Tuesday, 25 July 2017

NEWS 25.7.2017 DIO BULDANA

जिल्ह्यात ‘त्या’ एकाच मतदान यंत्रात तांत्रिक बिघाड
बुलडाणा, दि. 25 -  जिल्ह्यात फेब्रुवारी 2017 मध्ये जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक पार पडली. यावेळी लोणार तालुक्यातील सुलतानपूर गावात मतदान केंद्र क्रमांक 57/6 वर मतदानादरम्यान मतदान यंत्रामध्ये तांत्रिक बिघाड असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. सुलतानपूर येथील मतदान केंद्रावरील केवळ ‘त्या’ एकाच मतदान यंत्रात तांत्रिक बिघाड झाला होता. मतदान प्रक्रियेत वापरलेले इतर सर्व मतदान यंत्र योग्य होते. सर्व ठिकाणी प्रत्येक मतदान यंत्राची तपासणी करून ते सर्व यंत्र योग्य असल्याची खातरजमा करण्यात आलेली होती. त्यानंतरच मतदान प्रक्रिया पार पाडण्यात आली, असे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
     या मतदान केंद्राचे फेरमतदान घेण्यात येवून 23 फेब्रुवारी 2017 रेाजी निकाल घोषीत करण्यात आला. जिल्ह्यात 60 जिल्हा परिषद व 120 पंचायत समिती मतदारसंघासाठी निवडणूक झाली होती. या निवडणूकीकरीता 1691 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच 3 हजार 382 मतदान यंत्र उपयोगात आणण्यात आले. प्रत्येक मतदान केंद्रात जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघाकरीता स्वतंत्र मतदान यंत्र होती. त्यापैकी जिल्हा परिषद मतदारसंघासाठी उपयोगात येणारी सुलतानपूर येथील 57/6 मतदान केंद्रामधील मतदान यंत्रात बिघाड समोर आला. छेडखानी करण्यात आलेली नाही.  याच ठिकाणी पंचायत समिती मतदारसंघाकरीता उपयोगात येणाऱ्या मतदान यंत्रात कुठलाही बिघाड नव्हता. तसेच जिल्ह्यात उर्वरित 1690 मतदान केंद्रांमधून अशाप्रकारची कुठलीही तक्रार जिल्हा प्रशासनाकडे आली नाही. सुलतानपूरच्या प्रकरणाविषयी कुठलीही निवडणूकीविषयक याचिका दाखल झालेली नाही, असेही पत्रकात नमूद आहे.  
                                                                        *******
कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रति क्विंटल 100 रूपयांचे अनुदान मंजूर
·                    मलकापूर व नांदुरा बाजार समितीमध्ये कांदा विक्री केलेले शेतकरी
·                    शेतकऱ्यांनी बँकेचा तपशील तात्काळ बाजार समिती कार्यालयात सादर करावा
बुलडाणा, दि. 25 -  सहकार विभागाच्या 3 जुलै 2017 च्या शासन निर्णयानुसार कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 100 रूपये अनुदान शासनाने मंजूर केले आहे. शेतकऱ्यांनी त्यांचेकडील कांदा जुलै व ऑगस्ट 2016 मध्ये या दोन महिन्याच्या कालावधीत कृषि उत्पन्न बाजार समिती मलकापूर व नांदुरा येथे विक्री केलेला आहे. अशा पात्र शेतकऱ्यांना  सदर अनुदान मंजूर झाले असून ही रक्कम थेट पात्र शेतकरी यांचे बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. त्याकरिता पात्र शेतकरी यांनी त्यांचे बँक खाते क्रमांक, बँकेचे नाव, बँकेचा आयएफएससी कोड व आधार क्रमांक आदी तपशील संबंधीत कृषि उत्पन्न बाजार समिती कार्यालयात जमा करावा. जेणेकरून अनुदानाची रक्कम तात्काळ त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करणे शक्य होईल. तरी सदर पात्र कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांनी तात्काळ बँकेचा तपशील संबंधीत कृषि उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात सादर करावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी केले आहे.
                                                                        *******
जिल्ह्यात 27 जुलै ते 5 ऑगस्ट दरम्यान मौखिक कर्करोग सप्ताहाचे आयोजन
बुलडाणा, दि. 25 -  राष्ट्रीय असंसर्गजन्य कार्यक्रमातंर्गत 27 जुलै ते 5 ऑगस्ट 2017 दरम्यान मौखिक, डोके, मान व चेहरा कर्करोग जनजागृती सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. दरम्यान 27 जुलै रोजी जागतिक मौखिक कर्करोग दिन साजरा केल्या जाणार आहे. सप्ताहादरम्यान तंबाखू नियंत्रण कायद्याच्या अंमलबजावणीकरीता तंबाखूच्या दुष्पपरिणामाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणाऱ्यांविरोधात जास्तीत जास्त चलान भरण्याबाबत गृह विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रवृत्त करण्यात येणार आहे.  सप्ताहादरम्यान जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये आरबीएसके च्या मदतीने जनजागृती करून तंबाखूचे दुष्परिणाम सांगणारी पोष्टर स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. तसेच कॅन्सर वॉरिअर्सच्या मदतीने मौखिक आरोग्य शिबिर आयोजित करणे, कर्करोगावर समुपदेशन व प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करणे, आदी उपक्रमही राबविण्यात येणार आहे, असे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी कळविले आहे.
यशकथा

‘स्टॅण्ड अप इंडिया’..ने दिले ट्रॅव्हल्स व्यवसायाला बळ..
·                    सुवर्णा भालेराव यांची भरारी
   बुलडाणा, दि. 25 -  केवळ पांरपारिक व्यवसायांच्या साचेबद्ध कामांत महिला आघाडी घेत नसून आधुनिक व्यवसायाच्या जगातही आपला ठसा उमटवित आहे. अशा महिलांच्या कर्तबगारीला शासन विविध योजनांच्या माध्यमातून सहकार्य करते. केंद्र शासनाने महिलांना भरारी मिळवून देवून खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरणाचा नारा बुलंद करण्यासाठी स्टँण्ड अप इंडिया ही येाजना सुरू केली आहे. या योजनेतून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा महिला यांना 10 लक्ष रूपये ते 1 कोटी रूपयांपर्यंत कर्ज देण्यात येते. उत्पादन क्षेत्र, सेवा क्षेत्र यामधील व्यवसायांकरीता कर्ज प्रकरण मंजूर करण्यात येते. स्टँण्ड इंडिया या योजनेमध्ये जिल्ह्यात बुलडाणा येथील सुवर्णा धनजंय भालेराव यांचे पहिलेच कर्ज प्रकरण मंजूर झाले आहे. हे कर्ज प्रकरण बँक ऑफ इंडियाने मंजूर केले आहे.
     या योजनेचा लाभ घेत त्यांना 30 लक्ष रूपयांचे कर्ज प्राप्त झाले आहे. त्यांनी या पैशांमधून पतीचा आधीचा असलेला ट्रॅव्हल्स व्यवसायाला बळ देण्याचे ठरविले आणि बघता.. बघता एक ट्रॅव्हल्स.. आरामदायी बस खरेदी केली. त्यामुळे एका नवीन व्यवसायात त्यांना कर्तृत्व  सिद्ध करण्याची  संधी मिळाली. महिलेने पतीच्या ट्रॅव्हल्स व्यवसायामध्ये सहभाग घेवून संपूर्ण व्यवसाय स्वत: सांभाळत असल्याचे उदाहरण पाहावयास मिळाले. या पैशांमधून त्यांनी संपूर्ण सोयीयुक्त अशी प्रवाशांना आकर्षित करणारी बस सुरू केली. केंद्र शासन किंवा राज्य शासन महिलांच्या उत्थानासाठी विविध योजना राबवितात. या योजनांचा अनुकूल परिपाक म्हणजे सौ. सुवर्णा भालेराव यांचा ट्रॅव्हल्सचा व्यवसाय.. चाणक्य ट्रॅव्हल्स या समूहाचे नावाने त्यांनी ट्रॅव्हल्स सुरू केल्यात. प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी विविध संकल्पना त्या राबवितात.
   कर्ज प्रकरण मंजूर झाल्यानंतर बँक ऑफ इंडियाच्यावतीने त्यांचे सदर योजनेची पहिलेच प्रकरण मंजूर झाल्याबद्दल अभिनंदन केले. स्टँण्ड अप इंडियाच्या प्रोत्साहानामुळे बसचे चेसीज खरेदी करून आकर्षक बस बनविण्याचा निर्णय सुवर्णा भालेराव यांनी घेतला. बसचे चेसीज लखनऊ (उत्तर प्रदेश) येथून खरेदी करण्यात आले. त्यानंतर कर्नाटकातील बंगलोरजवळील जिगनी येथे बसची बांधणी करण्यात आली. जिगनी येथे कर्नाटक औद्योगिक वसाहतीमध्ये वीरा बॉडीजचा प्लँण्ट आहे. या प्लँण्टमधून बसची आकर्षक स्वरूपात निर्मिती करण्यात आली. एका आधुनिक व्यवसायाशी जुळल्यामुळे श्रीमती भालेराव यांनी सर्व सुविधांनीयुक्त एम . एच 28 एबी 9090 या क्रमांकाची बस बनविली.  हे सर्व काही निर्मिती झाली ती केवळ स्टँण्ड अप इंडिया योजनेमुळेच, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
    केवळ व्यवसाय करायचा म्हणून नाही, तर व्यवसाय आगळा ठरावा यासाठी बसमध्ये वाय फाय सुविधा, स्वत:च्या चाणक्य ब्रँण्डचीच पाण्याची बाटली, टि.व्ही सेट, स्वच्छ पांढरे ब्लँकेट आदी विनामूल्य सुविधा देतात. त्यामुळे बसकडे प्रवाशांचा ओढा वाढला आहे. एवढेच नव्हे, तर प्रवाशांना सुविधेबरोबरच सुरक्षा पुरविल्या जाते. सुरक्षीतेकरीता बस सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी सज्‍ज आहे. तसेच चालकांची वेळोवेळी वैद्यकीय तपासणी करून त्यांच्या सुरक्षेची काळजीही घेतल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. आज बुलडाणा येथून त्यांची पुणे, मुंबई येथे नियमित बस सुरू आहे. आपत्या पतीच्या व्यवसायात केवळ हातभार लावून कार्य करणाऱ्या महिला आपणास दिसतात. मात्र संपूर्ण व्यवसायच आपल्या खांद्यावर घेवून यशस्वीरित्या चालविणाऱ्या महिलांचे उदाहरणे एखादेच असते. त्यामध्ये निश्चितच सुवर्णा भालेराव यांचे नाव घेतल्या जाईल.
  बॅंकेत कागदपत्रांची जमवा-जमव करून प्रकरणाचा पाठपुरावा करणे. स्टँण्ड अप इंडिया योजनेची माहिती घेवून प्रकरण तयार करणे, बस खरेदी करणे, ट्रॅव्हल्स व्यवसायामध्ये असलेल्या नवीन ट्रेंण्डची माहिती घेवून त्या पद्धतीने अंमलात आणणे, परिवहन विभागाकडील बसची नोंदणी, कर भरणा व अन्य कामकाज सांभाळणे आदी कामे त्यांनी यशस्वीरित्या केली. त्यांच्या या यशामध्ये केंद्र सरकारची स्टँण्ड अप इंडिया योजना, बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय अधिकारी श्री. पिंप्रीकर, शाखा प्रबंधक विलास बावस्कर आदींचा मोठा सहभाग असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात मोठ्या  ट्रॅव्हल्स  कंपनीमध्ये या व्यवसायाचे रूपांतरण करून देशात टुर पॅकेजेस सुरू करणे. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रवासी पॅकेज देवून आकर्षक पर्यटन स्थळी पर्यटकांना नेणार असल्याचे त्यांचे नियोजन आहे. एका महिलेने पतीच्या व्यवसायात झोकून देवून काम करत आपला ठसा उमटविणारा सौ. भालेराव यांचा प्रवास प्रेरणादायी आहे.

                                                                            ************                    

No comments:

Post a Comment