नाबार्डच्या
जलदूत प्रशिक्षण कार्यक्रमात जिल्हा राज्यात अव्वल
·
607 गावांत
उपक्रम,
·
52 जलदूतांनी
केली जलजागृती
बुलडाणा, दि.15 : नाबार्डच्यावतीने जिल्ह्यात 607 गावांमध्ये ‘पाणी हेच जीवन’ हा
उपक्रम जलजागृती संदर्भात राबविण्यात आला आहे. हा उपक्रम राबविण्यामध्ये जिल्हा
राज्यात अव्वल ठरला आहे. राज्यामध्ये 16 जिल्ह्यांमध्ये नाबार्डच्या माध्यमातून
जलजागृतीकरीता सदर उपक्रम राबविण्यात आला. त्यामध्ये जिल्ह्याने भरारी घेत अव्वल
स्थान पटकाविले आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी नाबार्डने जिल्ह्यात
52 जलदूतांची निवड केली. प्रत्येक तालुक्यात
दोन टिमने हे जलजागृतीचे काम केले. या कृषी
जलदूत प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप
नुकताच बुलडाणा रेसीडेन्सी क्लबच्या सभागृहात पार पडला. सदर कार्यक्रम दोन सत्रात
घेण्यात आला. त्यामध्ये पहिल्या सत्रामध्ये बुलडाणा अर्बनचे सुकेश झंवर, एसबीआयचे
क्षेत्रीय प्रबंधक के. एल कुळकर्णी, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक श्री. श्रोते, नाबार्डच्या
पुणे क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक महाप्रबंधक अशोक जाधव, केंद्रीय पर्यावरण शिक्षण
केंद्राच्या सुप्रिया निशांदकर, नाबार्डचे जिल्हा प्रबंधक सुभाष बोंदाडे आदी
उपस्थित होते.
या
सत्रामध्ये सुकेश झंवर, सुप्रिया निशांदकर, श्री. कुळकर्णी आदी मान्यवरांनी जलदूतांनी
केलेल्या जल जागृतीच्या कामावर समाधान व्यक्त केले. या उपक्रम राबविण्यामध्ये
दाखविलेले सातत्य जिल्ह्याला अव्वल क्रमांकावर घेवून गेलयाबद्दल त्यांचे अभिनंदन
केले. सद्यस्थितीत जलजागृतीचे महत्व सर्वांना
पटले आहे. जलजागृती करून प्रत्येकाने भविष्यात येणाऱ्या जलसंकटाविषयी नागरिकांना
अवगत करावे. जलसाक्षरता अत्यंत महत्वाची असून भविष्यात पाण्यामुळे संघर्ष तीव्र होणार
आहे, असे मतही मान्यवरांनी यावेळी व्यक्त केले.
याप्रसंगी श्री. बोंदाडे यांनी पाणी हेच जीवन
हा उपक्रम जिल्हाभर प्रभावीपणे राबविल्याबद्दल कौतुक केले. या अभियानात जलदूतांनी गावकऱ्यांना पावसाचे पाणी अडविणे,
पाणी पुनर्भरण करणे, पावसाच्या पाण्याचा संचय करून उपयोग करणे आदी बाबींवर दिलेल्या
प्रशिक्षणामुळे या पावसाळयात अधिकाधिक शेतकरी पावसाचे शेतातून वाहून जाणाऱ्या पाण्याला
थांबवतील, थांबलेल्या पाण्याला मुरवतील आणि भूजल पातळी वाढवितील, अशी अपेक्षाही
त्यांनी व्यक्त केली. यावेळी शेतकऱ्यांना पीक
घेताना पावसात खंड पडल्यास सिंचनाचे नियोजन करण्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
दुसऱ्या
सत्रामध्ये पर्यावरण शिक्षण केंद्र, अहमदाबाद येथील भिमाशंकर ढोले, जलतज्ज्ञ
रामकृष्ण पाटील, अशोक जाधव, विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे प्रबंधक सुनील पांडे, महाराष्ट्र
बँकेचे मुख्य व्यवस्थापक प्रविण पुरके आदींनी मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रामध्ये
पाणी मुरविण्याच्या पद्धतींवर प्रकाश टाकण्यात आला. कार्यक्रमाचे आभार नाबार्डचे
जिल्हा प्रबंधक सुभाष बोंदाडे यांनी केले. यावेळी जलदूत, प्रशिक्षणार्थी, विविध
बँकाचे अधिकारी आदी उपस्थित होते.
*****
जागतिक युवा कौशल्य विकास दिनानिमित्त
जनजागृती रॅली
·
आयटीआयमध्ये
समारोपीय कार्यक्रम
बुलडाणा, दि.15 : जागतिक युवा कौशल्य विकास दिन 15 जुलै रोजी जगभरात साजरा करण्यात येतो. या दिनानिमित्त शहरातही
कौशल्य विकासविषयक जनजागृती करण्यासाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीचा शुभारंभ जिल्हाधिकारी
कार्यालयापासून करण्यात आला. तर समारोप आयटीआय बुलडाणा येथे करण्यात आला. रॅलीला
जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन,
कौशल्य विकास विभागाचे सहायक संचालक डी.एल
ठाकरे आदींसी विद्यार्थी, प्राध्यापक वर्ग यांच्या उपस्थितीत हिरवी झेंडी
दाखविण्यात आली.
या
रॅलीचे आयोजन जिल्हा कौशल्य विकास केंद्र, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था
बुलडाणा, व्यवसाय शिक्षण देणारे महाविद्यालय, सूचीबद्ध कौशलय विकास प्रशिक्षण संस्था
आणि नगर परिषद बुलडाणा यांच्यावतीने करण्यात आले.
रॅलीमध्ये प्रमोद
महाजन कौशल्य विकास योजना, राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानातंर्गत प्रशिक्षण घेणारे
लाभार्थी, आयटीआयचे विद्यार्थी यांचा सहभाग होता.
रॅलीचे उद्घाटन करताना जिल्हाधिकारी म्हणाले, प्रशिक्षणार्थ्यांनी
आपल्या कौशल्याची गती कायम ठेवावी. तसेच कौशल्य प्राप्त करून आपल्या क्षेत्रामध्ये
प्रविण व्हावे. जेणेकरून भावी आयुष्यात कुठल्याही प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे
लागणार नाही. या रॅलीचा समारोपीय कार्यक्रम आयटीआय येथे करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा
उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक श्रीमती सोनाली देवरे, जिल्हा व्यवसाय व प्रशिक्षण
अधिकारी सी. एल वानखडे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी प्रास्ताविक सहायक संचालक श्री.
ठाकरे यांनी केले. ते म्हणाले, कौशल्य प्राप्त करून स्वयंरोजगार उभारावा. कौशल्य विकासामुळे
नोकरी मागणारे, नाही तर आपण नोकरी देणारे होतो. हा बदल तुमच्या आयुष्यात होणार आहे.
श्रीमती देवरे यांनी प्रशिक्षणानंतर स्वयंरोजगाराच्या वेगवेगळ्या वाटा या विषयावर
मार्गदर्शन केले. याप्रसंगी उत्कृष्ट प्रशिक्षण देणाऱ्या तसेच जास्तीत जास्त उमेदवारांना
रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या गुरूकुल
कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजीचे संचालक सचिन सुपे, एसबी टेक्नॉलॉजी धाडचे संचालक शरद
बावीस्कर यांचा मानपत्र देवून सन्मान करण्यात आला. तसेच प्रशिक्षण घेवून उत्कृष्ट रोजगार अथवा स्वयंरोजगार प्राप्त करणाऱ्या
विद्यार्थ्यांचा एलईडी दिवे देवून सत्कार करण्यात आला.
संचलन श्री. कंडारकर यांनी, तर आभार प्रदर्शन
प्राचार्य प्रकाश जैस्वाल यांनी केले. याप्रसंगी श्री. मोटघरे, श्री. पवार, श्री.
गोसावी, श्री. कुटे, श्री. लोकरे, शिवाजी व जिजामाता महाविद्यालयाचे शिक्षक, विद्यार्थी
यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मतीन शेख, सचीन सुपे, दादाराव
पगारे, श्री. शिरसाठ, विनोद जाधव, श्रीमती गायकवाड, अरूण देशमुख यांनी प्रयत्न
केले.
*******
राज्याचा ऑलिम्पीकमधील टक्का वाढण्यासाठी आता ऑलिम्पीक
व्हिजन कृती आराखडा
·
2020 च्या
ऑलीम्पीकवर लक्ष
·
जिल्ह्यातील
खेळाडूंनी आपली वैयक्तिक माहिती सादर करावी
बुलडाणा, दि.15 : राज्य शासनाच्या क्रीडा विभागामार्फत राज्यातील
खेळाडूंचा ऑलिम्पिक स्पर्धेतील टक्का वाढविण्यासाठी राज्य शासन विविध उपाययोजना
आखत आहे. तसेच खेळाडूंचा डाटाही तयार करीत आहे. त्या अनुषंगाने जिल्हा निहाय प्राविण्यप्राप्त
सर्व गटातील खेळाडूंची वैयक्तिक व खेळांबाबतची माहिती एकत्रित होण्यास गुगल फॉर्म
तयार करण्यात आला आहे. राज्य शासनाने 2020 च्या ऑलिम्पिक स्पर्धेवर लक्ष केंद्रीत केले असून त्यामुळे शासन ऑलिम्पिक व्हिजन
कृती आराखडाच तयार करीत आहे. त्यानुसार खेळाडूंनी आपली वैयक्तिक व खेळाची माहिती http://goo.gl/
GN csBN या लिंकवर उपलब्ध करून दिलेल्या फॉर्ममध्ये सादर करावी.
सर्व गटातील प्राविण्यप्राप्त खेळाडू, पालक, शाळा , महाविद्यालय, संस्था, मंडळ त्यांचे
प्रशिक्षक यांनी या शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर दिलेल्या लिंकवर जावून आपली माहिती
भरावी व सदर माहितीची एक प्रत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडे फोटोसह सादर
करावी. सन 2016-17 मध्ये सर्व गटात खेळनिहाय व सर्व स्तरावरच्या स्पर्धांमध्ये प्रथम,
द्वितीय व तृतीय क्रमांकाचे प्राविण्यप्राप्त खेळाडू यांनी आपली माहिती फॉर्ममध्ये द्यावी.
तसेच दिव्यांग खेळाडूंनी आपली कामगिरी फॉर्ममध्ये देण्यात आलेल्या खेळप्रकारानुसार
भरावी. याबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जांभरून रोड, बुलडाणा
येथे संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांनी केले आहे.
******
शासकीय तंत्र
कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश सुरू
बुलडाणा,दि. 15 : शासकीय तंत्र माध्यमिक शाळा केंद्र
तथा कनिष्ठ महाविद्यालय गणेश नगर, बुलडाणा येथे ऑगस्ट 2017 च्या प्रवेशपत्रासाठी इयत्ता
11 वीची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या संस्थेत इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी
या अभ्यासक्रमाकरीता 30 जागा आहेत, तर मेकॅनीकल टेक्नॉलॉजी कोर्सकरीता 30 जागा
आहेत. तसेच कॉम्प्युटर टेक्नीक्स करीता 30 जागा आहेत. त्यासाठी इयत्ता 10 वी
उत्तीर्ण किंवा एटीकेटी प्राप्त विद्यार्थी असणे आवश्यक आहे. तरी इच्छूक विद्यार्थ्यांनी
प्रवेश घ्यावा, असे आवाहन मुख्याध्यापक यांनी केले आहे.
*******
जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीचे आयोजन
बुलडाणा, दि. 15 :
जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली 20
जुलै 2017 रोजी जिल्हाधिकारी
कार्यालयाच्या सभागृहात सकाळी 11
वाजता करण्यात आले आहे. तरी जिल्हा ग्राहक
संरक्षण परिषदेच्या अनुषंगाने असलेल्या तक्रारी पुराव्यासह दोन प्रतीत लेखी
स्वरूपात बैठकीत सादर कराव्यात, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी केले आहे.
*****
तासिका तत्वावरील शिक्षक पदासाठी 20 जुलै रोजी
मुलाखती
बुलडाणा,दि. 15 : शासकीय तंत्र माध्यमिक शाळा केंद्र मलकापूर रोड, बुलडाणा या
संस्थेत तासिका तत्वावर सत्र 2017-18 करीता निव्वळ तात्पुरत्या
स्वरूपात शिक्षक पदाकरीता मुलाखतीचे आयोजन
करण्यात आले आहे. सदर मुलाखतींचे आयेाजन 20 जुलै 2017 रोजी सकाळी 11 वाजता शासकीय
तंत्र माध्यमिक शाळा केंद्र, मलकापूर रोड, बुलडाणा येथे करण्यात आले आहे.
मराठी व इंग्रजी विषयाकरीता प्रत्येकी एका शिक्षक पदासाठी एम.ए. बी. एड द्वितीय
श्रेणी पात्रता आवश्यक आहे. तसेच जनरल फाऊंडेशन विषयाच्या एका पदाकरीता एम.कॉम,
बी.एड द्वितीय श्रेणी, एम.एस.सी.आय.टी उत्तीर्ण असणे आवश्यक असून सहायक अधिव्याख्याताकरीता
एक पदासाठी यंत्र अभियांत्रिकी पदविका पाहिजे. तरी इच्छूक उमेदवारांनी उपरोक्त
दिवशी उपस्थित रहावे, असे आवाहन मुख्याध्यापक यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment