Monday, 12 July 2021

DIO BULDANA NEWS 12.7.2021

 



महाराष्ट्रातील 10 खेळाडूंची टोकीयो ऑलिम्पिक साठी निवड

·         खेळाडूंच्या प्रोत्साहनासाठी जागतिक दर्जाच्या लोणार सरोवर येथे सेल्फी पॉईंटची निर्मिती

बुलडाणा, (जिमाका) दि. 12 : ऑलिम्पिक टोकीयो-2020 चे आयोजन 23 जुलै ते 5 सप्टेंबर 2021 दरम्यान होणार आहे.  महाराष्ट्राला अभिमान म्हणजे यावेळी 10 खेळाडूंची निवड टोकीयो ऑलिम्पिकसाठी झाली आहे.  त्यामुळे हा आनंदाचा क्षण साजरा करणे आवश्यक आहे.  ऑलिम्पिकचा कुंभमेळा म्हणजेच टोकीयो-2020 आशिया खंडात टोकीयो या शहरात दुसऱ्यांदा आयोजित होत आहे. एकाच शहरात दोनवेळा ऑलिम्पिक आयोजीत होणारे टोकीयो हे आशियाई खंडातील पहिलेच शहर आहे.  

     राज्यातील सहभागी खेळाडूंना अधिकाधिक प्रोत्साहन मिळण्यासत्यांचे मनोबल वाढण्यास23 जुलै 2021 टोकीयो ऑलिम्पिकचे औचित्य साधुन ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या भारतातील व राज्यतील सर्व सहभागी खेळाडूंना शुभेच्छा व प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांचे मार्गदर्शनात जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.  यामध्ये प्रामुख्याने जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुलबुलडाणा आणि जिल्हा क्रीडा संकुलक्रीडानगरीजांभरुन रोडबुलडाणातालुका क्रीडा संकुलमलकापूररेल्वे स्टेशनमलकापूर इत्यादी ठिकाणी शुभेच्छा बॅनरसेल्फी पॉईंटस्टॅडी लावण्यात आलेले आहेत.

      जागतीक दर्जाचे खाऱ्या पाण्याचे सरोवरपर्यटन स्थळ लोणार सरोवर परिसर व पंचायत समिती समोरील लोणार धार पॉईंट याठिकाणी ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंकरीता प्रोत्साहन देण्यासाठी शुभेच्छा बॅनर व स्टॅडी तर क्रीडाप्रेमी नागरीकांसाठी सेल्फी पॉईंटची निर्मिती जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांचेमार्फत करण्यात आली आहे.

  ऑलीम्पीकसाठी राज्यातील राही जिवन सरनोबत (शुटींगकोल्हापूर) 25 मी. पीस्टलमहाराष्ट्र शासनात थेट नियुक्तीद्वारे उपजिल्हाधिकारी पदी नेमणुकतेजस्वीनी सावंत (शुटींगकोल्हापूर) 50 मी. थ्री रायफलक्रीडा विभागात विशेष कार्यकारी अधिकारी म्हणुन नेमणुकअविनाश साबळे (ॲथलेटीक्सबिड) 3000 मी. स्टीपलचेससेनादलामध्ये नायक सुभेदार पदी कार्यरतप्रविण जाधव (तिरंदाजी, (आर्चरी) सातारा) रिकर्व्हसेनादलामध्ये नायक सुभेदार पदी कार्यरतचिराग चंद्रशेखर शेट्टी (बॅडमिंटनमुंबई) पुरुष दुहेरीअ-श्रेणी अधिकारीइंडीयन ऑईल, विष्णु सरवानन (सेलींगमुंबई) लेजर स्टॅण्डर्ड क्लाससेनादलामध्ये नायक सुभेदार पदी कार्यरतउदयन माने (गोल्फमहाराष्ट्र)सुयश नारायण जाधव (पॅरास्विमरसोलापुर) 50 मी. बटरफ्लाय200 मी.महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागात थेट नियुक्तीद्वारे अ श्रेणी क्रीडा मार्गदर्शक पदी नियुक्तीभाग्यश्री जाधव (पॅराऑलिम्पिकगोळाफेकनांदेड)स्वरुप महावीर उन्हाळकर (पॅराशुटींगकोल्हापूर) 10 मी.रायफल यांचा समावेश आहे.

           जिल्ह्यातील क्रीडाप्रेमी नागरीकक्रीडा मंडळेसंस्थाखेळाडूएकविध खेळ क्रीडा संघटनाशारीरिक शिक्षण शिक्षकविविध शासकीय / निमशासकीय अधिकारी-कर्मचारी यांनी ज्या ठिकाणी सेल्फी पॉईंटची निर्मिती केलेली आहे. त्याठिकाणी सेल्फी काढून व्हाट्सॲपफेसबुकट्विटरयुट्युब च्या माध्यमातुन महाराष्ट्रातील खेळाडूंना शुभेच्छा प्रदान कराव्यात.  तसेच सहभागी महाराष्ट्रातील खेळाडूंनी अधिकाधिक मेडल्स भारतासाठी जिंकावेत अशी सर्व क्रीडाप्रेमींनी अपेक्षा व्यक्त करुन शुभेच्छा प्रदान कराव्यात.  लोणार सरोवर येथे भारतीय पुरातत्व विभागाचे श्री.भगतविठ्ठल घारोडसुरेश गुळवेक्रीडा मार्गदर्शक अनिल इंगळे, विनोद गायकवाडभिमराव पवारक्रीडाप्रेमींच्या उपस्थितीत सेल्फी पॉईंटची निर्मिती केली आहे.     

   जिल्ह्यात खेळाचे वातावरण तयार होण्याकरीता सेल्फी पॉईंटस्टँडीशुभेच्छा बॅनर ची निर्मिती करण्यात आली आहे. जिल्ह्यातील क्रीडाप्रेमी नागरीकक्रीडा मंडळेसंस्थाखेळाडूएकविध खेळ क्रीडा संघटनाशारीरिक शिक्षण शिक्षकविविध शासकीय / निमशासकीय अधिकारी-कर्मचारी यांनी लाभ घेऊन शुभेच्छा प्रदान कराव्यात व खेळाडूंनी अधिकाधिक मेडल्स प्राप्त करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.


जिल्ह्यात कुठे जोरदार पाऊस, तर कुठे रिपरिप

  • मेहकर तालुक्यात सर्वात जास्त पाऊस

बुलडाणा, (जिमाका) दि. 12 - जिल्ह्यात 11 जुलै रोजी पर्जन्यधारांनी कुठे जोरदार, तर कुठे रिपरिप हजेरी लावली. या हजेरीमुळे पावसासाठी आसुललेल्या पिकांना नक्कीच जिवदान मिळाले. मात्र अजूनही बऱ्याच भागात दमदार पावसाची प्रतिक्षा कायम आहे.   या पावसामुळे रखडलेल्या पेरण्या करण्यामध्ये बळीराजा व्यस्त आहे. जिल्ह्यात सकाळी 8 वाजेपर्यंत महसूल विभागाकडील आकडेवारीनुसार मेहकर तालुक्यात सर्वात जास्त 40 मि.मी पावसाची नोंद करण्यात आली आहे.   

   जिल्ह्यात आज 12 जुलै 2021 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती विभागाकडून प्राप्त आकडेवारीनुसार पावसाची झालेली नोंद पुढीलप्रमाणे : कंसातील आकडेवारी आतापर्यंत पडलेल्या पावसाची – सर्वात जास्त पाऊस मेहकर : 40.7 मि.मी (395 मि. मी), मलकापूर : 33.8 (125.2 मि. मी), संग्रामपूर: 33.5 (172.8), खामगांव : 33 (252.8), नांदुरा : 22.6 (139.8),  चिखली : 16.7 (302.2), सिं. राजा : 14 (329.8), बुलडाणा : 13.9 (175.3), मोताळा : 12.3 (162.8), लोणार : 10.4 (272.4), दे. राजा : 8.1 (219.3), जळगांव जामोद : 7.9 (60.8) आणि सर्वात कमी शेगांव तालुक्यात निरंक पावसाची नोंद असून आजपर्यंत 66 मि.मी पावसाची नोंद करण्यात आली. अशाप्रकारे जिल्ह्यात एकूण 246.9 मि. मी पावसाची नोंद करण्यात आली असून त्याची सरासरी 19 मि. मी आहे. आतापर्यंत सर्वात जास्त 395 मि.मी पाऊस मेहकर तालुक्यात झाला असून सर्वात कमी पाऊस दे.राजा तालुक्यात 60.8 मि.मी झाला आहे. जिल्ह्यात 1 जुन 2021 पासून आतापर्यंत पडलेल्या पावसाची सरासरी 205.7 मि. मी आहे.

******

कोरोना अलर्ट : प्राप्त 757 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 18 पॉझिटिव्ह

  • 27 रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा,(जिमाका) दि.12 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 775 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 757 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 18 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 9 व रॅपीड टेस्टमधील 9 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 356 तर रॅपिड टेस्टमधील 401 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 757 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : नांदुरा शहर : 3, खामगांव शहर : 1, सिं. राजा तालुका : साखरखेर्डा 2, जळगांव जामोद तालुका : बोराळा 1, चिखली शहर : 2, चिखली तालुका : बेराळा 1, दे. राजा शहर : 2, दे. राजा तालुका : मंडपगांव 1, मेहकर तालुका : चिंचोली 1, बुलडाणा शहर : 1, बुलडाणा तालुका : देऊळघाट 1, लोणार तालुका : टिटवी 2 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत.  अशाप्रकारे जिल्ह्यात 18 रूग्ण आढळले आहे. 

      तसेच आज 27 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.   

   तसेच आजपर्यंत 602646 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86386 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या  86386 आहे.

  आज रोजी 1360 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 602646 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87134 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86386 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 83 सक्रीय रूग्ण असून उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 665 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

****

 

विमा योजनेच्या थेट एजंट भरतीसाठी अर्ज सादर करावे

  • 31 जुलै रोजी इच्छूक उमेदवारांनी डाक घर कार्यालयात उपस्थित रहावे

बुलडाणा,(जिमाका) दि.12 : महाराष्ट्र व गोवा राज्यात टपाज जीवन विमा व ग्रामीण टपाल जीवन विमा योजनेसाठी थेट एजंट भरतीकरिता अर्ज मागविण्यात येत आहे. एजंट भरती करीता इच्छूक उमेदवारांनी अर्ज सादर करावे. इच्छूक उमेदवारांनी अधिक्षक डाक घर कार्यालय, बुलडाणा येथे विहीत नमुन्यातील अर्ज आणि सर्व शैक्षणिक प्रमाणपत्र, त्यामध्ये प्रामुख्याने 10 वी किंवा 12 वी बोर्डाचे प्रमाणपत्र, जन्मतारखेचे प्रमाणपत्र असावे. तसेच पॅन कार्ड, आधार कार्ड व अन्य संबंधित दस्तऐवज सोबत घेवून 31 जुलै 2021 रोजी सकाळी 11 ते दु 2 वाजेपर्यंत उपस्थित रहावे.

   एजंटसाठी उमेदवाराचे वय 18 ते 60 वर्ष दरम्यान असावे, किमान 10 वी उत्तीर्ण असावी, उमेदवाराची निवड थेट मुलाखतीद्वारे व्यावसायिक कौशल्य, व्यक्तिमत्व, परस्पर संबंधाचे कौशल्य, जीवन विम्याबाबतचे ज्ञानाच्या आधारावर केली जाणार आहे. बेरोजगारीत किंवा स्वयंम रोजगारीत शिक्षीत युवक, माजी जीवन सल्लागार, इन्शुरन्स कंपनीचे माजी एजंट, माजी सैनिक, अंगणवाडी सेविका, महिला मंडळ सेविका, सेवा निवृत्त शिक्षक व इतरांनी अर्ज करावेत. निवड झालेल्या उमेदवारास 5 हजार रूपये अनामत रक्कम सुरक्षा ठेव म्हणून ठेवावी लागणार आहे. जी एनएससी अथवा केव्हीपीच्या स्वरूपात राहील. प्रशिक्षण पूर्तता नंतर डाक विभागाकडून तात्पुरत्या परवाना देण्यात येईल, जो आयआरडीए ची परवाना परीक्षा पास केल्यानंतर कायमच्या परवान्यामध्ये रूपांतरीत केल्या जाणार आहे. आयरडीएची परवाना परीक्षा नियुक्तीनंतर 3 वर्षाचे आत पास करणे अनिवार्य राहील. निवड झालेल्या उमेदवारास डाक विभागाने वेळोवेळी ठरविलेले कमिशन दिले जाणार आहे. अधिक माहितीसाठी नजीकच्या डाक कार्यालयात किंवा www.maharashtrapost.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन डाक अधिक्षक यांनी केले आहे.

*****


जिल्ह्यात मत्स्य शेतकरी दिन उत्साहात साजरा

बुलडाणा,(जिमाका) दि.12 :  जिल्ह्यात केंद्र शासनाच्या धोरणानुसार 10 जुलै हा दिवस मत्स्य शेतकरी दिन म्हणून साजरा करण्यात आला. या दिनानिमित्ताने ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. मोताळा तालुक्यातील मोहेगांव येथे पोर्टेबल हॅचरी लाभार्थी मकसूद बिसमिल्ला चौधरी यांच्या हॅचेरी ठिकाणी मत्स्य शेतकरी दिवस साजरा करण्यात आला. यावेळी सहायक आयुक्त स. इ नायकवडी यांनी उपस्थित शेतकरी बांधवांना मस्त्य शेतीबद्दल मार्गदर्शन केले.

    तसेच लोणार तालुक्यातील टिटवी येथे आदिवासी मत्स्यव्यवसाय संस्थेच्यावतीने राष्ट्रीय मत्स्य व मत्स्य शेतकरी दिनाचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी संस्थेचे अध्यक्ष भगवान कोकाटे यांनी मत्स्यव्यवसाय सभासदांना मासेमारी विषयी  मार्गदर्शन केले. ते महणाले, तलाव, पाझर तलाव, गाव तलाव यामध्ये मत्स्य बीज सोडून खाद्य टाकून 500 ग्रॅम झाल्यानंतर विक्री करावी, त्यामुळे  रोजगार मिळतो. या क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान अवगत करून जास्तीचे उत्पन्न घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.  मत्स्यबीज उत्पादन केंद्र, कोराडी ता. मेहकर येथे केंद्राधिकारी निखील साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली सदर दिवस साजरा करण्यात आला. यावेळी प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेविषयी माहिती उपस्थित शेतकऱ्यांना देण्यात आली. राष्ट्रीय मत्स्य दिनास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाल्यामुळे जिल्ह्यात नक्कीच मत्स्यव्यवसायास चालना मिळणार, आहे अशी भावना सहायक आयुक्त श्री. नायकवडी यांनी व्यक्त केली आहे.

*******

जागृती ॲग्रो फुड्स इंडिया कंपनीने फसवणूक केली असल्यास संपर्क साधावा

  • आर्थिक गुन्हे शाखेचे आवाहन

बुलडाणा,(जिमाका) दि.12 :  जागृती ॲग्रो फुड्स इंडिया प्रा. लि. मार्केट यार्ड, चेंबर भवन, सांगली या कंपनीने गुंतवणूकीवरील परताव्याचे पैसे परत न करता विश्वासघात करून फसवणूक केली आहे. अशी फिर्याद 16.9.2015 रोजी बुलडाणा शहर पोलीस स्टेशन येथे प्यारेलाल जयस्वाल, विष्णूवाडी, बुलडाणा यांनी दिली होती. त्यानुसार पोलीसांनी राज गणपत गायकवाड व इतर 10 आरोपीविरूद्ध कलम 420, 406, 34 भादंवि सह कलम 3, 4 महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय आस्थापनामधील) हितसंबंधाचे रक्षण करण्याबाबत अधिनियम 1999 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

    तरी राज गणपत गायकवाड व इतर 10 आरोपींनी अन्य जनतेची देखील  अशा प्रकारची फसवणूक केल्याची शक्यता आहे. अशाप्रकारची फसवणूक झालेले आणखी जिल्ह्यातील काही व्यक्ती असल्यास त्यांनी आर्थिक गुन्हे शाखा, बुलडाणा येथे संपर्क साधावा किंवा स्वत: आपला जबाब नोंदविणे कामी आपल्याजवळ असलेल्या मूळ कागदपत्रांसह आर्थिक गुन्हे शाखा, भारत शाळेचे समोर, पोलीस स्टेशन, बुलडाणा शहरचे आवार, बुलडाणा येथे उपस्थित रहावे किंवा मोबाईल क्रमांक 9823327105 वर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील आर्थिक गुन्हे शाखा, बुलडाणा यांनी केले आहे.

*****

No comments:

Post a Comment