नैसर्गिक आपत्तीमध्ये मृत्यू अथवा अपंगत्व आलेल्या
शेतकरी कुटुंबीयांचे विमा प्रस्ताव तात्काळ सादर करावे
*कृषी विभागाचे आवाहन
बुलडाणा, (जिमाका) दि २८: नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यांमध्ये बऱ्याच ठिकाणी दरड कोसळून, पुराच्या पाण्यात वाहून किंवा अन्य अपघाताने शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांचा दुर्दैवी मृत्यू अथवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्याच्या घटना घडलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सदर कुटुंबियांच्या वारसदारांना आर्थिक मदत होण्यासाठी राज्य शासनाच्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत रुपये एक ते दोन लाखांपर्यंत विमा संरक्षण उपलब्ध आहे.अपघातग्रस्तांच्या वारसदारांनी आपल्या कार्यक्षेत्रातील कृषी पर्यवेक्षक किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क करुन विमा प्रस्ताव सादर करावा.विमा प्रस्तावासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे संबंधित विभागांनी प्राधान्याने उपलब्ध करून द्यावी,जेणेकरून बाधित कुटुंबास विमा संरक्षणाचा लाभ शीघ्रतेने देता येईल. विमा प्रस्ताव तयार करणेकामी ऑक्झीलियम इन्शुरन्स ब्रोकिंग कंपनीच्या जिल्हा प्रतिनिधींची मदत घ्यावी. या विमा सल्लागार कंपनीचा टोल फ्री क्रमांक 1800 220 812 असा आहे.अपघात ग्रस्त शेतकरी कुटुंबियांच्या वारसदारांनी युनिव्हर्सल सोंपो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांक 1800 22 40 30 किंवा 1800 200 40 30 यावर पूर्व सूचनेची नोंद करावी, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
****
अभियान राबवून जिल्हा कॅन्सरमुक्त करण्याचा प्रयत्न करणार
- ना.डॉ.राजेंद्र शिंगणे
बुलडाणा, (जिमाका) दि २८: कॅन्सर अर्थातच कर्करोग, या आजारामुळे देशातच नव्हे तर संपूर्ण जगात अनेकांचा मृत्यू होतो. कॅन्सरवर अद्यापही प्रतिबंधक लस मिळालेली नाही. परंतु जनजागृती, प्रतिबंध, निदान व उपचार अभियान राबविल्यास निश्चितच कॅन्सरवर नियंत्रण मिळविता येऊ शकते. हीच बाब हेरून जिल्ह्यात अशा स्वरूपाचे अभियान राबवून जिल्हा कॅन्सरमुक्त करण्याचा निर्धार करावा, अशा सूचना राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना डॉ राजेंद्रजी शिंगणे यांनी दिल्या आहेत. यावेळी त्यांनी जिल्हा कॅन्सर मुक्त करण्याचा निश्चयही व्यक्त केला.
यासंदर्भात स्थानिक विश्रामगृह येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये तोंडाचा कॅन्सर, गर्भाशयाचा कॅन्सर, ब्रेस्टचा कॅन्सर होण्याची नेमकी कारणे व त्यावर कशाप्रकारे नियंत्रण मिळविता येऊ शकते, यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यावेळी पालकमंत्री बोलत होते. कर्करोगासंदर्भात व्यापक जनजागृती केल्यास व याचे वेळीच निदान व उपचार झाल्यास आपण यावर नियंत्रण मिळवू शकतो असा विश्वास कँसर प्रकल्पाचे सल्लागार डॉ नंदकुमार पानसे यांनी यावेळी व्यक्त केला.
कॅन्सर वरील उपचारास मोठ्याप्रमाणात खर्च येतो. हा उपचार खर्च सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरचा असून जिल्ह्यात कॅन्सर जनजागृती, प्रतिबंध, निदान व उपचार अभियान राबविल्यास जिल्ह्यातील लाखों सामान्य लोकांना याचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे हे अभियान जिल्ह्यात राबवण्याच्या सूचना पालकमंत्री ना.डॉ शिंगणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. या बैठकीस कँसर प्रकल्पाचे सल्लागार डॉ नंदकुमार पानसे, विजया दुलंगे, प्रदीप सोळुंके, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कांबळे, जिल्हा नियोजन अधिकारी श्री. लाड, सह.जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ उपस्थित होते.
******
कोरोना अलर्ट : प्राप्त 2504 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 01 पॉझिटिव्ह
बुलडाणा,(जिमाका) दि. २८ : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 2505 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 2504 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 1 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये रॅपीड टेस्टमधील एका अहवालाचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 634 तर रॅपिड टेस्टमधील 1870 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 2504 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेला अहवाल पुढीलप्रमाणे : चिखली शहर : डी.पि.रोड 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आली आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात 01 नवीन रूग्ण आढळला आहे.
तसेच आजपर्यंत 633762 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86552 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 86552 आहे.
आज रोजी 1504 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 633762 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87247 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86552 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 23 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 672 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
No comments:
Post a Comment