कलांगण महिला बचत गटाने साकारला ‘रेशीम ज्वेलरी’चा व्यवसाय
· अनोख्या व्यवसायातून बचत गटाची उभारी
बुलडाणा, दि. 1 : पारंपारिक जीवनपद्धतीला तडा देत भारतीय नारी आता सर्व क्षेत्रात आपले नाव ठसवित आहे. आपल्या जीवनात सकारात्मकेची जोड देत अनेक महिला बचत गटांच्या माध्यमातून उन्नती करीत आहेत. अशा महिलांचे कार्य म्हणजे.. ‘महिलांना आता कुणीही कमी लेखू नये, असा दबदबा निर्माण करणारा आवाजच आहे’. शेळीपालन, दुग्धव्यवसाय, शेतमाल ग्रेडींग, रोपांची नर्सरी आदी व्यवसाय महिला बचत गटांमार्फत सुरू असल्याचे आपण ऐकले आहे. मात्र एका अनोख्या व्यवसायातून उभारी घेत असलेल्या खामगांव तालुक्यातील सुटाळा खुर्द येथील कलांगण महिला बचत गटाचे काम वेगळेच आहे. या गटाने रेशीमवर आधारीत ज्वेलरी निर्माण केली आहे. तसेच विलींग पेपरवरील कलाकुसरही त्यांची वाखाणण्यासारखी आहे.
खामगांवसारखे शहर जवळ असल्यामुळे या महिला बचत गटाला त्यांनी निर्माण केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळविणे सोपे गेले. रेशीम धाग्यांच्या गाठी आणून बचत गटातील महिला त्यापासून कानातील दागिणे, नाकातील नथणी, बांगड्या, हार, साडी पिन, तोरड्या आदी ज्वेलरी बनवितात. रेशीम व अन्य ज्वेलरीचे साहित्य जळगांव, मुंबई व अकोला येथून आणतात. त्यापासून प्रत्येक स्त्रीला आकर्षित करून घेण्याची क्षमता असलेले दागिण्यांची निर्मिती करण्यात येते. अशा या अनोख्या ज्वेलरीमुळे खामगांव व परिसरातील महिला बचत गटाच्या दागिण्यांची आतुरतेने वाट बघत असतात. बचत गटाच्या अध्यक्षा सौ. सविता किशोर देशमुख यांनी बचत गटाच्या माध्यमातून सुरू असलेला आधीचा व्यवसाय बंद करीत एका नवीन व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली.
सुटाळा खुर्द येथील महिलांना एकत्रित करीत आपल्या कला-गुणांच्या उपयोगातून नवीन उत्पादने करण्याचा निर्णय घेतला. त्यांना सचिव वैशाली देशमुख यांची समर्थ साथ लाभली. तसेच भाग्यश्री भूषण इगवे, रूपाली शालीग्राम टेकाडे, संगीता राजपूत, मेघा दूधे या महिला सदस्यांनी आपल्या कला-गुणांचे सादरीकरण करीत अनोखी रेशीम ज्वेलरी आकारास आणली आहे. एवढ्यावरच हा बचत गट थांबला नाही, तर विलींग पेपरद्वारे, प्लायवूडद्वारे लग्न समारंभासाठी लागणाऱ्या विविध वस्तू बनविण्यास गट अग्रेसर राहीला आहे.
लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असतो. अशा अविस्मरणीय प्रसंगाला लागणारे साजही महत्वाचे ठरतात. त्यामध्ये वर, वधू यांना लागणारे जेवणाची ताटे, बसण्यासाठी चौरंग यांचा प्रामुख्याने समावेश असतो. वऱ्हाडामध्ये लग्नात मुलींसोबत रूखवत देण्याची प्रथा आहे. या रूखवतामध्ये घर सुशोभीत करणाऱ्या वस्तू असतात. सदर वस्तू कलांगण महिला बचत गट उत्कृष्टरित्या बनवितो. त्यामध्ये वर-वधूचे ताट, चौरंग, दरवाजाचे तोरणे, लोकरीच्या पर्स, आकर्षित करणारी बैलजोडी, घरात दर्शनी भागात ठेवण्याच्या वस्तू, लाईटच्या व्यवस्थेसह असलेले दिवे, वर-वधूंचे श्रृंगार साहित्या आदींचा समावेश आहे. सध्या बनविलेल्या वस्तूंपेक्षाही जास्त मागणी या बचत गटाकडे आहे. केवळ खामगांव व परिसरापूतेच कलांगण महिला बचत गटाच्या वस्तू मर्यादीत नाही, तर जिल्ह्यात वस्तू विक्रीस जात आहे. स्टेशनरी दुकांनामधूनही ही रेशीम ज्वेलरी आता चांगलाच भाव खावून जात आहे. महिलांच्या अप्रतिम सृजनशीलतेला नक्कीच चांगला दर मिळत आहे. दिवाळी, रक्षाबंधन, दसरा, गणेशोत्सव, गौरी पूजन, मकरसंक्रांत आदी सणांच्या दिवसात मोठ्या प्रमाणावर नवनवीन वस्तू हा बचत गट तयार करीत असतो. या बचत गटाला आयडीबीआय बँकेकडून कर्जपुरवठा करण्यात येणार आहे. बँकेचे पासबूक तयार झाले असून गटाचे काम बघून बँकेने त्यांना अर्थपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.
कलांगण महिला बचत गट कच्चा माल व लागणारी मजूरी वजा जाता चांगला नफा मिळवित आहे. विलींग पेपरवरील कलाकुसर, तर या बचत गटाची अगदी दर्जेदार आहे. महिलांचे बाजूबंद, बिंदीया, साडी पिन, हार, कानातील दागिणे असे कितीतरी वस्तू हा बचत गट तयार करून आपले नावाचा वेगळा ठसा उमटवित आहे.
केवळ पारंपारित व्यवसायात गुंतून संथ गतीने आर्थिक विकास साधणारे अनेक बचत गट आहेत. मात्र अशा कल्पक व्यवसायातून कलांगण महिला बचत गटाचे कार्य वेगळेपण जपणारे आहे. त्यांच्या या व्यवसायातून अनेक महिलांना प्रेरणा मिळत आहे. खामगांव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या या बचत गटाला विविध प्रदर्शनांमधूनही वस्तू विक्रीची संधी मिळत आहे. तरी कल्पक कामाचे कौतुक होणे स्वाभाविक आहे आणि ते होत आहे..
*****
चळवळ वृक्षारोपणाची.. पायाभरणी हरीत महाराष्ट्राची
· जिल्ह्यात वृक्षारोपणाचा सर्वदूर कार्यक्रम
· जिल्हाधिकारी यांनी केले वृक्षारोपण
· जिल्ह्यात गुंजला हरीत महाराष्ट्राचा गजर
बुलडाणा, दि. 1 - राज्य शासनाने हरीत महाराष्ट्राच्या पायाभरणीसाठी महत्वांकांक्षी चार कोटी वृक्षलागवड कार्यक्रम हाती घेतला. यावर्षी वृक्षारोपणाचा कार्यक्रम 7 जुलै 2017 पर्यंत म्हणजेच सप्ताहाभर चालणार आहे. त्यानुसार आज 1 जुलै 2017 रोजी जिल्ह्यात सर्वदूर वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालय, जिल्हा परिषद, प्राथमिक आरोग्य केंद्र, स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यालये, खाजगी व्यवस्थापनांची कार्यालये, खुली जागा, कृषि उत्पन्न बाजार समिती परिसर, आयटीआय, वन विभागांचे आगार आदी ठिकाणी प्रामुख्याने वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपण मोहीमेला जिल्ह्यामध्ये लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त झाले होते.
जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आज सर्वप्रथम जिल्हाधिकारी निवासस्थान परिसरात वृक्षारोपण केले. त्यानंतर खामगांव रस्त्यावरील सामाजिक वनीकरण विभागाच्या वृक्षारोपण केलेल्या साईटजवळ जिल्हाधिकारी यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन एस, उपवनसंरक्षक बी. टी भगत, सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक पी. के बागूल आदींसह वन व सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात अप्पर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तहसील कार्यालय, उपनिबंधक कार्यालय आदी ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हाधिकारी यांनी वृक्षारोपण केले म्हणजे संपले असे नाही, तर या रोपट्यांचे वृक्षात रूपांतर कसे होईल याची काळजी घेतली पाहिजे. वृक्ष जगविण्यास येणाऱ्या अडचणींवर मात करून भावी पिढीसाठी वृक्षांचे संवर्धन करण्याचे आवाहनही त्यांनी वृक्षारोपणाप्रसंगी केले.
शाळा-शाळांमधून याआधीच वृक्षदिंडी काढून वृक्षारोपणाचे महत्व पटवून देण्यात आले आहे. चिमुकल्या विद्यार्थ्यांनीही वृक्षारोपण केले. या हरीत महाराष्ट्र चळवळीमध्ये बुलडाणा जिल्हा आज अक्षरश: हिरवागार झाला. अशाप्रकारे जिल्ह्यात उपविभागीय अधिकारी कार्यालये, तहसील कार्यालये, विविध विभागांची तालुका कार्यालये, पोलीस स्टेशन, शासकीय रूग्णालये, नगर पालिका आदी ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, नागरिक, पत्रकार सर्वांनी हिरीरीने सहभाग घेतला.
*******
वसंतराव नाईक यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
बुलडाणा, 1 : हरितक्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंती दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात अप्पर जिल्हाधिकारी शिवानंद टासाळे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे, निवासी उपजिल्हाधिकारी ललीत वराडे, जिल्हा पुरवठा अधिकारी बी. यु काळे आदींसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment