कोरोना अलर्ट : प्राप्त 348 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 82 पॉझिटिव्ह
• 76 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा,(जिमाका) दि. 16 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 430 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 348 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 82 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 56 व रॅपीड अँटीजेन टेस्टमधील 26 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 176 तर रॅपिड टेस्टमधील 172 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 348 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर : 37, बुलडाणा तालुका : सुंदरखेड 1, गिरडा 1, दहीद 1, चांडोळ 1, चिखली तालुका : हिवरा 1, अमडापूर 1, धोत्रा भणगोजी 1, हातणी 1, चिखली शहर : 11, दे. राजा शहर : 1, दे. राजा तालुका : सिनगांव जहागीर 2, दे. मही 1, दगडवाडी 1, लोणार शहर : 4, सिं. राजा शहर : 2, सिं. राजा तालुका : रूम्हणा 1, शेंदुर्जन 1, मेहकर शहर : 4, मेहकर तालुका : गुंधा 1, मुंदेफळ 1, डोणगांव 2, नांदुरा शहर : 1, नांदुरा तालुका : झाडेगांव 1, मूळ पत्ता मुर्तीजापूर जि. अकोला 1, माहोरा ता. जाफ्राबाद 2, संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 82 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान अंजनी खु ता. मेहकर येथील 55 वर्षीय महिला रूग्णाचा मृत्यू झाला आहे.
तसेच आज 76 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
विविध तालुक्यातील कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : बुलडाणा : स्त्री रूग्णालय 2, अपंग विद्यालय 12, खामगांव : 9, दे. राजा : 17, सिं. राजा : 3, चिखली : 9, शेगांव : 5, मलकापूर : 3, लोणार : 6, जळगांव जामोद : 1, मेहकर : 8,
तसेच आजपर्यंत 115951 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 14221 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 14221 आहे.
तसेच 1067 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 115951 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 15026 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 14221 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 627 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 178 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
*******
कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी ‘कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग’ वाढवावे
- जिल्हाधिकारी एस रामामूर्ती
- विनामास्क, सोशल डिस्टसिंगचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई
- चाचण्यांचे प्रमाण वाढवा, मोबाईल टेस्टींग युनीट सुरू करा
- होम आयसोलेशनची सुविधा बंद करावी
बुलडाणा,(जिमाका) दि. 16 : कोरोना संसर्गाचे प्रमाण गत तीन ते चार दिवसांपासून अचानक वाढले आहे. हे प्रमाण नियंत्रणात आणणे गरजेचे आहे. कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी पॉझीटीव्ह रूग्णाच्या हाय व लो रिस्क संपर्कातील सर्वांची कोरोना तपासणी करावी. त्यासाठी कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग वाढविण्यात यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी आज दिल्या.
कोरोना संसर्ग नियंत्रण कृती दलाची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया, अप्पर जिल्हाधिकारी दिनेश गिते, अप्पर पोलीस अधिक्षक बजरंग बनसोडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळकृष्ण कांबळे आदी उपस्थित होते.
कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग करून आरटीपीसीआर व रॅपिड चाचण्यांवर भर देण्याचे सांगत जिल्हाधिकारी म्हणाले, पॉझीटीव्ह रूग्ण असलेल्या गावांमध्ये मोबाईल टेस्टींग युनीट सुरू करावे. यासोबतच प्रत्येकाने बाहेर पडताना मास्क वापरणे, हात सॅनीटाईज करणे किंवा स्वच्छ धुणे, सोशल डिस्टसिंगचे पालन करणे या बाबींचा अवलंब करावा. जे कुणी बाहेर पडल्यानंतर मास्क लावणार नाही, सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टसिंगचे पालन करणार नाही, त्यांच्यावर स्थानिक स्वराज्य संस्था व पोलीस यंत्रणा दंडात्मक कारवाई करेल. तसेच शहरांमध्ये ज्या दुकानांसमोर सोशल डिस्टसिंग पाळले जाणार नाहीत किंवा तिथे विना मास्क ग्राहक दिसतील, अशा दुकानदारांवरसुद्धा करवाई करावी.
चाचण्यांचे प्रमाण वाढविण्याचे निर्देश देत जिल्हाधिकारी म्हणाले, एका पॉझीटीव्ह रूग्णामागे 15 हाय रिस्कमधील व 20 लो रिस्कमधील अशाप्रकारे 35 नागरिकांची तपासणी करावी. जेणेकरून कोरोना संसर्ग थांबविणे शक्य होईल. त्याचप्रमाणे सुपर स्प्रेडर असलेले दुकानदार, भाजीपाला विक्रेते तसेच ज्यांना लोक जास्त भेटतात त्यांच्या 100 टक्के तपासण्या बंधनकारकरित्या कराव्यात. अशा सुपर स्प्रेडरची महिन्यातून दोनवेळा तपासणी करावी. सध्या पॉझीटीव्ह रूग्णांना होम आयसोलेशन दिल्या जाते. ही सुविधा बंद करण्यात यावी. कारण असे रूग्ण बाहेर फिरतांना आढळतात. त्यांच्यामुळेही कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे आयसोलेशनची पुर्ण व्यवस्था आहे, त्यांनाच होम आयसोलेशन द्यावे. अन्यथा ही सुविधा देवू नये. तालुका स्तरावरील यंत्रणांनी समन्वय ठेवून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न करावे. तालुका स्तरावर कोविड केअर सेंटर सुरू आहेत. तरी पॉझीटीव्ह रूग्णांना आधी कोविड केअर सेंटर येथे दाखल करावे. कोविड केअर सेंटरमधील मनुष्यबळाला कन्ट्युनेशन द्यावे. दुर्धर आजाराने ग्रस्त नागरिकांची प्राधान्याने तपासणी करण्यात यावी.
ते पुढे म्हणाले, मलकापूर तालुक्यात पॉझीटीव्ह व मृत्यू दर जास्त आहे. तेथील यंत्रणांनी गांभीर्याने घेत कोरोना संसर्ग रोखावा. शहरात कुठेही हॉटस्पॉट होवू देवू नये. पॉझीटीव्ह आलेल्या रूग्णांची यादी तयार ठेवून त्यांच्या कुटूंबीय, कॉन्टॅक्टमधील नागरिकांची कोरोना चाचणी करावी. अशाचप्रकारे चिखली, खामगांव आदी ठिकाणीसुद्धा कारवाई करावी. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक, अप्पर जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांनीही आवश्यक त्या सुचना दिल्या. बैठकीला उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिक्षक आदींसह संबंधीत विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. बैठकीचे सादरीकरण अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे यांनी, तर आभार माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. गोफणे यांनी मानले.
************
शिवजयंती उत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा
- जिल्हा प्रशासनाचे आवाहन
बुलडाणा,(जिमाका) दि. 16 : येत्या 19 फेब्रुवारी 2021 रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती आहे. मात्र यावर्षी कोविड 19 या साथरोगामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीमुळे शिवजयंती उत्सव हा साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शिवजयंती उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनान केले आहे.
अनेक शिवप्रेमी किल्ला शिवनेरी अथवा गड / किल्ल्यांवर जावून तारखेनुसार 18 फेब्रुवारीच्या मध्यरात्री 12 वाजता देखील एकत्र येवून शिवजयंती साजरी करतात. मात्र संसर्गजन्य परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात एकत्र न येता साधेपणाने शिवजयंती उत्सव साजरा करावा. कोणत्याही प्रकारे प्रभात फेरी, बाईक रॅली, मिरवणुका काढण्यात येवू नये. त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करून त्या ठिकाणी सोशल डिस्टसिंगचे पालन करावे. अशा ठिकाणी 100 व्यक्तींच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्याची परवानगी देण्यात येत आहे.
त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारे सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याख्यान, गाणे, नाटक आदींचे सादरीकरण अथवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येवू नये. त्याऐवजी सदर कार्यक्रमाचे केबल नेटवर्क अथवा ऑनलाईन प्रक्षेपण उपलब्ध करून देण्याबाबत व्यवस्था करावी. शिवजयंतीच्या दिवशी आरोग्यविषयक उपक्रम, शिबिरे आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे. त्याद्वारे कोरोना, मलेरीया, डेंग्यू आजार व त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय, स्वच्छता याबाबत जनजागृती करावी. या ठिकाणी सोशल डिस्टसिंग, मास्क वापरणे व सॅनीटाईज करणे आदींचे पालन करावे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाने व स्थानिक प्रशासनाने विहीत केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे अप्पर जिल्हा दंडाधिकारी दिनेश गिते यांनी कळविले आहे.
*********
आर आर (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजनेचे बक्षीस वितरण
- जिल्हा सुंदर गाव स्पर्धेत माकोडी गावाला पारितोषीक
बुलडाणा,(जिमाका) दि. 16 : आर. आर. (आबा) पाटील यांचे पुण्यतिथी निमित्ताने आज 16 फेब्रुवारी रोजी सन 2019-20 अंतर्गत तालुका सुंदर व जिल्हा सुंदर गाव पुरस्कार योजनेचे बक्षीस वितरण करण्यात आले. या स्पर्धेच्या पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या श्री. छत्रपती शिवाजी सभागृह येथे आयोजित करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सौ. मनिषाताई पवार, उपाध्यक्ष सौ. कमलताई बुधवत, सभापती रियाजखॉ पठाण, जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्यश्री विसपुते, पं.स मोताळा सभापती प्रकाश बस्सी आदी उपस्थित होते.
याप्रसंगी जि.प अध्यक्ष मनिषाताई पवार म्हणाल्या, या स्पर्धेत सहभाग नोंदवित पारितोषिक मिळालेल्या ग्रामपंचायतींपासून अन्य ग्रामपंचायतींनी प्रेरणा घ्यावी. पुढील वर्षी आपली ग्रामपंचायतीला कसे पारितोषिक मिळेल, यादृष्टीने काम करावे. ग्राम विकासाच्या योजना अधिकाधिक प्रभावीपणे राबवून ग्रामपंचायतींनी आपली ग्रामविकासातील भूमिका अधोरेखीत करावी. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे यांनी केले. त्यांनी स्पर्धेची माहिती दिली.
सन 2019-20 चे उत्कृष्ट कामगिरी केलेले तालुका सुंदर गाव व जिल्हा सुंदर गाव स्पर्धेतील पारितोषिक विजेते ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामसेवक व विस्तार अधिकारी (पंचायत) यांना प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. या पुरस्कार योजनेतंर्गत राज्य शासनाकडून तालुका सुंदर गाव करीता 10 लक्ष रूपये व जिल्हा सुंदर गाव करीता 40 लक्ष रूपये पारितोषिक घोषीत करण्यात आले आहे. त्यानुसार पारितोषिक विजेत्या गावांना पारितोषिक रक्कमेचा धनादेश देण्यात आला. संचलन चंद्रशेखर जोशी यांनी तर आभार प्रदर्शन सहा. गट विकास अधिकारी भरत हिवाळे यांनी केले.
ह्या ग्रामपंचायती आहेत विजेत्या
जिल्हा सुंदर गाव पुरस्कार विजेती ग्रामपंचायत : माकोडी ता. मोताळा, तालुका सुंदर गाव पारितोषिक विजेत्या ग्रामपंचायती : बुलडाणा – हतेडी खु, चिखली – सावरगांव डुकरे, दे. राजा- खल्याळ गव्हाण, सिं. राजा- आडगांव राजा, मेहकर – आंध्रुड, लोणार – आरडव, खामगांव – वझर, शेगांव – खातखेड, संग्रामपूर- उमरा, जळगांव जामोद- सुनगांव, नांदुरा – खुमगांव, मलकापूर – विवरा, मोताळा – माकोडी.
No comments:
Post a Comment