स्वयंसहाय्यता बचतगटाच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.
शासनाच्या निर्णयानुसार 9 ते 18 अश्वशक्तीच्या मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांची कमाल किंमत 3 लाख 50 हजार ठरविण्यात आली आहे. सदर रक्कमेपैकी अनुदानाची रक्कम कमाल किंमतीच्या 90 टक्के म्हणजेच 3 लाख 15 हजार रूपये राहिल. भारत सरकारने निर्धारीत केल्यानुसार मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने ही फार्म मशिनरी, ट्रेनिंग आणि टेस्टींग इन्स्टिट्यूट यांनी टेस्ट करुन जाहिर केलेल्या उत्पादकांच्या यादीतील परिमाणानुसार असावीत.
या योजनेतील लाभार्थ्यांचे निकष ठरविण्यात आले आहेत. यामध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटातील सर्व सदस्य व अध्यक्ष हे राज्याचे रहिवासी असावेत. स्वयंसहाय्यता बचतगटातील किमान 80 टक्के सदस्य हे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असावेत. स्वयंसहाय्यता बचत गटाचे अध्यक्ष व सचिव अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असावेत. मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांच्या खरेदीची कमाल मर्यादा 3 लाख 50 हजार रुपये इतकी राहिल. स्वयंसहाय्यता बचतगटांनी वरील कमाल मर्यादेच्या रक्कमेच्या किंवा प्रत्यक्ष साधनांच्या किंमतीच्या 10 टक्के स्व हिस्सा भरल्यानंतर प्रत्यक्ष किंमतीच्या 90 टक्के शासकीय अनुदान अनुज्ञेय राहील.
लाभार्थी स्वयंसहाय्यता बचतगटांनी या योजनेंतर्गत अनुज्ञेय असलेल्या किमान 9 ते 18 अश्वशक्तीपेक्षा जादा अश्वशक्तीचा ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी करता येईल. मात्र त्याची या योजनेंतर्गत अनुज्ञेय असलेल्या अनुदानापेक्षा जास्तीची रक्कम संबंधित बचतगटाने स्वत: खर्च करावी लागणार आहे.
यासाठी इच्छुक अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील स्वयंसहाय्यता बचतगटांनी विहित नमुन्यातील अर्ज दि. 15 डिसेंबर 2022 पर्यंत सादर करावे. अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चिखली रोड, त्रिशरण चौक, बुलडाणा येथे सादर करावेत. सोबत बचतगट नोंदणीबाबत सक्षम अधिकाऱ्यांचे नोंदणी प्रमाणपत्राची साक्षांकीत प्रत, बचतगटामधील मुळ सदस्यांची यादी, घटना व नियमावली प्रत, बचतगटातील सर्व सदस्यांचे सक्षम अधिकारी यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र, तसेच सक्षम अधिकारी यांनी दिलेले अधिवास प्रमाणपत्र जोडावी लागणार आहे. अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
00000
अनाथ, निराधार मुलांच्या बाल महोत्सवाचे आयोजन
बुलडाणा, दि. 20 : जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाच्या शासकीय मुलाचे बालगृह, निरीक्षणगृह संस्थांमध्ये पुनर्वसनासाठी दाखल झालेल्या अनाथ, निराधार मुलांचा चाचा नेहरू बाल महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. हा महोत्सव दि. गुरूवार, दि. 22 डिसेंबर 2022 पर्यंत सुरू राहणार आहे.
अनाथ, निराधार, उन्मार्गी मुलांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी, तसेच त्यांच्यात एकमेकांविषयी बंधुभाव, सांघिक भावना निर्माण होण्यासाठी बालकल्याण क्षेत्रात कार्यरत संस्थांमधील मुले व शहरातील विविध शाळांमधील मुलांसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या वतीने शासकीय मुलाचे बालगृह, निरीक्षणगृह शरद कला महाविद्यालयाच्या प्रांगणात दि. 20 ते 22 डिसेंबर दरम्यान बाल महोत्सव होणार आहे.
जिल्हाधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड, जिल्हा सत्र न्यायाधीश स्वप्निल खट्टी यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन पार पडले. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अशोक मारवाडी यांनी महोत्सवातील क्रीडा, सांस्कृतिक, गीत गायन, चित्रकला स्पर्धा घेण्यात येणार असल्याचे सांगितले. जिल्हाधिकारी डॉ. तुम्मोड यांनी बालकांनी आपल्या सुप्त गुणांना वाव देऊन प्रगती करावी, असे मत व्यक्त केले. श्री. खट्टी यांनी बालकांनी विविध स्पर्धेच्या युगात उत्तुंग भरारी घेऊन आपले अस्तित्व सिद्ध करावे असे सांगितले.
या बाल महोत्सवाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अशोक मारवाडी यांनी केले आहे.
0000
No comments:
Post a Comment