अखिल भारतीय नागरी सेवा स्पर्धेचे आयोजन
इच्छूकांनी 31 ऑक्टोंबर 2021 पर्यंत अर्ज करावे
बुलडाणा (जिमाका), दि. 27 : केंद्रीय क्रीडा नियंत्रण मंडळ,नवी दिल्ली यांच्या वतीने विविध खेळ प्रकारातील अखिल भारतीय नागरी सेवा स्पर्धा दरवर्षी आयोजीत केल्या जातात. केंद्रीय क्रीडा नियंत्रण मंडळाच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखाली या स्पर्धासाठी विवीध खेळ प्रकारातील महाराष्ट्र शासनाचा संघ, निवड चाचणी घेवून स्पर्धांसाठी पाठविले जातात.
राज्य शासनाकडून सचिवालय जिमखान्यास या स्पर्धासाठी महाराष्ट्र शासनाचा विवीध खेळ प्रकारातील संघ निवडण्याची व त्यांच्या प्रशिक्षण शिबीराची जबाबदारी सोपविली आहे. त्यामुळे जिल्हयातील प्रशायकीय विभागात/ कार्यालयात किंवा आपल्या विभागाच्या अधिपत्याखालील असलेले कार्यालय/विभागामध्ये कार्यरत असलेले खेळाडू/ कर्मचा-यांच्या निदर्शनास सदर बाब आणून टेबल टेनिस, बॅडमिंटन, फुटबॉल, हॉकी, क्रीकेट, व्हॉलीबॉल, जलतरण, बास्केटबॉल, ब्रीज, कॅरम, बुध्दीबळ, ॲथलेटीक्स, लघुनाटय, कबड्डी, वेटलिफ्टींग, पावरलिफ्टींग, शरीरसौष्ठव, कुस्ती, लॉनटेनिस, नृत्य व संगीत इत्यादी खेळ प्रकारात अखिल भारतीय भारतीय नागरी सेवा स्पर्धेतून ज्या खेळाडू/कर्मचा-यांना भाग घ्यावयाचा असेल (प्रत्येक खेळ प्रकारासाठी स्वतंत्र विहीत नमुन्यात अर्ज सादर करणे आवश्यक आहे.) त्यांनी दि. 31 ऑक्टोंबर 2021 पुर्वी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, क्रीडा नगरी जांभरून रोड, बुलडाणा येथे संपर्क साधून विहीत नमुण्यातील आवेदनपत्र प्राप्त करून घेवून, दिनांक 10.11.2021 पर्यंत, आवेदन पत्र सुअक्षरात भरुन, आपल्या कार्यालय प्रमुख/विभाग प्रमुख यांच्या मान्यतेने, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बुलडाणा येथे तीन प्रतीत अर्ज, आवश्यक प्रमाणपत्राच्या झेरॉक्स प्रतीसह सादर करण्यात यावे , असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.
*******
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानात जिल्ह्यातील गळीत, नगदी व कडधान्य पिकांचा समावेश
बुलडाणा, (जिमाका) दि 27: सन 2014-15 पासुन सुधारीत मार्गदर्शक सुचनांनुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. सन २०१८-१९ पासून या अभियानात पौष्टिक तृणधान्य व गळीतधान्य पिकांचा समावेश करण्यात आला आहे. या अभियानासाठी निधीची तरतूद केंद्र व राज्य 60-40 टक्के प्रमाणे आहे. या योजनेचा उद्देश क्षेत्र विस्तार व उत्पादकतेमध्ये वाढ करून शेतकऱ्यांच्या उत्पादनात शाश्वत वाढ करणे. जमिनीची सुपीकता व उत्पादन क्षमता वाढविणे. शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावणे हा आहे. तसेच अपरंपारिक भातपड क्षेत्रावर कडधान्य / गळीतधान्य पिकाच्या क्षेत्र वृद्धी व उत्पादकतेत वाढ करणे हा आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानात जिल्ह्यातील अन्नधान्य कडधान्य व गळीत धान्य पिकांचा समावेश आहे. तसेच पौष्टिक तृण धान्य पिके, नगदी पिकात कापूस पिकाचा समावेश आहे. अभियानामध्ये पीक प्रात्यक्षिके, पीक पद्धतीवर आधारीत प्रात्यक्षिके (आंतरपिक), मुलभूत बियाणे खरेदी (गळीतधान्य), प्रमाणित बियाणे वितरण व बियाणे उत्पादनास अर्थसहाय्य, एकात्मिक कीड व अन्नद्रव्ये व्यवस्थापन, सुधारित कृषि औजारे व सिंचन साधन, पीक पध्दतीवर आधारीत प्रशिक्षण आदींचा समावेश आहे. शेतकऱ्यांचे शेतमालाचे मुल्यवर्धनासाठी मिनी राईस मिल, मिनी दाल मिल (शेतकरी गटासाठी), बीज प्रक्रिया संच (FPO साठी), भात शेतीमध्ये मत्स्यपालन, तेलघाणी इ. घटकांची स्थानिक पुढाकाराच्या बाबींतर्गत अंमलबजावणी अभियान अंतर्गत केली जाणार आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत सन २०२१-२२ साठी अन्नधान्य पिकांसाठी रु. २२४८४.०० लाखाचा, गळीतधान्य व वृक्षजन्य तेलबिया पिकांसाठी रु. ७०६२.५५ लाखाचा आणि नगदी पिकांसाठी रू.739.00 लाखाचा कार्यक्रम मंजूर आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अन्नधान्य/गळीतधान्य/नगदी पिके सन २०२१-२२ अंतर्गत रब्बी हंगामामध्ये कडधान्य, गळीतधान्य व तृणधान्या पिकांचे अनुदानित दराने बियाणे वितरण, पीक प्रात्यक्षिके, सुधारित कृषि औजारे व सिंचन साधने या बाबींचे अनुदान प्राप्त करण्यासाठी शेतकऱ्यांनी महा-डीबीटी पोर्टलवर नोंदणी करून अर्ज करावेत. महा-डीबीटी पोर्टलवर नोंद केलेल्या शेतकऱ्यांमधून मंजूर कार्यक्रमाच्या मर्यादेत लॉटरी पद्धतीने लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाच्या सविस्तर मार्गदर्शक सूचनांसाठी कृषि विभागाच्या http://krishi.maharashtra.gov. in या वेबसाईट ला भेट द्यावी किंवा अधिक माहितीसाठी कृषि सहाय्यक/ कृषि पर्यवेक्षक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
*****
*कोरोना अलर्ट : प्राप्त 1394 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 06 पॉझिटिव्ह*
बुलडाणा,(जिमाका) दि. 27 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1400 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1394 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 6 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 3 व रॅपीड टेस्टमधील 3 अहवालाचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 302 तर रॅपिड टेस्टमधील 1092 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 1396 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : संग्रामपूर तालुका : पातुर्डा 1, वकाणा 1, संग्रामपूर शहर : 1, चिखली तालुका : डोढरा 1, अंत्री खेडेकर 1, बुलडाणा तालुका : सुंदरखेड 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 06 रूग्ण आढळले आहे.
तसेच आजपर्यंत 631258 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86552 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 86552 आहे.
आज रोजी 1556 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 631258 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87246 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86552 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 22 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 672 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
No comments:
Post a Comment