Thursday, 29 July 2021

DIO BULDANA NEWS 29.7.2021

 

माती व पाण्याच्या समृद्धीतूनच समृद्ध गाव साकार होईल 

-         जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती

बुलडाणा,(जिमाका) दि. 29 : गावाची समृद्धी माती आणि पाणी यावरच अवलंबून आहे. त्यामुळे पुढील कालावधीत समृद्ध गाव स्पर्धेतील सहभागी प्रत्येक गावाने आपल्या गावातील माती समृद्ध करण्यासाठी आणि शिवारात पाण्याची समृद्धी आणण्यासाठी जल व मृदसंधारण कामावर भर देणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतीपादन जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी केले आहे.

   पाणी फाउंडेशनकडून 2020  पासून सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धेला महाराष्ट्रातील एकूण 39 तालुक्यांमध्ये सुरुवात झालेली आहे. त्यामध्ये सहभागी गावाकरिता फेब्रुवारीमध्ये मिनी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पात्र असणाऱ्या गावांचा सन्मान सोहळा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय वॉटर कप द्वितीय पुरस्कार विजेते गाव सिंदखेड ता. मोताळा येथे आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात संबोधीत करताना जिल्हाधिकारी बोलत होते.  यावेळी उपजिल्हाधिकारी श्री. माचेवाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) जि. प राजेश लोखंडे,  वरिष्ठ भूजल वैज्ञानिक श्री. ढवळे, जि.प सदस्य निरंजन वाडे, गटविकास अधिकारी श्री. मोहोळ, वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. थोरात, तालुका कृषी अधिकारी श्री. कासार  आदी उपस्थित होते.

   जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, गावाच्या सामुहिक प्रयत्नातून सातत्यपूर्ण काम करीत राहिल्यास मोताळा तालुक्याचा नावलौकिक देशपातळीपर्यंत पोहोचेल. गावाच्या विकासाकरिता जिल्हा प्रशासनाचे पूर्ण क्षमतेने सहकार्य असणार आहे.  उपजिल्हाधिकारी श्री. माचेवाड यावेळी म्हणाले, नरेगा योजनेच्या माध्यमातून लखपती कुटुंब समृद्ध कुटुंब ही संकल्पना राबविण्यात येत आहे.  नरेगाची काम करण्याची पद्धत, आता बदलली असून मागेल ते काम  देण्याची कार्यपद्धती सध्या रोजगार हमी योजने मार्फत राबविण्यात येत आहे. रोजगार हमीच्या योग्य नियोजनातून गावातील बेरोजगारी तसेच आर्थिक अडचण निश्चितपणे सोडवल्या जाऊन शाश्‍वत विकासाकडे वाटचाल करता येते.

   कार्यक्रमामध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. लोखंडे म्हणाले, समृद्ध गाव स्पर्धेमध्ये काम करत असलेल्या सर्व गावांची कामगिरी समाधानकारक राहीली आहे. तसेच समृद्ध गाव स्पर्धेबरोबरच गावाने गावाची एकी आणि नेकी टिकवून ठेवावी.  त्याच्या जोरावर गावाचा विकास करावा. सन्मान सोहळा संपन्न झाल्यानंतर सर्व मान्यवरांनी सिंदखेड समृद्ध गाव स्पर्धेमध्ये करीत असलेल्या कामांची पाहणी केली. त्यामध्ये पर्जन्यमापक स्थळ, गावाने तयार केलेली गवत नर्सरी, बांधावरील वृक्ष लागवड, सोबतच 67 एकर वरती केलेली वृक्ष व गवत लागवडीच्या पाहणीचा समावेश आहे.

  संपूर्ण शिवारफेरी दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी अत्यंत बारकाईने गाव करीत असलेल्या कामाची पाहणी करून निरीक्षण केले. गावाची पुढील वाटचाल समजून घेतली. सन्मान सोहळ्यामध्ये जयपूर, जनुना, महाळुंगी जहागीर, वारुळी, पोखरी, चिंचपूर, पोहा, तिघ्रा, दाभा, उबाळखेड, शेलापुर खु, चिंचखेड नाथ आणि सिंदखेडा या 13 गावांना सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आले. तसेच पोफळी, लपाली, खामखेड, कोऱ्हाळा बाजार, अंत्री, रिधोरा जहागीर आणि भोरटेक या 7 गावांना सन्मानपत्र देऊन गौरवित करण्यात आले.  मोताळा तालुक्यातील विजयी गावांचा गौरव यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. सदर सन्मान सोहळ्यामध्ये श्रीमती कामिनीबाई राजगुरू, उबाळखेड यांना युएनडीपी, जलशक्ती मंत्रालय आणि स्टॉकहोम इंटरनॅशनल वॉटर इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने वॉटर वुमन वारियर हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सुद्धा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. प्रास्ताविक सुखदेव भोसले, पाणी फाउंडेशन, विभागीय समन्वयक यांनी  तर आभार प्रदर्शन दिलीप मोरे यांनी केले.

****

कोरोना अलर्ट : प्राप्त 2120 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 03 पॉझिटिव्ह

  • 04 रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा,(जिमाका) दि. 29 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 2123 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 2120 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 3 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये रॅपीड टेस्टमधील 3 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 499 तर रॅपिड टेस्टमधील 1621 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 2120 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : चिखली तालुका : अंचरवाडी 1, चिखली शहर : 1, दे. राजा तालुका : डोढ्रा 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 03 रूग्ण आढळले आहे.

      तसेच आज 04 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.   

   तसेच आजपर्यंत 635882 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86556 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या  86556 आहे.

  आज रोजी 1527 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 635882 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87250 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86556 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 22 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 672 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे. 

****

राष्ट्रीय लोक अदालतीचे 1 ऑगस्ट रोजी आयोजन

बुलडाणा,(जिमाका) दि. 23 : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणच्या आदेशान्वये जिल्ह्यात 1 ऑगस्ट 2021 रोजी बुलडाणा व तालुक्यांमध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. एकमेकांवर विजय मिळविल्याचा आनंद फक्त एक दिवस टिकतो पण तडजोड करून तसे प्रकरण एकमेकांना विश्वासात घेवून मिटविल्यास आपल्या जिवनातील विरोधक कमी होतात व त्याने आपण जास्त प्रगती करतो. त्यामुळे एकमेकांवर विजय मिळविण्याचा विचार करण्यापेक्षा तडजोड करून खटले निकाली काढल्यामुळे पक्षकारातील एकमेकांबद्दल असलेला तिरस्कार आणि आकस कमी होवून एकमेकांबद्दल प्रेमाने सद्भावना निर्माण होते.

   यानानीना विचार करुन राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण यांच्या आदेशान्वये 1 ऑगस्ट रोजी जिल्हयात सुध्दा लोक अदालतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. या संधीचा लाभ पक्षकारांनी भेटून दाखलपूर्व प्रकरणे आपसात तडजोडीद्वारे  निकाली काढावी, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या प्र. अध्यक्ष तथा प्र. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश चित्रा हंकारे, प्राधिकरणाचे सचिव साजिद आरिफ सैय्यद, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष विजयकुमार सावळे यांनी केले आहे.

  सदर लोकअदालतीत मोटार व्हेईकल अक्ट चे प्रकरणेसुद्धा तडजोडीसाठी मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आलेले असून त्यात तडलोड शुल्क न्यायालयीन दैनंदिन प्रक्रियेपेक्षा कमी आकारण्यात येणार आहे.  पक्षकारांनी या संधीचा फायदा जरूर घ्यावा.  लोकअदालतीत कोविड -१९ बाबत असलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करुन घेण्यात येणार आहे. आपण सर्वांनी मास्कचा वापर करणे, वारंवार हात धुणे व दोन गज सामाजिक दुरी ठेवणे बंधनकारक आहे. त्या नियमांचे काटेकोरपणे पालन करुन राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन जिल्ह्यात होणार आहे. राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातून प्रकरणे निकाली काढण्यासाठी पक्षकारांनी आणि संबंधितांनी नजिकच्या तालुका विधी सेवा समिती किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बुलडाणा येथे संपर्क साधावा. जेणेकरुन सदर प्रकरण सामजस्याने निकाली निघेल व आपला वेळ व खर्च वाचेल, असे आवाहन सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांनी कळविले आहे.

******

वृद्ध आई – वडीलांना मुले सांभाळत नसल्यास समाज कल्याणकडे तक्रार करावी

बुलडाणा,(जिमाका) दि. 29 : वृद्धांना त्यांची तक्रार दाखल करण्यासाठी जिल्ह्यातील सामाजिक न्याय विभागाच्या कार्यालयांमध्ये वृद्धांसाठी विशेष कक्ष सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कायद्याचा आधार घेवून प्राप्त तक्रारींना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न सामाजिक न्याय विभागाकडून केला जाणार आहे. मुले सांभाळ करीत नसतील, तर अशा वृद्धांच्या तक्रारींची सुनावणी घेण्याचे, त्यांना पोटगी मिळवून देण्याचे अधिकार कायद्याने महसूल विभागातील विभागीय प्रांत अधिकाऱ्यांकडे आहेत.

  अनेक सरकारी योजनांमध्ये वृद्धांना खास सवलती आहेत. त्यामुळे या योजनांची माहिती होणे, दावा करणे, तक्रार असल्यास ती देणे यासाठी प्रत्येक जिल्हा कार्यालयात कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षात वरिष्ठ लिपीक दर्जाचा अधिकारी प्रमुख असेल. आलेल्या प्रत्येक तक्रारीची दखल तो घेणार आहे. त्यासाठी कायद्याच्या आधारे पाठपुरावा करेल व तक्रारीचे निवारण करून घेईल. योजनांची माहितीही त्याच्याकडून वृद्ध नागरिकांना दिली जाईल. तक्रारदार व सरकारी यंत्रणा यांच्यातील समन्वयक म्हणून तो काम करेल, असे सहाय्यक आयुक्त डॉ अनिता राठोड यांनी कळविले आहे.

****

इमाव आर्थिक विकास महामंडळाचे विविध योजनांचे उद्दिष्ट प्राप्त

  • पात्र लाभार्थ्यांनी अर्ज करावे

बुलडाणा,(जिमाका) दि. 29 : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयासाठी सन 2021-22 या आर्थिक वर्षासाठी विविध योजनेचे उदिष्ट प्राप्त झाले आहे. जिल्ह्यासाठी बिजभांडवल योजनेचे 36, थेट कर्ज योजनेचे रक्कम रु. 1 लक्षपर्यंत 133, वैयक्तीक व्याज परतावा कर्ज योजनेचे 85 व गट कर्ज व्याज परतावा योजनेचे 12 चे  उद्दिष्ट प्रप्त झाले आहे. जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी योजनेसाठी अर्ज करावेत, असे आवाहन महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ कार्यालयाचे जिल्हा समन्वयक यांनी केले आहे.

  महामंडळाची 20 टक्के बीजभांडवल योजना ही राष्ट्रीयकृत बँकेच्या माध्यमातुन राबविण्यात येत आहे. एकूण मंजुर कर्ज रकमेत महामंडळाचा सहभाग 20 टक्के,  बँकेचा सहभाग 75 टक्के व लाभार्थी सहभाग 5 टक्के आहे. कर्जाची मर्यादा रू. 5 लाख व कर्ज परतफेडीचा कालावधी 5 वर्ष आहे.  थेट कर्ज योजना  ही महामंडळामार्फत राबवली जाते. कर्ज मर्यादा रू. 1 लाख आहे. लाभासाठी अर्जदाराचा सिबल क्रेडीट स्कोअर किमान 500 आवश्यक आहे. कर्ज परतफेडीचा कालावधी 4 वर्ष आहे. नियमीत कर्ज परतफेड करणा-या लाभार्थ्यांना व्याज आकारण्यात येणार नाही.

  वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजना ही बँकेमार्फत राबविली जाते. कर्ज मर्यादा रू.10 लाख (ऑनलाइन ) महामंडळाच्या वेब पोर्टलवर नाव नोंदनी आवश्यक आहे. कर्ज रकमेचे हप्ते नियमीत भरल्यास व्याजाची रक्कम अनुदान स्वरूपात लाभार्थ्यांच्या आधार लिंक खात्यात दरमहा महामंडळा मार्फत जमा करण्यात येईल. कुटूंबाची वार्षीक उत्पन्न मर्यादा रु.8 लाख पर्यंत असावी. अर्जदार इतर मागास प्रवर्गातील  असावा, महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा, महामंडळाच्या वा इतर महामंडळाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा, एकत्रित कुटूंबाचे सर्व मार्गांनी मिळणारे वार्षीक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त नसावे, केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही योजनेचा थकबाकीदार नसावा, वयोमर्यादा 18 ते 50 वर्ष पात्र निकषात बसणाऱ्या अर्जासाठी व अधिक माहिती तसेच अटी/ शर्तीसाठी आधार कार्ड,  जात प्रमाणपत्रासह जिल्हा कार्यालय, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन , चिखली रोड, बुलडाणा या कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा कार्यालयाचा दुरध्वनी क्र. 07262-248285 क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ लि. बुलडाणा यांनी केले आहे.

*****

 

 

 

धर्मादाय संस्थांनी पुरग्रस्तांसाठी मदत करावी

  • सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाचे आवाहन

बुलडाणा,(जिमाका) दि. 29 : राज्यातील कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये आलेल्या महापूरामुळे खुप मोठी जिपीत हानी व नुकसान झालेले आहे. महापूर, दरड कोसळल्यामुळे राज्यात निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता, गरीब व कष्टकरी, मजूर यांच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी, त्यांना जिवनावश्यक वस्तु, अन्नधान्य, औषधोपचार आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये आर्थिक स्वरूपात मदत करण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे. अशा परिस्थितीत शासन त्यांचे परीने आवश्यक त्या सर्व उपाय योजना करीत आहेच. मात्र सामाजिक बांधिलकी व सामाजिक उत्तरदायित्व म्हणून, स्थापन झालेल्या धर्मादाय संस्था यांनी सदर कामी पुढाकार घेणे गरजेचे आहे.

    जेणेकरून गरजूंना शक्य ती मदत करता येईल. त्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याशी समन्वय साधून गरजुंना धर्मादाय संस्थांनी शक्य ती मदत करावी. आर्थिक स्वरूपातील मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयामार्फत मुख्यमंत्री सहाय्यता निधी, बचत खाते क्रमांक 10972433751, स्टेट बँक ऑफ इंडिया, मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई 400001, शाखा कोड 00300, आयएफएस कोड SBIN0000300 यावर धनादेश किंवा डिडी द्वारे शक्य तितक्या लवकर करावी, असे आवाहन राज्याचे धर्मादाय आयुक्त प्र. श्रा. तरारे यांनी केले आहे.   

ऑगस्ट महिन्याचा लोकशाही दिन होणार ई लोकशाही दिन

कोरोना संसर्ग पार्श्वभूमीमुळे निर्णय

मोबाईल क्रमांक 7249093265 वर ऑनलाईन तक्रारी कराव्यात

व्हिडीओ कॉलद्वारे तक्रारदाराशी साधणार संपर्क

बुलडाणा,(जिमाका) दि. 29 : प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन करण्यात येते. या दिवशी जिल्हाधिकारी व इतर शासकीय अधिकारी,नागरिकांच्या तक्रारींचे निरसन करतात. मात्र सध्या सुरू असलेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमी व नियमित बस सेवा विस्कळीत नसल्यामुळे ऑगसट महिन्याचा लोकशाही दिन ई- लोकशाही दिन पद्धतीने घेण्यात येणार आहे. त्यानुसार सोमवार 2 ऑगस्ट रोजी ई लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.

   या लोकशाही दिनी तक्रारदारांनी ऑनलाईन पद्धतीने 7249093265 या मोबाईल क्रमांकावर तक्रारी कराव्यात. त्यामुळे तक्रारदारांना लोकशाही दिनाला स्वत: उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही. तक्रारदारांनी दिलेल्या व्हॉट्सॲप क्रमांकावर व्हिडीओ कॉल करून संपर्क साधण्यात येणार आहे. तक्रारदाराने सदर मोबाईल व्हॉट्सॲप क्रमाकांचे त्याकाळात इंटरनेट सुरू असण्याची खातरजमा करायची आहे.

    तालुका स्तरावरील लोकशाही दिनानंतर 1 महिन्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही दिनात अर्ज करता येतो. तसेच तक्रारदारांबरोबर त्रयस्थाने येऊ नये. अर्जदाराने एका अर्जात एकच तक्रार सादर करावी. एकापेक्षा जास्त तक्रारी असलेला अर्ज स्विकारला जाणार नाही. तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावी, त्याचप्रमाणे न्यायप्रविष्ठ प्रकरणे, राजस्व/ अपिल, सेवा व आस्थापना विषयक बाबी, विहित नमुन्यात नसलेले तसेच आवश्यक त्‍या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज, विविध न्यायालयात, प्राधिकाऱ्यांकडील, लोकआयुक्त यांच्याकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांच्या तक्रारी स्विकारल्या जाणार नाहीत, असे अर्ज संबंधित विभागाकडे आवश्यक कार्यवाहीसाठी 8 दिवसात पाठविण्यात येतील. त्याची एक प्रत अर्जदारास पाठविण्यात येईल, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.

******

No comments:

Post a Comment